उणिव 2

खरंतर लग्नाआधीच जर निर्मलावर एवढी बंधनं लादली जात होती तर लग्नानंतर काय होईल असे निर्मलाला वाटत होते. ती आईला म्हणालीच,

“मला हे लग्नच करायचे नाही.”
“मग काय करतेस. अशीच रहाणार का आयुष्यभर?”

“जगातली सगळी मुलं संपली?”

“अगं लग्न जमल्याचा बोभाटा गावभर झालाय, अन् आता दुसरीकडे लग्न जमवायचे काही सोपे नाही.”

“अगं म्हणून मी आयुष्यभर सगळे नियम पाळत बसू का?” “समाज काय म्हणेल, लोकं तोंडात शेण घालतील. दुसरं स्थळ मिळणंही कठीण.”

“समाज काय चांगलं केलं तरी नावे ठेवतो अन् वाईट वागलं तरी नावच ठेवतो. आपण योग्य काय अयोग्य काय ते ठरवायचं.” “माझे आई, तुला जसं पाहिजे तसं कर पण कमीत कमी तुझ्या लहान बहिणींचा तरी विचार कर.”

“म्हणजे माझ्या आयुष्याचं काही का होईना. मी फक्त दुसऱ्याचा विचार करायचा.”

“अगं, तुझ्या बापाने केला नाही आपला विचार. मग कमीत कमी तू तरी विचार कर आपल्या बहिणींचा. आणि शेवटी तुझी मर्जी. मी जास्त काही सांगत नाही. तू या लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी पाण्याचा घोट देखील घेणार नाही.”

“आई, तू मला कात्रीत पकडायला लागलीस. पण माहेर विसरून सासरीच रहायचं सोप्पं नाही गं!”

“अग, निर्मला तुला वाटतं का, माझ्यासाठी हे सारं सोपं आहे. पण काय करू, एकटी बाईमाणूस मी. परिस्थितीशी दोन हात करायचे कधी माहीत नाही. पण देवाने माझी सत्वपरीक्षाच घ्यायची ठरवली. मग मला उतरलंच पाहिजे.’
अन् आईचे डबडबलेले डोळे पाहिले अन् एवढ्या वेळ हिमतीने बोलणारी निर्मला आता भावुक झाली. आईच्या गळ्यात जाऊन पडली. खूपखूप रडली. तेवढ्यात आई म्हणाली,
“निर्मला, तू सगळ्यात मोठी आहेस. समजदार आहेस. सांग पोरी कपाळावर अभिमानाने कुंकू लावते पण माझा धनी मला असा दुःखाच्या खाईत लोटून किती धाडसाने विचार न करता निघून गेला. का विचार केला नाही त्याने येणाऱ्या परिस्थितीचा. कशी करेल ही म्हणून जरा तरी विचार करायचा होता.’

बोलता बोलता आईचा थरथरणारा आवाज, अन् जीवाची होणारी घालमेल निर्मलाच्या चांगलीच लक्षात येत होती. म्हणूनच यानंतर कमीत कमी आपण तरी आईला त्रास होईल असं वागायचं नाही असा तिने मनाशीच निश्चय केला. अन् ती आईला पुन्हा कधीही एक शब्दही बोलली नाही. लग्नात फक्त मुलगी अन् नारळ असंच ठरलं होतं. निर्मलाच्या आईने बाकीचाही मानपान आपल्या परिस्थितीनुसार करायचा ठरवले. शेवटी कुरबुर करत का होईना लग्न पार पाडावं लागणार होतं. लग्नाची तारीख समिप आली तशी निर्मला अन् तिच्या बहिणींच्या मनाची चलबिचल वाढली. निर्मला सासरी जाणार आणि तीही कायमची. साऱ्यांनाच हा निर्णय मान्य करणे जरा अवघड जात होते. निर्मला आता सौभाग्यकांक्षिणी होणार होती. एका वेगळ्या नात्यामध्ये गुंतणार होती. तरीही माहेरची माणसं म्हणजे स्त्रियांसाठी खूप अनमोल असतात. अन् त्यांनाच विसरायचं म्हणजे निर्मलाची सत्वपरीक्षाच होती. म्हणतात ना सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट हा सर्व सुखसोई असूनही आनंदी नसतो. याउलट जंगलातल्या पक्षाला स्वतः भटकून अन्नाचा शोध घ्यावा लागतो तरीही तो समाधानी असतो. सोन्याच्या पिंजरातल्या पोपटासारखी अवस्था निर्मलाची झाली होती. निर्मलाच्या सासूबाईंचा स्वभाव थोडा विचित्रच होता. नको तिथे त्या काटकसर करत होत्या. लग्नाआधी नवरी मुलीला आणण्यासाठी त्यांनी घरात गाडी असून देखील रिक्षा पाठवली. उद्देश काय तर गाडी म्हटलं की जास्त माणसं येतील त्यापेक्षा रिक्षात जास्तीत जास्त चार माणसं. बस! खरंतर दोन्ही घरातलं हे पहिलंच लग्न होतं. त्यामुळे हौस-मौज भरपूर प्रमाणात होत होती. नवरी बरोबर जायचं म्हणून तर तिच्या दोन बहिणी एक वयस्कर बाई अन् नात्यातल्या एक दोघी तयार होऊन बसल्या. पण रिक्षा घेऊन आल्याचं पहाताच नाराज झाल्या. न्यायला येणारी व्यक्तीच अवघडून गेली. नवरी सोबत फक्त एकजण चलावं अशी त्याने विनंती केली. यावर निर्मलाने सोबत एक बहीण अन् नात्यातल्या वयस्कर काकू यांना सोबत घेतले. खरंतर निर्मला खूप काही बोलणार होती. पण आईमुळे शांत झाली. तरी शेवटी ती आईला म्हणाली, “तू माझ्या सासूपुढे एवढी पडती बाजू का घेतेस. त्यांनी म्हणलेली प्रत्येक गोष्ट तू मान्य करणारच का?”

यावर निर्मलाच्या आईने मानेनेच होकार दिला. “पोरी, जाऊ दे, असतो एखाद्याचा स्वभाव. आपली परिस्थिती चांगली असती तर…. असू दे शेवटी काय देवाजीच्या मनात असेल तेच घडणार. उगीच वाईट वाटून घेऊ नको.”

निर्मलाने आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अन् आईच्या गळ्यात पडली. एक एक करून साऱ्या बहिणींची गळाभेट घेतली. केवढं प्रेम भरून ओसंडत होतं त्या एवढ्याशा घरात. प्रेमाने घर जणू तुडुंब भरलं होतं. आलेली व्यक्ती सारं पहात होती, ऐकत होती. क्षण अन् क्षण अनुभवत होती. न राहवून ती व्यक्तीच शेवटी म्हणाली,

“मला काय मी तुम्हा साऱ्यांना न्यायला तयार आहे. पण मामींनी फक्त रिक्षापुरतेच पैसे माझ्याकडे दिले. जास्त पैसे दिले असते तर ……”

साऱ्या बहिणी उदास झाल्या होत्या पण आईला वाईट वाटेल म्हणून त्यांनी वातावरणातला ताण कमी होण्यासाठी हसतमुख चेहऱ्याने साऱ्यांचा निरोप घ्यायचे ठरवले. निर्मलाला हे शक्य वाटत नव्हते. तिच्या मनात विचारांचा गुंता झाला होता. सासरी गेल्यावर माहेरच्या माणसांना सोडून रहाणे खूपच कठीण. त्यातूनही त्यांना कायमचे विसरायचे म्हणजे आपल्याच्या ते शक्य होईल का? काही पण असो पण देवाने आपल्याला चांगलेच पेचात पाडलेय. मनावरचे दडपण थोडे दूर करण्याचा प्रयत्न करून बहिणीची अन् आईची तिने पुन्हा गळाभेट घेतली. त्या छोट्याशा घरात  लहान खोली असली तरी त्यांच्यासाठी तो खूप मोठा बंगला होता. जिथे माया, प्रेम, त्याग होता. माया असणाऱ्या ठिकाणी एक तीळ सात जण खातात मग इथं तर सारे एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायलाही तयार होते. शेजारी साऱ्यांना सांगून घरात सर्वांचा निरोप घेऊन जड मनाने निर्मला रिक्षात बसली. हा प्रसंग साऱ्यांना जड चालला होता. पण कर्तव्य कुणाला चुकलीत का? निर्मला साऱ्यांचा निरोप घेऊन रिक्षात बसून निघून गेली. रिक्षा धूर, धूळ, उडवत लांब लांब निघून गेली.

निर्मला गेली खरी पण सोडायला म्हणून बाहेर आलेल्या कुणाला घरात जाऊच वाटेना. घरातलं काही तरी हरवलं असं वाटू लागलं. घर मोकळं मोकळं वाटू लागलं. सर्वांनी कामाच्या नादात मनात नसतानाही चार घास खाऊन रात्र काढली अन् दुसऱ्या दिवशी सारे वऱ्हाडासहीत लग्नाच्या ठिकाणी हजर झाले. निर्मलाच्या आईच्या मनात विचारांनी गोंधळ घातला होता. लेकीशिवाय रात्र त्यांना खूप जड गेली. आज ती दिसणार त्या तिला बोलणार म्हणून त्यांनी ती सहन केली. सासरी लेक गेल्यावर ती एका सणाला आली की नंतर पुढच्या सणाला येईलच या आशेवर माहेरची माणसं कसेतरी दिवस काढत असतात. सासुरवाशीणीला सण हे एक कारणच असतं माहेरी येण्याचं. नंतर एखाद मुलं झालं की त्याच्या कोडकौतुकात वर्षे जातं अन् बघता बघता सासूरवाशीण त्या घरातली होऊन जाते. पण…. पण त्यांच्या निर्मलाचं काय? या एका गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटत होतं. शेवटी नाइलाजाने का होईना त्यांना सारी परिस्थिती मान्य करावीच लागली. त्या विचारांच्या तंद्रीत असतानाच साखरपुडा अन् टिळा कार्यक्रमासाठी कोणीतरी बोलवायला आले. रीतीप्रमाणे सारे काही त्यांनी आणले होते. तसे तर ठरले काही नव्हते, पण एक रीत म्हणून जे जे असते ते त्यांनी मनानेच आणले होते. तरीही सासरकडची मंडळी काही ना काही कारण शोधून हळूहळू का होईना धुसपुस करत होती. निर्मलाने याचा अनुभव घेतला होता. पण आईने सांगितले होते ना. “पोरी, ऐकल्यानं अंगाला छिद्र पडत नाहीत. पुढच्याने जरी बोलले तरी उलट उत्तर द्यायचं नाही. आजची वेळ उद्या रहात नसते. हळूहळू तुझी
सासूही बदलेल.” निर्मलाला मात्र आपण हे किती काळ सहन करू शकू असे मनातून वाटत होते. शेवटी आईचे संस्कार म्हणून ती गप्प होती.

मंगल सनईचा सुस्वर कानी येऊ लागला. सर्वांच्या हातात अक्षता होत्या. समोर स्टेजवर नवरा-नवरी, भटजी अन् दोन्हीकडच्या एक-एक करवल्या. स्टेजवर आकर्षक सजावट केली होती. आटोपती माणसं असल्यामुळे लग्नाला आलेल्या प्रत्येकाला नवरा अन् नवरी स्पष्ट दिसत होते. एक एक मंगलाष्टका होऊ लागल्या. तस तसे मनाला आवर घातलेल्या निर्मलाच्या बहिणी, आई आणि स्वतः त्यांना आपल्या भावनांना आवर घालणे अवघड झाले. डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहू लागले. आपण आज खऱ्या अर्थाने परके झालो याची जाणीव त्यांना झाली. रडून त्यांचा चेहरा लालभडक झाला होता. एवढ्यात सासूबाईंनी जरा जवळ उभारून पण मोठ्यानं सांगितलं,

“मंगल प्रसंगी असं रडून काय होणार, माझी सून पहायला सारे इथपर्यंत हौसेनं आलेत. अजिबात रडायचं नाही. लग्न झाल्यावर सारे पाहुणे गेल्यावर माय लेकी तासभर रडा. मी खास तुमच्यासाठी इथंच थांबते, मात्र आता शांत व्हा. सूनबाई माझा लेक काय विचार करेल. माझ्याशी लग्न झाल्याचं हिला आवडलं नाही की काय, म्हणून एवढं रडतेय.”

सासूबाई एवढं सगळं बोलल्या खरं. निर्मलाच्या मनात विचार आलाच. खरंच यांचं लग्न झालं त्यावेळेस लग्नात या रडल्या असतील की नाही. मग स्वतःवरून या माझी स्थिती का ओळखत नाहीत. पण शेवटी काय सासूबाईंची सूचना शिरसावंद्य मानून मनात नसलं तरी सारेच शांत झाले. लग्नाचे एक एक विधी उरकत होते.

इकडे वऱ्हाडींची जेवणं उरकत होती. लग्न मोठ्या धामधुमीत झालं. निर्मलाच्या आईला मनातून तरी सासरच्या लोकांविषयी थोडाफार विश्वास वाटत होता. ‘ही मंडळी आपल्याशी कशी का वागेना पण आपल्या मुलीला सुखात ठेवणार एवढं खरं. आपलं काय, एक एक कर्तव्य पूर्ण करण्यातच आयुष्य संपणार.’ असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले.

बघता बघता दुपारचे चार वाजले. लग्नाचं वऱ्हाड हळूहळू पांगलं. अन् – माहेरची मंडळी निघणार असल्याने निर्मलाचं लक्ष काही फोटो काढण्यात लागेना. फोटोवाला मात्र ‘वहिनी, दादांच्या खांद्यावर हात ठेवा बरं. जरा डोके तिरके करा, वा छान हसा पाहू थोडसं.’ त्याच्या सूचना सुरूच, निर्मलाला मात्र हे सारे सोडून पटकन पळत जाऊन आई आणि बहिणीच्या गळ्यात पडावेसे वाटत होते. पण आता ती पूर्वीसारखी स्वतंत्र राहिली नव्हती. तिने हळूच नवऱ्याजवळ परवानगी मागितली.

“मी दोनच मिनिटात आईला अन् बहिणींना भेटून येऊ.” यावर राजेशने मानेनेच होकार दिला. निर्मला बहिणी व आईजवळ आली अन् साऱ्यांना आपल्या भावना आवरणे अशक्य झाले. बराच वेळ त्यांचा भेटीचा कार्यक्रम चालू होता. त्यांच्या साऱ्यांच्याच मनात एक वेगळीच रुखरुख होती. यानंतर हे सारे आपणास केव्हा भेटतील कोणास ठाऊक? निर्मलाच्या माहेरची गाडी निघाली अन् काकूंना समजून सांगण्यासाठी पाठराखीण आलीच. वयस्कर आज्जींनी निर्मलाला जवळ घेऊन गोड आवाजात समजूत घालत शांत केलं.

“अगं तू अशीच रडत राहिलीस तर तुझ्या आई अन् बहिणींना वाईट वाटेल. तेव्हा हसून निरोप दे. तुला आता असं हसलेलं पाहून त्यांनाही समाधान मिळेल, नाही तर त्यांना काय वाटेल. खरं की नाही.” शेवटी निर्मलाने आपल्या अश्रुंना आवर घातला अन् साऱ्यांना हसून निरोप दिला. तिची अवस्था म्हणजे एका नयनी दुःखाश्रु अन् दुसऱ्या नयनी सुखाश्रु, शेवटी काय माणसाच्या जीवनात अशी परिस्थिती बऱ्याच वेळा उभी रहाते पण त्यातूनही पार पडणे ही तर खरी कला असते. बघता बघता माहेरची मंडळी दृष्टीआड झाली.

निर्मलाच्या आईने नणंदेच्या म्हणजे लेकीच्या सासूच्या पुढे विनंती करून लेकीस व्यवस्थित सांभाळण्याविषयी विनवले होते. काही चुकल्यास तिचे अपराध पोटी घेऊन तिला माफ करा. तुमच्या मुलीप्रमाणेच तिला माना. यावर त्यांनी फक्त मानेनेच होकार दिला. त्या जास्त काही बोलल्या नाहीत. मान फिरवून उभारल्या होत्या. राजेश मात्र नजरेनेच आश्वासक दिलासा देत होता. खरंच निर्मलाला आईची एक एक गोष्ट सारखी आठवू लागली. आई जाऊन थोडाच वेळ झाला पण खूप वेळ झाल्यासारखं वाटू लागलं. निर्मला विचारांच्या तंद्रीत असतानाच राजेशने एकदम तिला हाक मारली.

“निमा, चल आपल्याला आपल्या घरी जायचंय.” या एका वाक्यातून कितीतरी प्रेम जाणवत होतं. तिला खूप मोठा आधार मिळाल्यासारखं वाटलं. निर्मलाला सजलेल्या कारमधून घरी नेण्यात आलं. तिचं अगदी जंगी स्वागत झालं. दोन नणंदा सासूबाई साऱ्यांनीच ओवाळलं अन् गृहप्रवेश झाला. एक एक कार्यक्रम हळूहळू पार पडत होते. निर्मलाही हळहूळू घरातील वातावरणात मिसळू लागली.

बघता बघता आठ दिवस झाले. देवदेव सारे कार्यक्रम उरकले. चार दिवस रीतीप्रमाणे येतीजाती करावी म्हणून माहेरून एक व्यक्ती न्यायला आली. मात्र निर्मलाच्या सासूबाईंनी “नवरी येणार नाही. फक्त पाठराखीणीला घेऊन जा” म्हणून बजावले. यावर निर्मलाने एकांतात राजेशला गोडीत विचारलेही, “फक्त दोन दिवसात परत येते, जाऊ का मी माहेरी?”

यावर राजेशने “आईला विचार अन् मग ठरव!” असे उत्तर दिले. निर्मला नाराज झाली. तिने सासूबाईंना विचारायचे धाडसही केले नाही. पाठराखीणीला जातानाच सासूबाईंनी चार जास्तीची वाक्य ऐकवलीच.

“माझी सून लग्न करून या घरी आली. आता ती या घराचा उंबरा ओलांडून माहेरी येणार नाही आणि आली तर ते कायमचीच.”

बापरे! त्यांचा तो जमदग्नीचा अवतार पाहून सारे गारच झाले. न्यायला आलेल्या नात्यातल्या त्या काकांनी शिदोरी ठेवली. मनात नसतानाही नाइलाजाने पाहुणचार स्वीकारला अन् पाठराखीणीला घेऊन परतले. शेवटी सासूबाईंनी आपलेच खरे करून दाखविले होते. निर्मलाला खूप वाईट वाटले. राजेशने त्यांना खूप समजावले.

“जाऊ दे, आज ना उद्या आई बदलेलच की, ती जरा रागीट आहे तरी मनाने खूप चांगली आहे. काही दिवसांनी स्वतः तुला माहेरी पाठवेल.” एक माहेरची उणीव सोडली तर निर्मलाच्या संसारात काहीच कमी नव्हते.

क्रमशः

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!