उणिव 3

संसारात हौस-मौज सारे होत होते. घरात सारे जण निमा-निमा अन् निमा दुसरे काहीच नाही. एकुलती एक सून होती ती. पण तरीही निर्मलाच्या मनात माहेरची आठवण आली की मनातल्या मनात का होईना तिला वाईट वाटतच असे. तसं तर माहेर विसरणं कोणत्याच स्त्रीला शक्य नसतंच. पण काळ कोणासाठी थांबत नाही. निमाला बाळाची चाहूल लागली.

निर्मलाने आता घरात गोड बातमी दिली. सासूबाई तर तिला कुठे ठेऊ नि कुठं नको असं करू लागल्या. त्यांना वंशाचा दिवा हवा होता. दोघी नणंदा लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. घरात फक्त चार माणसं. नणंदा सणा-वाराला किंवा आठवण झाली की एक रात्रीसाठी का होईना माहेरी जात. पण निर्मलाचा विचार कोणाच्याच मनात नव्हता. ‘आम्ही तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, मग कशाला व्हावी तिला माहेरची आठवण.’ या सासूबाईंच्या वाक्यावर तिला ओरडून सांगावे वाटे,
‘मी पण माणूस आहे, मलाही भावना आहेत. तुमच्या मुलींसारखीच मी पण कुणाची तरी मुलगी आहे. मग तुमच्या अन् माझ्या मध्ये हा दुजाभाव का?”

पण हे सारे मनातच. कारण सासूबाईंपुढे बोलायचे धाडस अजूनतरी निर्मलाने केले नव्हते. सासूबाईंनी तिच्या माहेरी जाणारी वाटच पुसून टाकली होती. त्यांच्या मते हिच्या माहेरी काय आहे. कष्ट, कष्ट अन् कष्ट. माझा भाऊ तर गेला. मग काय?
पण जिथे आईची निखळ माया, बहिणीची ओढ या साऱ्यांना जगातल्या कशाचीही तोड नव्हती आणि नसतेही. असे ठिकाण म्हणजे माहेर होय. शेवटी निर्मलाच माघार घेई कारण या दिवसात मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवली तरच होणाऱ्या बाळाचे संगोपन गर्भात चांगले होईल. राजेश पण तिला खूप जपत होते. तिच्या सर्वच भावना त्यांना समजत. पण जन्मदात्या आईला दुखावणे त्यांच्याच्याने शक्य नव्हते. राजेश खासगी बँकेत जरी होते तरीही पगार चांगला होता. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. निर्मलाची काळजी घरातला प्रत्येकजण घेत होता. डिलेव्हरीची तारीख आता महिन्यावर आली होती. निर्मलाच्या आईने मुलीला माहेरी आणण्यासाठी एकदा तरी प्रयत्न करावा म्हणून एका लेकीला घेऊन शिदोरीसह त्या नणंदेकडे गेल्या. लेकीची चोर चोळी करावी अन् चार दिवस घेऊन जावे हा उद्देश त्यांचा होता. पण छे! निर्मलाच्या सासूबाईंनी परवानगी दिलीच नाही. पाणउतारा केला तो निराळाच.

“आम्ही खंबीर आहोत आमच्या सुनेचं सारं करायला. तुमच्या त्या दहा बाय दहाच्या खोलीत काय काय करताल. तिला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. पुन्हा माहेरी न्यायचं म्हणून येऊ ही नका!”

ही आपली सख्खी नणंदच का यावर निर्मलाच्या आईचा विश्वास बसत नसे. कारण निर्मलाचे वडील असेपर्यंत सर्व ठीक होते. शेतीवर कर्ज, जप्ती या साऱ्या घटनांपासून, माहेरपासून चार हात लांबच त्या राहिल्या. भाऊ बेपत्ता झाल्यापासून तर माहेरची नाती वाऱ्यावरच सोडून दिली होती त्यांनी.निर्मलाच्या आईने शेवटचा प्रयत्न म्हणून ‘डिलेव्हरीच्या वेळी मदतीला तरी मी येते.’ असे म्हणून पाहिले.

पण यावर सासूबाईंनी सांगितले,

“काही गरज नाही कुणाची, दवाखान्यातच होणार सर्व, अन् घरी आल्यावर आहोतच आम्ही.”

“बरं मग अधूनमधून एखादी चक्कर उभ्या उभ्या का होईना टाकत जाईन. तेवढीच तिची खुशाली कळेल.’

“हूं! आम्ही काय तिला त्रास देतो का? विचारा हवं तर लेकीला. काय पण

काळजी करताय. तुमच्या घरापेक्षा आमच्या घरात जास्त जपतोय आम्ही.” असं रागारागाने बोलत पटकन् त्या तिथून निघून गेल्या. निर्मलाला सासूचं वागणं अजिबात पटत नव्हते, पण काय करणार. एक माहेर या विषयावरूनच वातावरण बदलत होतं. बाकी सारं सोन्याहून पिवळं होतं. नाईलाजाने का होईना निर्मलाच्या आईला तासभराची भेट घेऊन एकटच परतावं लागलं. लग्नानंतर आईची ही पहिलीच भेट. निर्मलाने तेवढ्या तासातही मायेच्या महापुरात न्हावून घेतलं. त्या तासांच्या सुखद क्षणांवरच ती आता पुन्हा पुढचे दिवस काढणार होती. आई गेल्यावर निर्मलाने धाडसाने राजेशकडे विषय काढलाच.

“अहो, माझ्या मनाचा तुम्ही विचार करता की नाही?”
“मी तुझाच विचार करतो, म्हणूनच आईला काही बोलत नाही.”

“काहीतरीच, जसे तुम्हाला तुमचे आई-वडील प्रिय तसे मला नाही का ?”

“तुझं खरं आहे पण मी आईला दुखवू शकत नाही. माझी जन्मदात्री आहे ती.”

“हो! मग माझी आई माझी कुणीच नाही का?”

“हे बघ नीमा, मला विषय वाढवायचा नाही.”
निर्मलाच्या डोळ्यात पाणी पाहून राजेशलाही गहिवरून आलं. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत,
“होईल ठीक सारे.”

एवढंच तो बोलला, अन् विषय इथेच संपवला. निर्मलाला सासू सासरे-नणंदा यांना समजून घेणे कठीण जात होते. एकेदिवशी शेजारच्या प्रिया बरोबर ती फिरायला गेली होती पण रस्त्यावरील धुळीचा तिला त्रास होऊ लागला म्हणून आज त्या दोघी निम्म्या रस्त्यातूनच परतल्या. प्रिया घरी गेली अन् निर्मला घरी आली. तेवढ्यात तिच्या कानावर घरातली काही वाक्य पडली.

“राजेश तुला किती वेळा सांगितलं, तू तिची कड घेऊन का बोलतोस. तिचे माहेर म्हणजेच माझेही माहेर पण तरीही ती तिथे गेलेली चालणार नाही. कारण तिच्या जाण्या येण्याने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर येईल.

“अगं, आई मी जबाबदारी घेणार नाही. तिलाही वाटतं गं माहेरी जावं. शेवटी काहीही झालं तरी माहेरची ओढ वाटणारच की. आपण नाही का मामा असताना जायचोच की नेहमी. तुझे आई वडील कुठे होते तेव्हा. तरीही भावासाठी का होईना तू जात होतीसच की?”

“लग्न होऊन वर्षही झालं नाही आणि लागला तिचा वकील बनून बोलायला.”

“अगं आई तसं नव्हे. पण जाऊ दे. तुला काही सांगण्यात अर्थच नाही.”

“तुला काय करायचे ते कर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. एकदा येणं- जाणं सुरू झालं की हळूहळू एक एक करत साऱ्या मेहुण्यांची जबाबदारी गळ्यात पडेल, मग कळेल आणि हा विषय मला पुन्हा पुन्हा नको.”

असं म्हणून सासूबाई फणकाऱ्याने निघून गेल्या. निर्मला आत गेली. राजेशचे लक्ष गेले पण शेवटी काय तेव्हापासून आपण माहेर हा विषय पुन्हा काढायचा नाही असे तिनेच ठरवले. दिवसामागून दिवस जात होते. काळ हा कोणासाठीच थांबत नाही अन् थांबलाही नाही. निर्मलाची डिलेव्हरी झाली. सुंदर गोंडस मुलगी झाली होती. खरा घोळ इथेच झाला. वंशाचा दिवा हवा म्हणून सासूबाईंचा झालेला अट्टाहास. त्यामुळे त्या बाळाचं तोंडही पहायला तयार होईनात. राजेशने आईची कशीतरी समजूत काढली. स्वतः त्याला मुलगा किंवा मुलगी असा काही फरक वाटत नव्हता. निर्मला अन् बाळ व्यवस्थित आहे बस! राजेशनेच बहिणींची अन् आईची समजूत काढली. पुढच्या वेळेस होईल मुलगा म्हणून आश्वासनच दिले थोडक्यात. हळूहळू घरातील वातावरण सुरळीत झाले. “पहिली बेटी, तूप रोटी, धनाची पेटी” असं बरंच काही सांगितल्याने सासूबाई गप्प झाल्या. निर्मलाची पहिली वेळ असल्याने आई होण्याचा सुखद अनुभव, स्वर्गसुख ती अनुभवत होती. आई झाली त्या दिवशी तिला आईची खूप आठवण झाली होती पण काय करणार. तरी पण ती दवाखान्यात असताना एक दोनदा येऊन आई भेटून गेली, तेही सासूबाईंच्या नकळत. राजेशला बाळ खूप आवडलं होतं.

क्रमशः

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!