उणिव ४


ते अगदी राजेशसारखंच दिसत होतं. म्हणूनच राजेशने त्याचं नाव नमिता सुचविलं होतं. ‘बाळ जरी माझ्यासारखं दिसत असलं तरी नाव तुझ्या नावावरूनच ठेवायचं!’ हा त्याचाच हट्ट अन् तो पूर्णही झाला.

नमिताच्या बाल लीलांमध्ये सारं घर हरवून जाई. राजेशला तर बँकेतून कधी एकदा घरी येतो अन् तिच्याशी खेळत बसतो असं वाटायचं. नमिताही दिसायला गोड होती. गोबऱ्या गालातही सरळ नाक उठून दिसत होतं. काळं भोर कुरळं जावळ, गोल गोल चेहरा अन् सुंदर अशा दोन गालावर खळ्या. बाळ जन्मतानाच तीन किलो भरलं होतं. दिसामासाने पुन्हा पुन्हा ते व्यवस्थित वाढत गेलं. त्याचं दिसणं, हसणं, बघणं, डोळे झाकणं, खुदकन गालात हसणं सारं सारं घरातल्यांना वेड लावून जाई. काही दिवसातच घर अगदी नमितामय झालं होतं. बघता बघता बाळ दीड वर्षाचं केव्हा झालं कळलंच नाही. काही दिवसातच निर्मलाला दुसऱ्या बाळाच्या येण्याची चाहूल लागली. यावेळी सासूबाई मुलगाच हवा म्हणून ताठूनच बसल्या होत्या. निर्मला मात्र मनातल्या मनातच विचार करत होती. ही बाई सुशिक्षित असूनही अडाण्यासारखी का वागते कळत नव्हते. मुलगा होणे न होणे स्त्रियांच्या हातात असते का? स्वतः ती स्त्री असूनही वेड पांघरून पेडगावला जाते. स्वतःला त्यांनाही पहिल्या दोन मुलींच्या पाठीवरच राजेश झाले ना? मग स्वतःवरून तरी जग ओळखावं पण म्हणतात ते काही खोटं नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. नमिता आता छान घरभर फिरू लागली होती. तिला आता आज्जीची सवय लागली. तिला राजेशची आई माहीत होती. पण निर्मलाची आई माहीतच नव्हती. निर्मलाचे बाळंतपण आज उद्यावर आले. यावेळेस तरी निदान आई यायला हवी होती असे निर्मलाला वाटत होते. पण काय करणार अजूनही योग्य वेळ आलीच नव्हती. थोड्या दिवसातच निर्मलाला अडमिट केलं. यावेळेस सासूबाई हौसेनं दवाखान्यात गेल्या. त्यांनी निर्मलाला दिवस गेल्यापासूनच तिच्यावर मुलगा होण्यासाठी अनेक प्रयोग केले होते. आयुर्वेदिक उपाय, गंडेदोरे, आणि बरंच काही. यावेळी वंशाचा दिवा हमखास, असे त्यांना वाटत होते.

बाळाचा जन्म झाला अन् डॉक्टरांनी बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचं सांगितलं. पण निर्मलालाही काय झाले याची उत्सुकता लागलीच होती. सासूबाईंची घोर निराशा झाली. पुन्हा मुलगीच झाली होती. पहिल्या वेळेस राजेश निराश झाले नाही. पण आता मात्र निराश झाले. ‘भगवान के यहाँ देर है अंधेर नहीं’ हे त्यांना ही मान्य होते. मग माझ्याच बाबतीत हा अंधार का? हा प्रश्न त्यांना सतावत होता. निर्मलाला स्वतःसाठी मुलगा किंवा मुलगी हे असं काही हवं किंवा नको नव्हतं. पण घरच्यांपुढे त्यांना काही बोलता येत नव्हतं. आता त्या डिलेव्हरीनंतर घरी परतल्या. घरातलं वातावरण बदलल्यासारखं त्यांना जाणवू लागलं. सासूबाईंनी तर बोलणंच कमी केलं होतं. राजेश अन् सासरेबुवा बाकी सारे मौन पाळून होते. नणंदा आल्या की ठिसफिस करत. बाळाचं नाव नलिनी ठेवलं होतं. ती रडू लागली म्हणजे तिला कोणी पटकन पहात नसे. घरातील काम अन् बाळाचे करता करता निर्मलाला नाकी नऊ येऊ लागले.

निर्मलाला घरातल्या साऱ्यांचाच खूप राग येई पण ती कोणाला काही म्हणू शकत नव्हती. नवरा बँकेत चांगल्या पगारावर पण तसा निर्मलाचा घरात अधिकार नव्हता. नलिनी आता चार महिन्याची झाली. तिची काळजी घरात कोणी नाही तर निर्मला घेतच होती. या महत्त्वाच्या प्रश्नावर काकूंनी साऱ्यांपुढे प्रश्न मांडला तर घरातलं वातावरण तापलं.

“बघा कालपर्यंत गरीब गाईसारखी शांत बसत होती. अन् आज हिला शिंग फुटली म्हणायची.” सासूबाईंच्या या वाक्यावर निर्मलाही चिडली.

“नमिता तशीच नलिनी मग तुम्ही फरक का करता. माझं वागणं म्हणाल तर पाणी गळ्याशी आल्यावर तरी माणूस हातपाय हलवतोच ना!”

या निर्मलाच्या वाक्याने घरात त्सुनामी वादळ उठले.

“म्हणजे आम्ही तुला मारायला निघालो म्हण की, आता ही पाहिजे ते आरोप करू लागली. बाई, त्यापेक्षा तू स्वतःचा जीव वाचव. इथून बाहेर जा. माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या संसारवेलीला वंशाचे फूल फुलावं ही आमची अपेक्षा. तर तुला गं एवढा त्रागा करायला काय झालं?”

सासूबाईंचं बोलणं ऐकलं आणि निर्मलाच्या डोक्यात असंख्य मुंग्या दंश करू लागल्या. निर्मलाला अधूनमधून सासू, सासरे, नणंदा, एखादं दुसरं वाक्य टोचून बोलत. राजेश मात्र धड या पार्टीचे नाही ना धड त्या पार्टीचे. अपक्ष उमेदवार बनून नुसता तमाशा पहाणे चालले होते. निर्मलाला राजेशने काही तरी बोलावे वाटत होते. शेवटी तिनेच राजेशला  प्रश्न केला.
“तुम्ही तरी या साऱ्यांना दुसऱ्यांदा समजून सांगा, मी मुलाच्या अट्टासामुळेच बाळास जन्म द्यायला तयार झाले. जेवढं जमतं तेवढे केलेच ना? बाकी आणखी काय करू शकते?” राजेश मात्र तरीही शांतच त्याची नजर आईकडे होती. आईला काहीतरी होतंय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने आईकडे जात तिला हात लावून विचारले.
“आई, तुला काही होतय का?”
निर्मलाकडे पहात फर्मावले

“बस्स! आता अजिबात एकही शब्द बोलू नकोस. पुरे झाले महाभारत.”
या वाक्यावर निर्मला एकदम रागाने उसळलीच.
“अरे व्वा! म्हणजे मी आक्रस्ताळेपणा करते म्हणा की?”

यावर राजेशने आईकडे निर्देश करत,
“माझ्या आईला त्रास होतोय म्हणून तरी गप्प रहा, मला या सगळ्या गोंधळापेक्षा तिचे दुखणे पहाणं महत्वाचं आहे.’

‘अहो मग मला समजून सांगता त्यापेक्षा या साऱ्यांना सांगा.’ राजेश आता खूपच चिडला होता. त्याने रागाच्या भरात निर्मलाला एक थप्पड लावली. त्यानंतर मात्र राजस्थानात जसं वातावरण तप्त असतं तितकं घरातलं वातावरण तापलं. निर्मलाने नलिनीला उचललं अन् नमिताला दरदर ओढतच ती तिच्या खोलीकडे गेली. जाता जाता बोलली ही,
“मला या घरात रहायचेच नाही.”

इतका वेळ गप्प बसलेले सासरे आता मधे पडले. त्यांनी निर्मलाला खोलीत जावून समजावले.

“तिला त्रास होतोय म्हणून गप्प रहा. राजेश रागात आहे. अगं तिला दवाखान्यात न्यावे लागेल. तू एवढं काही मनावर घेऊ नकोस त्या दोघांचं.”

तसं घरात काही घडलं तर सासरे कधी कधी तिची बाजू घेत. “मामांजी माझंच चुकतंय असंच वाटतं का हो तुम्हाला पण. अहो लग्न झाल्यापासून माहेर तुटलं. वर नको त्या गोष्टीसाठी मला जबाबदार धरलं जातेय. याला काय अर्थ आहे.’

“बेटा सगळं कळतंय पण तरीही लक्षात घे. आता जर तू रागात घर सोडून गेली अन् समजा देव न करो अन् काही विपरीत घरात घडलं तर!”

यावर निर्मला गप्प झाली. एखाद्याला एवढं सारं ऐकल्यावर तो हत्येचं पाप थोडंच डोक्यावर घेईल. दोन चार दिवसात वातावरण शांत होईल असं वाटलं, पण कुठंतरी साऱ्यांच्या मनात राग धुमसतच होता, त्यात त्या दिवसापासून निर्मलाच्या सासूबाईना डोके दुखण्याचा त्रास सुरू झाला. दवाखान्यात नेऊन आणलं. “जास्त काही नाही पण यांना जास्त ताण-तणाव सहन होणार नाही म्हणून त्यांची काळजी घ्या. अन्यथा काहीही होऊ शकते,” असे डॉक्टरांनी सांगितले. त्या दिवसापासून निर्मलाच्या तोंडाला कुलूपच होतं. राजेश अन् निर्मलामध्ये हळूहळू तणाव वाढू लागला. घरामध्ये नमिताचे पहिली मुलगी म्हणून लाड झाले. नलिनीकडे मात्र निर्मला सोडले तर जास्त कोणी लक्ष देत नसे. नलिनी खरंच रूप-गुणाने खूप चांगली पण मुलगी म्हणून जन्माला आली हा तिचा दोष मानला जात होता. निर्मलाला आता संसाराचा रहाटगाडा वाढवायला नको वाटू लागला. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतरच त्यांनी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करायचे ठरवले. पण राजेशच्या इच्छेपुढे तिला माघार घ्यावी लागली. निर्मला मात्र या साऱ्या गोष्टींना वैतागली होती. एकतर मानसिक स्थिती बिघडत होती. दुसरीकडे शारीरिक स्थिती वरच्यावर बिघडू लागली. हे सारे काय कमी म्हणून घरातले वातावरण बिघडलेले. पण म्हणतात ना ‘आलीया भोगासी असावे सादर’ राजेशच्या हट्टापुढे निर्मलाने हात टेकले. काही तरी मागण्यासाठी देवापुढे हात जोडले. ‘देवा तुला माझी दया येऊ दे, या अज्ञान लोकांच्या बुद्धीची कीव कर, मी आणखी किती अन्याय सहन करू?” निर्मलाला आता स्वतःसाठी नाही तर घरच्यांसाठी मुलगा हवा होता. कारण मुलगा झाल्याशिवाय या चक्रातून सुटका नाही हे तिला नकळत का होईना कळून चुकले होते. बघता बघता दिवस जात होते. तिसऱ्यांदा बाळ होण्याची चाहूल निर्मलाला लागली. निर्मला नेहमीप्रमाणे  स्वतःची काळजी घेत होती. घरातल्या साऱ्यांना आता पुन्हा एकदा  मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती की आता तरी पुत्ररत्न व्हावे. योगायोग म्हणा किंवा निर्मलाचे पुण्यकर्म म्हणा त्या घरात निखिलचा जन्म झाला. म्हणतात ना ‘आले देवाजीच्या मना, भक्ता आता हो म्हणा.’  निखिलचे घरात खूप लाड होत होते. त्याला एकजणही खाली ठेवायला मागत नव्हते. अन् नमिता नलिनीला पहायला कोणाकडे वेळच नव्हता. पण शेवटी निर्मला मात्र आई म्हणून तिनही लेकरांवर सारखीच माया करे. आईला शेवटी सर्व मुले सारखीच. मग ती कशीही असू दे. ना रंग, ना दिसणं, ना असणं.
“आईच्या प्रेमात राजकारण नसतं.”
आईचं प्रेम वाहणाऱ्या पाण्यासारखंच स्वच्छ, निर्मळ असतं. निर्मलाच्या सासूबाईनाही दोन मुलींच्या पाठीवरच मुलगा झाला होता. आता मात्र निर्मलाने ऑपरेशन करून घेतले. घराचं गोकुळ झालं होतं. घरामध्ये माणसंही भरपूर, येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांचा राबताही भरपूर. फक्त कमी होती ती निर्मलाच्या माहेरच्या लोकांची. निर्मला दवाखान्यात असताना, निखिल झाल्यावर अन् ऑपरेशन केल्याचं कळल्यावर तिची आई गुपचूप येऊन बाळ बाळंतिणीला पाहून गेली होती. तसं तर गावातल्या गावात रहात असल्यामुळे त्यांची काही कार्यक्रम किंवा प्रसंगानुरूप कधी ना कधी भेट होत असे. यावेळेस आईने धाडसाने सुंठवडा- डिंकवडा अन् बाळाला सुरकं टोपडं सारं आणले होते. खरंच आतापर्यंत निर्मलाच्या आईने विहिणबाई म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नणंदबाईंना घाबरून कधीच त्यांच्या नातींना पहायला त्यांच्या घरात पायही ठेवला नव्हता. मात्र आज त्या धाडस करून आल्या होत्या. लेकीला व नातवाला भेटून ख्याली खुशाली विचारून त्या निघाल्या. एवढ्यात निर्मलाच्या सासूची दारात गाठ पडली. खरंतर त्या थोडा रागराग करतील चिडतील अन् सोडून देतील असं निर्मलाला वाटलं पण त्यांचा जमदग्नीचा अवतार पाहिला अन् ती घाबरली. त्यांनी निर्मलाच्या आईचा पाणउतारा केलाच. आई गेल्यानंतर निर्मला जवळचा सुंठवडा, डिंकवडा फेकण्यासाठी उचलला. निर्मलाने यावेळेस अन्यायाला प्रतिकार करायचे ठरवले असल्याने तिने सासूबाईंना प्रश्न केलाच.
“का छळता मला, माझ्या माहेरची एक व्यक्ती तुम्हाला चालत नाही. तुमच्या साऱ्यांचं जिथल्या तिथं करते ना! लेकी-जावयाची सर्व व्यवस्था करते ना? मग माझीच माणसे का नको?”
या वाक्यावर सासूबाईना संताप आवरता आला नाही.

“माझं माझ्या नवऱ्याचं, अन् मुलांचं करतेस म्हणजे काही विशेष नाही. पण माझ्या मुली अन् जावयाचं कशाला नाव काढतेस. ते तुझ्याकडे नाही आमच्याकडे येतात!”

शब्दाला शब्द वाढत गेला अन् घरात दोघींचाच गोधळ वाढू लागला. दोघींच्यामध्ये कोणीच बोलले नाही. सासूबाईना मात्र हा ताण सहन झाला नाही. आजपर्यंत गाई सारखी गरीब असणारी आपली सून आज मात्र किती तोंड उचलून बोलतेय म्हणून ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. अन् व्हायचं तेच झालं. सासूबाईंच्या अचानक छातीत दुखू लागलं. एवढ्यात बँकेमधून राजेश परत आलाच. त्याला बाकी काही कळले नाही पण आईला दवाखान्यात पोहचवणे गरजेचे आहे, एवढेच लक्षात घेऊन त्याने बाकी कोणताही विचार न करता पटकन् आईला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सासूबाईंना माईल्ड अटॅक येऊन गेल्याचे सांगितलं. झालं, घरातलं सारं वातावरणच बदललं. घरात पाहुण्यांची रांग लागली होती. निर्मलाला मात्र एक अपराधी असण्याची भावना मनात बोचत राहू लागली. स्वतः तिच्या मनात विचारांचा गुंता झाला होता. पण नणंदा तरी काही कमी नव्हत्या. त्या एखाद दुसरा शब्द बोलतच. निर्मलाला आता हे वातावरण सहन होईना. जो तो सासूबाईंना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो पण माझं काय? म्हणून त्या मनातून नाराज होत्या. त्यांनी राजेशला शेवटी सांगितलेच,

“माझं चुकत असेल तर मला जरूर सांगा, पण असं तोंड दाबून बुक्यांचा मार मला सहन होत नाही.” राजेशलाही आपल्या आईचं चुकतंय हे पहिल्यापासून जाणवत होतं. पण तो ते मान्य करत नव्हता. पण साऱ्या परिस्थितीचा विचार करता त्याने विचाराअंती बदलीचा निर्णय घेतला. तो आईला दुखवू शकत नव्हता अन् निर्मलाला दुखवणे योग्य नव्हते. आई दवाखान्यातून घरी आल्यावर थोडे दिवस झाल्यावर त्याने  आपली बदलीची बातमी घरात सांगितली. तसं तर घरात बाबांना हे सारं नियोजनपूर्वक चाललंय हे जाणवत होतं. पण बायकोचा स्वभाव त्यांना माहीतच होता. म्हणून त्यांनी राजेशच्या निर्णयाला विरोध केला नाही, जे होतय ते चांगल्यासाठी म्हणून ते गप्प बसले. सासूबाईंच्या जीवाची घालमेल मात्र वाढली. राजेश घर सोडून जाणार ही कल्पना सहन होईना, या सर्वापेक्षा महत्त्वाचे होते ते म्हणजे नाती अन् निर्मलाही जाणार. आपल्याला या साऱ्यांना सोडून रहाणे जमेल का? मग आयुष्याच्या शेवटी आपण काय फक्त नवरा-बायकोच रहायचं का? त्यांनी राजेशला बदलीचा निर्णय बदलण्याची विनंती करून पाहिली पण काही उपयोग नव्हता. त्या नुकत्याच आजारपणातून उठल्यामुळे तर आपल्या सेवेला हक्काचं माणूस असलंच पाहिजे ही तीव्र भावना त्यांच्या मनात निर्माण होत होती.

हळूहळू निर्मलाच्या सासूबाईंना, सुनेशिवाय रहाणं सगळ्याच बाजूने कसं अवघड आहे हे लक्षात येऊ लागलं पण इतक्या दिवसांपासून त्या जे चुकीचं वागल्या त्याचं फळ मिळणारच होतं. नाती अन् सून दूर जाणारच होती. सोबत मुलगा अन् नातू ही दुरावणारच होते. त्यांच्या मनात आता हळूहळू परिवर्तन होऊ लागलं. त्या निर्मलाच्या वडिलांच्या बेपत्ता होण्यापासून घडलेल्या घटनेचा विचार करू लागल्या. खरंच आपला भाऊ घर सोडून गेला यात आपण भावजयीला का दोषी मानत राहिलो. त्यांना त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी मनात विचार येऊ लागले. आपले काही अंशी का होईना चुकले हे त्यांनी आपल्या मुलाजवळ मान्य केले. पण, पण आता खूप उशीर झाला होता. राजेश आपल्या कुटुंबासह बदलीच्या गावी दोन दिवसानी जाणार होता. राजेशला तसं मनापासून काळजी वाटत होती. पण लग्न झाल्यापासूनच्या वातावरणाचाही चांगलाच अभ्यास झाला होता. राजेशच्या आईला आता एक एक क्षण जड चालला होता. बघता बघता राजेश, निर्मला आपल्या मुलांसह बदलीच्या गावाला जाण्यासाठी निघाले. निर्मलाने सर्वांना वाकून नमस्कार केला. आपल्या मुलींनाही साऱ्यांच्या पाया पडण्यास सांगितले. राजेशला सोडून रहायचे, त्यापेक्षाही महत्वाचे राजेशच्या मुलांना म्हणजेच निखिलला सोडून रहायचे म्हणजे खूपच अवघड वाटत होते. दुधापेक्षा दुधाच्या साईला खूप महत्त्व असते त्याप्रमाणे निखिलला सोडून रहायचे त्यांच्या जीवावर आले होते. पण नाईलाज होता. त्यांनी भरलेल्या मनाने अन् जड अंतःकरणाने साऱ्यांचा निरोप घेतला.

राजेश निर्मला यांनी वेगळा संसार थाटला खरा, पण म्हणून लगेच तिथे माहेरच्यांची वर्दळ सुरू झाली नाही. मोठे सण-वार असताना ती सासरीच येऊन जाई. तिला आता एक वेगळं अस्तित्व जाणवू लागलं. पहिल्यापेक्षा सासरी आता तिच्या येण्याची जाण्याची सारेजण आतुरतेने वाट पहात. खरंतर हीच सून जेव्हा घरात होती तेव्हा एक माहेर अन् दुसरा वंशाचा दिवा या गोष्टी सोडल्या तर बाकी काही अडचण, समस्या नव्हतीच. त्यातला वंशाचा दिवा तर तिने प्रज्वलित केला होता. रहाता राहिला माहेरचा प्रश्न तो अजूनही यक्षप्रश्न बनून राहिला होता. आजची परिस्थिती आणि वेळ उद्या रहात नसते यावर साऱ्यांचा विश्वास होता. निर्मलाची हळूहळू मुलं मोठी होऊ लागली. तिने हळूहळू माहेरी येणं जाणं सुरू केलं. ती यात काही वेगळा गुन्हा करत नव्हती. तिचं ते हक्काचं घर होतं. ती माहेरी जाणार ही गोष्ट सासूबाईंना कुठूनतरी कळली होती. पण त्यांनीही आता विरोध करायचे सोडून दिले. तसं त्यांच्याही मनात आपल्या माहेरविषयी ओढ होतीच पण स्वभाव आड येत होता. इतक्या दिवस केलेला विरोध आपण सहजासहजी सोडून देणे योग्य आहे का? त्यांना मनातल्या मनात खूप वाईट वाटत होते. आपला निर्णय, नियम सुनेने मोडला पण शेवटी त्यांनी बराच गोंधळ करूनही माघार घेतली आणि ते इष्टही होतं. काही दिवस त्यांनी निर्मलाशी बोलणच सोडलं. ती मुली मुलांसह घरी आली तरी बोलायचं नाही, धुसफूस करायची असं बरंच काही पण शेवटी राजेश व निर्मलाच्या नणंदांनी प्रथम चांगल्या विधायक चार गोष्टी तिच्या बाजूने समजून सांगितल्या आणि त्यांनी त्या नाही होय करत का होईना मान्य केल्या. इतक्या लवकर ही गोष्ट सासूबाईंच्या पचनी पडेल असे निर्मलाला वाटत नव्हते पण शेवटी सारे सुरळीत झाले. निर्मलाची आई, बहिणी अधून मधून येत. काही का असेना येणं जाणं, बोलणं, बसणं सुरू झालं. हे फार महत्त्वाचं होतं. तुटलेलं माहेर पुन्हा जुळलं होतं. नमिता, नलिनी, निखिल तिघंही आता शाळेला व्यवस्थित जात. प्रत्येकाचा आपापल्या वर्गात अव्वल नंबर होता. या साऱ्यांबरोबर निर्मला मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांच्या इतर कलागुणांनाही वाव देत असे. राजेश बँकेत नोकरीस असल्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता होती. त्यामुळे मुलांना  तिने वेगवेगळ्या छंद वर्गाला घातले होते. मुलंही हुशार असल्याने कला सहज अवगत करत होती. राजेशला निर्मलाचा अन् आपल्या बच्चे कंपनीचा सार्थ अभिमान होता. राजेश बँकेतल्या लोकांसोबत सहलीला गणपतीपुळे इथे गेला होता.

क्रमशः

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!