उणिव ५

खरंतर ते कुटुंबासह जास्त फिरत पण बँकेतल्या लोकांचा आग्रह अन् निर्मलाचा पाठिंबा यामुळे त्यांनी सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. गणपतीपुळे सोबत आणखी बरीच ठिकाणे ठरली होती. सहलीची प्रत्येकाने जय्यत तयारी केली होती. एकूण पाच दिवसाची सहल होती. सहलीला राजेश निघाला अन् निर्मलाला उदास वाटू लागले. आजपर्यंत राजेश जेव्हा जेव्हा जात तेव्हा घरात तिच्या सोबत सासू-सासरे असत. पण यावेळेस प्रथमच ती मुलांसह रहाणार होती. तसं ती माहेरी किंवा सासरी जाऊन राहू शकत होती, पण तिने तसे केले नाही, कारण मुलांची शाळा. शाळा बुडवून, तिचं काय पण मुलंही कुठंही जायला तयार नव्हती. तिच्याकडे आईकडचे कोणी आपापला कामधंदा सोडून येऊन राहू शकत नव्हता अन् ती स्वतःहून सासू-सासऱ्यांना बोलवू इच्छित नव्हती. बघता बघता चार दिवस झाले. तिने अन् मुलांनी हे दिवस जीवावर ढकलले होते. राजेशचा अधूनमधून फोन येई. त्यांनाही आता घराची ओढ लागली होती. त्यांचा आता दुसऱ्या दिवशी सकाळी परतीचा प्रवास सुरू होणार होता. त्यांनी तशी घरात कल्पना दिली होती. मात्र त्याच रात्री परतण्याच्या घाईने गाडीच्या चालकाला त्यांनी पुरेशी विश्रांती घेऊ न देता परतीचा प्रवास सुरू करायला लावला. शेवटी काय व्हायचे तेच झालं. एका ठिकाणी पुलावरून गाडी जात असताना चालकाच्या डोळ्यावर झापड  आल्यामुळे गाडी पुलाचा कठडा तोडून पाण्यात पडली. सकाळी परतीचा प्रवास होणार होता. पण तो रात्रीच सुरू केल्यामुळे अनर्थ घडला होता. रात्रीची वेळ अन् असा अपघात. एकच गोंधळ माजला.  बस पाण्यात पडल्यावर प्रत्येकजण आपापला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. एस.टी. पुलावरून पडताना दुसऱ्या वाहनातील लोकांनी पाहिल्याने त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नदीचा प्रवाह तसा चांगलाच वेगाने होता. त्यामुळे त्यातून बस कुठे गेली याचा अंधारात पटकन अंदाज येत नव्हता. ज्यांना पोहता येते होते असे अनेकजण बसमधून धडपडून बाहेर पडले अन् कसा का होईना त्यांनी आपला जीव वाचवला, पण राजेश सारखंच बसमधल्या बऱ्याच जणांना पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्याच्या भीतीने अन् अचानक घडलेल्या प्रसंगामुळे ते सारे घाबरून गेले. सकाळपर्यंत शोध मोहीम पूर्ण व्हायला हवी होती. घटनास्थळी बचावकार्यासाठी क्रेनची आणि लाईटची व्यवस्था केली होती. सोबत पोलीस अन् स्वयंप्रेरणेने मदतीसाठी अनेक तरुण पुढे आले होते. बसमध्ये एकूण पन्नास जण होते. त्यातले दोनजण मृत अन् पाचजण बेपत्ता होते, दोघं गंभीर जखमी होते. बाकी साऱ्यांना किरकोळ जखमा होत्या. तेथून अपघातग्रस्तांना दवाखान्यात त्वरित हलविण्यात आले. पण तरीही शेवटी जे पाच बेपत्ता होते त्यांचा शोध लागला नव्हता. ही घटना साऱ्यांच्याच घरी लगेच नाही पण तीन-चार तासाने का होईना कळवली गेली. राजेशचे बेपत्ता होणे घरी माहीत नव्हते. पण त्याच्या सहकाऱ्यांनी ही बातमी घरी सांगितली. निर्मलाला प्रथम आपल्या कानावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा तिच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा तिने आर्त किंकाळी फोडली. आपल्या बछड्यांना जवळ घेऊन ती खूप खूप रडली. सासू-सासरे, आई यांच्यासह घटनास्थळी गेली. तिथे बसची भीषण अवस्था पाहून राजेशचं नक्की काय झालं असेल असा प्रश्न तिच्या मनात येत असे. पण आपल्या बछड्यांकडे पाहून ती गप्प होती. नियतीने वेगळाच डाव मांडला होता. तिच्या आईच्या बाबतीत वेगळा प्रसंग निर्माण होऊन बाबा बेपत्ता झाले, तर इथे राजेशचे सर्व काही चांगले चाललेले असताना बेपत्ता झाले. खरंच ‘नशिबाचा डाव कधीच कुणाला कळत नाही.’ रीतसर सारे

पूर्ण करण्यात आले होते. पोलिसात तक्रार  नोंद झाली होती. खासगी बँक असल्याने हेलपाटे घालून का होईना थोडीफार मदत करू असे आश्वासन मिळाले. पण एका घटनेने सारं कुटुंब उघड्यावर आलं होतं. सासू सासऱ्यांनी निर्मलाला आपल्याकडेच घेऊन जाण्याचा विचार केला आणि प्राप्त परिस्थितीनुसार तिने तो मान्य केला. आज ना उद्या राजेश परततील अन् सारी परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा तिला होती. आपल्या तीन मुलांसह आपण सासू-सासऱ्यांना ओझं व्हायचं नाही म्हणून तिने आपल्या आठवीपर्यंतच्या शिक्षणावर काय करता येईल हे पाहिले. शेवटी शिवणक्लास करून कपडे शिवण्याचा निर्णय तिने घेतला.

आता कुठे तिच्या संसाराची घडी जरा व्यवस्थित बसली होती. सासर माहेर कसे का होईना एक झाले होते. राजेशच्या अपघाताची घटना म्हणजे गाढ साखर झोपेत असताना पडलेले भयानक स्वप्न होते. त्या स्वप्नामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला होता. राजेशशिवाय जीवन ही कल्पना तिला मान्य नव्हती. कित्येक वेळा तिला वाटे जोपर्यंत राजेश सापडत नाही, तोपर्यंत आपण शोधतच रहावे. राजेशनंतर संसाराची जबाबदारी तिच्यावर आली होती. कधीही व्यवहारात न पडणाऱ्या तिला घर चालवावे लागणार होते. सासू-सासरे जमेल तेवढी मदत करतच होते. या साऱ्या संकटावर मात करण्यासाठी तिने शिवणक्लास पूर्ण केला. अन् काम सुरू झाले. तिच्या अंगामध्ये कला होतीच. त्याला परिस्थितीनुसार वापरावे लागले.

निर्मलाने तिन्ही मुलांची शाळा पुन्हा सुरू झाली. आपल्या शिवणकामावर ती त्यांचा खर्च भागवत होती. खरंतर राजेश बँकेत असल्यामुळे मुलांना पहिल्यापासून कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण सध्या मात्र त्यांना बाबा नसल्यामुळे, ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव होत होती. निर्मला मुलांचेच काय पण सासू-सासऱ्यांचेही व्यवस्थित पहात होती. अधून मधून आईही निर्मलाचे कमी-जास्त पहात होती. निर्मलाच्या बहिणी अन् साडू ही येत. पण निर्मलाचे स्पष्ट मत होते. मला कुणाची मदत नको. मी स्वतः सारी परिस्थिती पाहून घेईन. आलेल्या संकटावर मात करीन फक्त मला मानसिक आधार हवा आहे. राजेश अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिला संसाराचं गणित जुळवता जुळवता तिच्या नाकी नऊ आले होते. तरीही ती खंबीरपणे लढा देत होती. राजेशचा काही पत्ता लागतो का म्हणून वरच्यावर ती पोलीस स्टेशनला चकरा मारत असे. पण तिला तिथल्या अधिकाऱ्यानेच सांगितले ‘बाई आम्हीच काही खबर लागली तर तुम्हाला कळवू. तुम्ही सारखे येण्याचे कष्ट घेऊ नका.’ राजेश गेल्यामुळे तिला रात्र रात्र झोप येत नसे. नक्की राजेश कुठे असतील, काय झाले असेल, सध्या ते कुठे असतील, त्यांना आमची आठवण येत नसेल का? आणि बरेच प्रश्न अन् राजेशबरोबर घालविलेल्या क्षणांच्या आठवणी तिच्या पापणीला पापणी लागू देत नव्हत्या. पहिले पहिले ती राजेशच्या विचारात काही खात-पीत नसे. पण जेव्हा तिची प्रकृती बिघडू लागली तेव्हा तिच्या आईने तिला चार गोष्टी समजून सांगितल्या, ज्या तिला पटल्या.

तू जर अशीच स्वतःवर अन्याय करशील तर तुझी प्रकृती वरच्यावर खालावेल. तू म्हणजेच तुझ्या मुलांचा आधार आहेस. त्या मुलांसाठी आणि राजेशसाठी तुला आलेल्या वेळेला निभावून न्यावे लागेल. राजेश कधी ना कधी परत येतीलच! एवढ्या एका वाक्यामुळे तिला जगावे वाटे. नाहीतर या जीवनात काही राम नाही असे वाटे. कसे का होईना स्वतःला सावरत सावरत ती संसाराचा गाडा ओढत होती. तिला राहून राहून डोक्यात विचार येई. आपले बाबा ही बेपत्ता झाले अन् राजेशही. मग आपल्या आईसारखेच आपण आयुष्यभर वाट पहायची का? पण तिचे मन तिला बजावून सांगे, राजेश एक ना एक दिवस नक्की परततील. राजेशशिवाय जीवन ही कल्पनाही तिने केली नव्हती, पण ती आज सत्य झाली होती. मुलांना ती फक्त आईचेच नाही तर वडिलांचेही प्रेम देत होती. बापाची सारी कर्तव्य निभावत होती.

तिने नमिता, नलिनी, निखिल तिघांनाही शिकवले. आज नमिताचा पहिला पगार जेव्हा तिच्या हातात तिने दिला तेव्हा तिचे डोळे आनंदाश्रुंनी डबडबले. किती तरी प्रसंगांना तोंड देत नमिता इथपर्यंत आली होती. तिने परिस्थितीशी झगडून का होईना यश मिळविले होते. नमिताचा पगार राजेशच्या फोटोसमोर ठेवून ती फोटोकडे पहात असतानाच तिला रडू कोसळले.
‘सात जन्म साथ देण्याचे वचन दिले, अन् अर्ध्यावरती डाव सोडून निघून गेलात, तरीही आपल्या लेकीने यश मिळविले!’
एवढं वाक्य ती कशीबशी बोलली अन् तिला हुंदका आवरताच येईना. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून घरात साऱ्यांचेच डोळे पाणावले. आजपर्यंत आपल्या लेकरांना तिने कधीच डोळ्यात पाण्याचा एक थेंबही दिसू दिला नव्हता. प्रत्येक प्रसंगात ती अश्रू दाबून टाके. रात्री मात्र सारे निजल्यावर अंधारात मन मोकळं होईपर्यंत रडत असे. पण आज हे अश्रू दुःखाश्रू नव्हते. ते आनंदाश्रू होते. म्हणून तर ते तिच्या परवानगीशिवाय वाहू लागले. नमिताने आईला शांत केले. घरात आजी-आजोबा होते. ते आता बरेच वृद्ध झाले होते. त्यांचा मुलगा बेपत्ता आहे हे त्यांना कसेतरी सहन करावे लागत होते. शेवटी काय ज्या सासूबाईंनी भाऊ बेपत्ता झाला म्हणून माहेर तोडले होते त्यांच्याच पुढ्यात पुन्हा तीच परिस्थिती उभी राहिली होती. कसेतरी त्या स्वतःच्या मनाची समजूत घालत. राजेश परत येईलच. शेवटी मी त्याला पाहिल्याशिवाय या जगाचा निरोप घेणार नाही असे सारखे बडबडत. निर्मला आता मुलांसाठी आई-वडील दोघांचे कर्तव्य करत होती. तशीच ती सासू-सासऱ्यांसाठी मुलाचे कर्तव्य करत होती. त्यांना वरचेवर दवाखान्यात घेऊन जाणे. त्यांचे कमी-जास्त हे सारे तीच मनापासून करत होती. आता काही दिवस का होईना नमिताचा तिला आधार मिळणार होता. कारण थोड्या दिवसांनी का होईना नमिताचे दोनाचे चार हात करावेच लागणार होते. काळ कोणासाठी थांबत नाही. तो सतत आपले मार्गक्रमण करतच असतो. घडणाऱ्या घटना घडतच रहातात. होणाऱ्या जखमांवर काळ हेच औषध असते. निर्मला असा विचार करतच राजेशच्या फोटोकडे पहात होती. एवढ्यात नमिताने तिच्या पाठीवर हात ठेवला. तो स्पर्श तिला खूप आश्वासक वाटला. जणू त्या स्पर्शातून तिची  लेक तिला मी आता प्रत्येक परिस्थितीत तुझी साथ देणार आहे. म्हणूनच खूप भावुकतेने पाठिंबा देत होती. आज निर्मलाला आपल्याच बछड्यांनी आपला आधार होणं खूप भाग्याचं आहे असं वाटत होतं. म्हणूनच तिने तिघांनाही जवळ घेतले अन् जणू ते एकमेकांना आश्वासन देत होते. आपण मिळून खंबीरपणे आलेल्या प्रसंगाशी लढू. कधी ना कधी राजेश परततीलच. खूप वर्षापूर्वी बेपत्ता झालेले राजेश अन् निर्मलाचे बाबा परतणारच या आशेवरच ते आपल्या जीवनातील एक एक दिवस घालवत होते. सारं काही स्वकष्टाने मिळवलं होतं पण उणीव वाटत होतीच. राजेश अन् बाबा असते तर सुख ओसंडून वाहिले असते पण पण… जीवनात सगळंच सुख मिळाले तर त्या व्यक्ती भाग्यवान म्हणाव्या लागतील. प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उणीव भासतच असते. पण त्याचाही स्वीकार करून सकारात्मकतेने जगणे खूप महत्त्वाचे असते, हेच खरे…..

समाप्त.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!