वारसदार

                       साम्राज्ञी आज स्वरूपसाठी काही वेगळं करावं का? याचा विचार करतच घरातील एक एक काम आटपत होती. स्वरूपच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे त्याला घरी यायला थोडा वेळ होईल, असं त्याने साम्राज्ञीला फोन करून सांगितलं होतं. तिने मात्र स्वरूपला न सांगताच कॉलेजमधून रजा घेतली होती. आज त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस. प्रत्येक वाढदिवसाला लग्नाचे फोटो पाहाणे, कॅसेट पाहाणे, एखादा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहाणे अन् बाहेर जेवण करणे हा क्रम आतापर्यंत फक्त एक दोनवेळाच काही महत्त्वाच्या कारणांमुळे चुकला होता. ह्या साऱ्या गोष्टी आजही होणारच होत्या. विचार करता करता ती थबकली. आरशात स्वतःलाच पाहात विचार करू लागली. खरंच लग्नाला पंचवीस वर्ष झाली, वाटतच नाही. तिची मोठी मुलगी मिताली पुण्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राहात होती. तर छोटी निशा पाचगणीला बारावीच्या शिक्षणासाठी राहिली होती. मुलींना शिक्षणासाठी बाहेर ठेवायचं दोघांसाठी थोडं अवघडच होतं. पण मुलींच्या भवितव्याचा विचार करता त्यांनी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला. मुली घरात नसल्या की, पहिल्यांदा करमत नसे. पण आता सवय झाली होती. कारण मुली असल्या की, घर भरल्यासारखे वाटे. तिने विचार केला, जेव्हा मुली नव्हत्या त्यावेळेस ती दोघेच होती की. पण तो नव्हाळीचा काळ, सोबत गोकुळाप्रमाणे भरलेलं घर होतं. सासू सासरे, दीर, जाऊ होतेच.

साम्राज्ञी तशी नावाप्रमाणेच होती. दिसायला सुस्वरूप, गव्हाळ वर्ण, कमरेच्या खाली रुळणारे दाट कुरळे केस, उंची पाच फूट सात इंच, बोलणं-वागणं दिसणं सारंच गोड. तिचा लाघवी स्वभाव सासरी-माहेरी दोन्हीकडे आवडे, देशमुखांच्या घरी सून म्हणून आली तेव्हा ती वीस-बावीस वर्षांची होती. ‘आम्ही शिक्षण घेण्याकरिता पाठिंबा देऊ’ या आबासाहेब देशमुखांच्या वाक्यावर अन् स्वरूपच्या नजरेत तिला दिसलेला विश्वास, यावरच ती लग्नास तयार झाली. लग्नानंतरचे नवीन दिवस फुलासारखे रंगीबेरंगी, मोरपिसांसारखे मऊ अन् रोमांचित करणारे होते. एकमेकांना जाणून घेण्यात, त्यातल्या अनेक क्षणांची गंमत लुटण्यात शिक्षणातही ती गुरफटत गेली. दोन्हीही बाजू ती व्यवस्थित सांभाळत होती. नवीन नवीन साम्राज्ञीनं आपलं सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. घरच्या सर्वांचा पाठिंबा असल्यामुळे तिनं शिक्षणात चांगलीच प्रगती केली. बीएड, एमएड, नेटसेट या पायऱ्या ती प्रयत्नपूर्वक यशस्वीपणाने चढत गेली. आबासाहेबांना सुनेचं खूप कौतुक वाटे. देशमुख घराण्यात आतापर्यंत मुलं डॉक्टर, इंजिनिअर, व्यापारी झाली. देशमुखांपैकीच काही देशमुख परदेशीही स्थिरावले होते. मात्र मुली, सुना यापैकी जास्त कोणी शिकून घराबाहेर पडले नव्हते. आबासाहेबांना एक मुलगी अन् दोन मुले. सर्वात मोठी आकांक्षा, नंतर स्वरूप आणि मग सिद्धार्थ, आकांक्षाही पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच तिचे लग्न झाले. साम्राज्ञी म्हणजे देशमुख घराण्यातील यशस्विनी होती. तिच्यामध्ये अभ्यासाची ओढ , प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द पाहून आबासाहेबांना अभिमान वाटे. या सर्व धांदलीत पहिली परी केव्हा झाली हे तिला कळलेच नाही.

साम्राज्ञीने बाळाला जन्म दिला. घराचे जणू गोकुळच बनले. देशमुख घराण्याच्या परंपरेनुसार पहिली बेटी अन् तूप रोटी. आकांक्षा आत्याने बाळाचे नाव मिताली ठेवले. घरात पाळण्याभोवती जास्तीत जास्त वेळ सारेच घुटमळत. पहिलं बाळंतपण असूनही सुनेला माहेरी पाठवलं नव्हतं. आमच्याच घरी सर्व व्यवस्थित करूया. वाटल्यास तुम्हीच चार दिवस इकडं या, असा निरोप देशमुखांच्या घरून विहीणबाईंना गेल्यानं विहीणबाई नाही हो करत इकडेच आल्या होत्या. त्यामुळे  बाळंतपणात हातभार लागला. मिताली झोपली तर घर एकदम शांत वाटे. ती जागी झाली की, प्रत्येकजण तिला खेळवण्याचा, तिच्याशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम सुरू ठेवी. तिचं रडणंसुद्धा कौतुकाने ऐकत. हळूहळू ती मोठी होऊ लागली. तिचं वागणं, खेळणं दररोजच्या नवीन गमतीजमती यामुळे दिवस भुर्रकन् उडून जात होते. मितालीला एकजण खाली ठेवत नसे. ती पण भलतीच लबाड होती. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं जायचं असलं की, त्या व्यक्तीला पाहून ‘अगोsss अगोsss’ असा उच्चार करे. सहजच ती व्यक्ती तिला घेई. गोल चेहरा, कुरळे केस, गोबरे गाल अन् गब्दुल शरीर. साऱ्यांना आकर्षून घेई. मिताली होण्यापूर्वी साम्राज्ञीला कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून नोकरी लागली होती. आता तिला कॉलेज, मिताली अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार होती. लग्न झाल्यापासूनच सासूबाईनी कधीच तिच्यावर घरकामाची जबाबदारी टाकली नव्हती.

काही महिन्यात सिद्धार्थ भावोजींचं लग्न जमलं. सिद्धार्थ भावोजींचं लग्न म्हटल्यावर साम्राज्ञी वहिनींची चांगलीच पळापळ सुरू होती. ती स्वतः जरी काही करणार नसली तरी घरातल्या कामाच्या बायकांना सांगून कामं तरी करून घ्यावी लागणार होती. लग्न धुमधडाक्यात पार पड़ले. देशमुखांच्या सुना म्हणून गावात चांगलाच मान होता. साम्राज्ञी तशीच आता ही सून लता. लताचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं होतं. पण पुढं शिकण्याची तिची इच्छा नव्हती. घरातल्या कामात ती खूप हुशार होती. सणवार, पाहुणे, आकांक्षा वन्स अन् साम्राज्ञीताई या साऱ्याचं मनापासून सगळे ती करत होती. मितालीला घ्यायला, तिचं सगळं काही करायला तिला आवडे. मितालीला खेळायला. घोडा घोडा करायला आजोबा, सिद्धार्थ काका होतेच. काही महिन्यातच लताला नवीन पाहुण्याची चाहूल लागली. तशा अवघड अवस्थेतही ती घरात सर्वांना काय हवं नको ते पाही. काही महिन्यातच तिने गोड मुलीला जन्म दिला. नेहमीप्रमाणे याही सुनेचं बाळंतपण सासरीच झाले. आकांक्षा आत्याने बाळाचे नाव सुश्मिता ठेवले. मितालीला आता खेळगडी मिळाली होती. बाळापासून लांब राहायचे तिच्या जिवावर येई.

घरातील एकमेकांविषयीच्या प्रेम, माया, आपुलकीने घर एकसंघ राहिले होते. आकांक्षाचंही तिच्या सासरी चांगलं चाललं होतं. भांड्याच्या शेजारी भांडं ठेवल्यावर ते वाजणारच हे जाणूनच ती आपल्या संसारात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी अथवा भांडणं कधीही माहेरी सांगत नसे. अन् माहेरच्या कारभारातही कधी लुडबूड करीत नसे. म्हणूनच की काय, सुनांना अन् लेकींना देशमुख घराण्यानं समान वागणूक दिली होती. देशमुखांच्या घराला परकेपणाचा वारा शिवतही नव्हता. मिताली आता थोडी मोठी झाली होती. साम्राज्ञीची नोकरीही व्यवस्थित चालली होती. सुखाला दृष्ट लागू नये, असे वाटावे असा काळ होता. काही दिवसांच्या फरकाने लता अन् साम्राज्ञीला दिवस गेले साम्राज्ञीला मात्र मनात वेगळीच हुरहूर दाटून राहिली होती, तिला एकच मुलगी पुरे, असा तिचा हट्ट स्वरूपजवळ चालला होता. कारण तिच्यासारखीच स्वरूपचीही धारणा होती. ती म्हणजे मुलगा मुलगी समान. पण सासूबाईच्या हट्टामुळे सारे झाले होते. सासूबाईंकडून ती बऱ्याचवेळा ऐकत होती. या घराण्याची परंपराच आहे.
‘पहिली बेटी तूप रोटी अन् पुन्हा इथं प्रकाशतात वंशाचे दिवे’
यावर साम्राज्ञी एकदा हसून म्हणालीही होती की,
  ‘वंशाचे दिवे नाही दिवा. आम्हाला नोकरीवाल्यांना दोन अपत्यांचीच परवानगी असते. त्यापेक्षाही महत्त्वाचे, आपण ज्या देशात राहातो त्या देशाचा विचार करायलाच हवा. उगीच लोकसंख्येचं प्रमाण वाढवून नको त्या समस्यांना आमंत्रण कशाला द्यायचे ?’
  यावर तिच्या सासूबाई म्हणतच,
   ‘तुझे तत्त्वज्ञान खरंही असेल. अन् आजच्या काळात लागूही पडत असेल. दिवे नको पण एक दिवा तरी हवाच, माझ्या स्वरूपचा वंश वाढायला नको का, त्याचे नाव पुढे चालले पाहिजे.’
    त्यांच्या या बोलण्यावर ती खूप विचार करे, मुलगा, मुलगी असं कशाला मानत बसायचं ? देवाचे दान पदरी घ्यावे. घरात सर्वांना मात्र साम्राज्ञीकडूनच काय पण लताकडूनही अपेक्षा होती. साम्राज्ञीला सासूबाईच्या विचारांची कधी कधी भीती वाटे. आपण  मितालीचेच व्यवस्थित संगोपन करायला हवे होते. तिलाच शिकवून तिचे भविष्य उज्ज्वल करणे महत्त्वाचे होते पण या तिच्या कल्पना बाकीच्यांना पटत नव्हत्या. स्वरूपला पटत होत्या पण आईच्या शब्दापुढे तो नव्हता. साम्राज्ञीला स्वरूपचं मन मोडणं ठीक वाटत नसे. त्याने लग्न झाल्यापासून तिला समजून घेतले तर होतेच पण सोबत चांगल्या सहचाऱ्याची भूमिका निभावली होती. घरामध्ये सासूबाईनी दोघींच्याही कोडकौतुकात कोठे कसर पडू नये, याची काळजी घेत होत्या. वेळच्या वेळी खाणे-पिणे, व्यायाम, फिरणे, दवाखाना सारं सारं. घरात कामाला असणाऱ्या घरगडी अन् बायकांची संख्याही भरपूर होती. घरातील शेती, व्यापार भरपूर होता. घरातील माणसं होतीच हे सारं बघायला. पण नोकर-चाकरांचाही राबता होता. बघता बघता दिवस सरत होते. साम्राज्ञी आणि लता दोघींच्या बाळंतपणाच्या तारखांमध्ये एक-दीड महिन्याचा फरक होता. पहिल्यांदा लता बाळंतीण झाली. गोंडस, गोड अशा बाळाचा जन्म झाला. मुलगा झाल्यामुळे लताला अगदी सुटका झाल्यासारखी वाटली. एकतर नऊ महिने नऊ दिवस त्या बाळाला सांभाळा. ती आईपणाची भावना, मनाच्या खोल कप्प्यात होणाऱ्या विविध जाणिवा यांचे क्षण, एक आई आपल्या मनात साठवत असते. पण इथे लताला सुटका याचा अर्थ वेगळा अभिप्रेत होता. कारण देशमुखांच्या घराणेशाहीच्या गोडव्यांबरोबरच तिला वंशाच्या दिव्याची आख्यायिकाही माहीत होती. पाहाता पाहाता ती यातून पार पडली होती. तिने मनोमन देवाचे आभार मानले. कारण एकतर तिने लग्नानंतर शिक्षण पुढे चालू ठेवले नव्हते. म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी नव्हती. काही प्रसंग आलाच तर तिला माहेरी राहाण्याशिवाय पर्याय राहिला नसता. मात्र तिची चिंता मिटली होती. तिने देशमुख घराण्याच्या परंपरेला मुलाला जन्म देऊन जणू कायम ठेवले होते. साम्राज्ञी मात्र तशा कुठल्याच भावना मनाशी बाळगून नव्हती. तिला मुलगा-मुलगी हा भेदभाव मान्य नव्हता. दुसरे ही गोष्ट स्त्रियांच्या हाती नसते, हे तिने वैज्ञानिकतेचा आधार घेत सासूबाईंना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना पटणं शक्य नव्हतं. स्वरूपला हे सारं कळत होतं. काही का असेना, स्वरूपने ते मान्य केलं अन येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला  सामोरी जाण्याची स्वतःची तनामनाने तिने तयारी ठेवली होती. लताचा ललित आता सव्वा महिन्याचा झाला होता. घरात मिताली, सुस्मिता, ललित या साऱ्यांमुळे गोकुळात असल्यासारखे वाटे. या साऱ्यांमध्ये दिवस कसे जात होते, कोणालाच कळत नव्हते. अशातच एके दिवशी साम्राज्ञीला बाळंतपणासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. आता प्रत्येक क्षण जड वाटत होता. तिच्यासोबत दवाखान्यात सासूबाई, आई, स्वरूप, आकांक्षा, सिद्धार्थ एवढेजण होते. घरामध्ये लताच्या सोबतीला तिच्या आईला बोलावून घेतलेच होते. साम्राज्ञीचे सासरे तिला पाहाण्यासाठी दवाखान्यात निघाले होते. रस्ता रहदारीचा होता. घरापासून पाच-साडेपाच किलोमीटरवर दवाखाना होता. ते गाडीवर निघाले होते. एवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी रस्त्याच्या बाजूला गाडी घेऊन मग मोबाईल उचलला. साम्राज्ञीला दुसरीही मुलगीच झाली होती. आबासाहेबांना, घरच्यांना अन् स्वरूपला काय वाटले असेल याचा विचार साम्राज्ञीच्या मनात आला. पण स्वरूपचे काही नाही. सासूबाईनी मात्र आबासाहेबांशी फोनवरच नाराजी व्यक्त केली होती. विचारांच्या तंद्रीत गाडी सुरू करून ते गाडी चालवू लागले. एवढ्यात काही कळायच्या आत गाडी उडाली अन् देशमुख रस्त्याच्या बाजूला दगडावर जोरात उडून पडले. त्यांना कंटेनरने जोरात ठोकले होते. चूक तर दोघांचीही होती. देशमुख विचारात होते अन् कंटेनरचा वेग चांगलाच होता. त्याला कंटेनरवर नियंत्रण ठेवता आले नाही. पटापट गर्दी जमा झाली. जाणाऱ्या – येणाऱ्यांमध्ये बरेचजण ओळखीचे होते. त्यामुळे मदतीला बरेचजण धावले. कंटेनर चालवणारा ड्रायव्हर मार खायच्या भीतीने पळून गेला. देशमुखांचा श्वासोच्छ्वास चालू होता. जखम मात्र कोठेच दिसत नव्हती. लोकांनी  पोलिसांची वाट न पाहाता त्यांना त्वरित दवाखान्यात पोहोचवले. ओळखीच्या लोकांनी स्वरूप, सिद्धार्थला फोन केला. पोरं आली पण दवाखान्यात उपचार सुरू होण्यापूर्वीच देशमुखांनी हे जग सोडले होते. देशमुख कुटुंबीयांवर जणू आभाळच कोसळले होते. आधीच स्वरूपला मुलगा झाला नाही म्हणून दुःखी झालेली स्वरूपची आई, आतातर दुःखाच्या खाईत लोटली गेली होती. त्यांना सावरायचे कठीण होते. घरात आता दोन दोन ओल्या बाळंतीण. स्वरूपच्या आईचा आक्रोश ऐकणाऱ्यांचे  मन हेलावून टाकत होता.

साम्राज्ञी बाळंतपण झाल्यावर माहेरी येऊन चार महिने होत आले. दोन महिन्यांनी ती कामावर हजर होणार होती. त्यापूर्वी बाळाला घरातल्या माणसांची सवय झाली पाहिजे. बाळाच्या म्हणजेच निशाच्या सवयी सर्वांना माहीत झाल्या पाहिजेत. म्हणून साम्राज्ञीने आईसमोर सासरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आईलाही तिचे म्हणणे पटले. पण सासरहून काहीच निरोप नव्हता. तरीही तिने स्वरूपला फोन केला. स्वरूपने मात्र मी तुला पुन्हा फोन करतो म्हणून फोन ठेवला. स्वरूपला एकीकडे आई अन् दुसरीकडे बायको. ज्या आईने जन्म दिला, लहानाचे मोठे केले, जीवनात संस्कार अन् अनुभवांची शिदोरी दिली. तिचं ऐकावं की, जिने आपल्या जीवनात सप्तपदींच्या पावलांनी कर्तव्य अन् प्रेमाची पूर्तता करीत प्रवेश केला. अन् प्रेमाची बरसात करत वेगळाच बहुरंगी, प्रेमरंग भरला त्या सहचारिणीचा विचार करावा. त्याला काहीच सुचत नव्हते. साम्राज्ञीला निशाचा जन्म झाल्यावर दवाखान्यातून घरी न आणता थेट माहेरी सोडले होते. सुतकाचे कारण सांगून ओली बाळंतीण नको, असे कारण सांगायला स्वरूपच्या आईने स्वरूपला भाग पाडले होते. सासूबाई दुःखात आहेत म्हणून नातीला पाहायला एकदाही आल्या नाहीत. साम्राज्ञीलाही इकडे आताच येऊ नकोस भेटायला, पुन्हा तू येणार आहेसच की, असा निरोप दिला असल्याने तीही आली नव्हती. स्वरूप निशाला पाहायला, साम्राज्ञीला भेटायला एक-दोनदा येऊनही गेला होता. पण तुम्ही आईना जपा, माझी काळजी करू नका, या भूमिकेने साम्राज्ञी स्वरूपला सासरी घेऊन जाण्यासाठी विचारत नव्हती. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. आबासाहेब जाण्याचे कारण सासूबाईंना साम्राज्ञी अन् निशाच वाटत होत्या. त्यांनी स्वरूपला एकतर मी नाहीतर ती असा पर्याय ठेवला होता. खरंतर देशमुखबाईना असं वाटायचं कारण नव्हते. पण प्राप्त परिस्थितीनुसार त्यांनी आपल्या मनात गैरसमज करून घेऊन चुकीची धारणा करून घेतली होती. बघता बघता सहा महिने पूर्ण होत आले. शेवटी एके दिवशी साम्राज्ञी आईला घेऊन बाळासह सासरी पोहोचली. साम्राज्ञीला सासरच्या लोकांच्या वागण्यात फरक जाणवला. ज्या सासूबाई तिला लेकीसारखं जपत होत्या त्यांनी आज स्वतः तर नाहीच पण इतर कोणाला तरी बाळंतीण आली म्हणून भाकरीतुकडा, लिंबू काही ओवाळून उतरून टाकायला लावले. त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या होत्या. ज्या जाऊबाई ताई ताई म्हणत मागं पुढं करत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर अनामिक आकस होता. सिद्धार्थ भावोजीही नजरेला नजर देत नव्हते. स्वरूपची अवस्था साम्राज्ञीला अचानक पाहून भांबावल्यासारखी, त्रिशंकूसारखी झाली होती. जणू त्या बंगल्यात एक क्षण सारे वातावरण गोठून गेले होते. क्षण स्थिरावला होता. कोणीच कोणाला काहीच बोलत नव्हते. एवढ्यात निशा भूक लागली म्हणून रडू लागली. तिला पाजण्यासाठी आडोशाला जावं म्हणून साम्राज्ञी आपल्या खोलीकडे निघाली. एवढ्यात सासूबाई गरजल्या,
‘थांब तुझा या घरातला अधिकार आम्ही केव्हाच संपवलाय’
  साम्राज्ञीला कानात कोणीतरी गरम शिसं ओतावं असं वाटलं. आपल्याच कानावर तिचा विश्वास बसेना. तिला काहीच कळेना. एक गूढ दाटून राहिलं तिच्या मनात. ‘सासूबाई, काय झाले? माझं काही चुकलं का?’

साम्राज्ञी स्वरूपकडे वळली.
‘अहो, तुम्ही तरी सांगा.’
पण कोणीच काहीच बोलत नव्हते. साम्राज्ञीची आई तर मटकन् खालीच बसली. तिला काय बोलावे ते सुचेना. एकंदरीत परिस्थिती बिकट अन् भयंकर आहे, याची जाणीव दोघींनाही झाली.
‘साम्राज्ञी तू या घरात राहिलीस तर मी राहाणार नाही. अन् मी राहिले तर तू राहायचं नाही.’
  या एका वाक्यात सासूबाईनी निर्णय सांगितला.
  ‘पण पण माझी चूक तरी सांगा. माझं काही चुकलं असल्यास क्षमा करा.’
   म्हणून तिने निशाला सासूबाईंकडे देण्याचा प्रयत्न केला. पण त्या दूर सरकल्या. शेवटी निशाला आईकडे देऊन ती सासूबाईंकडे वळली. पण त्या काही बोलायच्या अन् ऐकायच्याही मनःस्थितीत नव्हत्या. त्यांनी स्वरूपला तुला योग्य वाटेल तो निर्णय घे, म्हणून सांगितले आणि त्या खोलीकडे निघून गेल्या. त्यांनी स्वतःच्या खोलीचे दार आपटल्याचा आवाज ऐकून साम्राज्ञीच्या मस्तकात असंख्य कळा आल्या. तिने स्वरूपजवळ जाऊन नक्की काय झाले? असे विचारले. आईच्या मनातले गूढ त्याने तिला सांगितले. ते ऐकून साम्राज्ञी मनातल्या मनात पार कोसळली.
   ‘मग मी आत काय करावं?’
    या तिच्या प्रश्नावर स्वरूपने तिची बॅग उचलली व तो झपझप बंगल्याच्या बाहेर पडू लागला. साम्राज्ञीसह तिथे असणाऱ्या कोणालाच आता पुढे काय होईल ते समजेना.
    ‘जिथं तू तिथं मी’
    या तत्त्वाने साम्राज्ञीही निशा आणि आईसह बाहेर पडली. स्वरूपने रिक्षाला हात केला. रिक्षानं कुठं जायचं हे कोणालाच माहीत नव्हतं.
    ‘माझ्या माहेरी जायच का?’
    या प्रश्नावर त्याला राग आला असावा. त्याने रागातच
     ‘मी आपली योग्य ती सोय करतो.’
      एवढंच उत्तर दिलं. थोड्याच वेळात रिक्षा एका मित्राच्या दारात थांबली. रिक्षाच्या आवाजाने तो बाहेर आला. अचानक सर्वांना पाहून मित्रही आश्चर्यचकित झाला. पण तरीही हसतमुखाने स्वागत करत पुढे आला. स्वरूप त्याचा लंगोटीयार, तो कसल्यातरी बिकट परिस्थितीत आहे एवढंच त्याला साऱ्या परिस्थितीवरून लक्षात येत होतं. घरात त्याची आई, बायको होतीच. बायकोने आलेल्या सर्वांना चहा, नाश्ता केला. झालेल्या चर्चेतून घडलेली घटना कळली अन् त्यावर उपाय एकच होता. जन्म दिलेल्या आईला सोडणं चुकीचंच पण जिने सात जन्माची साथसोबत करण्याचे वचन दिलं होतं, घेतलं होतं, सर्वस्व अर्पण केलं होतं. नवऱ्याच्या दुनियेला आपली दुनिया मानलं, त्याच्या जीवनात संसाराचे रंग भरले त्या पत्नीला फक्त मुलगी झाली, अन् त्या मुलीच्या जन्मानंतर काही वेळातच वडिलांचे म्हणजेच आजोबांचे प्राण गेले, याचे कारण करून तिला जीवनातून, संसारातून बाहेर काढणं चुकीचं होतं. हे मत स्वरूपने सर्वांसमोर मांडलं. साम्राज्ञीचं डोकं सुन्न झालं होतं.
       ‘तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुमच्या आईजवळ राहा. मी माझ्या मुलींसह एकटी राहीन.’
       पण स्वरूपच्या उत्तराने तिला जगण्याचे बळ अन् ध्येय दिले.
       ‘एकदा साथ देण्याचे वचन दिलंना. मग आता पुढे काय हा प्रश्न नको. जे होईल ते मिळून पाहू.’
       झालं सगळे काही पहातच होते. स्वरूपने साम्राज्ञीला दोन दिवस मित्राकडे राहून भाड्याचं घर शोधू असे सांगितले. साम्राज्ञीसह कोणालाच हे योग्य वाटेना. पण वेगळं राहाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

बघता बघता दिवस जात होते. आज लग्नाचा पंचविसावा वाढदिवस मुलींशिवाय दोघांनीच साजरा केला. मुलींच्या सुटीदिवशी त्यांचे फोन येऊन गेले. दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या. स्वरूपला आईची आठवण येई. पण तो तिची समजूत घालण्यात कमी पडत होता, असं तो स्वतःच साम्राज्ञीला सांगत असे. आईही नातं जुळवून घ्यायला पुढाकार घेत नव्हती. साम्राज्ञीला एवढं मात्र माहीत होतं,
‘ही वेळ पण निघून जाईलच’
या वाक्याचा जीवनात सुखात, दुःखात दोन्हीही ठिकाणी सकारात्मक वापर ती लक्षात ठेवत होती. बघता बघता  मुली मोठ्या झाल्या. आज मितालीचा वृत्तपत्रात फोटो पाहून तिचे डोळे भरून आले. दहावी, बारावी, पदवीत तिने प्रथम क्रमांक सोडला नव्हता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने महाराष्ट्रात मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. सर्वांचाच आनंद गगनात मावत नव्हता. साम्राज्ञी अन् स्वरूपला मुली आहेत म्हणून कधीच दुःख वाटत नव्हते. उलट त्यांनी मुलींना शिक्षणासाठी नेहमी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मुलं असती तर जे जे केले असते ते ते त्यांनी मुलींसाठी केले होते. त्यामुळेच हा क्षण त्यांच्या जीवनात आला होता. मितालीच्या पावलावर पाऊल ठेवत निशाचेही प्रयत्न सुरू होते. साम्राज्ञीची चिकाटी, जिद्द, ध्येयासक्ती दोघींमध्येही पुरेपूर उतरली होती. या दोन मुलींची आपण आई आहोत, याचा तिला सार्थ अभिमान वाटत होता.

जाऊबाईंनी ललितचे खूप लाड केले होते. वंशाचा दिवा म्हणून घरातील सर्वांनी त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. त्याची प्रत्येक मागणी पूर्ण केली होती. सुस्मिता हुशार होती पण शिकलेल्या लोकांची बुद्धीच वेगळी चालते, असं म्हणून पदवीपर्यंत तिला शिकवले होते. हा निर्णय सासूबाईचा होता. ललित मात्र कसातरी दहावी, बारावी पास झाला. आता यापुढे आपण शिकून डोक्याला त्रास करून घेणार नाही, असे त्याने घरात सांगितले. आबासाहेबांनी कमावलेल्या इस्टेटीचा ‘वारसदार’ म्हणजे ललित हीच विचित्र गोष्ट त्याच्या डोक्यात होती. लताला पहिल्यांदा काही वाटले नाही. पण जेव्हा मिताली देशमुखचे यश या मथळ्याखाली तिने बातमी वाचली. तेव्हा तिला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. सासूबाई एके दिवशी नातींना भेटण्याचे कारण काढून स्वरूपच्या घरी गेल्या. मितालीचा गावात सत्कार होणार असल्याने ती पुण्याहून आली होती. सगळ्यांच्याच नजरा चमकल्या. साम्राज्ञी अन् स्वरूपच्या डोळ्यासमोरून लग्नापासून आतापर्यंतच्या क्षणांची चित्रं सरकली. पण काही कळायच्या आत तर साम्राज्ञीच्या गळ्यात पडून सासूबाई खूप रडल्या.
‘आज जर आबासाहेब असते तर त्यांना हा आनंद पाहायला मिळाला असता. नात कलेक्टर झाली म्हणून त्यांनी गावभर पेढे वाटले असते.’
त्यांना अजून दुखवावे असे स्वरूप अन् साम्राज्ञीला वाटले नाही. दोघांनी मोठ्या मनाने सर्व चुका माफ करून त्यांना पेढा भरवला.

‘ह्याच खऱ्या देशमुखांच्या वारसदार, वंशाच्या पणत्या, ह्यांना मी इस्टेटीत हिस्सा देणार’ असं त्यांनी जाहीर केलं. स्वरूप-साम्राज्ञीला हे अपेक्षित नव्हतं. पण आईचं मन मोडणं चुकीचंच होतं.

पुन्हा एकदा देशमुखांच्या बंगल्यात गुण्यागोविंदानं गोकूळ नांदू लागलं.

सौ. आशा अरुण पाटील

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!