विद्यार्थी ज्ञानकेंद्री की परिक्षाकेंद्री

         
          
                  संकटाशी करू सुरक्षेने दोन हात
                  देऊ एकमेकांना माणुसकीची साथ
                   नियम पाळू सारे स्वसंयमाने
                   पुन्हा जग धावेल वेगाने
                  
खरं तर न भूतो न भविष्यती असे संकट आपल्या सर्वांवर आले आहे. कधी आपण विचारही केला नव्हता की आपण स्वतःला बंद करून घेवू. सारं जग काही फार प्रमाणात बंद राहील. खरंतर याची कारणं किंवा परिणाम पाहिले तर हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. तसे पाहता भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील जनता  शेतीवर अवलंबून आहे. परंतु हे सत्य नाकारत शहराकडे पळणारी जनता पुन्हा गावाकडे परतली आहे. प्रत्येक क्षेत्रात काम पूर्णपणे बंद नसून ते काही प्रमाणात सुरू आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातही आहे.
                   फेब्रुवारी २०२० ला थोड्याफार कोरोनाच्या बातम्या सुरु होत्या. पण अचानक मार्च महिन्यात जेव्हा शाळा कॉलेज बंद झाली. तेव्हा मात्र विद्यार्थी- शिक्षक- पालक या साऱ्यांचीच अवस्था विचित्र झाली होती. अगदी काही महिन्यांवर आलेल्या परीक्षा असतील किंवा बोर्ड परीक्षा. पाहता पाहता काही निर्णायक भूमिकेवर शैक्षणिक वर्षाचे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. आता संपुर्ण एक शैक्षणिक वर्ष मुलांनी घरातून शिक्षण घेतलं.
                    सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे. राज्य शासनाच्या या धोरणानुसारच आज आपण ऑनलाइन एज्युकेशन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक प्रचंड संभ्रमात आहेत. त्यामुळे खरोखरच ऑनलाइन शिक्षण पद्धती ही पारंपरिक शिक्षण पद्धतीला पर्याय ठरू शकते का? यावर विचार केलाच पाहिजे. शिक्षणाचा खरा उद्देश चहुबाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करणे व त्यातून आपले उत्तम व्यक्तिमत्व घडविणे हा आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो. नाविन्य म्हणून याकडे विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होतात पण एक डिजिटल शिक्षण कायमस्वरूपी इलाज होऊ शकते का? आताच्या अडचणींच्या काळात एक पर्यायी व्यवस्था म्हणूनच योग्य आहे का?
                            सध्या पालकांच्या तसेच बऱ्याच जणांच्या मनात एक विचार घोळू लागला आहे, तो म्हणजे शिक्षक शिकवायला नसतील तरी विद्यार्थी शिकू शकतात. पुढच्या वर्गात जावू शकतात. मग जेव्हा परिक्षा असेल तेव्हाच शिक्षकांची गरज असे आहे का? विचार व सर्वेक्षणा अंती आपल्या लक्षात येते की ज्ञान मिळविण्यासाठी आणि मार्गदर्शक म्हणून शिक्षक हा एकमेव आहे. पर्याय म्हणून दुसरं कुणी असूच शकत नाही. शिक्षकाकडून ज्ञान घेवून विद्यार्थी समृद्ध होतात. ऑनलाइन शिक्षणाने मुलांमध्ये प्रगती झाली का? खरं तर मुलं एका इयत्तेतून दुसर्‍या इयत्तेत  गेली. विशेष आपण त्यांची परीक्षा ही घेतली नाही. पण मुले पुढे गेलीही. परिक्षेशिवाय या पुढे जाण्याला तसा अर्थ आहे असे म्हणता येणार नाही. मुलांनी परीक्षा दिली असती तर ते शक्य झाले असते असे होते का? विद्यार्थी परीक्षाकेंद्री झाले आहेत नव्हे ते ज्ञानकेंद्री असायला हवेत. असा विचार शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ञांचा असतो. मुलांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा ठरतो. पण  विचार फक्त परीक्षेसाठी केला जातो. परीक्षेसाठी ज्ञानार्जन करणे कितपत योग्य आहे. विद्यार्थी शिकत असताना तो घडतही असतो. विद्यार्थी हा जीवनावश्यक क्षमतांमध्ये विकसित होणे आवश्यक असते. ठरवलेल्या अभ्यासक्रमातून आणि नियोजित पाठ्यक्रमातून हे साध्य होते. पण हे देण्यासाठी जो माध्यम आहे, जो सुलभक आहे त्याचं महत्वही तेवढंच आहे. कोणत्याही अभ्यासक्रमाला विविध पद्धतींच्या साह्याने अध्ययन कर्त्यांपर्यंत पोहोचवणारा शिक्षकच असतो.
                    गुरुविना ज्ञान देई कोण? आजकाल आपण ऑनलाइन शिक्षण घेत देत आहोत. मग शिक्षका ऐवजी ह्या माध्यमाचा पर्याय म्हणून विचार होऊ शकतो का? तर तो काही अंशी काही टक्‍क्‍यांपर्यंत ठीकही आहे पण वास्तवात शिक्षक हाच एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. हे सर्वमान्य झाले आहे. आज ऑनलाईन शिकत असताना किती मुलं आपल्या इयत्तेनुसार क्षमतेत साध्या पर्यंत जाऊ शकली? उलट आपलं ध्येय सोडून आभासी जगाकडे, आभासी विचार, कल्पना आणि नको त्या ज्ञानाकडे वळणे कितपत योग्य आहे. आपण चहा करण्यासाठी दुधाऐवजी दूध पावडरचा वापर करू पण दूध हाच सर्वात योग्य घटक ठरतो.
                    ऑनलाईन शिक्षण देताना वेगवेगळ्या पध्दतीने दिले जाते. शैक्षणिक व्हिडिओ, प्रश्नोत्तरे, दृढीकरणासाठी अभ्यासावर आधारित खेळ. याने ज्ञान मिळते पण ते घेताना वय, वेळ, वातावरण, आरोग्य आणि पैसा यांचा विचार करावाच लागतो. जर लहान मुलांना अभ्यासाचे मोबाईलवर व्हिडिओ, नोट्स पाहायला सांगाल तर कोवळ्या वयातल्या दृष्टीवर वाईट परिणाम हा होणारच. डोळ्यांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असतेच. दुसरी गोष्ट वातावरण. विद्यार्थी जेव्हा शाळेत असतात तेव्हा ते एक वेगळ्या वातावरणात असतात की ज्यामुळे त्यांचे लक्ष आपोआप ज्ञानावर केंद्रित होते पण इथे मात्र घडते वेगळे. एक गोष्ट पाहता पाहता येणाऱ्या विविध सूचना संदेश यामुळे तो कधी अभ्यास सोडून इतर गोष्टी कडे वळतो ते त्याच्या त्यालाही कळतच नाही. उलट शाळेमध्ये एखादा घटक शिकवताना शिक्षक दृकश्राव्य माध्यमातून समजून सांगतातच. सोबत अनेक उदाहरणे देतात. ज्यामुळे ज्ञानाचे दृढीकरण होते.  हाच अनुभव गुगल मीट किंवा झुम ऍपद्वारे शिक्षक देवू शकतात पण त्यावर ही काही मर्यादा येतात. आरोग्यावरही याचा खोलवर परिणाम होतो. सर्वात प्रथम नेत्र नंतर तुमच्या बसण्याच्या पध्दती वरून तुम्हाला वेगवेगळे आजार उद्भवतात. जेव्हा आपण ऑनलाइन शिक्षण घेतो. तेव्हा मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशनचा विपरीत परिणाम होतो. तसं आपण ऑनलाइन शिक्षण टीव्ही किंवा संगणकापेक्षा मोबाईल वर जास्तीत जास्त घेतो. मोबाईलवर पाहताना मिळणाऱ्या नेत्रसुखामुळे हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. मेंदूमध्ये हव्या त्या गोष्टी पाहिल्या नंतर डोपामाइन नावाचा स्राव स्त्रवतो. त्यामुळे माणसाला आत्मिक समाधान मिळते. व तो जास्तीत जास्त  वेळ मोबाईल मध्ये गुंतून राहतो. एखाद्या गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात पण या गोष्टीत वय आणि पैसा या दृष्टिकोनातून तोटे जास्त आढळतात.
                             विद्यार्थी ज्ञान पाहून, ऐकून, स्पष्ट करून आणि कृतीतून घेतातही. पण शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष घडणारा संवाद येथे होत नाही. अध्ययनात आलेले अडथळे तात्काळ दूर होतील असे नाही. शिक्षकांसमोर अध्यापन करताना विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून त्याची प्रतिक्रिया शिक्षकास कळते. वेळच्या वेळी असलेल्या शंका दूर होतात.
                             दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑनलाइन शिक्षण पद्धती सर्व स्तरातील लोकांना शक्य होणार नाही. त्यासाठी लागणारा मोबाईल, संगणक सर्वांकडे असेल असे नाही. त्याला लागणारे नेटवर्क सर्वांनाच मिळेल असेही नाही. त्यामुळे सर्वसमावेशकता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक विद्यार्थी या शिक्षण पद्धती पासून दुरावलेले आहेत, वंचित राहिलेले आहेत. शिक्षण देताना अनुभवांची समृद्ध स्थिती, काटेकोर वेळाचे पालन करत केलेल्या ऑनलाइन पद्धतीत आढळत नाही. शिक्षणामध्ये अनुभूती ही खूप महत्त्वाची ठरते. शिक्षक एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी बरीच उदाहरणे  देतोच तर  कधी शैक्षणिक साधनांचा वापर करतो. त्यामुळे विद्यार्थी लहानपणापासून अनेक गोष्टी हाताळून ज्ञान घेत असतो. मोठेपणीही तो प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून बघतो. स्वतः केलेल्या गोष्टींमुळे हे ज्ञान जास्तीत जास्त मेंदूमध्ये ठसते. परंतु ऑनलाइन शिक्षण घेत असताना या प्रकारचे ज्ञान कमी प्रमाणात मिळते. सक्षम अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करता ऑनलाइन शिक्षण पद्धती नक्कीच विचार करायला लावणारी आहे.
                             शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अविरत झटत असतो. इयत्तेनिहाय दिलेल्या क्षमतांनुसार विद्यार्थ्यांना त्या पातळीपर्यंत नेण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. सर्वांगीण विकास घडवून चांगला नागरिक घडवणे हे ध्येय उराशी बाळगून कष्टत असतो. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचे मुल्यमापन करुन कोणती क्षमता परिपूर्ण नाही ते पाहून उपाययोजना करतो. मात्र ऑनलाइन अभ्यासात हे कधी घडतं तर कधी घडतही नाही. आपले शिक्षक आपल्याला हवे तिथे मार्गदर्शन करतात हे पाहून शाबासकीची थाप विद्यार्थ्यांना प्रेरक ठरते. ऑनलाइन अभ्यास हा महाविद्यालयीन व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना योग्य वाटतो.
                            

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!