या चिमण्यांनो

                            या चिमण्यांनो
                           
           या चिमण्यांनो…
           परत फिरा रे
            घराकडे आपुल्या
            तिन्ही सांजा जाहल्या…
गाणं ऐकून उषाच्या डोक्यात विचार आला. आजकाल चिमण्यांना घर करण्यासाठी झाडंच नाहीत. तर त्या कुठे परतणार? या विचाराबरोबरच तिला माहेरचीही आठवण झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. सरिताने आईच्या डोळ्यात पाणी पाहून ‘काय झालं?’ असा प्रश्न केला. पण ‘काहीही नाही’ असं म्हणून उषाने  आपल्या डोळ्यात आलेले अश्रू सरितापासून लपविले. आईला आणखी प्रश्न विचारल्यावर तिचे मन दुखावेल म्हणून ती गप्पच राहिली. आईला सरिताच्या वयाचा व समजूतदारपणा अभिमान वाटला.  लहान असुन सुद्धा कितीतरी समजूतदार. आताशा सहावीत गेल्यापासून उंची उषाबरोबर आली होती. आता ती आपल्या सर्व गोष्टीत सहभागी होते. हेही उषाला जाणवलं. ज्येष्ठ चिरंजीव आठवीत असूनही त्याचं जास्त लक्ष घरातल्या  व्यक्तींकडं नसून ‘मी माझं विश्व’ एवढंच होतं. सरिता व स्वरीतच्या स्वभावात बराच फरक त्यांच्या बाबांनाही जाणवत होता.

                           एके दिवशी परसबागेतल्या झाडाच्या खाली नुकतेच जन्मलेलं चिमणीचं एक पिल्लू पडलेलं स्वरीतने पाहिले. तो त्या पिलाला काठीने डिवचणार इतक्यात सरिताने त्याला अडवलं. तुझ्या स्पर्शाने त्याची आई त्याला परत घरट्यात घेणार नाही. तू काडीने डिवचलेस तर ते मरेल, अशा वेगवेगळ्या पध्दतीने तिने स्वरीतला समजावले. आईकडे जाऊन तिने एवढ्या उंचीवरून पिलू खाली पडले कसे? अशीही शंका उपस्थित केली. पिलाने नुकतीच हालचाल करण्यास सुरुवात केल्याने घरट्यातून ते चुकून खाली पडले असणार असा अंदाज आईने सांगितला. यावर सरिता गंभीर झाली. 
‘लहानपणी स्वतः मोठ्यांच्या मदतीशिवाय केलेल्या कृतीचा परिणाम वाईट होतो,
हे तिला पटले. त्या दिवशी ती उदासच होती. त्यानंतर ती दररोज घरासमोर आणि मागे झाडावर येणाऱ्या, जाणाऱ्या आणि राहणाऱ्या पिलांचे निरीक्षण करू लागली. तिला तो छंदच जडला. तिने त्या पिलांना प्यायला पाणी ठेवण्यासाठी मातीची छोटी भांडी (गाडगी) ठेवली. काही दिवसांनी तिने झाडावर कुठूनतरी सुगरणीची घरटी आणून अडकवली. तिच्या या छंदाचा स्वरीतला मात्र राग यायचा. घराबाहेर बॅटबॉल खेळताना त्याच्या चेंडूचा पक्षांना त्रास व्हायचा. त्यामुळे त्याला मुक्तपणे खेळता येत नव्हते.  शाळेमध्ये एकदा ‘पर्यावरण मित्र’ नावाची स्पर्धा होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी घरातील माणसांच्या संख्येएवढी झाडे लावायची. एवढंच नव्हे तर ती जगवायची अशी अट होती. सरिताला खूप आनंद झाला. तिने आईकडून घरातील दुधाच्या पिशव्या घेऊन त्यात माती घालून बिया पेरल्या आणि काही छोटी छोटी रोपं ही लावली. स्वरितच्या मनात नव्हते. पण वर्गशिक्षकांची आज्ञा म्हणून त्याने सरिताच्या मागे लागून दोन चार रोपे आयतीच मिळविली. त्याला त्यांची निगा राखणे जमेना. शेवटी स्पर्धेचा दिवस आला. सर्वांनी आपापली रोपे शाळेत आणली. कोणी औषधी, तर कोणी सजावटीची, तर कोणी फुलांची झाडे लावली होती. परीक्षकांनी सर्वांची रोपं पाहिली. निरीक्षणानंतर त्यांच्या लक्षात आले की, बऱ्याच मुलांनी रोपं विकतच आणली होती. बिया लावून किंवा रोप लावून वाढवण्यातला आनंद त्यांनी अनुभवला नव्हता. सरिता मात्र सर्व बाबतीत पुढं होती.  बिया आणि रोपांचे तिने मन लावून निरीक्षण केलं होतं. बियांना कोंब, अंकुर किती दिवसात फुटतो, त्यांना पाणी किती वेळा द्यावं लागतं. त्यांना सूर्यप्रकाशाची गरज का पडते, अशा बऱ्याच गोष्टीचे ज्ञान तिला होते. परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने योग्य उत्तरे दिली. तिला पहिल्या नंबरचे बक्षीस मिळाले. स्वरितची रोपं चांगली होती. मात्र त्याचे झाडांविषयीचे ज्ञान कमी त्यामुळे त्याचा नंबर आलाच नाही. स्वरितला सरिताचे बक्षीस खूप आवडले. आता त्याला, आपल्यालाही बक्षीस मिळालेच पाहिजे, असे वाटू लागले.
                     शाळेच्या आवारातच मुलांनी आणलेली रोपं लावली गेली. ‘झाडं लावण्याइतकंच जगवणंही किती महत्त्वाचं आहे’ हे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितलं. शाळेमधील बागेची एक वेगळीच ओढ शाळेतील मुलांना लागली. हिरवा परिसर, शुद्ध हवा, सरस्वती पूजनासाठी ताजी फुलं या सर्वांमुळं मुलांना एक वेगळाच आनंद मिळत होता. दिवसामागून दिवस जात होते. हळूहळू रोपांची वाढ होत होती. मुलं पुढच्या इयत्तेत गेली. तशी झाडही मुलांच्या उंचीबरोबर वाढली. आता वेगवेगळे पक्षी त्या झाडावर येऊ लागले. त्या छोट्या झाडांच्या सावलीत बसण्यास छोटी मुले येऊ लागली. कार्यानुभवाच्या तासालाही शिक्षकांनी फळभाज्या, फुलांची छोटी झाडे, वेल लावून उत्पादनाचा व विक्रीचा आनंद मुलांना दिला होता. प्रत्येक वर्गाने विक्री चांगलीच केली होती. दहावीत असलेल्या स्वरितने अभ्यास सांभाळून विक्री केली होती, तीही विक्रमी. स्वरितला सर्वात जास्त विक्री केली म्हणून प्रशालेकडून बक्षीस मिळाले. सरिता व स्वरितच्या छंदामुळे घराजवळ, शाळेजवळ आता काही छोटे छोटे पक्षी आईला दिसू लागले होते. तिच्या गाण्याला आता खरा अर्थ आला. तिनेही मुलांना पक्ष्यांना पाणी ठेवण्यास, धान्याचे दाणे टाकण्यास, त्यांचा निवारा करण्यास मदत केली. हळूहळू वर्षे जात होती.
                 सरिताचं आता शाळेतील शेवटचं वर्ष. दहावीचं वर्ष म्हणूनच तिने आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. त्यांच्या वर्गाची बागकामाची जबाबदारी नववीच्या वर्गाला सोपविण्यात आली. त्या वर्गाने ती मन लावून पार पाडली. प्रशालेला ‘सुंदर शाळा, निसर्ग शाळा’ हा मान मिळाला. सरिताने दहावीचा तर स्वरितने बारावीचा अभ्यास मन लावून केला. दोघंही चांगल्या मार्कांनी पास झाले. सरिताने शास्त्र शाखा तर स्वरितने १२ वी नंतर शेतकी (ॲग्रीकल्चर) शाखेला प्रवेश घेतला. ‘छंदाचं रूपांतर नोकरीत व नोकरीचं छंदात’ या सुवर्णमेळानं त्या दोघांना जीवनात यशस्वी केलं.  आईच्या बहरलेला संसार व बागेमुळे आईच्या ओठी गीत फुललं, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे….’ मुलांना आता घरातील बागकामाला वेळ नव्हता पण आईने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

2 Replies to “या चिमण्यांनो”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!