asha patil mee lekhika

योगायोग

                   
           निशा आदित्यची वाट पाहात एकेक काम करत होती. आज सकाळी आदित्य ऑफिसला जाताना तिचे अन् त्याचे जरा भांडण झाले होते. तसे तर दोघांचा प्रेमविवाह, तिने आदित्यसाठी आपल्या माहेरची माणसं सोडली होती. या माहेरच्या माणसांचा तिच्यावर अतूट विश्वास अन् जीव; पण तरीही यौवनाच्या उंबरठ्यावर आदित्यसारख्या भ्रमराच्या प्रेमात ती केव्हा पडली, हे तिला कळलेच नाही. प्रेमात पडण्यापूर्वी प्रेम म्हणजे लफडं असतं, प्रेम करणाऱ्यांना डोकं नसतं, भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. अशा सारखेच तिचे अनेक गैरसमज होते; पण जशी ती प्रेमात पडली, तसं तसे सर्व गैरसमज चुकीचे होते, असं तिला वाटू लागलं. आदित्य तिच्यापुढे एक वर्ष शिकत होता. कॉलेज कमी अन् बाकी व्याप ज्यादा, असं त्याचं असे. श्रीमंत घराण्यातला आदित्य, निशाच्या प्रिया नावाच्या मैत्रिणीचा भाऊ होता. प्रिया काय किंवा आदित्य काय श्रीमंतीत वाढलेली नशीबवान मूलं. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेली. बघता बघता प्रिया अन् निशा खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. प्रियाला निशाचा स्वभाव अन् दिसणं दोन्हीही आवडे. निशाचं सावळंच पण रेखीव सौंदर्य पाहिलं की पाहणारा तिच्या प्रेमात सहजच पडे. तिला घडवताना जणू देवानं तन्-मन् लावले असेल असे वाटत होतं. तिच्या सावळ्या रंगातही तिचं रूप मनमोहक वाटत होतं. प्रियाचा मोठा भाऊ आदित्यही आजकाल प्रियाची खूप काळजी घेऊ लागला होता. प्रियाला कॉलेजमध्ये सोडायला आणायला तोच जात असे. प्रियालाही हा बदल हळूहळू लक्षात येऊ लागला. तिला आता निशाही आपली मैत्रीण आहेच पण ती वहिनी होण्याच्या मार्गावर आहे हे लक्षात आले.
          दिवसा मागून दिवस जात होते. निशालाही प्रियाची मैत्री आवडत होती; पण आता तर ती तिच्या घरातील एक घटक बनणार होती. निशाला आदित्यसोबत गप्पा मारायला आवडू लागले. तसं दोघांच्याही घरातील माणसं सुशिक्षित होती, त्यामुळे त्या दोघांच्या नात्यांची अडचण किंवा त्रास वाटावा, असं काहीच नव्हतं. प्रिया अन् आदित्य अशी दोनच मुलं. त्यांचे वडील मोठे व्यापारी, घर म्हणजे एक आलिशान बंगला. बंगल्यासमोर चार-पाच गाड्या, घरात भरपूर नोकर माणसं दिमतीला. सुख म्हणजे नेमकं काय असतं, ते ह्या घराला पाहून कळत होतं. एवढी श्रीमंती पाहूनच कधी कधी निशाला घाबरायला व्हायचं, कारण तिचे वडील सरकारी नोकर होते. पगार झाल्या झाल्या आनंदी आनंद गडे; पण पुढील आठ दिवसांनंतर खूपच अवघड होई. वीस तारखेपर्यंत जेमतेम घर चालवावे लागे, अन् वीस तारखेच्या पुढे तर कॅलेंडर पाहात कसे तरी दिवस ढकलावे लागत. पण ही सारी परिस्थिती असतानाही निशा, उषा, स्वरा अन् मनीष यांच्या चेहऱ्यावर कधी दुःख किंवा उदासी जाणवत नसे. प्रत्येक दिवसाचं नवं आव्हान मोठ्या हिमतीने पेलायचं, हेच जणू साऱ्यांनी ठरविलेले होते. सर्वजन शिकत असल्याने घरात पगार उरण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातून मुली म्हटलं की खर्चाला काही मर्यादाच राहात नाहीत, असं निशाच्या आजीचं मत.
         निशा कॉलेज करत करत वेगवेगळे कोर्स करत होती. या कोर्समुळे ती जास्त काही नाही; पण थोडीफार मदत घरात करू शकणार होती. उषाही आईला घरकामात आणि  शिवणकामात मदत करी. निशाला एकूणच घरातील सगळ्या परिस्थितीचा अंदाज होता. त्यामुळेच की काय तिला  आदित्यचे स्थळ म्हणजे नाकापेक्षा मोती जड वाटे. ‘आदित्यला मात्र व्यवहारज्ञान जास्त नाही’ असं त्याच्या व्यापार करत असलेल्या वडिलांचं मत  होतं. कॉलेजचं दुसरं वर्षे बघता बघता सरलं. आदित्यला पुढे वडिलांचा व्यापार पहायचा  होता. निशाच्या घरच्यांनी निशाला स्थळ पाहण्यास सुरुवात केली. देवाची पण लीला अघाध असते.
‘सौंदर्य गरिबाघरी जन्मत् अन् गरीबाच्या जीवाला घोर लावतं.’
निशा, उषा, स्वरा एका चढीत एक. मुलींना लग्नासाठी मागण्या तर खूप येत होत्या; पण योग्य स्थळासोबत लग्न झालं पाहिजे अशी प्रत्येक मुलीच्या आई वडिलांची इच्छा असते. आपल्या परिस्थितीला पेलवणारं स्थळ हवं, असं निशाच्या बाबांचं मत होतं. निशाने हळू हळू आपल्या आणि आदित्यच्या मैत्रीविषयी बहिणींना सांगितलं. निशाच्या मागे एकच वर्ष उषा असल्याने या गोष्टीची कुणकुण तिला थोडी फार होतीच. प्रथम कळल्यावर दोघीं बहिणींना आनंद झाला; पण घरातल्या वातावरणामुळे तिघीही नाराज झाल्या. काय करावे? या परिस्थितीतून योग्य पद्धतीने बाहेर कसे पडावे? याविषयी तिघीही विचार करू लागल्या. शेवटी एकमताने ही सारी गोष्ट घरच्यांच्या म्हणजे आई बाबांच्या कानावर घालायची असं ठरलं. मनीषच्या वाढदिवसादिवशी आदित्यला निशाने घरी बोलावले, सोबत प्रिया ही होतीच. त्या दिवशी सर्वांनी आनंदानं वाढदिवस साजरा केला. प्रिया अन् आदित्यने मनीषला महागडी वस्तू भेट दिली. तेव्हाच निशाच्या बाबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या साऱ्या घटनांचा त्यांनी तटस्थपणे विचार केला. अन् काय ते मुलींशी जेवणानंतर निवांतपणे बोलायचे ठरवले. घरातील सगळे आनंदात होते. तर निशा अन् बाबा मात्र मनातल्या मनात खूप विचार करत होते.
              निशाच्या आईने मुलींना मदतीला घेऊन ताटं केली. मनीषही अधूनमधून एखादं दुसऱ्या कामात मदत करत असे. वाढदिवसामुळे जेवणाचा फक्कड बेत होता. जेवायला मनीषच्या आवडीचे पदार्थ होते. मनीष खूश होता. मनिष तीन बहिणींच्या पाठीवर, त्यामुळे लाडका. घरातल्या परिस्थितीशी काहीही देणं घेणं नसणारा. वाढदिवसाला फक्त घरातले सर्व आणि प्रिया व आदित्य होते. जेवनं झाली खरी; पण आदित्यच्या हालचाली व नजरेचा खेळ, निशाच्या बाबांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही. त्यांनी त्या क्षणी मात्र अनभिज्ञच राहणं पसंत केलं. जेवण झाल्यावर प्रिया व आदित्यने निरोप घेतला व ते घरी गेले. ते दोघे असताना खेळकर वातावरणाने घर भरले होते; परंतु तेच वातावरण आता तणावपूर्ण झाले होते. शतपावली करून येतो म्हणून बाबा काही वेळापूर्वी बाहेर गेले होते. निशाला कोठून व कशी सुरुवात करावी ते कळेना; पण शेवटी एकदा सांगणे भाग होते. तिने ही गोष्ट कशी का होईना आईच्या कानावर घातली. आई प्रथम नाराज झाली. मुलगा आपल्या जातीचा असला तरी, ती लोक कुठं अन् आपण कुठं. आपल्याला हे स्थळ परवडणार नाही, असं स्पष्ट आईने निशाला सांगितलं; पण तिघी बहिणींनी आपल्या पद्धतीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आई कशीबशी तयार झाली. हे सारे वडिलांना सांगण्यासाठी सर्वांनी मिळून तिला तयार केलं. त्यानंतर सर्वांनी पटापट आवारावर केली. अन् सारे झोपायला गेले. एवढ्यात बाबा फिरून आलेच. सांगण्यासाठी   कुठून सुरुवात करावी हे निशाच्या आईला कळेना पण शेवटी सांगावे तर लागणारच. सारा धीर एकवटून तिने सुरुवात केली. बाबांना या गोष्टींविषयी थोडा फार संशय वाटू लागला होताच. सारं ऐकल्यावर बाबा चिडले. आईबरोबरच वाद घालू लागले. मनीष आणि त्या तिघी जरी झोपायला गेल्या तरी एवढ्यात झोपल्या नक्कीच नव्हत्या. त्यांना या वादावादीमुळे भीती वाटू लागली. काय करावे सुचेना?  एवढ्यात निशाच्या बाबांनी निशाला हाक मारली निशा इकडे ये, निशा खूप घाबरली. आपले काही खरे नाही असे तिला वाटू लागले पण कधीतरी या प्रसंगाला सामोरे जावे लागणार म्हणून ती बाबांपुढे आली. बाबांचं रौद्ररूप पाहून ती घाबरली; पण शेवटी हिंमत करून तिने बोलणे सुरू केलं. आदित्यनेच तिला मागणी घातल्याचं सांगितलं. त्यांच्या घरची परिस्थिती, वातावरण याविषयी थोडक्यात कल्पना दिली. आता मात्र घरातले वातावरण अचानक तापल्या सारखे वाटत होते. पुढच्या क्षणी काय होणार याची कुणालाच कल्पना नव्हती. बाबांनी सारे ऐकले आणि हे स्थळ आपल्यासाठी योग्य नाही. या एका वाक्याने प्रकरण संपवायचा प्रयत्न केला. पण तरीही निशा धाडसाने म्हणालीच,
‘ बाबा माझे आदित्यवर अन् आदित्यचे माझ्यावर खूप प्रेम आहे.’
‘ प्रेम, प्रेम कश्या बरोबर खातात हे तरी माहित आहे का? निर्लज्जा प्रमाणे तोंड वर करून सांगतेस.’
असं म्हणून बाबांनी तिच्या गालावर एक चापट मारली अन् रागाने ते थरथरत झोपायला निघून गेले. एकंदरीत साऱ्या परिस्थितीवरून बाबांचा विरोध आहे हे लक्षात येतंच होते. निशा रडत रडत खाली बसली. दोघी बहिणी तिची समजूत घालू लागल्या. मनीष घाबरून लांब उभा होता. आईची मात्र द्विधा अवस्था झाली होती. मुलीला समजवावे की नवऱ्याला? तेवढ्यातही निशा आदित्यचा विचार सोडून दे. असं मायेने डोक्यावरून हात फिरवत सांगून तीही रडू लागली. या साऱ्या प्रकरणात आजी मात्र शांत अन् स्तब्ध होती. एवढ्यात बाबांचा ‘पाणी आणा.’ असा आवाज आला आणि आई निघून गेली. मनीष फक्त सारी परिस्थिती पाहत होता त्याला योग्य काय, अयोग्य काय हे मात्र कळत नव्हते. आदित्य ची गाडी, त्याची राहण्याची वागण्याची पद्धत त्याला आवडे. त्यामुळे आदित्य अन् निशाचे लग्न झाले तर किती मज्जा. असा अल्लड विचार त्यांच्या मनात येऊन गेला. निशाला बहिणीने समजूत घालून कसे बसे झोपावयास  नेले. निशा पुढे आता यक्षप्रश्न उभा होता, पुढे काय करायचे असा विचार करतच  ती झोपी गेली. तिला झोपेतही असलीच काहीशी भयानक स्वप्न पडली. कधी एकदा सकाळ होते अन् कॉलेज मध्ये जाऊन आदित्यला सांगते असं तिला झालं होतं. सकाळी उठल्यावर सर्व आवरून आईला स्वयंपाकात मदत करत होती. त्यावेळेसच आईने बाबांचा निरोप दिला. आजपासून कॉलेजला जायचं नाही. निशाला तर प्रथम आपण काय ऐकतोय यावर विश्वासच बसेना. पण बाबांचा निर्णय हा अंतिम मानला जात असे, त्यामुळे तिचा नावईलाज होता.                
         बघता बघता चार दिवस झाले. निशा कॉलेजमध्ये येईना म्हणून प्रिया पेक्षा जास्त आदित्य बेचैन होऊ लागला. त्याने प्रिया जवळ आपले मन मोकळे केले. तसं थोडीफार कल्पना प्रियाला होतीच. प्रियाने घरात आईजवळ विषय काढला. आई प्रथम नाही म्हणाली पण  निशाचं दिसणं, वागणं या साऱ्याला पाहून हो म्हणाली. फक्त हा विषय बाबांजवळ काढणं महत्त्वाचं. बघता बघता विषय आदित्यच्या बाबांपर्यंत पोहोचला परंतु त्यांनी असा काही गोंधळ न घालता स्थळ आपल्या तोलामोलाचे नाही. नाद सोडून दे असे सांगितले. आदित्यच काय पण प्रिया ही नाराज झाली. निशा का आली नाही हे पाहण्यासाठी ती आदित्य सह तीच्या घरी पोहोचली. आदित्यला पाहून निशा घाबरली कारण बाबा जरी घरी नव्हते तरी आजी, आई होत्याच की.
‘आत ये.’
म्हणण्याचंही तिचा धाडस  होईना पण शेवटी  निशाच्या आईने त्या दोघांना आत बोलावून सर्व परिस्थिती सांगितली. बाबांचा विरोध ऐकून प्रिया व आदित्य नाराज झाले. पुन्हा तुम्ही घरी येऊ नका अशी निशाच्या आईने प्रिया व आदित्य यांना हात जोडून विनंती केली. आजी या वेळीही शांत होती. नाइलाजाने आदित्य व निशा घरी परतले. संध्याकाळी बाबा आल्यावर मात्र आजीने सारा वृत्तांत सांगितला. बाबा भयंकर संतापले आपली   परिस्थिती नाही मग कशाला हाऊस करता नाही त्या गोष्टींची. असं  म्हणून चिडले. निशासाठी स्थळ आलंच होतं. त्या पाहुण्यांना उद्याच्या उद्याच पाहावयास बोलावतो. म्हणून तिथून निघून गेले. निशाला आता काय करावं काहीच समजेना. काय करावं आणि काय नको अशी तिची अवस्था झाली. उद्या पाहुणे  येतील आणि जर त्यांनी पसंत केले तर  तिला कल्पनेनेच अंगावर शहरे येऊ लागले. दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार म्हणून बाबांनी अर्धी रजा घ्यायची ठरवली. सकाळी ते कामावर गेले पण दुपारी लवकर येणार होते.
                निशाने आपल्या बहिणींकडून आदित्य व प्रियाला निरोप दिला. अन् बाबा कामावर गेले की घरातून पळ काढला. उषा व आशा सांगायला गेल्यावर आई व आजीला लवकर काही लक्षात आलेच नाही. मात्र थोड्या वेळाने   निशा दिसेना म्हटल्यावर आईचे धाबे दणाणले. कधी नव्हे ते तिने आजीला बोलायला सुरुवात केली. माझे कामात लक्ष होते, तुम्ही तरी लक्ष द्यायचं नाही का? म्हणून ती रडू लागली. आता कोणी कोणाला बोलून फायदा नव्हता. आदित्य, प्रिया, निशा तिघे मिळून कोर्टात गेले. त्यांनी  रितसर लग्नासाठी नावनोंदणी केली. अन् काही तासात घरी परतले. निशा काही वेळाने परत आल्याने आईच्या जिवात जीव आला. पण ती कुठे गेली हे विचारले असता काही नाही पाहुणे येणार म्हणून पार्लरला गेले होते, असे तिने सांगितले. सांगून जायचे एवढं म्हणून आईने नाराजी दर्शवली. थोड्यावेळाने  आई आजी दोघीही शांत झाल्या.थोड्या वेळाने बाबा आले. अन् काही तासात पाहुणेही आले. पाहुणे येणार म्हणून कांदेपोहे, चहा यांची तयारी केलीच होती. आलेले स्थळ चांगले होते. मुलगा सरकारी नोकरीत होता. त्याला एक लहान बहीण होती. वडील रिटायर झाले होते. आई घरातच असे, एकंदरीत छोटे अन् सुखी कुटुंब होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पसंती कळवू म्हणून पाहणे गेले. निशा मनातून घाबरली होती. पण करायचे काय ते कळत नव्हते. एक महिना कसा तरी निघाला म्हणजे झालं, तिच्या मनात पुढच्या योजना सुरू झाल्या होत्या. बाबा, आई, आजी  साऱ्यांनाच  स्थळ पसंत पडले. उषा व आशालाही आईने कॉलेजमधून आल्यावर स्थळाबद्दल सांगितले. बाकी सर्व ठिक आहे,  पण ताईला आदित्यशीच लग्न करायचंय. मग कशाला हा सारा खटाटोप असं म्हणताच आई चिडली. अजून प्रेमाचं भूत गेलं नाही का?  बाप शांत बसलाय याचा अर्थ काही वेगळा घेऊ नका. प्रसंगी जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. या वाक्याने उषाच काय पण दिशा अन् आशाही घाबरली. निशाने रात्री उषा व आशाला कोर्ट मॅरेजची माहिती सांगितली आणि कुणाला न सांगण्याची विनंती केली.
      पाहून गेलेल्या पाहुण्यांचा पसंती दर्शक होकार आला. निशाची आता पाचावर धारण बसली होती. काय करावे ते कळेना. बैठक घेण्याविषयी त्यांनी विचारले होते. निशाच्या बाबांनी दिवस पाहून चार पाच दिवसांनंतरचा दिवस सांगितला. अन् घरात तयारी सुरू झाली. निशाला प्रचंड ताण जाणवू लागला. अन् याच गोंधळात मानसिक ताणामुळे ती आजारी पडली. मुलगी आजारी आहे, थोड्या दिवसांनी बैठक घेवू म्हणत म्हणत पंधरा दिवसांनंतरचा मुहूर्त निघाला. कसे का होईना वीस बावीस दिवस गेले. आता फक्त आठ दिवसांची गोष्ट होती. आठ दिवसांत जरी बैठक झाली, तरी लग्न होणार नाही याची निशाला खात्री होती. बैठक बसवून लग्न मोडणं योग्य नव्हतं. पण तिच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. बघता बघता बैठकीचा दिवस येऊन ठेपला. बैठक बसली बड्याबड्या मागण्या होऊ लागल्या. मुलगा एकुलता एक अन् सरकारी नोकरी. अपेक्षा तर असणारच असं मुलाची आत्या म्हणाली. पण निशाच्या बाबांनी मी फक्त मुलगी अन् नारळ देणार असं जाहीर केलं. नाही होय करत दीड लाख हुंडा अन् लग्न करून द्यावे. ज्याचे त्याने कपडे घ्यावे असं ठरलं. ही रक्कम देखील खूप होतेय असं निशाच्या बाबांना वाटत होतंच. पहिल्याच मुलीला एवढं दिलं तर पुढे येणाऱ्या  जावयांच्या अपेक्षा वाढतात. त्यापेक्षा फक्त एकावन्न हजार रुपये देऊन लग्न मात्र तुमच्याकडे असा पर्याय त्यांनी शोधला. निशाचं देखणं रूप आणि हुशारी पाहता काही न मागता मुलाकडच्यांनी लग्न करून घ्यावं असं त्यांना वाटत होतं. पण मुलाकडचे काही ऐकेनात. शेवटी रागात मुलाचे काका म्हणाले,
‘काही देऊ नका. मुलगी आम्हाला आवडली आहे आम्ही लग्न करून  घेतो पण लग्न झाल्यावर पुन्हा मुलगी आमची म्हणू नका. तुमचा आमचा संबंध संपला. मुलगी माहेरी येणार नाही. तुम्ही सासरी यायचं नाही.’
हे ऐकून आजी रागाने म्हणाली,
‘ असं करण्यापेक्षा आम्हाला मुलगी तुमच्या घरी द्यायचीच नाही. मी- तू मी – तू  होत शेवटी बैठक मोडली. निशाला मनातून आनंद झाला. खरं तर घरात आई, बाबा, आजी यांना खूप वाईट वाटत होतं. बाबांचं डोकं तर सुन्न झालं होतं. पहिल्या मुलीच्या वेळेस असले अनुभव. तीन तीन मुलींची लग्न कशी व्हायची. घरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले. संध्याकाळी कसे बसे चार घास खाऊन सारे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी बाबा कामाला गेले अन् निशाचे नियोजन सुरू झाले. कोणत्या दिवशी, किती वाजता जावे लागेल. लग्नाला साक्षीदार कोण असतील. असे बरेच प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत होते. तिने हळूहळू गुपचूप सर्व तयारी सुरू केली. ती आता एक एक क्षण मोजत होती. बाबांनी आणखी एका स्थळाचा फोटो आणला होता. मुलगा चांगला होता पण शेतकरी होता. बघायला काय? असं म्हणून बघायला येण्याचं आमंत्रण पंधरा दिवसांनंतरचं देण्यात आलं. निशा मनातल्या मनात सुखावली. एकदा पाच दिवसांनंतर लग्न झालं की सुटले. पुढचं पुढं पाहू.
            कोर्ट मॅरेजचा दिवस उजाडला. तिने मैत्रिणीकडे जाण्याचा बहाणा करत घरातून काढता पाय घेतला. ती थेट कोर्टात पोहोचली. उषा, आशा, प्रिया, आदित्य आणि निशा सारे तयारीनिशी कोर्टात आले. एक दोन तासात सारे पार पडले. आदित्यच्या गाडीत बसूनच ती आदित्यच्या घरी गेली. त्याच्या आई ने त्या दोघांचे होय नाही करत स्वागत केले. पण बाबांनी मात्र निशाचा अपमान केला. आधी कमवायला शिका मग संसाराचं बघा. माझ्या घरात पाय ठेवू नका. आल्या पावली परत फिरा. असं सांगितलं. आदित्यच्या आईने मात्र बाबांची मनधरणी करून त्यांना घरात नका ठेवू पण तुमच्या एका  दुकानाचा कारभार त्याला पाहू दे अशी विनवणी केली. एकुलत्या एका मुलाला असा वाऱ्यावर सोडू नका. म्हणून त्यांच्या पाया पडू लागली. नाइलाजाने त्यांनी त्याला कपड्याच्या दुकानाचे काम सोपवले. पण तू घरात रहायचे नाही असेही सांगितले. आदित्यच्या आईला एकुलत्या एका मुलाचे लग्न असे होईल याची कल्पनाच नव्हती. तिला खूप वाईट वाटले पण शेवटी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे महत्त्वाचे होते. म्हणून ती गप्प बसली. आज ना उद्या आदित्य अन् निशाला आदित्यचे बाबा माफ करतील याची तिला खात्री होती. इकडे माहेरी जेव्हा निशा आदित्य गेले, तोपर्यंत बाबा कामावरून आले होते. निशा घरात नाही म्हणून गोंधळ उडाला होता. दोघांना लग्न करून  आल्याचं पाहून निशाचे बाबा भडकले. उंबरा ओलांडून आत येऊ नका. निशा तू माझ्यासाठी मेलीस अन् मी तुझ्यासाठी. असं म्हणून त्यांनी दार लावून घेतले. आई, उषा, आशा, आजी बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या पण बाबा कुणाचा एक शब्दही ऐकायला तयार नव्हते. शेवटी निशा आदित्य माघारी फिरले.
              आज आदित्यशी भांडण झालं अन् गेल्या वर्षभराचा काळ तिच्या डोळ्यासमोर चित्रफितीसारखा सरकला. एवढ्यात दारात गाडीचा आवाजा आला. आदित्य असेल म्हणून निशा जागची हलली देखील नाही. पण कुणाचा तरी बोलण्याचा आवाज आला म्हणून तिने उठून खिडकीतून पाहिले. तर सासूबाई अन् आई दोघींना घेऊन आदित्य आला होता. ती सारं विसरली अन् पळत जाऊन तिने  दार उघडलं. तिने दोघींनाही वाकून नमस्कार केला. अन् ती दोघींच्याही गळ्यात पडून रडली. आदित्यने तिला शांत करून आत आणले.
‘आजच एका वर्षांपूर्वी आपलं लग्न झाले ना! म्हणून तर विनंती करून दोघींना घेऊन आलो.’
या वाक्यासरशी ती एकदम चमकली. अरे बापरे, आपण तर विसरलोच. गेल्या एक वर्षात जीवन म्हणजे काय? प्रेमाचा अर्थ काय? याचा अनुभव दोघांनीही चांगला घेतला होता.
‘ बाबा आणि पप्पा का नाही आले?’
या तिच्या प्रश्नावर डोळे मिचकावून आदित्य म्हणाला,
‘ आताच नाही पुढच्या कार्यक्रमाला येतील. आता आईचा अन् काकूंचा राग घालवला आणि तूही रागावली होतीस सकाळी.’
यावर तिने हळूच त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले.
‘ असू दे, तुझं प्रेम आहे म्हणून तर भांडतेस माझ्याशी, होयना!’
असं म्हटल्यावर सारे जोरात हसू लागले. निशा विचार करू लागली. आज सासूबाई आणि आई माझ्या घरी आल्या पण कधीना कधी बाबा अन् पप्पा ही येतीलच. मी त्या दिवसाची वाट पाहीन.’
सर्वजन एकत्र येण्याचा सुवर्णकांचन योग जीवनात येईल. याची तिला खात्री होती. प्रथम प्रेमाला फालतू समजणाऱ्या तिने प्रेमाच्या साथीने संसार सफल करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली, हाही योगायोगच होता. ती विचारात असतानाच आदित्य म्हणाला,
‘ बाबा आणि पप्पा लवकर येतीलच पण सध्या आपण लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करूया.’
सारेजण तयारीला लागले.
     सौ आशा अरुण पाटील सोलापूर

2 Replies to “योगायोग”

  1. खूप छान कथा मॅडम
    प्रेमाला एक वेगळे वळण येथे पाहायला मिळाले अभिनंदन

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!