यशोदा

‘यशोदा, यशोदा’ जोरात हाका मारूनही तिचे काही लक्षच जाईना. एवढ्यात शालनने ‘आई, बघ ना बाई काय म्हणतात? असं म्हटल्यावर ती माझ्याकडे बघू लागली. यशोदेच्या अंगावर भारी इरकल साडी होती. चेहऱ्यावर समाधानाची झळाळी मुखचंद्राला उजळून टाकत होती. मला बघताच हातातला गजरा मुलीला देतच ती माझ्याकडे वळली.
‘पोरगी हाफिसात सायब म्हणून नवकरीला लागली. म्हनूनशान सिद्धरामाला पेडं ठिवाया आलू होतू.’

या तिच्या स्पष्टीकरणाने मलाही खूप आनंद झाला. मी शालनच्या जवळ जाऊन तिला अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात तिने माझ्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद मागितला.
  ‘अशीच तुझी प्रगती होवो. कीर्ती वाढो.’
  असे म्हणत मी तिला उठवून जवळ घेतलं. तिला मी कधी परकी मानलीच नव्हती. तिही लगेच माझ्या गळ्यात पडली. गप्पा झाल्यावर थोड्या वेळाने मी घरी येते, पेडे द्यायचं हायत अन् काम सोडल्यापासनं घरीबी येनं झालंच नाय बघा.’
  अशी आशा लावून यशोदेने माझा निरोप घेतला. बघता बघता गर्दीत त्या दोघी हरवून गेल्या अन् माझ्या डोळ्यांसमोर भूतकाळातील आठवणींनी फेर धरला.

कामाला विश्वासू, कष्टाळू बाई पाहिजे म्हणून सीमाला निरोप दिला. एकानंतर एक अशा दहा बायका येऊन गेल्या. प्रत्येकीच्या अशा वेगळ्याच मागण्या. सीमा तर माझी चेष्टा करू लागली.
‘अगं, कामवालीसाठी दहा बायकांचा चाखाचोळा घेतीयेस. मग सून आणायच्या वेळेस अख्खा महाराष्ट्र की भारत धुंडाळणारेस?’
या सर्व चेष्टामस्करीत ह्यांची अनमोल साथ होतीच. मेहुणी अन् ह्यांनी माझी खिचाताणी करायला मागेपुढे बघतील, तर शपथ. मी आता कामवालीचा नाद सोडून दिला अन् स्वावलंबनाचे महत्त्व यजमानांना व मुलांना समजून सांगत स्वत:च काम करणे सुरू केले. तसं घरात माझ्या निर्णयामुळे त्रास होणार होता तो मलाच; कारण नोकरी अन् घरकाम यांमुळे मी रात्री आडवी झाले म्हणजे अंगावरून ट्रक गेला तरी कळणार नाही, अशी अवस्था होई. त्यातून घरामध्ये मदत करणारं बाईमाणूस नाही. ह्यांची आत्या होती पण; बाईसाहेबांचा मूड असला तरच, नाहीतर टीव्हीला चिटकून बसणे, नाहीतर गल्लीभरच्या फुकटच्या बातम्या गोळ्या करणे अन् आपल्या मोफत सांगणे. हेही नको तर मग वयाचे कारण पुढे करून दिवसभर लोळणे. नुसते लोळणे नव्हे, तर पुस्तक वाचणे. बाकी काही न का पटेना, पण त्यांचा पुस्तक वाचण्याचा छंद मला भारी आवडत असे. मी तर ह्यांना चेष्टेने बऱ्याच वेळा सांगितलं,
  ‘बघा, तुमच्या आत्या, राज्यसेवा किंवा लोकसेवा आयोग, नाहीतर डॉक्टरेट करायच्या. उच्च प्रतीचं वाचन करतात. ह्या जर परीक्षेला बसल्या, तर ह्यांचाच नंबर येणार. कारण त्यांचं वाचनच तसं अफाट आहे ना.’
ही गोष्ट ह्यांनी नेहमी चेष्टेवारी घेतली म्हणून तर ते नंतर त्यांना डॉक्टर आत्या म्हणून हाक मारत, घरातील कामाच्या, नोकरीच्या वाढत्या जबाबदाऱ्या या सर्वामुळे ताण आला. मी शेवटी अंथरूण पकडले. ‘चार दिवस विश्रांती घ्या’ म्हणून डॉक्टरांनी सांगितलं, परंतु माझ्या यजमानांसह मुलांनी, डॉक्टर आत्याने घराची जी स्थिती केली, ती पाहता पुन्हा आजारी पडायचं नाही, हे जरी माझ्या हातात नसलं, तरी हे मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. बघता बघता मला कामवालीही मिळाली. अंगकाठी शिडशिडीत. वय पस्तीसच्या पुढे असूनही केसांचा महिरप काळा. त्याचा छानसा फोडून घातलेला अंबाडा, कानात खोटे, पण मोत्याचे. चेहरा सावळाच, पण भुवयांच्या कमानीत छानसं रेखीव कुंकू अन् हसरा चेहरा. गळ्यात चार मणी अन् स्वच्छ पेहराव, तिला पाहिलं की, प्रसन्न वाटलं, तिने तिच्या कामासाठीच्या अटीविषयी विचारताच ‘काहीच नाही’ असं सांगत, ‘फक्त मला तुम्ही आपलं मानून चला’, या एका वाक्यात तिने सर्व काही सांगितलं होतं. चहा, नाष्टा, जेवण, सण असले हट्ट तिनं स्वत: कधी केले नाहीत. अन् दिलाच चहा, नाश्ता तर,
‘बाय आताच करून आले. ‘
असं म्हणून कामाला सुरुवात करे. तिच्या घरी दोन मुली अन् नवरा एवढंच कुटुंब, पोरगं होईल म्हणून दोन पोरी अन् पोरासाठी म्हणून सवत अन् तिचं पोरगं. एवढ्या सगळ्याला तिचा दाल्ला या महागाईच्या जमान्यात खाऊ घालू शकत नाही म्हणून यशोदेने धाडसाने दररोजची कटकट नको म्हणून दोन परी घेऊन घर सोडलं. सवत, पोरगं अन् नवरा बाजूला अन् ही बाजूला. तिचा प्रामाणिकपणा, कष्टाळूवृत्ती, खरं बोलणं यांमुळे तिला भरपूर कामं मिळाली. शालन अन् मालन होत्याच तिच्या मदतीला. पोरी खुप गुणाच्या होत्या. आई जाऊ शकली नाही, तर त्या दोघी हरएक घरचं काम न कुरकुरता करत. पोरी पण दिसायला सुंदर, पण सुस्वभावी, ‘शालन बारावी करून आता पुढे काय?’
  म्हटल्यावर मला खरं पदवी घेऊन मोठं ऑफिसर व्हायचंय पण; आईला त्रास नको म्हणून शिक्षिका होणार अन् मग नंतर बाहेरून परीक्षा देण्याचा विचार आहे.’ तिचं ध्येय ऐकलं अन् मी चकित झाले. खरंच
 
“जिद्द असली, तर दगडांतमुद्धा झाड येतं हेच खरं.”

मालन आता दहावीला होती. तीसुद्धा शिकून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होती. अशा गरीब स्थितीत हे शक्य होईल का, हा विचार माझ्या मनात घोळत होता पण, जिद्द , चिकाटी आणि कष्ट केल्याने यश मिळू शकते. यांच्या अंगात ध्येय, जिद्द, आत्मविश्वास खचाखच भरला होता. मग काय प्रयत्नांची जोड अन् सरकारी विविध योजना यामुळे ते सारं शक्य होतं. बघता बघता शालन शिक्षिका म्हणून एका नामांकित शाळेत लागली.

तिच्या शिकवण्याच्या व इतरांशी आदरार्थी वागण्यामुळे थोड्याच दिवसांत ती आदर्श ठरली. तिचं वाणीवरचे वर्चस्व पाहून सरस्वतीमाता तिच्या जिव्हेवर राज्य करते, असे वाटत असे. तिला नोकरी लागल्यावर तिच्या सावत्र आईने लग्नाचा तगादा लावला पण; यशोदेने शालनच्या मागे खंबीर पाठिंबा दिला.
‘पोरी, तू पाहिजे तेवढे शिक. तुला लाल दिव्याच्या गाडीत बगायचं सपान हाय माझं.’
मग काय, शालनला मजबूत पाठिंबा होता. ती नोकरी करत सोलापूर विद्यापीठात बहि:स्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देत राहिली. एकीकडं शाळा, अभ्यास अन् मनी बाळगलेलं स्वप्नं यामुळे ती यशाच्या दिशेने दमदार मार्गक्रमण करत होती, तिचा पगार सुरू झाल्यावर यशोदेला काम सोडण्याचा तिने आग्रह केला पण;
‘काम म्हणजेच माझा देव, माझं सर्वस्व, यामुळे तर मी तुला मोठं बनवू शकले. ‘
असं म्हणून तिनं काम सोडणं टाळलं. मालननेही बारावी सायन्स करून पुढे बीएएमएसला अॅडमिशन घेतले. शालनचा पगार अन् आईच्या कमाईमुळे मालनचे साहित्य, फी अन् घरखर्च कट्टाकट्टी भागत होता; परंतु मालनही मन लावून जिद्दीने अभ्यास करत होती. ती नेहमी आईला म्हणे,
  ‘आई, मी तुला सांगते, मी डॉक्टर होणार.’
हे तिचं स्वप्नं तिने सत्यात उतरवायचं ठरवलं होतं.
“स्वप्नं जर मनापासून ठरवलेली असतील, तर सत्यात यायला वेळ लागत नाही.”
  अन् हे सत्य आहे, हे शालनने दाखवलं. पदवी झाल्यावर तिने वृत्तपत्रांतल्या जाहिराती वाचून राज्यसेवा आयोगाचा फॉर्म भरला. त्यासाठी पुण्यात जाऊन पूर्वतयारी केली. मुलाखत, पेपर यांची तिने सर्व बाजूने तयारी केली अन् तिच्या पहिल्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवरून तिच्या आई, बहीण व वडिलांसोबत मुलाखती दाखवण्यात आल्या. या वेळी तिने आपले आई-वडिलांचे काम जगापासून लपवायचा प्रयत्न केला नाही. उलट तिने आपल्या घरची सत्यस्थिती सांगितली. यामुळे तिला सहानुभूती मिळवायची नव्हती, तर आपल्यासारखी परिस्थिती असणाऱ्या अनेक जणांना ती मुलाखत ऐकून, पाहून, त्यांनी प्रेरित होऊन कार्य करावे, हीच सदिच्छा तिच्या मनात होती. बघता बघता ती क्लासवन अधिकारी झाली. आता मात्र तिने आईला हात जोडून विनम्रपणे काम सोडण्यास सांगितले. आईनेही आपली मुलगी आता लाल दिव्याच्या गाडीत फिरू लागली, हेच आपल्या जीवनाचे यश आणि सार्थक म्हणून काम  सोडले. मी माझ्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर दोघीही येऊन मनमोकळं बोलून पेढे देऊन गेल्या. थोड्याच दिवसांत शालनच्या लोकप्रियतेचे किस्से ऐकायला मिळू लागले. लोकप्रिय अधिकारी म्हणून ती प्रसिद्ध झाली. गरीब लोकांना येणाऱ्या अडीअडचणी आणि मोठ्यांकडून होणारा अन्याय तिने स्वत: अनुभवला होता आणि म्हणून तिने सामान्य थरातून येणाऱ्या प्रत्येक गरजू हाताला मदत करून साथ दिली. बहिणीचे शिक्षण पूर्ण करून तिला यशस्वीपणे तिच्या पायावर उभा केले. तिच्या दवाखान्याचे उद्घाटन आईकडूनच केले; परंतु याबरोबरच तिने गरीब मुलं दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वत:च्या अंगावर घेतला. अनेक अनाथ मुले-मुली दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या जीवनात यशस्वीपणे घडवले. एका यशोदेच्या कष्टाने गरिबांमध्ये आशेचे गोकुळ फुलले.

शालन राज्यसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यापासून यशोदेने माझ्या घरचे काम करणे सोडून दिले होते. मात्र तिच्यासारखीच एक कष्टाळू बाई तिने मला मिळवून दिली. यशोदा आणि तिच्या मुलींसारखी जिद्द असेल तर कोणतेही काम कठीण नाही हेच खरे.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!