आटपाट नगरातील धावपळीतली वटपौर्णिमा

आटपाट नगरातील धावपळीतली वटपौर्णिमा 

                 मागणे मागू सात जन्माचे

                 क्षण सातही नाही भरवश्याचे

                 प्राणवायू तू दे भरभरून

                 कर कल्याण सात पिढ्यांचे

               शुभ्रा कोणत्याही सणाची तयारी आधीच करून ठेवत असे. घरात सासू सासरे, जाऊ-दीर, त्यांची दोन मुलं आणि हिची दोन मुलं. घरातलं वातावरण एकमेकांना समजून घेणारं. सासूबाई निवृत्त शिक्षिका, सासरे निवृत्त पोलिस अधिकारी. दीर – जाऊ दोघं इंजिनिअर आणि तिचे पती बँकेत. स्वत: ती आयटी कंपनीत. थोरल्या जाऊबाई आणि ती मिळून घरातील आणि बाहेरील कामाचं व्यवस्थित व्यवस्थापन करत. त्याच त्या कामाचा कंटाळा नको म्हणून एक महिना घेतलेले काम पुढच्या महिन्यात दुसऱ्याकडे असे. घर म्हटलं की कामांची यादी तर हनुमानाच्या शेपटाप्रमाणे वाढत जाणारीच. एकंदरीत घर-घराशी संबंधित कामांमध्ये प्रत्येक सदस्य योगदान देत असे. दोन-अडीच गुंठयाच्या घरात जेवढी जागा जास्त तेवढेच गृहिणीला काम जास्त. तसं घरात घरकामाला बाई होतीच. पण हे कोरोनाचं संकट आलं आणि सगळी कामं घरातच करून घ्यावी असं सहमत झाले. काम करायला काही अडचण नव्हती पण प्रत्येकाचं काम घरून सुरू. त्यामुळे आठ- नऊ तास बाहेर जाणारी माणसं घरातच वावरू लागली. त्यामुळे कामाचा ताण तर वाढणारच. मुलं घरातच, नोकरी करणारे घरातच. सासू- सासरे विरंगुळा म्हणून भिशी आणि बागेतल्या मित्र-मैत्रीणी बरोबर सहल, खरेदी, देवदर्शन याला जात. पण गेल्या एक-दीड वर्षापासून सारंच बंद. एक वेगळाच ताण वातावरण जाणवत होता. घराबाहेर कोरोना आणि घरात कामाचा बोजा.

               सासूबाई कितीही झालं तरी निवृत शिक्षिका नियोजनाचा गुण रक्तातलाच. त्यांनी घरातील खाणं-पिणं, कामं यांचं छान नियोजन करून सर्वांपुढे मांडलं आणि त्यामुळे प्रत्येकजण आपल्या वाटणीचं काम करून निवांत होई. सणाच्या दिवशीचा स्वयंपाक त्या स्वतः करत. शिक्षिका असल्याने राष्ट्रीय सण, धार्मिक सण, जयंत्या, पुण्यतिथ्या यांच्या सुट्टयांची त्यांना चांगलीच सवय. सध्या मात्र या सुनांच्या नोकरीत असलं काही नसतं. यामुळे प्रथम चिडचिड होई पण पुन्हा पुन्हा त्यांनी तन-मनाने ते स्विकारले.  सकाळी साडेआठ ते पाच, दुपारी बारा ते रात्री नऊ किंवा मग नाईट शिफ्ट. नवीन पिढीला नावं ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार केला पाहिजे असं त्या म्हणायच्या. कारण एकतर वाढती महागाई आणि वाढत्या गरजा. नोकरीसाठी करावे लागणारे प्रयत्न. वेळ काळ बदलला की माणसानं स्वतःला बदलावं हेच खरं. 

                शुभ्राने  या महिन्यात कोणते सण आहेत हे पाहून ठेवले होते. वटपोर्णिमा म्हणजे वडाला जावे लागणार. पण वडाचे झाड रेल्वे स्टेशनला आहे. तितके लांब पुजेला इतर वेळेस त्या तिघी जातही पण सध्या कोरोनाच्या काळात घराच्या बाहेर कोणी जायचे नाही हा नियम सर्वमान्य आणि सर्वासाठीच होता. रेल्वेस्टेशन घरापासून चांगल दोन-अडीच किलोमीटर लांब. खरंतर वडाच झाडं आपल्या परिसरातच लावा असा प्रस्ताव सोसायटीच्यातल्या मेनेकाकांनी मागेच ठेवला होता. पण इथं काय खेडेगाव आहे का ? वडाच्या शेजारी कट्टा बांधून पारावर मारतात तश्या गप्पा मारत बसायच्या का ? त्या झाडाच्या मुळ्या लांब जातात, मग इमारतीला धोका होणार. असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने झाडं लावलीच गेली नाही. सोसायटीसाठीचं मैदान बरंच मोठं होतं पण वृक्षारोपण म्हणलं की जबाबदारी आली. कोणतीही झाडे लावायची म्हणजे संगोपन महत्त्वाचं. फक्त फोटोसाठी झाडं लावून रिकाम होणं चुकीचंच. लावलेलं झोडं जगलं पाहिजे. आपण आपल्या माणसाची काळजी कशी मनापासून घेतो, अगदी तसंच. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचं महत्व सोसायटीलाच काय पण साऱ्या जगालाच कळलं होतं. कळलं तरी वळत नाही असा नियम जगाचा सर्वांनाच अंगवळणी होता. यावर्षी मात्र याविषया संदर्भात ठोस पाऊल उचलायचे असे सोसायटीतील सर्वांनीच ठरवले. वटपोर्णिमेला अजून चांगले पंचवीस तीस दिवस शिल्लक असतानाच नर्सरीतून वड, सप्तपर्णी, चाफा, पिंपळ, कडुलिंब अशी पाच रोपं आणली. खरंतर हे म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्यासारखं होतं. पण शेवटी काय देर आये दुरुस्त आये। मुखपट्टी, सॅनिटायजर आणि सुरक्षित अंतर पाळत वृक्षारोपण झालं. सोसायटीत प्रत्येकाच्या दारात तुळस होतीच पण आता या पाच झाडांसोबत अनेक तुळशीची रोपंही त्यांनी लावली. एकतर ऑक्सिजन महत्वाचा, सोबत तुळशीचा चहा, काढा महत्वाचाच की. सोसायटीतील रिकाम्या जागेत असलेल्या बागेच्या देखभालीसाठी एक गडी होताच. पण तो व्यवस्थित काम करतो का? हे पाहण्यासाठी काही दिवस प्रत्येकाला ठरवून दिले होते. मग काय घरात बसून कंटाळलेले एक-एकजण बागेत थोडासा विरंगुळा अन् मोकळेपणा अनुभवत होते.

                  लावलेली पाचही झाडे खूप छान लागली होती. त्याची देखभाल व्यवस्थित केली जात होतीच. खरंतर शुभ्राच्या मते पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अधिकार मिळाला तर नोकरीचा अधिकार नव्हता. तो हळूहळू मिळत गेला. पण तोही सर्वांना नव्हताच. नियम, रुढी परंपरा यातून स्त्रिमनाची घुसमट होवू नये म्हणून तर अशा सणांची आखणी केली असावी. त्यानिमिताने घराच्या चार भिंतीतून स्त्री बाहेर पडावी. चारजणींशी तिचा संवाद व्हावा. सुख-दुःख वाटली जावी, नवीन काहीतरी माहिती दयावी- घ्यावी हाच उद्देश असावा. हळूहळू स्त्रिया शिकल्या. ज्ञानाने समृद्ध झाल्या. विचारांनी प्रगल्भ झाल्या. मग त्याच त्या जुन्या रुढी-परंपरा जपायच्या का? यावर शुभ्राला सासूबाई समजून सांगत. जीवनामध्ये श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी. जगण्यातला आनंद घेण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या. प्रत्येकाच्या संस्कृती प्रमाणे वेगवेगळे सण समारंभ. हे जर करायचे नाहीतर आयुष्य कंटाळवाणे होईल. दररोज उठायचे, खायचे, प्यायचे, काम करायचे अन झोपायचे. सण-उत्सवामुळे वातावरणात बदल होतो आणि मग जीवनाला वेगळे ध्येय दिशा दिसतात. भले तुम्ही सणांच्या पद्धतीत फरक करा. तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे तुम्ही निसर्गसानिध्यात जावं, चार मैत्रिणींशी बोलावं, सजावं नटावं असे उद्देश होते. आता नोकरीमुळे हे सारं होतंच आहे मग परंपरा सोडायच्या का? त्यापेक्षा त्यात थोडाफार फरक करा. वडाच्या झाडाला जायला जमत नाही म्हणून झाडाची फांदी आणून घरात पूजन करण्यापेक्षा तुमच्या घर, शेत, सोसायटी, ऑफिसच्या आवारात वृक्षारोपण करा. त्यामुळे तुम्ही पर्यावरण संवर्धनात हातभार लावताल आणि अंशतः परंपरा पाळली म्हणून मानसिक समाधानही मिळेल. 

               सासूबाईंचे विचार शुभ्राला नेहमीच पटत. कारण त्या अगदी व्यवस्थित समजून सांगत. म्हणून या वटपौर्णिमेदिवशी ती वडाच्या झाडाची पूजा करायला दूर न जाता सोसायटीच्या बागेतल्या रोपाचीच पूजा करणार होती. त्या रोपाला दोरा गुंडाळण्याऐवजी पाच मुठी काळी माती आणि त्याला आवश्यक तेवढे पाणी घालणार होती. ओटीला घालायचं सगळं सामान वडासमार ठेवून मग गरजू व्यक्तीला देणार होती. नर्सरीमधून आणल्याने रोप मोठं होतंच.  त्यांची निगा राखल्याने अन् पाच-सात वेळा छान पाऊस पडल्याने ते वाऱ्यावर छान डोलू लागलं. शुभ्रा यावेळेस सासू-जाऊ आणि तिच्या सोसायटीतल्या मैत्रिणींसोबत योग्य अंतर ठेवून मुखपट्टी अन् सॅनिटायजर वापरून मनोभावे पूजा करून  पृथ्वीवर पर्यावरण समृद्ध होवू दे आणि आमच्या पुढच्या सात पिढया तरी सुखात राहू दे अशी प्रार्थना करणार होती. आज आपल्यालाच ऑक्सिजन कमी पडतोय. त्याचे दुष्परिणाम हळूहळू लक्षात येऊ लागले. मग पुढच्या पिढयांचं काय? हा प्रश्न आहेच की. तिचा विचार आणि तिने करणार असलेली प्रार्थना सासूबाईंनाही आवडली. पुढचे आयुष्य कुणी पाहिलंय पण आपल्या पिढ्यांसाठी निसर्ग हितकारक हे त्यांना पटले. रुढी-परंपरा योग्य पद्धतीने जोपासणे फायदयाचंच  शुभ्राच्या या वाक्यावर सारेजण तिच्याकडे कौतुक आणि सहमतीदर्शक नजरेने पाहू लागले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!