पेराल ते उगवेल

             आयुष्यात आपण आई- वडिलानंतर गुरुंना मानतो. माझ्या आयुष्यातही मी आई-वडिलांनंतर  दुसऱ्या क्रमांकावर गुरुंना तर तिसऱ्या क्रमांकावर विदयार्थ्यांना स्थान देते. विद्यार्थी घडविणे हा माझा व्यवसाय आहे. तो व्यवसाय म्हणून न पाहता तो एक आवडीचा छंदच वाटतो  मला. मी माझ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते. तसे पाहता शाळा स्तरावरील विदयार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम होतातच.  नीतीमूल्य कथेतून सांगण्यापेक्षा ते शिक्षकांच्या आचरणातच असतील  तर आपोआपच ती विद्यार्थ्यांना मध्ये अनुकरणाद्वारे अंगिकारली जातात. शालेय व सहशालेय उपक्रमांशिवाय वर्गात साधारणही काही खेळ घेण्याची सवयच आहे माझी. एकदा असेच मी एक खेळ घेतला. प्रत्येक मुलाला दोन कागद दिले. त्या कागदांवर त्यांनी त्यांच्या मित्रांची नावे लिहून त्याच पानावर तो मित्र तुम्हाला का आवडतो ते लिहायचे. त्या मित्राचे चांगले किंवा चुकीचे गुण यांची थोडक्यात नोंद करायची. पहाता पहाता मुलांनी आपापल्या दोन मित्रांची नावे लिहून नोंदी केल्या. त्या दिवशी मी कागद गोळा केले. शिक्षक खोलीत बसल्यावर एक एक कागद वाचून प्रत्येक विदयार्थ्याच्या विषयी केलेल्या नोंदी लिहून ठेवल्या. जवळ जवळ सगळ्याच नोंदी मनाला स्पर्शून जाणाऱ्या होत्या. कारण मित्र या शब्दातूनच आपल्या लक्षात सहजच लक्षात येतं. गुण, दुर्गुण, अवगुण यांच्यासह आपण स्विकारतो तीच मैत्री असते. गुणांची वृद्धी आणि अवगुणांची  ऱ्हासवृत्ती वाढत जाते.

              मी पुन्हा दोन-चार दिवसांनी मुलांनी ज्या ज्या मित्राविषयी लिहिले होते. त्या त्या नावाचा कागद त्या त्या विदयार्थ्यांला देवून टाकला. विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान दिसत होते. खरं तर तो तास संपला अन् तो खेळ त्यातला विषय मी विसरून गेले. पुन्हा माझ्या विद्यार्थ्यांच्यात अन् माझ्यात या विषयावरून चर्चाही झाली नाही. माझे अनेक विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात यशाच्या शिखरावर गेले. त्यांचं यश मला पुरस्कारापेक्षाही खूप मोठे होते. मी अनेक विद्यार्थी घडवत गेले. समाधान, आणि आत्मिक आनंदाने मी आयुष्य जगत होते.

             एके दिवशी मात्र माझा विद्यार्थी सैनिक होता. तो गेल्याची बातमी कळली आणि मला वाईट वाटले. मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेले. खरंतर मी यापूर्वी कुठल्याच सैनिकाची अंतिम यात्रा पाहिली नव्हती, मात्र आज शासकीय इतमामात त्याचे अंत्यसंस्कार पाहून मला गलबलून आले. खरंतर हा माझा विद्यार्थी कमी वयात गेला पण त्याच्या चेहऱ्यावर देशसेवा करताना आलेल्या वीरमरणामुळे समाधान जाणवत होते. मी त्याचे दर्शन घेतले आणि निघणार एवढयात त्याच्या घरचे तसेच त्याच्या बरोबर वर्गात शिकणार एक एक करत माझ्या शेजारी गोळा झाले. त्याच्या घरचे माझी आपुलकीने चौकशी करत होते. आमचा मुलगा संजय तुमच्यामुळेच घडला, असे त्यांनी म्हणल्यावर मला अभिमान वाटला आपल्या शिक्षकी पेशाचा. संजयच्या आईने मी घेतलेल्या सकारात्मक उपक्रमाची आठवण करून दिली. संजयने तो जपून ठेवलेला कागद दाखविला. तो कागद बराच जुना वाटत होता. घडी हाताळल्याने जुनी वाटत होती. पण त्या कागदावर संजयविषयी त्याच्या मित्रांनी लिहिलेली सकारात्मक वाक्य संजयला सकारात्मक प्रेरणा देणारी ठरली. आपल्या गुणांची कोणीतरी दखल घेतोय ही गोष्ट एकमेकांबद्दल आदर निर्माण करणारी, तसेच जीवनात प्रेरणा देणारी गोष्ट ठरली होती. पहाता पहाता अर्जुन, पृथ्वीराजची बायको, दिपाली रश्मी आणि अशा अनेक विद्यार्थ्यांनी असे कागद जपून ठेवले होते, कुणी ते घरात दर्शनी भागात, तर कुणी फोटो अल्बम मध्ये, तर कुणी पैशाच्या पाकिटात ही कागदं जपून ठेवली होती. खरंच माझ्या भावना मी आवरू शकले नाही. माझ्या एका छोट्या क्रियाशील खेळाचा एवढा चांगला परिणाम झाला होता. माझ्या डोळ्यातून अखंड अश्रु वाहत होते. आपण एखादी व्यक्ती पाहिली की तिच्यातले दोष प्रथम पाहतो आणि नको असतानाही आत्मसात करतो. समोरच्याचे चांगले गुण पाहून त्यांचे कौतुक केलं. समोरच्याला तू आम्हाला किंवा मला का आवडतो? आणि तू माझ्यासाठी किती प्रेरणादायी आहेस हे सांगितले तर त्या व्यक्तिची आयुष्याची खरी कमाई होऊ शकते. पेराल ते उगवेल. आपण कायम दुसऱ्यातले चांगले गुण फक्त बघावे.

                                     लेखन – आशा पाटील

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!