शर्वरी

                         ‘शर्वरी, ए शर्वरी’ 

मी दचकून भानावर आले. माझी मैत्रीण निशा मला हाक मारत होती. मी हळूच माझ्या डोळ्यातून नकळत ओघळलेला अश्रू पुसला.

‘चल बॉस आले असतील भेटून येते.’

असं म्हणून मी निघणार तेवढ्यात निशा मला म्हणालीच.

 ‘अगं, शिरिषला  तू बॉस ऑफिस स्टाफसमोर म्हणतेस माझ्यापुढे नाही.’

 ‘तसं नव्हे गं जीवनातल्या बऱ्याच नात्यांचे संदर्भ एका अपघातामुळे बदलले असं मला वाटतं. ‘

 तसं तिने माझ्या पाठीवर हलकेच थोपटले. खरंतर मला हे शहर, ऑफिस सोडून जावं असं अजिबात वाटत नव्हतं. पण मी बदलीसाठी अर्ज केला होता. त्याला कारणही तसंच होतं. मी विचारांच्या तंद्रीत असतानाच माझा मोबाईल वाजला. शेफालीचा फोन होता. 

‘ आत्तू, तू आज येणारेस ना!’

‘ हो बेटा, मी निघतेच आहे थोड्या वेळाने.’ 

बाकी चौकशी करून मी मोबाईल ठेवला. 

‘आत येऊ का? सर.’

‘सर…… मी तुझ्यासाठी केव्हापासून सर झालो.’

मला तर सरांना काय बोलावे,  काय सांगावे, कुठून सुरुवात करावी. काहीही कळत नव्हते. बघता-बघता माझ्या नयनांतून अश्रू वाहू लागले. खरं तर मी अजिबात भावूक  न होता सरांना म्हणजेच शिरीषला सर्व सांगणार होते पण….. माझ्याच्याने ते शक्य नव्हते. माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा जमुना पाहून त्याने प्रथम मला शांत केलं. आपण जरा बाहेर जावून येवू. तुला बरे वाटेल. नक्की तुझ्यापुढे काय समस्या आहे ते पण तू मला सविस्तर सांग. मी आणि शिरीष ऑफिसच्या वातावरणापासून दूर… थोडं मन हलकं व्हावं म्हणून कॉफी शॉप मध्ये आलो होतो. शिरीष बरोबर असला तरी मला खूप मोठा आधार वाटे. कोणतेही संकट येऊ दे. मला कसलीच चिंता वाटत नसे. मी घाबरणार नाही, माघार घेणार नाही असं बरंच काही. शिरीषला मी माझ्यापुढे उभ्या ठाकलेल्या परिस्थितीबद्दल सांगायचं ठरवलं. 

             मी माझा  भाऊ नितीन, वहिनी सरिता, आई- बाबा, नितीनदादाची मुलगी शेफाली असे सर्वजण चार दिवसाची सुट्टी मिळाली म्हणून ट्रीपला गेलो होतो. मी ऑफिसमुळे मुंबईला तर सारं कुटुंब पुण्यात राहत असल्यामुळे मी सुट्टी मिळाली की शक्यतो लगेच पुणे गाठत असे. बरेच दिवसापासून देवदर्शनासाठी जायचं असा घरातील सर्वांचा मानस होताच. योगही जुळून आला होता. मी या सुट्टीला गेल्यावर माझा शिरीष बरोबर लग्न करण्याचा निर्णयही घरात जाहीर करणार होते. दादा आणि बाबांची परवानगी घेणार होते. तसं तर मी आई आणि सरिता वहिनींना शिरीष बद्दल बोलले होते. म्हणजे त्या दोघींनी ते ओळखलं होतं.  मुंबईत राहायला नको म्हणणारी मी अलीकडे  चांगलीच रूळले होते. एखाद्या शनिवारी रविवारी पुण्याला जायची टाळू लागले होते. केव्हा ही घरून फोन आला तर त्यांना माझा फोन  एंगेज येत असे. मी मैत्रिणीचा होता म्हणून वेळ मारून नेत होते. तरी वहिनींनी मी पुण्याला गेल्यावर एकदा मला शिरीष बरोबर व्हिडीओ कॉलवर बोलताना बरोबर रंगेहात पकडलं होतं. मी वहिनीला बराच मस्का पॉलिश करून कोणाला न सांगण्याचे वचन घेतलं होतं. हे करताना म्हणजेच बोलताना आईने दोघींना रंगेहात पकडले. मग काय?  वहिनी मला काहीतरी बोलायच्या आणि आईकडे पाहून डोळे मिचकवायच्या. मग मुद्दाम आम्ही तिघी असताना मला चिडवायच्या.  आईने मोठ्या काळजीने शिरिषबद्दल ची सर्व माहिती मला विचारून घेतली होती. त्यांच्या घरी कोण आहे? त्यांची विचारसरणी कशी आहे? रूढी परंपरा मानतात का? आणि असंच बरंच काही. मी पहिलं तर या विषयावर बोलायला लाजायचे पण पुन्हा पुन्हा आमच्या तिघींच गुपीत छान पैकी घरात सुरू असे. दादाचं  लग्न होऊन सात वर्ष होत आली होती. शेफाली  सहा वर्षाची होती. तिला माझा चांगलाच लळा लागला होता. मी कॉलेजला निघाले की ती मागे येई. 

‘आत्तू तू तुतं ताललीस. मला तण यायतं’

 बोबड्या गोड आवाजात मला पण यायचं म्हणून हट्ट करे. मी कशीतरी तिला एक तर चुकवून जात असे. नाहीतर घराजवळील दुकानातलं चॉकलेट दिल्यावर मग कुठे मॅडम बाय बाय करत. मी कॉलेजमधून यायचीही ती खूप आतुरतेने वाट पाहत असे. मी कॉलेजवरून आले की मग दिवसभरातील घरात व शेजारी खेळतांना केलेले पराक्रम आपल्या बोबड्या आवाजात सांगत असे. वहिनी तर मला बराच वेळा म्हणत असे. 

‘असं करा वन्स,  तिला कॉलेजला बरोबर घेऊन जात जा! नाही तरी तुमच्या लग्नात तिला तुमच्या सोबत जीवनभरासाठी पाठराखीण म्हणून पाठवून देऊ. तुम्ही दोघींनीच ठरवायचं. कोण कुणाची पाठ राखायची ते.’

  यावर आम्ही सारे खळखळून हसत असू. तिला जेवायला, फिरायला, झोपायला, अन् कधीकधी तर खेळायलाही मीच लागत होते. तिला पाहणारा पाहतच राही. गोल गरगरीत चेहरा, कुरळ्या केसांच्या छोट्या बटा कपाळावर रूळत, डोळेही बदामी, हसलं की तिच्या गालावर छान खळ्या पडायच्या. सावळंच पण खुललेलं तिचं रूपडं पाहतच राहण्याचा मोह मला नेहमीच होई. आईतर बऱ्याच वेळा म्हणायची थेट तुझ्या दादा वर गेली आहे. लहानपणी तुझा दादा असाच दिसायचा. त्यावर मी वहिनीकडे पाहून मुद्दाम म्हणत असे, 

‘नाही गं आई, शेफाली तर वहिनींसारखी दिसते डिक्टो.’

 यावर आई म्हणे, 

‘अगं थोडी-थोडी वाटते खरं.’

यावर आम्ही हसलो की शेफालीही खूप काही कळल्यासारखं  हसे. 

           दिवस कसे फुलपाखरासारखे उडून गेले. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी घरातल्यांना कसंबसं समजावून सांगत हट्ट करून आज मुंबईला नोकरीसाठी निघाले. घरातलं वातावरण पाहता मी जणू नांदायलाच निघाले असा माहोल घरात दिसू लागला. जो तो डोळ्यात कचरा गेला, काय  बाई कांदा तिखट आहे. आणि अशी बरीच कारणं सांगून नकळत डोळे पुसत होते. माझी मात्र द्विधा मनस्थिती झाली होती. मला एकीकडे वाईट वाटत होते पण दुसरीकडे आपण नोकरी करणार स्वतःच्या पायावर सक्षम उभारणार त्याचाही आनंद होता.  शेफालीने तर मजाच केली. खेळण्यातली छोटी बॅग घेऊन त्यात स्वतःचे कपडे घातले. अन् 

‘मी तण जाणाल आत्तू बलोबल.’ अस म्हणू लागली. 

 इतके वेळ टिपं गाळणारे सगळे आता मात्र रडत रडत हसत होते. मी मुंबईला आल्यावर एखादी सुट्टी मिळाली तरी घरी जात असे. पण जसजशी मी शहरातल्या वातावरणात रूळू लागले तसतसे घरी जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागलं. मात्र शनिवार-रविवारी मात्र आवर्जून  जात असे. शिरीष भेटल्यापासुन त्याची सोबत मला  हवीहवीशी वाटे. त्याचा सहवास मला मोरपिसा सारखा वाटे. आम्ही तासनतास बागेमध्ये निसर्गाचं सौंदर्य पाहत हातात हात घेऊन फिरत असू. मी निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत असताना बराच वेळ जाई. तो मात्र नजरेनी माझी छबी जणू मनात साठवत असे. मी पुण्याला गेल्यावर तर दोन-तीन तास तरी आरामात फोनवर बोलत असू. मला न राहवून एकदा वहिनींनी प्रश्न केला होता. 

‘ वन्स, नक्की इतका वेळ तुम्ही काय बोलता हो! मला पण सांगा ना एकदा.’

‘वहिनी, तू माहेरी गेल्यावर दादाला काय बोलतेस ना तेच.’

‘ अगोबाई काय पण कौतुक सांगावं तुमच्या भावाचं. घरात समोर असताना कधी बोलायचं सुचत नाही आणि फोनवर काय बोलतील. फक्त एवढेच विचारतात. पोहचलीस का? सगळे बरे आहेत का? शेफाली काय करते? केव्हा येणार आहेस? हे बघा कौतुक. अजून जाऊन बुडपण टेकलेलं नसतं. तोपर्यंत येणार कधी हा प्रश्न  सुरूच.’

यावर मी म्हणालेच.

‘ बघ वहिनी दादाला तू जराही नजरेसमोर नसलेले चालत नाही. म्हणून तर गेलं की लगेच येणार कधी हा प्रश्न विचारतो तुला तो. त्यावर पुन्हा वहिनीचा प्रश्न सुरुच. 

‘पण तुम्हाला तुमचे हे काय बोलतात फोनवर’

यावर शिरीष काय बोलतो हे सांगेन कधीतरी म्हणून मी वेळ मारून नेत असे. 

       मी या सर्व विचारात एकटक झाडाकडे बघत बसले असताना शिरीषने ‘शरु, शरु अगं कुठे  हरवली?’

 म्हणून मला जागे केले. खरं तर मला शिरीषला काय सांगायचे आणि कसे सांगायचे तेच कळेना. आई-बाबा, दादा-वहिनी अपघातात गेल्याचं त्याला तर माहित होतं. दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला होता पण सर्वात वाईट या गोष्टीचे वाटत होतं की शेफाली आता अनाथ झाली होती. तसं तिला अनाथ कसं म्हणता येईल? मी होतेच की. या विचारासरशी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिरिषने चटकन माझ्या शेजारच्या खुर्चीत बसत, माझे डोळे पुसले. शर्वरी मला सांग त्यातून काही मार्ग नक्की निघेल. आपण दोघं मिळून नक्की मार्ग काढू, असेही आश्वासन दिलं आणि माझ्या मनाला खूप मोठा दिलासा मिळाला. माझ्या पुढे उभ्या ठाकलेल्या परिस्थितीबद्दल मी त्याला सांगितलं. शेफालीला तिच्या आईचे आई-बाबा सांभाळतीलही पण शेफालीच्या मामीचा या गोष्टीला विरोध आहे. मी शेफालीला सांभाळावं असं त्या सर्वांचे मत आहे. मी सौभाग्यवती होण्याआधी  आई होणार आहे. तिची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. मला माफ करशील?मी सर्व परिस्थितीशी दोन हात करणार आहे. मी तिची आत्तू तिचा सांभाळ करणार आहे. मी स्वीकारलेल्या मातृत्वामुळे माझ्यातली प्रियसी हरली आहे.  प्रेमिका या भूमिकेला इथून पुढे न्याय देऊ शकणार नाही. मला कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्यावं लागेल. काळाची गरज पाहून मला निर्णय घ्यावा लागतोय. मी हे सर्व सांगत असताना अश्रूंनी माझे गाल भिजले होते. शिरीषने सर्व परिस्थिती ऐकली आणि तो गंभीर झाला. मला त्याच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याची कला  छान जमली होती. आज मात्र मला भाव भावनांचा कल्लोळ माजलेला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. मी परिस्थितीशी झगडू शकत होते पण तिच्या मनातला गोंधळ दूर करू शकत नव्हते. मी म्हणूनच धाडसाने त्याला मी पुण्याला बदली करून घेणार असल्याचं सांगितलं. खरं तर हे सांगताना मी त्याच्या नजरेला नजर ही देऊ शकत नव्हते. आता मात्र शिरीष एकदम उसळलाच. मला त्याचं हे रूप अपेक्षीत असं  नव्हतं. तू माझ्या प्रेमाचं हेच परीक्षण केलं का? माझ्या प्रेमाची किंमत कवडीमोल केलीस. मी तुझ्यावर प्रेम केलंय, टाईमपास नाही. मी तुझा मनापासून स्वीकार केला. तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला. तेव्हापासून तुझी सारी सुखदुःख माझी झाली. ही फक्त तुझ्या एकटीची जबाबदारी नाही. मी पण शर्वरीला आधार देणारच आहे. तू मला क्षणात परकं केलंस. तरीच तू ऑफिसमध्ये आल्यावर सर….. असं म्हणालीस, त्याच वेळी मला जरा शंका आली होती. तू माझ्या प्रेमात माझी हीच पारख केलीस का? बोलत बोलतच त्याचे डोळे भरून आले. आसपास कोण आहे नाही याचं भानही दोघांना नव्हतं. थोड्यावेळ भयान शांतता पसरली. मला काय बोलावे ते सुचतच नव्हते. अचानक माझ्यापुढे एक पाय दुमडून गुढग्यावर बसत, त्याने सुंदर लाल रंगाचा गुलाब पुढे केला आणि शर्वरी माझ्याबरोबर लग्न करशील? मी शेफाली अन् तुझा स्वीकार करणार आहे. त्याच्या या वाक्यानंतर मी त्याच्या गळ्यात पडले. आसपासच्या टेबलवर बसलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. मी लाजेने चुर झाले होते. मी हळूच त्याच्या कानात  म्हणाले,  

‘शेफालीने तुला बाबा बनवलं हं.’ आम्ही दोघंही हसू लागलो. दोघांच्याही डोळ्यातून अश्रु वाहत होते पण ते सुखाश्रू होते.

                  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!