ती

सरला आयुष्यात कधीच एकटी कुठे गेली नव्हती. पन्नाशी ओलांडलेली, पण मनानं अजूनही पारंपरिक – नवरा किंवा मुलगी नसेल तर एकटी दुकानातही जाणं तिला धाडसाचं वाटायचं. सगळ्या गोष्टी, अगदी बँकेतली कामंही नवऱ्याबरोबर किंवा मुलीबरोबर.

पण आज सकाळ काहीतरी वेगळीच भासत होती.

शालिनी, सरलाची जुनी मैत्रीण – तिच्या मुलाचं लग्न पुण्याला होतं. घरातून बोलावणं आलं होतं. नवऱ्यानं तिला आग्रह केला, “सगळ्या तुझ्या मैत्रिणी जातायत. तुझ्यासारखी एकटी न जाणारी कुणीच राहिली नाही. एकटी जा सरू, किती दिवसांनी मजा करशील. मी पोहचवतो स्टेशनला.”

सरला बावरली. “मी? एकटी? नको रे… कशाला उगाच.”

तेवढ्यात तिची कॉलेजला शिकणारी मुलगी, स्मिता, म्हणाली, “आई, तुम्ही लहान गोष्टीसाठीच घाबरता. हे काही हिमालय चढणं नाहीये! बसमध्ये बसायचं आणि पुढे शालिनी मावशी तुला घ्यायला येणारच आहेत ना? मी सगळी तयारी करुन ठेवते.”

सरलाचं मन गोंधळलेलं. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक धूसरशी उत्सुकता चमकत होती.

दुसऱ्या दिवशी ती बसमध्ये बसली. खिडकीतून बाहेर बघत असताना, तिच्या मनात विचारांची गर्दी होती—“तुझ्या बरोबर कोण नाही… काही चुकलं तर? पैसे काढायला लागले तर? टॉयलेट कुठे मिळेल?…” पण मनात एक शांत आधारही होता—स्मिताचं हसणं आणि नवऱ्याचा विश्वास.

बस सुरू झाली. दोन तास गेले. सरलाच्या शेजारी कॉलेजला जाणारी एक मुलगी बसली—छानशी, प्रसन्न. ती म्हणाली, “हाय आंटी! मी आर्या. तुम्ही कुठे चाललायत?”

सरलाने एक लाजरीशी हसत ओळख दिली. पुढचा अर्धा तास सरलाच्या संकोचात गेला, पण आर्याचं मोकळेपण, चौकसपणा आणि उत्साहाने वातावरणच बदलून टाकलं.

आर्या म्हणाली, “आंटी, मी एकटीच प्रवास करते,  नौकरीसाठी चाललेय. पहिल्यांदा एकटी बाहेर पडणं म्हणजे बंधनातून सुटणं असतं—हृदय थोडं धडधडतं पण मोकळं… मस्त वाटतं.”

सरलाला हसू आलं. “आमच्या पिढीचं वेगळं आहे गं. आम्हाला चहा घ्यायचाही निर्णय दुसऱ्याला विचारून घ्यावा लागायचा.”

आर्याने चहा आणून दिला. दोघींच्या गप्पा रंगल्या. आयुष्य, शिक्षण, लग्न, मैत्रिणी, सासर, नवरा… आणि त्यातच अचानक बस थांबली.

बसच्या इंजिन मध्ये काहीतरी गडबड झाली होती. चालकाने सांगितलं, “काही तास लागतील. पुढच्या गावातून मेकॅनिक बोलावतो.”

मोकळ्या माळावर बसमधले लोक उतरले. सरलाला आधी काळजी वाटली. “हेच राहिलं होतं. आता काय करायचं?” पण आर्याने लगेच तिचा हात पकडला, “चला आंटी, थोडा वेळ आपण पाय मोकळे करू. झाडाखाली बसू, मी नाश्ता आणते.”

त्या दोघी एका झाडाखाली बसल्या. दूरवर डोंगराच्या कुशीतून सूर्यमावळतीचं सौंदर्य उमटत होतं. सरलाने अचानक ओळखलं—या क्षणाचं मोल… या वेळेचं सौंदर्य. हसू लागली. “काय गं आर्या, मला तर या अडचणीतसुद्धा मजा येतेय.” आर्या म्हणाली, “कारण तुम्ही मन मोकळं केलंत.”

त्या क्षणी सरलाने स्वतःला नव्याने शोधलं.

बस दुरुस्त झाली. पुण्याला पोहोचायला उशीर झाला, पण स्वागताला मैत्रिणी दारात होत्याच. त्यांना पाहून सरला जणू पंख लावून उडाली.

“सरू! तू एकटी आलीस? छे! विश्वास बसत नाही शाब्बास,” शालिनी म्हणाली.

लग्नात दुसऱ्या दिवशी धमाल मस्ती, गाणी, नाच, आठवणींना पूर आला होता. सरलाला तिच्या मुलीच्या आयुष्यात पुढे येणारे क्षण दिसू लागले. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते. एक वेगळंच समाधान यातून पाझरत होते. तिने लग्नाचा मनसोक्त आनंद लुटला.

                ती लग्नावरून परत घरी आली. घराचा दरवाजा उघडताना क्षणभर थांबली. नवऱ्याच्या नजरेत प्रश्न होता,

 कसा झाला प्रवास?

 सरला ने हसून एक लांब  सुस्कारा सोडला.

 ‘काय सांगू तुला जणू माझ्यातले मी नव्यानेच स्वतःला भेटली.’

 मुलगी धावत आली, ‘आई काही अडचण तर आली नाही ना!’

 सरलाने  तिला जवळ घेतले  आणि म्हणाली, 

‘अडचणी आल्या पण मी मागे वळून पाहिलंच नाही.’

 तेव्हा नवऱ्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले. मनातल्या मनात जणू तो म्हणत होता. माझी बायको आता खरी सरला झाली असं वाटतंय. 

त्या रात्री सरलाने आर्याला मेसेज केला.

 ‘तू मला माझीच नव्याने ओळख करून दिली. आता मी एकटी नाही राहिले. माझा आत्मविश्वास माझ्यासोबत आहे. 

तसा प्रयत्न माझ्या लेकीनेही यापूर्वी केला होता परंतु म्हणतात ना,

 सोनाराने कान टोचल्याशिवाय टोचले जात नाहीत. असंच काहीसं  माझ्या बाबतीत झालं होतं पण काही का असेना आज मी मुक्तपणे या जगात विहार करण्यासाठी मनाने तयार झाले आहे.’

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!