एकत्र वेगवेगळे असूनही

  “एकत्र, वेगवेगळे असूनही”

सुभाषराव चव्हाण, वय चौऱ्याहत्तर. उन्हं कलली होती. बाल्कनीतल्या खुर्चीत ते सवयीप्रमाणे बसले होते. हातात चहाचा कप, शेजारी दिवसभराचं वर्तमानपत्र पसरलेलं होतं. पण त्यांच्यी नजर मात्र कुठल्याही  बातमीवर स्थिर नव्हती.

“पन्नास वर्षांपूर्वी आम्ही लग्न केलं होतं. सगळी साधी माणसं, साधा सोहळा, पण त्या एका वचनावर ठाम – सोबत राहायचं.”

आज मात्र, त्याच वर्तमानपत्रातली एक बातमी त्यांचा आत्मा हलवून गेली होती — “गेल्या पाच वर्षांत घटस्फोटांचे प्रमाण दुपटीहून अधिक.”

तेच विचार मनात घोळवत होते. वसंतच्या मुलीचं लग्न मोडलं. शशिकांतच्या नातवाचंही. “हे काय चाललंय… नात्यांना काय झालंय…?”

सुभाषरावांचा नातू विहान, नुकताच सत्तावीस पूर्ण केलेला. नोकरीनिमित्त पुण्यात राहत. स्वभावाने समजूतदार, विचारपूर्वक निर्णय घेणारा. आणि सध्या त्याच्या लग्नाच्या गाठी घालण्यासाठी घरात नव्या उत्साहाचं वारे वाहत होतं.

एका रविवारी, घरात थोडीशी गडबड सुरू होती. नातवाच्या पसंतीची मुलगी, तिचं कुटुंब घरात यायचं होतं. सगळं व्यवस्थित होतं, पण सुभाषरावांचं मन कुठेतरी खोलात डोकावत होतं — “हे लग्न ठरेल, पण टिकेल का?”

नातवाने पूर्वीच स्पष्ट सांगितलं होतं, “माझ्या लग्नाचा अर्थ म्हणजे फक्त विवाहसोहळा नाही. ती माझ्या आयुष्याची वाटचाल आहे. ती मुलगी — रूचिरा — डॉक्टर. घरच्यांची लाडकी. तिनंही हे नातं स्वच्छ मनाने स्वीकारलं आहे. “

रुचिराचे  बाबा मात्र थोडे सावध. “पुन्हा विचार करतेयस ना?” त्यांनी तिला विचारलं होतं. ती हसली होती, “हो बाबा. माझा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही, तर विचारपूर्वक आणि आम्ही दोघांनी चर्चेअंती घेतलेला आहे.”

एका संध्याकाळी घरात सगळे परत एकत्र जमले. शांत वातावरण होतं. कुणी चहा घेत होतं, कुणी बसून गप्पा करत होतं. विहानने उभं राहून हळूहळू बोलायला सुरुवात केली, “आजचं जग भरभर चालतंय. पण नातं टिकवायला शहाणपणाची गती लागते. मी आणि रूचिरा दोघंही उच्चशिक्षित आहोत, पण नातं डिग्रीवर टिकत नाही — ते संयम आणि संवादावर टिकतं.”

सुभाषरावांच्या डोळ्यांत पाणी आलं. “माझा नातू… विचारपूर्वक बोलतोय… याचं लग्न निभावेल बहुधा…”

दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकत्र बसणं झालं. या वेळी दोघांनी एक विवाह समुपदेशक बोलावली होती. थोडं सगळ्यांना नवीन वाटलं, पण मनात मात्र रुजलं.

ती समुपदेशक म्हणाली, “हल्लीचं नातं एका परफेक्ट इमेज च्या मागे धावतंय. पण परिपूर्णता कुणातच नसते. विश्वास, माफ करणं आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे मोठेपणानं पाहणं हे नातं वाचवतं.”

रूचिरा म्हणाली, “मी डॉक्टर आहे, पण प्रत्येक दुखण्यावर उत्तर नसतं. नातंही तसंच असतं. काही त्रास लगेच नाहीसे होत नाहीत. पण साथ दिली, की बरे होतात.”

लग्न ठरलं. भव्य नाही, पण भावनिक. पंच्याहत्तर पाहुणे, साधे पण निखळ समारंभ. तामझाम नव्हता, पण हास्य होतं. कॅमेऱ्यात अडकलेली क्षणभराची झळाळी नव्हती, पण डोळ्यांतून झरणाऱ्या  भावना होत्या.

सात वचनं घेताना नवरा मुलगा म्हणाला,

 “एक आणखी वचन — मी तुझ्या मतभेदांनाही सन्मानाने सामावून घेईन.”

लग्नानंतर दोघं नव्या शहरात राहायला गेले. सुरुवातीचे दिवस स्वप्नाळू, गंधाळलेले, गहिरे आणि हवेहवेसे वाटणारे. त्यातही मजा व्हायची. कधी दिवसाची कामे राहायची तर कधी नवीनच काहीतरी कामे निघायची.  रुचिराला घर सांभाळण्याची सवय नसल्यामुळे थोडासा विस्कळीतपणा होत होता.

— कधी ब्रश कुठे ठेवायचा यावर वाद, कधी फोनवर जास्त वेळ घालवला म्हणून अबोला,कधी थकून आल्यावर,

 “तू तरी का नाही विचारलं?” अशी किरकोळ कुरबूर…

पण दररोज रात्री झोपताना एक वाक्य ऐकू यायचं,

 “आपण वेगळे आहोत, पण एकत्र आहोत — आणि हेच महत्वाचं.”

सुभाषराव हे सगळं निवांतपणे पाहत होते. आठवड्याला एक फोन यायचाच. स्नेह, संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न दोघांकडून स्पष्ट दिसत होता.

एक दिवस त्यांनी आपल्या जुन्या डायरीत लिहून ठेवलं —”लग्न म्हणजे एक सुरेल भजन. त्याला सुरांची, तालांची, आणि साथ देणाऱ्यांची गरज असते. आणि विहान आणि रुचाने ती साथ योग्य वेळेस ओळखली आहे. लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचा संग नाही, ती दोन कुटुंबांची सहजीवन शाळा आहे. आणि या दोघांनी तिथं पहिला पाठ यशस्वीपणे पार केला आहे…”

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!