
मला आता माझं ऑफिस दोन लेकरं सासू-सासरे नवरा यांचं पाहत पाहत सारी कामं उरकावी लागणार होती. तसं तर मला आठवतंय त्याप्रमाणे माझं लग्न झालं तेव्हा आमच्या सासूबाईच्या दोन जावा होत्या. एका वाडयात तीन कुटूंब. असं मी एकदा बोलता बोलता म्हणाले तर आत्ती खूप रागावल्या.
‘तीन नव्हे एकच कुटूंब आहे हे. तुमच्या मुंबईसारखं आमच्याकडे जागा, माणसे, वेळ यांची कमी नाही बरं का? असे काही बोलून उगीच घरातल्यांचा रोष ओढवून घेवू नकोस.’
त्यांच्या या वाक्यानंतर मी घरात कधीच कुणाच्या मध्ये आणि कुणाविषयी बोलत नसे. एकतर मुंबईकरांना जास्त बोलायची अन् उगाच कुणाचे काय जाणून घेण्याची इच्छा नसते. त्यामुळेच आमच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये कोण रहातं याची कधी आम्ही चौकशी करत बसत नाही. वेळ- काळानुसार माहिती होतंच की. जसं जसं माझ्या चुलत नणंदा व दिरांची लग्न होवू लागली. घरात हळूहळू जागा कमी पडू लागली. तरीही सारेच खूप आनंदाने रहात होते. सासूबाई सासरे अन् दोन चुलत सासरे त्यांची प्रत्येकी दोन दोन मुलं. पाहता पाहता गोकुळ वाटावे असे झाले होते घराचं रुपडे पण जागेची कमी साऱ्यांनाच खटकू लागली. एकाच वाडयात राहणारे सारे आम्ही सारी नाती माणूसकीने जपत होतो. म्हणजे आमच्याकडे सुनांच्या माहेरच्या लोकांचं येणं जाणं सुरू होते. नेहमी असणारी माणसं कशीतरी घरात राहत पण पाहुणे आले की झाले. मी नवीन असताना काही वाटत नव्हते पण जशा मला चुलत जावा येत गेल्या, तसतसे वातावरण बदलत गेले. अन् एक एक करत सारे वेगळे झाले. खर मी शहरात रहात असूनही मला मात्र यांच्या घरात आल्यावर खूप छान वाटायचे. मात्र जसजसे सारे कमी कमी होत गेले तसे मलाही करमेनासे झाले. पण शेवटी प्रत्येकाला मोकळीक हवीच ना!