
नमिता ऑफिसमधून घाईघाईने बाहेर पडली. आईचा फोन आला होता.
“नमिता, पटकन घरी ये, सरला आत्या गेली. आपल्याला मुंबईला जायचं आहे.”
गाडीने रस्ता पकडला आणि नमिताचं मन धडधडू लागलं. सरला आत्या म्हणजे माहेरची संजीवनी होती. तिच्यामुळे घरात नवचैतन्य निर्माण होत होतं. मुलात मुल बनून राहणारी, मोठ्यांमध्ये समजदारीने निर्णय घेणारी आणि देणारीही. सख्ख्याच काय पण चुलत भावंडांना जीव लावणारी. स्वतः पावसात भिजणारी आणि भावंडांना भिजू देणारी, स्वतः गोळ्या चॉकलेट देणारी आणि सणासुदीला लाडू-चिवड्याचे डब्बे आणि फटाके आणणारी.
तरीही गेल्या काही वर्षांत तिच्याशी नीट बोलायलाही वेळ मिळाला नव्हता. चौकात गाडी थांबली. आईने साड्यांचं दुकान दाखवलं.
“लेक गेल्यावर तिला माहेरची साडी नेसवली जाते,”
आईने शांतपणे सांगितलं.
तिने एक चिंतामणी रंगाची, सोन्याच्या काठाची साडी पिशवीत घालून आणली. नमिता गप्प होती, तिच्या मनात शेकडो आठवणी दाटून आल्या होत्या.
“ही साडी आत्याच्या अंगावर घातली की तिला माहेरच्या उबदारपणाचा शेवटचा स्पर्श मिळेल,”
आई म्हणाली.
मुंबईला पोहोचल्यावर घरात सगळीकडे शांतता होती. सरला आत्या शांत झोपल्यागत पडली होती. आईने घेतलेली साडी नमिताच्या हातात ठेवली. थरथरत्या हाताने तिने ती आत्याच्या अंगावर चढवली… पण त्या क्षणी नमिताच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.
“आत्या, तुमच्यासाठी मी कधीच साडी घेतली नाही, हे माझं चुकलं…”
मनातून माफी मागत नमिता बसली.
तेव्हापासून पंधरा दिवस झाले तरी नमिताला झोप लागत नव्हती. ऑफिसमध्येही मन गुंतत नव्हतं. तिच्या मनात एकच विचार घोंघावत होता.
“आपण का ही साडी मृत्यू नंतर देतो? जिवंतपणी का नाही?”
आठवड्याच्या शेवटी नमिताने मनात काहीतरी पक्कं ठरवलं. ठरवलं.
आत्याच्या वर्षश्राध्दानंतर ती माहेरी गेली. भावाला म्हणाली,
“दादा, यंदा सणासुदीला आपण सरळ आत्यासारख्या सगळ्या माहेरवाशिणींना एकेक साडी घेऊ. त्या आनंदाने नेसतील, मिरवतील.”
भावाने थोडा विचार करून होकार दिला. त्या दिवाळीत घरात एक सुंदर सोहळा झाला. सगळ्या बहिणी, आत्या, नणंदा आल्या. त्यांना एकेक साडी देताना नमिताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.
“सरला आत्या जिवंत असत्या तर किती आनंदल्या असत्या…” सगळ्या बहिणींनी ती साडी अंगावर नेसून आरशात पाहिलं, हसल्या, फोटो काढले.
त्या दिवशी घरभर हसण्याचा, आठवणींचा, माहेरपणाच्या उबेचा गोड गंध दरवळला आणि नमिताला जाणवलं —”हो, हीच खरी माहेरची साडी आहे. जी जिवंतपणी नेसली जाते आणि आनंदाची आठवण मागे ठेवते.”
माहेरची साडी नेसून मायेची ऊब जाणवत राहणं माहेरवाशीणीला कायम सुखावतं आणि मोठा भावनिक आणि मानसिक आधारही देतं.