सांडलेलं चांदणं

 

रामराव वयाच्या ऐंशीच्या टप्प्यावर होते. शरीर थकलेलं, पण मन झपाटलेलं होतं. शारदे सोबतच्या आठवणींचं ओझं वाहत, एकटेपणाची विटंबना सहन करत. गावाकडच्या रानामळातल्या मोकळ्या आभाळाखालचं आयुष्य, त्यांना आठवत होतं कारण आता इथं  शहरातल्या चार भिंतीत मुलगा अन् सुनेसोबत शहरात रहायला आल्याने त्यांना कैदेत असल्यासारखं वाटत होतं.

शारदा गेल्यानंतर सगळं संपल्यासारखं झालं. विनयने आईच्या चौदाव्याला गावाकडचा सगळा हिशोब मिटवला. दाराला मोठा टाळा मारला आणि बापाला घेऊन शहरात आला. “आई गेली, आता तुझं एकट्याचं तिकडं काय?” त्याच्या स्वरात तर्क होता, भावना नव्हत्या.

शहरात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस रामराव फक्त भांबावून गेले होते. एक क्षण गर्दी ओसंडणारं शहर, दुसऱ्या क्षणी भकास एकांत. घरात ए.सी., टिव्ही, गादी  सुखाची रेलचेल पण मनाला हवा असतो गावातल्या चुलीवरच्या  पदार्थांचा वास, बाजरीची भाकरी, आणि शारदेचा हसरा चेहरा आणि आनंदी आवाज. हे सगळं इकडे नव्हतं.

ते नेहमीप्रमाणे पाचला उठत. शारदा हयात असताना ती पाच वाजता उठायची. पहाटेचा गारवा शरीरात उतरत असताना ती ओल्या पदरानं कपाळ टिपायची आणि पाण्याच्या हंड्याकडं वाकून त्याला हाक मारायची – “राया, हात-पाय धुवून घ्या, मी चहा ठेवते.”

आता काहीच नाही. ते बसतात. पंख्याकडं बघत. आवाज नाही. शारदा नाही. केवळ एक थंड शून्यता आहे, जी पंख्यासारखी सतत फिरतेय.

डॉली त्यांची सून त्यांच्या हातात चहाचा कप देते. ती न बोलता बरंच काही बोलते. तिचा चेहरा कधीच न बघता, त्यांच्या मनात ‘निव्वळ कर्तव्य आहे’ असंच काहीसं उमगतं.

चहा घेताना कपाचे थरथरते हात सावरताना त्याला वाटतं, “शारदा असती, तर चहा कपात देणं तिला मान्यच नव्हतं. पितळेच्या ग्लासात गोड असा चहा … ती माझा चेहरा बघून अंदाज घेऊन चहात साखर वाढवायची…” आठवणींनी ही रामरावांना चहाची चव तोंडांत आल्यासारखं वाटलं.

दररोज सकाळी दहा वाजता ते रोज खाली जातात. अन् बाकावर बसतात. बाकीचे म्हातारे त्याच्याकडं न बघता बसलेले असतात. हे गावाकडचे. एकतर ओळख नाही. त्यात गावाकडची भाषा. काही बोललं तर आपलंच हसं होणार. तसंही सुन अन् लेकाने त्यांना कुणाशीही गप्पा मारण्यावर बंधन घातलेले. बोलून काही तरी चुकायचं त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. बागेत काही वृध्द मोबाईलवर गेम्स खेळतात. कोणाला बोलावं त्यांना विचारावं, 

“तुम्हाला गावाकडचं काही आठवतं का?” 

हे असं विचारायचीही सोय नाही आणि धाडसही नाही.

बागेत पलीकडं एक बाई इंग्लिश कुत्रा फिरवायला घेऊन चाललेली पाहून रामरावला ‘राजा’ आठवला. राजा गावाकडचा प्रामाणिक कुत्रा. शारदेच्या आसपास रेंगाळणारा, भाकरीचा तुकडा मागणारा.

“त्याला आता कोण भाकर टाकत असेल? गावच्या शेजाऱ्यांना तरी सुचतं का असं काही?” ते मनाशी विचार करत होते. आठवणीने ही त्यांचे डोळे ओलावले.

दुपार झाली ते विचार करत होते. विनय ऑफिसला गेला असेल.  डॉली घरात. रॉनीत शाळेत. आता काय करायचे. रामराव खुर्चीत झोपले. थोड्यावेळाने डॉलीच्या आवाजाने  जागे होतात. तेव्हा पुढ्यात डिशमध्ये शिल्लक मैगी तिने आणलेली. ही त्यांची दुपारची ‘भाकरी’ झालीय आता. ते जेवता जेवता मनातल्या मनात म्हणतात,

“शारदे, त्या काळी साजूक तूप घालून तू जे शिजवलंस ना, त्याला ही मैगी कधीच सरस ठरणार नाही गं…”

मॅगी नको म्हणलं तर भुकेलेल्या पोटाला काहीच मिळणार नाही. गावाकडचं घट्ट मुठ्ठ दुध, सोबत शारदेच्या हातच्या दणकट दोन भाकरी अन् सोबत खर्डा. वाह ही चव इथल्या कोणत्याच पदार्थाला नव्हती. ते दिवसभर विचारांचा खेळ खेळत बसायचे, अन् काही आठवून कधी हसायचे तर कधी एखादा शब्द बोलायचे. यावर घरात सारे एकटं का बरं हसतात अन् बोलतात. असं म्हणून विचित्र नजरेने पहायचे.

रात्री हॉल अंधारलेला. छतावर रात्रीचं सीलिंग लाइट. तारे-चंद्र दाखवणारं. ते त्या चंद्रात शारदेला शोधतात. ती त्याच्याकडं बघतेय की त्याच्याकडून वळून चाललीय? त्यांना आठवणींचं उत्तर नाही मिळत. खऱ्या आकाशातले चांदणं पहात बाजेवर गार वाऱ्यात आकाशाचे पांघरूण घेऊन झोपणं शहरात अशक्यच. हे रामरावांना जाणवलं होतं.

कधी-कधी ते जागेपणीही भूतकाळात जातात. शारदा त्याच्यासोबत विहिरीवर कपडे धुवायला गेलेली.

 “हंss… आता ह्या पोत्यातले कपडे घे… नीट टाक बरं का…  घाण नको व्हायला.”

कधी ती वाणसामान घेऊन बाजारातून परतलेली. तेवढ्यातल्या तेवढ्यात काटकसरीने घर चालवणारी. 

“दहा हजाराचं बजेट होतं, आठात संपवलं. पोराच्या लग्नातही हाच हात सावरायचा!”

शारदा. कडक. सरळ. जिवाभावाची. तिच्या बोलण्यामागे काळजी असायची. तिने प्रेम कधी गोंजारून दाखवलं नाही, पण ते रोजच्या भाकरीत, काळजी करण्यात आणि वागण्यात होतं.

          एका रात्री ते अचानक उठले. त्यांना शारदेचा चेहरा दिसला. ती म्हणाली, 

“तुम्ही जर आधी गेलात, तर मी सांभाळीन. पण मी आधी गेले, तर तुम्हाला कोण सांभाळेल  हो राया?”

ते स्तब्ध झाले. किती साधं, पण खोल जाणारं वाक्य. आणि खरंच… आता कोण? आता कोणीच नाही. गावंढळ बाप मुलाला अन् मुलीला नको वाटतोय. त्याचं राहणं, वागणं त्यांना खटकतंय. आठवणींनी डोळे पाणावले खरं पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी डोळे पुसले.

एके दिवशी ते गच्चीवर गेले. रात्रीच्या आभाळात माळरानाचं आभाळ शोधत. त्यांना वाटलं, शारदा तिथंच आहे. वाऱ्यात, आभाळात, ढगांच्या पांढऱ्या कुशीत.

त्याचं थकलेलं शरीर, पण ओझ्यानं दबलेलं मन… त्यांनी हलकेच डोळे मिटले.

खाली आल्यावर त्यांनी पाहिलं, खोलीत पंखा चालू आहे. सून काय म्हणेल? रागावेल ना! पण आता मन स्थिर झालंय.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉली खोलीत आली. रामराव खुर्चीत बसले होते. त्यांनी डोळे मिटले होते. चेहऱ्यावर शांत हसू. जसं की त्याच्या एका हातात पुन्हा शारदेचा हात आहे… आणि दोघं पुन्हा त्या गावाकडच्या घरात  बसले आहेत, अन् रात्री छिद्र पडलेल्या घरात चांदणे सांडलंय. त्या चांदण्यांखाली ती दोघं निवांत आयुष्यातील सुखद आठवणींचा पसारा मांडून एकमेकांना सांगताहेत. 

अशा समाधानात खरंच मरण सुध्दा देखणं भासतंय.

म्हातारं का बरं आज उशीर पर्यंत झोपलंय याचं सूनंला कोडं पडलंय. पण ते तर आता शारदे सोबत दूर दूर निघून गेलंय. सुख दुःखाची सारी गणितं बाजूला ठेवून अनंताच्या वाटेवर.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!