
“आम्ही कुठे सांगितलं होतं आम्हाला जन्म द्या म्हणून?”
तो आवाज घराच्या भिंतींवर आपटत परत येत होता.
अच्युतराव खुर्चीत बसले होते. समोरच्या जमिनीवर त्यांची नजर स्थिर होती, पण कान मात्र प्रत्येक शब्द टिपत होते. शेजारी शांत बसलेल्या कमलाबाई पदराचा कोपरा हातात गुंडाळत होत्या. त्यांच्या बोटांच्या हालचालींत अस्वस्थता होती, पण चेहऱ्यावर निर्विकार शांतता.
“तुमच्या इच्छेने सगळं केलं. शिक्षण, घर, व्यवसाय… आणि आता त्याची परतफेड म्हणून आमच्याकडून सेवा हवी?”
मोठा मुलगा समीर बोलायचं थांबत नव्हता.
जन्म देण्याच्या त्याच्या विधानावर
“हो ना,” असं लहानगा अमित लगेच म्हणाला, “काल काय तर म्हणे भाजी फार तिखट झाली, आज काय तर भात हवा. आता आपल्या बायकांनी रोज किती किती मेनू करत बसायचे? नीलम वैतागली होती काल.”
नीलम पुढे झाली.
“घर, ऑफिस, मुलं… आणि त्यात यांचं सगळं. कुठे बाहेर जेवायला जायचं ठरवलं तरी आधी ‘आईबाबांचं बघा’. एक दिवस तरी निवांत मिळतो का?”
समीरची पत्नी राधा थोडा राग आवरून बोलत होती, पण शब्द धारदार होते.
“आम्ही काही बोललो की लगेच तेच वाक्य – ‘आम्ही तुम्हाला लहानाचं मोठं केलं.’ मग काय, आयुष्यभर तेच ऐकत बसायचं?”
अच्युतरावांनी मान थोडी वर केली.
“असं नाही गं… आम्ही फक्त एवढंच म्हणतो—”
“बाबा, प्लीज,” समीरने मध्येच वाक्य तोडलं,
“आता हे सगळं नको. आम्ही सुट्टीला जायचं ठरवलं तर लगेच चिंता सुरू.
‘आम्ही एकटे राहिलो तर?’,
‘तब्येत बरी नाही’… मग काय, आम्ही फिरायलाच जाऊ नये का?”
अमित उठत म्हणाला,
“चला, उशीर होतोय. फ्लाइट मिस होईल. यांच्या मागे वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही.”
आणि ते सगळे निघून गेले.
दार बंद झालं… पण घरात उरलेला आवाज मात्र बराच वेळ घुमत राहिला.
कमलाबाई बराच वेळ शांत बसून राहिल्या. मग हळूच म्हणाल्या,
“चहा थंड झाला असेल…”
अच्युतराव काही बोलले नाहीत.
त्यांच्या मनात आठवणींचा पूर आला होता.
तरुणपणी ते गावोगावी फिरून कापड विकायचे. उन्हाळा, पाऊस, थंडी… काहीच अडवत नव्हतं. सायकलवर गठ्ठे, डोक्यात स्वप्नं. कमलाबाईंनी संसार सावरला, शिवणकाम केलं, मुलांना शिकवलं.
समीर इंजिनिअर झाला. अमित एमबीए.
घर उभं राहिलं. गाडी आली. प्रतिष्ठा आली. संसार कसा सुखात चालला होता…
आणि मग… एक दिवस अचानक छातीत दुखलं.
हृदयविकाराचा झटक्याने आयुष्य बदलून टाकले.
त्या दिवसानंतर अच्युतराव बदलले. शरीर थकलं. मनात भीती घर करू लागली. चपाती चावायला जमत नसे, म्हणून कधी भाताची मागणी. रात्री झोप येईना, म्हणून कधी उठून बसणं.
मुलांना वाटू लागलं—आता हे आपल्यावर अवलंबून आहेत.
मुलं परदेशात गेल्यानंतर घर अगदी रिकामं वाटू लागलं.
“आज भाजी काय बनवू या?,” कमलाबाई म्हणाल्या. तेच ते प्रश्न पडत असतात बायकांना आयुष्यभर. कमलाबाई एके दिवशी मात्र म्हणाल्या,
“आपण जेवण बाहेरून मागवू या का?”
अच्युतरावांनी पहिल्यांदाच हलकंसं हसून मान डोलावली. दिवस मजेत छान गेला खरं पण रात्री छातीत कळ आली. फार नाही, पण तेवढी भीती पुरेशी होती.
कमलाबाईंनी औषध दिलं. हात धरून बसल्या. मनात कसलीशी अनामिक भीती होतीच.
“आपण कुणावर ओझं तर होत नाही ना?” त्या हळूच म्हणाल्या.
अच्युतराव बराच वेळ गप्प होते. मग म्हणाले,
“नाही… पण आपल्याला तसं भासवलं जातंय.”
त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी अच्युतरावांनी आपल्या जुन्या मित्राला म्हणजेच वकील देशमुखांना फोन केला.
“मला भेटायचं आहे,” ते शांतपणे म्हणाले.
दोन तासांत देशमुख आले.
चहा झाला. औपचारिक बोलणं झालं.
मग अच्युतराव म्हणाले,
“मला माझ्या उरलेल्या आयुष्याची व्यवस्था करायची आहे. कोणाचं ओझं न होता.”
देशमुखांनी त्यांच्याकडे नीट पाहिलं.
“तुम्ही खात्रीने बोलताय ना?”
“अगदी.”
त्या दिवशी कागदपत्रांची सुरुवात झाली.
घर, व्यवसायातील हिस्सा, बँक खातं—सगळ्याची नव्याने मांडणी.
एक वृद्धाश्रमाचा पर्यायही चर्चेला आला.
पण कमलाबाई ठाम होत्या.
“आपलं घर आपण सोडणार नाही.”
दिवस जात होते. महिनाभराने जेव्हा समीर, अमित, त्यांची बायका, मुलं सगळे विमानतळावर उतरले.
परदेशी सहल, फोटो, खरेदी एकूणच सहलीत सगळं समाधानकारक झालं होतं.
ड्रायव्हरला फोन केला. तो उचलत का नाही?
पुन्हा, पुन्हा केला… तरीही नाही.
“काय भानगड आहे?” अमित वैतागला.
शेवटी कॅब करायचा निर्णय घेतला. कॅब करून सगळे घरी आले.
गेट मात्र बंदच होते.
वॉचमन दारात शांत उभा होता.
“गेट उघडा,” समीर ओरडला.
“सॉरी साहेब,” वॉचमन म्हणाला,
“मालकांनी सांगितलंय तुम्हाला आत सोडायचं नाही.”
“मालक?”
नीलम चकित झाली.
तेवढ्यात दार उघडलं.
अच्युतराव आणि कमलाबाई बाहेर आले.
“बाबा, हा काय प्रकार आहे?” समीर चिडून म्हणाला.
अच्युतरावांचा आवाज शांत होता.
“तुम्ही म्हणालात ना! आम्ही तुमच्याकडून काही मागू नये?
म्हणून आम्ही स्वतःची व्यवस्था केली.”
“म्हणजे?” अमित विचारत होता.
देशमुख पुढे आले.
“कायदेशीररीत्या, आता हे घर आणि व्यवसाय ट्रस्टकडे आहे.
तुम्हाला तुमचा हिस्सा मिळालेला आहे. पण या घरात निर्णय त्यांचे असतील.”
राधा गप्प झाली.
नीलमचे डोळे खाली गेले.
कमलाबाई म्हणाल्या,
“आम्हाला सेवा नको.
फक्त आदर हवा होता. तुम्ही आम्हाला तुमच्या वेळे नुसार गृहीत धरता. आमच्याही काही अपेक्षा, इच्छा आहेत.”
कोणाकडेही उत्तर नव्हतं.
त्या दिवशी समीर आणि अमित यांना पहिल्यांदाच समजले—
आई-वडील म्हणजे गुंतवणूक नाही… ऋण असतं.
पण काही ऋण उशिरा उमगली होती त्यांना, त्यामुळे तर फक्त पश्चात्ताप उरला.
आणि अच्युतराव-कमलाबाईंनी आपलं उरलेलं आयुष्य
स्वाभिमानाने जगायचं ठरवलं. आयुष्य खर्ची घातले तरी त्याची किंमत नसेल तर….