अस्तित्व

कप्प्यात अजून गंध आहे…

तिने दरवाजा बंद केला. त्यावर त्या खोलीत जायचं धाडस त्याचं झालं नव्हतं. तो आत जाणार तेवढ्यात दरवाजा अलगद वाजला. 

वाऱ्याच्या झुळकीसारखं हलकंसं काहीतरी घरातून निघून गेलं होतं. आवाज कुठलाही झाला नव्हता, पण घर थोडं सुन्न झालं होतं. हॉलमध्ये ठेवलेला तिच्या कॉफीचा मग, अजून नेहमीच्या जागी शोकेस मध्येच होता. ज्यावर तिचं हसतमुख चित्र होतं. टेबलावर तिच्या केसांची क्लिप अजूनही तशीच विसावलेली होती.

बाबा हळूहळू उठले, आणि तिच्या खोलीकडे गेले. दरवाजा अर्धा उघडा होता. अंधारात सवयीचे नसले तरीही त्यांनी आत पाऊल टाकले. खोली भरलेली होती, पण तरीही पोकळ वाटत होती.

टेबलवर ठेवलेली तिची डायरी बघून त्यांनी एक क्षण श्वास थांबवला. उघडली नाही, फक्त हात ठेवला त्यावर. त्यांचा स्पर्श म्हणजे तिच्यासाठी आशीर्वाद होता—

मूक, पण स्नेहाने ओतप्रोत भरलेला.

त्यांनी कपाट उघडलं, एक एक वस्तू, कपडे, पुस्तकं हळूहळू पाहत लेकीचं अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करु लागले.

सासरी जाताना तिने काही कपडे मागे ठेवले होते.

“आता सासरी हे कपडे नेसायला कधी वेळ मिळणार बाबा,” 

असं हसून म्हणाली होती. पण ते कपडे, तिचे बूट, आणि एक  साड्यांचं गाठोडं अजून तिथंच होतं. त्या सगळ्यांत तिच्या अस्तित्वाचा वास होता. मोगऱ्याचा,  एका विश्वासू मिठीचा. तिला मोगरा प्रचंड आवडत होता.

बाबांनी कपड्यांवरून हात फिरवला. एका गडद गुलाबी ओढणीच्या फटीतून चिमुकले फोटो बाहेर डोकावत होते—ती, तीन वर्षांची असताना, त्यांच्या खांद्यावर बसलेली. ते फोटो उचलले, आणि त्यांच्या हृदयात एक कळ उठली.

“किती मोठी झालीस गं तू,” ते नकळत पुटपुटले.

ते कपाट बंद करताना त्यांनी शेवटचं पुन्हा एकदा आत बघितलं. एका कोपऱ्यात जुनं एक छोटं पाकीट होतं. त्यांनी ते उघडलं—तिचं पहिलं पत्र!

 “बाबा, मी शाळेच्या ट्रिपला जातेय. काळजी करू नकोस. मला तू खूप खूप आवडतोस.”

हे पत्र त्यावेळी वाचून तिची आई म्हणाली ही होती. 

‘दिवसरात्र काळजी करायची मी, काय हवं नको पहायचं मी, नऊ महिने गर्भात वाढवायचं मी, डोहाळे लागतात ते वेगळंच. पण शब्दात तरी प्रेम व्यक्त करायचं माझ्याविषयी. सारखं आपलं बाबा बाबा…’

शेवटी त्यानेच तर दोघींनाही वैयक्तिक समजून सांगितले.

‘अगं मुलींसाठी शेवटी बापच जवळचा वाटतो.’

असं  म्हणून बायकोला तिच्या वडिलांपासून मिळालेल्या प्रेमाचे महत्त्व आणि दाट मायेविषयी सांगितल्यावर ती शांत झाली. मुलीलाही समजून सांगितले,

‘सारखं, बाबा बाबा नको गं करत जाऊ. कधीतरी आईलाही विचारत जा.”

त्याने समजून सांगितले.

आज आठवणींचा हिंदोळा मनामध्ये उठला होता. त्यांने ते पाकीट कपाळाला लावले, हृदयाजवळ धरलं. डोळ्यात हलकं धुकं दाटून आलं.

तितक्यात मागून बायको आली.

“काय करताय?” तिने हलक्या स्वरात विचारलं. ते काही बोलले नाहीत. फक्त कपाटाकडे बघत म्हणाला, 

“कप्प्यात अजून गंध आहे तिचा… आणि तो राहू द्यावा असं वाटतंय.” 

ती हसली, समजून.

“हो. राहू दे. आपण तिला नवीन घरटं बांधायलाच तर पाठवलंय… पण जुन्या घरट्यात अजून तिचे अस्तित्व हवेच ना. ते आपण मरेपर्यंत कायम राहणारच.”

बाबांनी कपाट बंद केलं. ओढणीचा एक कोपरा दारात अडकला होता. त्यांनी तो अलगद मोकळा केला. तेव्हा वाटलं.कप्प्यात अजून गंध आहे…
कधी कधी मुली जातात, पण राहतात. गंधासारख्या. आठवणीसारख्या. कप्प्यात, मनात, आणि एका रिकाम्या खोलीत… ज्यात अजूनही तिची चाहूल ऐकू येतेय. अस्तित्व जाणवतंय.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!