पुन्हा जुळलेली वाट

पाऊस रिमझिम सुरू होता.

खिडकीतून बाहेर पाहत आर्या म्हणाली,

“खरंच, हे शहर अजून तसंच आहे बाबा… पावसात तर अजूनच सुंदर दिसतं.”

बाबांनी हलकंसं हसत उत्तर दिलं,

“शहर नाही बदललं, पण तू मात्र खूप बदलली आहेस. पुण्यात फ्लॅट, कार, बँक अकाऊंट… सगळं मिळवलंस. पण बघ, मिळवत-मिळवत स्वतःला हरवून बसू नकोस.”

आर्या त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली,

“तुम्ही माझ्यासोबत पुण्यात राहायला या ना. आई गेल्याला चार वर्षं झालीत, इथे एकटे… मला बरं वाटणार नाही.”

“अगं, इथे माझी मुळं आहेत. आणि आता इथे रोज संध्याकाळी माझ्या मंडळाची गाठ पडते. आमच्या ग्रुपचा कॅप्टन संदीप  काय भन्नाट माणूस आहे!”

या त्यांच्या वाक्यावर का कुणास ठाऊक पण क्षणभर शांतता पसरली.

आज आर्याने आईची  साडी घातली होती. बाबा आर्याकडे पाहून म्हणाले,

“साडीमध्ये तू अगदी तुझ्या आईसारखी दिसतेस.”

उदासीचा एक क्षण गेला आणि आर्या हसत म्हणाली,

“आजच बोलवा ना त्या कॅप्टन साहेबांना, मलाही भेटू द्या.”

पण ते आज कदाचित शक्य नव्हते. 

थोड्या वेळाने आर्या, बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कुलकर्णी आणि स्थानिक मुलगा गणेश यांच्या सह साई नगर वस्तीसमोर उभी होती.

आर्याला आठवलं  काही वर्षांपूर्वी ही वस्ती कचऱ्याच्या ढिगांनी भरलेली, सडलेल्या भिंतींची होती. पण आज स्वच्छ रस्ते, रंगीत भिंती, झाकलेली गटारं, आणि पावसाने पसरलेला सुगंध…

गणेश अभिमानाने म्हणाला,

“हे सगळं आमच्या ‘दादा’चं काम आहे.”

‘दादा?’ आर्या थोडी उत्सुक झाली.

गल्ल्यांमधून जाताना तिला दिसलं. घराघरात लहान उद्योग, बॉलपेनचे पार्ट्स जोडणाऱ्या बायका, हाताने दिवे बनवणारे तरुण.

एका भिंतीपाशी गणेश थांबला. पाच-सहा मुलं भिंतीवर पतंगाचं चित्र रंगवत होती, आणि पांढऱ्या शर्टावर जॅकेट घातलेला एक उंच पुरूष त्यांच्या मध्ये उभा होता.

आर्याच्या पायाखालची जमीन सरकली.

“समीर…” तिच्या तोंडून नाव निघालं.

कॉलेजच्या दिवसांतील तिचा जवळचा मित्र… तिचं प्रेम… आणि आज सगळ्यांच्या तोंडी ‘दादा’.

कॉलेजच्या वेळी समीरला बदल घडवायचा होता – समाजात, लोकांच्या जीवनात. आर्याला वाटायचं, स्वप्नं वेगळी असली तरी पोटासाठी सुरक्षित भविष्य महत्त्वाचं.

त्यांच्यात चर्चा, वाद वाढले… शेवटी आर्याने त्याला प्रश्न केला –

“समीर, तू समाजसेवा की मी – एक निवड.”

समीरने समाजसेवा निवडली. आर्याने ठरवलं – स्वतःला सिद्ध करायचं, पुढे जायचं. आणि त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.

आज समीर तिच्यासमोर उभा होता. तोच आत्मविश्वास, तीच मिश्कील नजर. फक्त आज त्याच्या आसपास एक नवं जग होतं, लोकांमध्ये बदल घडवलेलं.

पाऊस वाढला. ती दोघं एका जुन्या वाड्याच्या ओट्यावर उभी राहिली. आतून आवाज येत होता बोलण्याचा. बायका काम करत होत्या, मुलं हसत खेळत होती.

अचानक आर्याचा ड्रायव्हर फोनवर घाईघाईने म्हणाला – पोलिसांनी गाडी उचलली आहे. आर्याला वाईट वाटले खरे पण शेवटी काय? 

समीर तिला म्हणाला,

“चल, मी सोडतो तुला. पण रिक्षेनं जावं लागेल.”

रिक्षेतल्या क्षणांमध्ये जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या. आर्याला वाटलं, त्या वेळी मी कदाचित चुकीचं वागले.

घरी पोहोचल्यावर समीरने खिशातून एक फोटो काढला. कॉलेजच्या दिवसांचा, दोघं एकत्र उभा असलेला. 

“पैसा कमी आहे, पण आठवणी भरपूर आहेत,” तो हसत म्हणाला.

बाल्कनीतून बाबांचा आवाज आला,

“अरे वा! तुम्ही एकत्र?”

समीर हसला,

“माझं पूर्ण नाव आहे  समीर संदीप देशमुख… तुमच्या बाबांसोबत चेस खेळायला मी अधूनमधून येतो.”

आर्याला कळेना हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही…

गेटवर निरोप घेताना आर्या म्हणाली,

“समीर, सॉरी… तुझी स्वप्नं मला तेव्हा समजले नाही. पण आज मला तुझा अभिमान आहे.”

तो शांतपणे म्हणाला,

“आर्या, मला तर नेहमीच तुझा अभिमान होता.”

त्या संध्याकाळी दोघांच्या मनात एकच विचार होता. आर्या शिवाय त्याने कधीच दुसरा विचार केला नाही आणि म्हणूनच त्याने कामात स्वतःला गुंतवून घेतले होते. इकडे आर्या पैसे कमावण्याच्या नादात त्याला विसरण्याचा जरी प्रयत्न करत होती तरी तिलाही ते शक्य झाले नव्हते म्हणूनच कदाचित, त्यांच्या वेगळ्या झालेल्या वाटा पुन्हा एकत्र यायला सुरुवात झाली होती…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!