तेजूला गेट टुगेदरला भेटून पंधरा दिवस झाले. पण मला तर खूप दिवस झाले असे वाटत होत. माझ्या बालपणीची मैत्रिण. शाळेनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोच नव्हतो, माझा लहानपणीचा आणि कॉलेज जीवनातला तडफदारपणा आता जणू हरवला असेल तिला जाणवल्यास तिनं मला नमूद केलं होतं. महिन्यापूर्वी यांनी आजारी पडले आणि आठ दिवसापूर्वी डॉक्टरांनी आता देवावर भरोसा ठेवा म्हणून सांगितले आणि शेवटी व्हायचं तेच झालं. खरंतर मला जगाचं कधी देणं घेणं नव्हतं. नव्हे तसे आताही नव्हतंच पण व्यवहारी जगात दोन चिमणी पाखरं घेवून जगणं, तसं सोपं नव्हतं. जगाच्या दृष्टीने माझं काहीच अवघड नव्हतं. त्याच्या मागं सारं माझं अन् लेकरांचंच होतं पण तरीही. त्याच्या असण्याने माझ्या जीवनात सप्तरंग होते तर त्यांच्या नसण्याने सारंच बेरंग होतं. त्यांच्यासह आणि त्याच्याशिवाय यातला फरक माझ्याशिवाय कोणीच जाणून शकत नाही.
माझी अवस्था अशी झाली याला जेवढी पुढची व्यक्ती आहे तेवढीच मी पण जबाबदार आहेच की. परवा परवा पर्यंत मी माझ्या राजाची राणी होते. प्रियकराची प्रियतमा, पतीची पत्नी, सहचारिणी, अर्धांगिनी होते, पण आता तो गेल्यावर माझ्या आयुष्याची गोळाबेरीज केल्यावर वजाबाकी शून्य होती. आठ वर्षांपूर्वी आम्ही दोघं एकमेकांसाठी अनभिज्ञ होतो. या अजाणतेपणातच लग्न जमले अन् स्वप्नांच्या राज्यात मला माझा जोडीदार सोनेरी स्वप्न दाखवण्यासाठी, सुगंधित वातावरणात गंधाळण्यासाठी घेवून गेला. मला माझ्या साहिल बरोबरचा प्रत्येक क्षण आजही आठवतो. टिपकागदाने टिपून घ्यावे असे हे क्षण माझ्या मनाने टिपले होते. मी आणि साहिल या पलीकडेही काही जग असतं हे मी विसरुनच गेले होते. सुख, सुख म्हणजे काय असतं? याची प्रचिती मला येत होती.
सध्या माझ्या सुखाचा पेला ओसंडून वाहत होता. त्याच्या फोनने दिवसाची सुरुवात आणि शेवटही होत असे. अवघ्या दोन महिन्यांनी लग्न होते. पण या दोन महिन्यातले असंख्य क्षण मी माझ्या मनाच्या कुपीत शिंपल्याप्रमाणे जपले होते. एकमेकांच्या आवडी निवडी जाणत आणि जपत जपत मी आणि तो म्हणजे जणू एका मनाची दोन शरीरे झाले होतो.
साहिलचे सोन्याचे दुकान होते. दुकान चांगलेच तेजीत होते, मला तर जर आम्ही प्रत्यक्ष भेटलो तर हमखास एक ना एक अनोखा असा दागिना मिळत असे. तसं दागिने मला आवडतातच. पण माझं मन बुद्धी व्यवहारात अडकत नाही, किती ग्रॅमचा दागिना आहे. किती मंजूरी, किती जीएसटी असल्या भानगडीत मी कधी पडले नाही. आता तर मी सोन्याच्या दुकानाची मालकिन होते. आमचं दुकान मी पाहिलेलं होतंच. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते नव्हे मी भाग्यवानच होते, कारण माझ्या दृष्टीने माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागतं काय? तीन गोष्टींची आवश्यकता माणसाचे आयुष्य यशस्वी ठरवतात. रोटी, कपडा और मकान.
माझ्याकडे माहेरी आणि सासरी या तीन गोष्टींची अजिबातच कमतरता नव्हती, माहेरी बाबांची शेती होती. पण ती अशी तशी नाही तर चांगली वीस एकर बागाईत अन् सासरी साहिलकडे एक चौथी गोष्ट भरपूर होती. ती म्हणजे अमाप पैसा. ‘रोटी, कपडा, मकान और ‘ढेर सारा पैसा.’ मी तर माझ्या मनोराज्यात पंख लावून उडत होते. मी फक्त नावाची राणी नाही तर स्वतःला खरोखरची राणी समजत होते. लग्नाच्या आधीच्या दोन महिन्यात दिवसातले सहा-सात तास तरी आम्ही फोनवर असू. खरंच क्षण क्षण माझ्यासाठी अनमोल होता.
लग्न होवून मी साहिलच्या घरात धन-धान्याच्या राशीसहित प्रवेश केला. त्यांच्या घरातली माणसे, रिती-रिवाज हे सारं सारं समजून घेतलं. मी चांगली या साऱ्या गोष्टीत तरबेज झाले. साहिल आणि मी जेवढा वेळ तो दुकानावर जाई तेवढाच वेळ दूर असू नाहीतर घरात आम्ही आसपास वावरत असू. माझ्या विश्वात फक्त तो आणि तोच होता, त्याने विश्व व्यापलं होतं. संसारात आम्ही दोन चिमण्यांचे आई बाबा झालो. भरपूर फिरणे, मौजमजा यात दिवस भुरकन उडून जात होते. मला यानंतर मात्र थोडी जबाबदारीची जाणीव होवू लागली. आपल्या समर आणि रिमासाठी आपण बचत करून ठेवायला हवी असा विचार मी त्याच्या समोर मांडल्यावर तो हसला,
‘अगं वेडाबाई, हे सार त्यांचंच तर आहे ना! मग वेगळे काय ते करायचं.’
‘मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण असफल झाले. मी आजतागायत कधीच त्यांच्या व्यापारात लक्ष घातलं नाही आणि त्यांनीही घालू दिलं नाही. तू फक्त आमच्या तिघांची काळजी घेत जा बास. खरं पण खरा घात इथेच झाला. पहाता पहाता साहिल घराकडे दुर्लक्ष करू लागला. जेवणावरही त्याचे लक्ष लागेना. काही विचारलं तू
‘तू आरामात रहा उगाच ताण घेवू नको. मी आहे ना!’
हे वाक्य म्हणत असे. खरंतर त्याला व्यापारात कुणातरी फसवल होते. त्यांमुळे तो वरचेवर आजारी पडू लागला. त्याला घरामध्ये आई- वडील किंवा छोट्या भावासोबत बोलावं असंही का वाटलं नाही काय माहित? अशातच छोट्या दिराला कंपनीत नोकरी लागली आणि तो शहरात राहायला गेला. तिथे पोटापाण्याची अब्दा होते म्हणल्याने सासू-सासरे त्याच्याकडे राहायला गेले.
घरात मी, समर, रिमा आणि यांनीच होतो. मी व्यवहारात तशी पहिल्यापासूनच कच्ची. कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी केला तर पुढच्यांनी कधी ते महत्त्वाचं असतं हे जाणलं नाही. साहिल मनातल्या मनात कुढत होता. खाण्यापिण्यावरच काय पण बोलण्यावरही त्याचे लक्ष नसायचे. एके दिवशी छातीत दुखतंय एवढंच कारण झालं आणि होत्याचं नव्हतं झालं. माझं आभाळ फाटलं होतं. आम्ही कधी एकमेकांपासून लांब जावू असा स्वप्नातही मी विचार केला नव्हता. तसं त्यांनी आमच्यासाठी बरच काही केलं पण पण आता त्याच्याशिवाय जगायचं माझ्या जीवावर आले होते. दोन चिमण्या पाखरांसाठी आयुष्य जगायचं होतं पण व्यवहाराची गणितं आता मला लक्षात घ्यावीच लागणार होती. आजपर्यंत मी सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते पण आता तसं चालणार नव्हते. कारण माझी आणि माझ्या चिमण्या पाखरांची वाताहत होणार नाही याची काळजी मीच तर घ्यावी लागणार होती.