पर्याय

मला आवरून बाहेर निघालेली पाहून वंदनाताई म्हणजे माझ्या सासूबाई जरा नाराज झाल्या.
‘काय या आजकालच्या मुली, शरद जावून दोनच महिने झाले आणि लागली उधळायला. नौकरी करणं एवढं महत्त्वाचे आहे का?’
असेच काहीसे भाव त्यांच्या नजरेतून व्यक्त होत होते. त्यांना पेन्शन मिळत होतीच. शरद गेल्यानंतर त्यांची पेन्शन हाच आधार होता साऱ्या कुटूंबाला. वंदनाताईंची दोन मुलं, शरद आणि रिता. रिता दिल्या घरी आनंदी होती. शरदचा म्हणजे आमचा संसार ही बहरला होता. आम्हाला दोन मुलं पण कारचा अपघात झाला आणि सारं सारं काही बदललं. एवढे दिवस शरद तिला नौकरी करू देत नाही म्हणून मी निवांत घरात राहिले. पण आज मला घराबाहेर पडण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता..

मला आठवतंय या घरात येवून सहा वर्षं झाली. शरदने त्याच्या आश्वासक नजरेने आणि विश्वासपूर्ण स्पर्शाने माझं त्याच्या जीवनात स्वागत केले. त्याला मी नौकरी करणं आवडत नव्हतं. त्याच्या मते मी स्वत:साठी जगलं पाहिजे. याचा अर्थ घराकडे दुर्लक्ष करावं असा नव्हता. त्याने मला छंद जोपासायला शिकवले. फक्त पैशासाठी जगण्याऐवजी आपल्यासाठी पैसा कसा वापरायचा हे शिकवलं. मी सासरी आल्यापासून माझे आवडते आणि कधीही पूर्ण न झालेले छंद जोपासू लागले. गाणं म्हणणं माझा आवडता छंद. त्यासाठी लागणारं शिक्षणही शरदनेच मला दिलं. माझ्या चार परिक्षा झाल्या. आणखी पुढं चालूच होतं. तसं तर माणूस हा आयुष्यभर विदयार्थी असतोच. कोणतंही ज्ञान हे पूर्ण नसतंच, कितीही ज्ञानार्जन केलं तरी अपूर्णच वाटतं, मी मात्र शरदच्या साथीने गाण्यात आपलं मन रमवत होते. तसा सासूबाईचा या गोष्टींना पाठिंबा नव्हता. पण शरदच्या पुढे त्या काही बोलत नसत. पण शरद नसला की मात्र आठवण करून देत. अगदी मग अमक्याची सून एवढं कमावते, तमक्याची सून अशी राहते. बरंच काही बोलूनही मी जास्त वाद न घालता शांत राहणंच पसंत करे. त्यामुळेच आमच्या घरात वातावरण चांगलं होतं. वातावरण जर ढवळलं तर अशांतीला आमंत्रण. त्यापेक्षा शांतता बरी. माझ्या गाण्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मी पुढं काही तरी करणारच होते. पण पहिलं पूर्ण शिक्षण घेणं महत्वाचं आहे, असं मला वाटत होते. आमच्या संगीत क्लास मधील विदयार्थ्यांचे गाण्याचे कार्यक्रम होत. ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचेही स्वतःचे असे वेगळे छोटे छोटे संगीत वर्ग सुरु होते पण या संगीत साधनेत आयुष्य खर्ची घातले तरी कमीच असते, हे मात्र सत्य. आता माझा रियाज सुरु झाला. मी सर्व अंगाने गाण्याचा अभ्यास करत होते. बारीक सारीक गोष्टी समजून घेवून अंगिकारत होते. शरद ऑफिसवरुन दमून आला की माझे रियाज करतानाचे स्वर मनापासून ऐकत असे. एकूणच संगीत आणि संसार दोन्हीही व्यवस्थित चालले होते. माझ्या मनचक्षूपुढे आगामी स्वप्नं तरळत होते. एके दिवशी मुलं आणि शरद माझ्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मुलांना घरात सासूबाईंजवळ ठेवले होते. कार्यक्रम संपवून आम्ही घराकडे येत असताना ओव्हरटेक करून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवायच्या नादात शरदला गंभीर दुखापत झाली. मला थोडं खरचटलं होतं. अवघ्या दोन तीन तासात तो काहीही न बोलता दूर दूर गेला. मला ही दुःखाची ढगफुटी कुठे वाहवत नेणार होती. ते काही सांगता येणार नव्हतं. माझ्या पुढची आयुष्याची गणितं आणि त्या सोडवण्याच्या पध्दती बदलत गेल्या. आयुष्य म्हणजे काय? कर्तव्य म्हणजे काय ? जबाबदारी म्हणजे काय? अर्थाजन का करायचे? चिमुकल्यांचे भविष्य कसे घडवायचे? अशा असंख्य प्रश्नांचे ढग मनात भरून होते पण… सासूबाई म्हणतंही,
‘तुला संसारासाठी बरंच काही लागेल. मी काय पिकलेले पान. कधी गळेल सांगता येत नाही.’


खरंच होतं ते. सासरे गेल्यावर त्यांनीच तर संसाराची कर्तव्य पूर्ण केली. माझ्यापुढे मात्र प्रश्न होता, कसे व काय करायचे. संगीत शिक्षण पूर्ण करायचे शक्य नाही मग अर्थाजनासाठी काय करायचे. स्वतःसाठी आयुष्य जगणं आणि इतरांसाठी जगणं यात खूप फरक असतो, माझी मनाची अवस्था वाईट झाली होती. शिक्षण सोडले तरी सासूबाईंच्या पेन्शनवर सोय होणार नाही. आपल्या लेकराच्या भविष्यासाठी मी आता बाहेर पडणार होते, बाबा गेला तरी आई आहेच ना त्यांची. मीच आई-बाबा दोन्ही भूमिका पेलवणार होते. यासाठी तर मी माझ्या संगीताच्या गुरुंकडे जावून त्यांचा सल्ला घेतला. हे शिक्षण पूर्ण करतच दुसरंही काही करता येईल का? विचारून त्यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून जाणार होते. घरातही मी सगळी कामे घरीच करत होते. मी ड्रेस डिझायनिंगच्या कोर्सला एडमिशन घेतले. संगीत आणि ड्रेस डिझायनिंग हे छंद होतेच. फक्त दुसरा छंद मी जोपासला नव्हता. तो गरज म्हणून तरी मला जोपासावा लागणार होता.

मी माझ्या अर्थाजनातून घर चालेल एवढी तरतूद करणं आवश्यक होते आणि तीच धडपड मी करत होते. पण हळूहळू मी व्यावसायिक होवू लागले होते. जीवनाच्या या रहाटगाड्यात शरदची आठवण आली की पुन्हा मी छंद जोपासण्याकरता धडपडे. मला जे काही करायचे त्यात सासूबाईंची साथ असणं खूप महत्वाचं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा आधार झाली तरच तीला यश प्राप्त होणार पण त्यांचा अट्टाहास होता तू गाणं सोड.
‘तुझी नौकरी आणि माझी पेन्शन यावर घर चालव.’ पण ते शक्य नव्हतं. शरदचं स्वप्न होतं की मी गावं.

सासूबाईंच्या मते ‘स्वप्नातल्या घरात काही क्षण रेंगाळता येतं पण कायमचं राहता येत नसतं.’

म्हणून तर स्थितीला सामोरं जाण्यासाठी मी आता फॅशन डिझाइनिंगच्या जागेसाठी नोकरी करायचा पर्याय शोधला होता.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!