तोडगा
मला अलिकडे उदास वाटत होते. नोकरी असेपर्यंत घर, शाळा, पाहुणे- राऊळे, कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य. या सर्व गोष्टींमधून स्वतःचे छंद आवडीनिवडी जपायच्या असतात हेच विसरून गेले होते मी. सध्या दोन मुलं आपापल्या नोकरीच्या ठिकाणी महानगरांमध्ये होती. मला त्यांच्याकडे गेलं की अवघडलेपण जाणवत होते तर त्यांना माझ्याकडं तालुक्याच्या ठिकाणी येणं आवडत नव्हते. दोन्हीकडे अवस्था अशी झाली होती.
‘धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय.’
करावं काय तेच मला समजत नव्हते. साथीदार नसल्याने एकटेपणा जाणवत होता. पण मग काय करावे ते सूचतही नव्हते. तोडगा तर काढायलाच हवा. पण तो कसा…
मला एवढा एकटेपणा वाटेल याची यत्किंचितही कल्पना माझ्या मनात कधी आलीही नव्हती. वयाच्या पन्नासाव्या वर्षी साथीदाराने साथ अर्ध्यावर सोडली. पण आपलं ते संचित असावं असं मनाला समजून सांगत फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा आत्माविश्वासाने वावरू लागले. तसं पाहता माझी नोकरी असल्याने आर्थिक विवंचना नव्हतीच. यांचा व्यापार तसा बऱ्यापैकी चालत होता. पण त्यांच्या माघारी मी नौकरी, घर, दोन मुलांची जबाबदारी पेलवत होते. हेच माझ्यासाठी खूप मोठे होते. खरंतर मुलांना वाढवत असताना, त्यांच्या आयुष्याचे महत्वपूर्ण निर्णय घेताना मी एकटी घेत होते. निर्णय चुकू नये म्हणून विचारपूर्वक कृती करत होते. मुलंही मला साथ देत होती. पहाता पहाता एक राजधानीच्या ठिकाणी तर दुसरा महाराष्ट्राच्या राजधानीत स्थिरावला. मला मात्र पंढरपूरलाच करमत होते. विठू-रखुमाईच्या पावन नगरीत जन्म घेणं म्हणजे महाभाग्य. त्याचे दर्शन म्हणजे जणू त्या रुपात आपल्या आई-वडिलांचे दर्शनच घेणं होय. मला मुलांच्या घरी गेल्यावर जास्त दिवस करमत नसे. एक त्यांच्या नोकरीचा काळ वेळ जगावेगळा. वर कहर म्हणजे नात-नातू यांना क्लासच्या जंजाळात यांनी चांगले जखडलेलं. करावं तरी काय? यांच्या घरात प्रत्येक कामाला माणसे. घरात स्वच्छता तर एवढी की घरात घातलेल्या पांढऱ्या शुभ्र फरशीत तोंड सुद्धा दिसे. मग प्रश्न पडेच, काम नक्की काय करायचं, आणि वेळ कशात घालवायचा. एक दिवशी मी पंढरपूरला असतानाच माझी शालेय मैत्रिण ज्योती महाशब्दे भेटली, अन् मला कोण आनंद झाला. म्हणून सांगू एवढ्या दिवसानंतर ती भेटली. खरं तर मला तिच्या सोबत जुन्या दिवसांच्या गप्पा मारल्यावर स्वर्गसुख तर वाटलेच पण मनमोकळे करायचे हक्काची जागा सापडली. ज्योतीचा नवरा एक वर्षापूर्वीच वारला होता, असे तिने सांगितल्यावर कळले. कारण तिच्या चेहऱ्यावर तेज अगदी पहिल्यासारखंच दिसत होते. मी तिला विचारलंच. तू एवढी आनंदी, समाधानी टवटवीत दिसतेस. याचं रहस्य नक्की काय? ते मला कळलं पाहिजे. यावर तिचं उत्तर मला प्रेरणा देणारं ठरलं. तीने तिच्या शालेय वयात राहून गेलेल्या छंदांची यादी प्रथम सांगितली. त्यानंतर यामधले कोणते छंद आपण सध्याही पूर्ण करू शकतो, असे छंद निवडल्याचं सांगितले. मग सुरु झाले खऱ्या अर्थाने आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास न होता कोणते छंद आपण जोपासू शकू यांचे गणित. त्यातला पहिला छंद म्हणजे मित्र-मैत्रिणींशी जवळीकता साधणे. त्यांच्या अडीअडचणी सोडवणे. अहो, महाआश्चर्यम, तिला हिंदी चित्रपटातील,
‘दुनिया में कितना गम है। मेरा गम कितना कम है।‘ या गाण्याची प्रचिती आली. प्रचिती दुःखाची आली पण उपाय काय हे उत्तर सापडले. मी ही शेवटी ज्योतीलाच माझ्या छंदाबद्दल सांगून कोणता छंद जोपासावा ते विचारून घेतलं. तिने मला माझा सुगरणपणा हा आवडता छंद जोपासायला सांगितला तो म्हणजे पदार्थ करणे. माझ्या हातचे पदार्थ माझ्या पिढीतल्या सर्वानाच खूप आवडत. माझ्या पिढीत म्हणायचे कारण आजकाल ही लेकरं काहाही अरबट चरबट खावून प्रकृती बिघडवून घेतात. मग भले दवाखाना मागं लागला तरी चालेल. पण आजकाल आम्ही हेच खातो आणि खाणार. काही म्हणलं तर म्हणतील,
‘तुम्ही भाग्यवान, तुम्ही सगळं पौष्टीक खाल्लंत. आम्ही सगळं हायब्रिड खातो. खाण्याच्या अन्नपदार्थामध्ये कसच नाही. तुम्ही पद्धत म्हणून दुधात थेंबभर घातलेल्या पाण्याचा आस्वाद घेतला. आम्ही पाण्याच्या दुधात दुधाचा आस्वाद शोधतो.’
मी मात्र या सुगरणपणाच्या छंदामुळे चांगलीच व्यस्त झाले. माझ्या तालुक्याच्या गावी मी ‘सुगरण’ नावाचा कार्यक्रम स्थानिक चॅनलवर चालवू लागले. घरात येणाऱ्याला त्याबाबत सल्ला देवू लागले. आजकाल घरातल्या मोठ्या व्यक्तिंना विचारून पदार्थ करणार नाहीत पण दुसऱ्याला विचारुन करतील. माझा ‘सुगरण’ कार्यक्रम जोरात चालू लागला. मला त्यातून थोडाफार येणारा पैसा, मी माझ्या गरजू मित्र- मैत्रीणींच्या दवाखान्यासाठी, दैनिक निकडीच्या गरजांसाठी वापरला. मला आता खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा झाल्याचं समाधान आणि आत्मानंद मिळत होता. खरंच ज्योतीने माझं आणि माझ्यासोबत माझ्या मित्र- मैत्रीणींचं आयुष्य बदलवून टाकलं. ती म्हणतेच’,
‘गेलं किती? होतं किती? याचं दुःख करत बसण्यापेक्षा, आहे किती? अन् काय? याला महत्त्व द्यावे.’
तिने आयुष्यात पैसा कमावला आणि सोबत माणसेही कमावली. ती सल्ला देण्याचं काम करत होती. त्यातून सामाजिक अनुबंध तयार झालाच पण तिला आर्थिक कमाईपण झाली. सर्वात महत्वाचे वेळ कसा घालवू ? काय करू ? हा प्रश्नच सुटला. हे जास्त महत्वाचं नाही का? मी ही आता आमच्या वयाच्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी घेवून त्यांच्या आयुष्यात आलेली मरगळ झटकून टाकणार आहे. बऱ्याच वेळा प्रयत्नाने अनेक प्रश्नांचा गुंता सुटतो. फक्त तो कसा सोडवायचा ते कळलं पाहिजे. यासाठीच मी ज्योतीसह प्रयत्न करणार आहे. तिने माझं आयुष्य उजळवून टाकलं तसा प्रयत्न मी ही करणार आहे. शेवटी प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढणं महत्वाचं.