अस्तित्व
काल सकाळपासून सारखं गरगरल्यासारखंच वाटत होतं. दररोज पहाटे साडेचार-पाचला उठणारी मी, आज साडे सहा वाजले तरी अंथरुणातून हलले नव्हते. नवीनला त्याच्या मोबाईलवर गजर झाल्याने जाग आली. तो उठल्यानंतर त्याला मी उठले नाही याचे प्रथम आश्चर्य वाटले. पण कदाचित रात्री लवकर झोप लागली नसेल म्हणून… थोडावेळ ऑफिसचं काम करु असा विचार करत त्याने काम सुरू केले. त्या कामात त्याचा बराच वेळ गेला. काम थोडं राहिलं होतं पण सहज त्याने घडयाळाकडे पाहिले आणि तो उडालाच. सात वाजले होते. राजूची व्हॅन साडे सात पर्यंत येईल. त्याला उठवून तयार करायला तर हवेच पण सोबत त्याचा डबा होणंही तितकच महत्वाचं. आज त्याच्याही ऑफिसमध्ये महत्वाच्या विषयावर मिटिंग असल्यामुळे तोही आठ-सव्वाआठला घरातून निघणार होता. नवीनच्या आई-बाबांचा नाष्टाही आठ-साडेआठला होई. त्याने झटकन मला जोरजोरात हलवत उठवले आणि तो लॅपटॉपवर ऑफिसचे काम करायला बसला. मी कशीबशी धडपडत उठले आणि राजूला उठवले. तो दररोज उठण्यापासून ते व्हॅनमध्ये बसून शाळेला जाईपर्यंत त्रास देतच असे. एवढयात सासूबाईंचा आवाज माझ्या कानी पडलाच.
‘आज स्वयंपाक घर अजूनही थंडच कसे काय? मालकिण बाईंनी संप पुकारला की काय?’
राजूही उशिर झाला शाळेला, बाई रागावतात म्हणून चिडचिड करू लागला. मला आता किती पळू आणि किती नको असं झाले होतं. पण त्यापूर्वी आपल्याला कुणीतरी मायेनं कपाळावर हात फिरवत, गरमागरम चहाचा वाफाळता कप आयता दिला तर…
‘शरयू, काय होतंय तुला. त्रास होतोय का?’ असं विचारलं तर ताप कमी नाही होणार पण मानसिक बळ मिळून कामाचा उत्साह वाढेल.
गेल्या चार दिवसापासून जरा अंग दुखतच होते. कालपासून अंगावर काटे उभारत होते मध्येच शहारल्यासारखे वाटत होते. मी घरात सांगावं असा विचार केला पण सांगून तरी उपयोग काय? शेवटी काम हे मलाच करावे लागणार होते. मी मनानेच मेडिकलमधून तापावरची गोळी घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच, कारण पुन्हा आज सकाळी उठल्यावर पुन्हा अंगात ताप असल्यासारखे वाटत होते. कणकणी जाणवत होती. मी तसे नवीनला सांगितलं. पण त्याने ऐकून अगदी सहजतेने घेतलं. अगं असं निवांत रहाण्यापेक्षा तू कालच दवाखान्यात दाखवायचं नाही का? म्हणून तर ओरडलाच पण सोबत आता या सगळ्यांच्या जेवणाचं काय? म्हणूनही नाराज झाला. राजूही कावळ्यासारखी अंघोळ उरकून आला. आज माझ्या शाळेत मेथीचे पराठे आणायला सांगितले म्हणून हट्ट धरून बसला. तसं तर ही गोष्ट त्याने कालच सांगायला हवी होती. मला ताप असल्याने मी त्याच्या अभ्यासाची, उपक्रमाची चौकशी केली नाही. तसं तर मला त्याच्या शाळेत पालक मिटिंगसाठी जायचंच होतं पण ही मिटिंग शाळा सुटल्यानंतर अर्ध्या तासाने होती. म्हणून तर मुलांची शाळा एक-दीडतास आधीच सुटणार होती. पण डबा झाला नाही म्हणजे जेवणाच्या सुट्टीपूर्वी मलाच डबा दयायला जावे लागणार होतं. मी कसंबस माझं उरकलं आणि झटपट स्वयंपाक सुरु केला. आज कामाशी गाठ घालणं महत्वाचंच होतं. नाष्टा आणि सागर संगीत स्वयंपाक करायला वेळच नव्हता. जेवणाचे केलेले पदार्थ पाहून सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला अवघडल्यासारखं झालं. त्यांची नजर जणू मला भेदून आरपार जाईल असं वाटत होतं. तरीही त्या बडबडल्याच
‘आमच्या वेळी असे नव्हते बाई, आजकालच्या पोरींना त्रास म्हणून नको. सगळं हाताशी आहे यांच्या. तरीही कामात उरक म्हणून नाही, सगळ्या कामाला हाताशी यंत्र असून सुद्धा कशानी दुखणं येतं कुणाला माहित.’
खरंतर मला काय झालं आहे. हे कुणीही जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. कमीत कमी अंगाला हात लावून ताप आलाय का? किंवा काय होतंय म्हणून चौकशी तरी करावी, एवढी साधी अपेक्षा माझी. मी सगळ्यांसाठी जमेल आणि शक्य असेल तितकं करत रहाते. सासू-सासऱ्यांची आजारपणं, येणारे जाणारे, पै पाहुणे आणि लेकराच आजारपण, वेगवेगळे क्लास एवढं सारं पाहायचं म्हणजे खूपच काम. पण तसं घरातल्यांना वाटतच नव्हते. यांची आत्येबहीण कंपनीत नोकरीला आहे. काय तिचा थाट पहायचा. धुणं, भांडी, फरशी, चपात्या सर्व कामासाठी बाई होती. काही म्हणलं तर… बरोबरच आहे तिचं. ती पगार मिळवते ना! मग तिला कामाला बाई ठेवावीच लागणार. बिचारी किती धावपळ करते. घरामध्ये येणारी जाणारी माणसं ही तिच्याकडे जास्त वेळ थांबत नसत. थांबली तरी आपला तिला त्रास होवू नये याची काळजी घेत. तिच्या कामात मदत करत. तिचं भरभरुन कौतुक करत. आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती. काय काम असतं घरात बसून? दीड-दोन तासात सर्वकाम उरकले की झालं. दिवसभर आरामच आराम. पण घरात बसून जी काम करते त्याचा मोल भाव केला तर? आज मीही ठरवलंच. खूप काही नाही. पण मीही स्वतःसाठी जगणार आहे. या महिन्यापासून घरात बसून गृहोदयोग करणार पण त्यापूर्वी कुणी जरी नाही विचारले तरी स्वतःसाठी दवाखान्यात जाऊन येणार. पुर्ण आराम करणार. आज संध्याकाळ आणि उद्या सकाळपर्यंत स्वयंपाक घर बंद अशी घोषणा करणार. घरात बसणारी असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी असो. शेवटी ती गृहिणीच असते. बाहेर पडणारी स्त्री काही मदत न स्वीकारता काम करतेही पण त्यामुळे ती थकून जाते. उलट घरात असणारी स्त्री सर्व कामं मीच करणार या अट्टाहासाने ती थकून जाते. शेवटी काय? कुठेतरी स्व अस्तित्वाची जाणीव महत्वाची. आपलं मुल्य आपणच ठेवायला हवं ना! सर्व क्षेत्र व्यापणाऱ्या स्त्रीला पाठिंबा देणारी प्रथम स्त्रीच असते.