संचित

शारदा केव्हाची वाट पाहात होती. कोणीतरी येईल अन् तिला खुर्चीतून उठण्यास मदत करेल. माणसांनी गच्च भरलेलं घर. नवरा, सासू-सासरे, दोन मुलं, जाऊ-दीर, त्यांची मुलं आणि आजे सासूबाई. बघता बघता तिची स्वतःची मुलं केव्हा मोठी झाली ते तिला कळलंच नाही. मुलं लहान होती तेव्हा नोकरी करायची नाही, असं नवऱ्याचं म्हणणं होतं. ते तिनं मान्यही केलं. छोटा सोहम दोन वर्षांचा तर मोठा सुरज तीन वर्षांचा झाला होता. संसाराचं गणित मुलं झाल्यावर पूर्ण होतं, असं सासूबाईंचं म्हणणं असलं तरी तिला मात्र नोकरी केल्यावर हे गणित पूर्ण होतं, असे वाटत होते. त्यासाठी तिने संसाराचा रथ खूप परिश्रमपूर्वक हाकण्यास सुरुवात केली. घरात ती थोरली सून होती. सासूबाई धाकट्या सुनेला कर्तव्याच्या बाबतीत जास्त जमेत धरत नव्हत्या. पण शारदाला मात्र वर्षातील सर्व सण, उत्सव, वाढदिवस, नणंदेचं माहेरपण, तिच्या बाबतीतली कर्तव्यं या साऱ्यांच्या बाबतीत नेहमी कर्तव्यदक्ष राहावे लागत होते. लग्नाला सात वर्ष झाली होती. या घरात येताना उंबरठ्यावर ओलांडून आलेलं धान्याच्या मापानं काही वेगळीच किमया दाखवली होती पाटलांच्या घरात.

शारदाचा नवरा शेती करत होता. छोटा दीर इंजिनिअर होता. सासरे पूर्वी शेती करत होते. पण वय झाल्यामुळे तेही सध्या निवांत होते. शेती बागायत आणि स्वतः लक्षपूर्वक करत असल्यामुळे उत्पन्न चांगले होते. पाटलांच्या वाड्यात नोकर-चाकरांचा शेतीसाठी राबता चागंला होता. ती विचार करता करता भूतकाळात रमली. शारदाने जीवनात वेगळी वाट हाताळली होती. शारदाचे वडील शिक्षक तर आई गृहिणी. दोन भाऊ होते. दोघेही नोकरीसाठी पुण्याला राहात होते. आईवडिलांना सुटीसाठी पुण्याला बोलावत. नोकरीतून रिटायर झालं की, पुण्याला आमच्याकडे येऊन राहायचं म्हणून बजावत होते. शारदानेही डी. एड्. कले होते. लग्नापूर्वी नोकरी करायची अशी तिची इच्छा होती. पण डी. एड्. होण्यापूर्वीच रोहित पाटलांचं स्थळ आलं आणि बाबांनी तिचे दोनाचे चार हात केले. दोन भावात एक बहीण. त्यामुळे चांगलीच लाडावलेली. शारदा सासरी मात्र पाटलांच्या घरंदाज घराण्यातली थोरली सून होती. रोहित पाटलांची गृहलक्ष्मी ही फक्त दिसायलाच नाही तर बुद्धीने खूप हुशार आहे, याची प्रचिती तिने शेतकरी नवरा निवडून करून दिलीच होती. सासरच्या कुटुंबात जरी ती वाढली होती तरीही तिने सासरच्या कर्तव्याची जबाबदारी मनापासून स्वीकारली होती. लग्नाच्या पहिल्या वर्षात माहेरी येती-जाती करत करत तिने हळूहळू सर्व सणांची व्यवस्थित माहिती करून घेतली. वडील नोकरी करीत असल्याने शेत किंवा त्यासंबंधी कुठल्याच गोष्टींची माहिती तिला नव्हती. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात जास्तीत जास्त पावसावर आधारित शेती केली जाते. नक्की जिराईत शेती कशाला म्हणतात, शेती आणि शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा मानले जातात, हे सारं पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात बरंच वेगळं असतं आणि शेती करणं हे सोपं नसतं, याची प्रचीती तिला अल्पावधीतच आली. शेतात मजूर असले तरीही हौसेनी ती अधूनमधून चक्कर मारत असे.

शेतात येणाऱ्या पिकांची माहिती ती करून घेत होती. शेत बागायती असल्याने डोळ्याचं पारणं फिटावं असंच काहीसं होतं. शारदा आवडीने शेतावर जात असे. घरातही जबाबदारीने सर्व पाहात असे, या सर्व गोष्टी सासूबाईंना मनापासून आवडत. कारण शारदाला पाहायला गेल्यावर तिचा चंद्रासारखा गोल चेहरा, टपोरे डोळे, कमानीसारख्या दोन भुवया, काळेभोर लांबसडक केस अन् हसताना गालावर पडणारी खळी पाहता, मुलगी प्रथमदर्शनी सर्वांनाच आवडली. परंतु तिचे शिक्षण पाहाता मुलगी शेतकरी स्थळास होकार देणार नाही व जरी होकार दिला तरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलू शकणार नाही, असं साऱ्यांनाच वाटलं होतं. पण शारदाच्या वडिलांनी शारदाची आई, भाऊ व शारदा यांच्याशी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेऊन चांगले सहा महिन्याने होकार कळविला होता. शारदाने पाटलाकडे नोकरी करण्याची परवानगीही प्रयत्नपूर्वक मिळविली होती.

बघता बघता दिवस गेले अन् पाटलांच्या अंगणाला चिमुकल्या पावलांचे डोहाळे लागले. अंगणात एकतरी बाळ चिमुकल्या पावलांनी छुम छुम करत, पैंजण वाजवत दुडूदुडू पळलं पाहिजे, असं घरातल्याच काय पण गावातल्या साऱ्यांनाच वाटू लागलं होतं. शारदा आता सुखावली. संसार आणि बाई याचं पूर्णत्व, मातृत्वसुखातच असतं, हे तिला जाणवलं. घरातील प्रत्येकजण तिची काळजी घेऊ लागला. पाटील घराण्याचा वंश वाढणार, यातच शारदाच्या सासऱ्यांना आनंद होता. मुलगा असो की मुलगी, त्याबद्दल कुणाच्याच अशा विशेष अपेक्षा नव्हत्या. शारदानेही प्रथम आई होण्याचा आनंद मनात जपला होता. तिचं मन आनंदान बहरले होते. वेळच्यावेळी सर्व काही चालले होते. सासूबाई प्रयत्नपूर्वक सूनबाईंना जपत होत्याच. बघता बघता बाळंतपणासाठी शारदा माहेरी आली. शारदाच्या आईला बाळंतपण म्हणजे एक मोठी जबाबदारी वाटत होती. माहेरी आल्यावर शारदा निवांत झाली. लग्न लागल्यापासून एखादं दुसरा दिवस सणाला येणे अन् घाई घाई परत जाणे, हा तिचा क्रम ठरलेला होता. आता मात्र ती दोन-तीन महिन्यासाठी आली होती. त्यामुळे तिला खूपच निवांत वाटत होते. सासरी मात्र सासूबाईंना हात मोडल्यासारखे झाले होते. बघता बघता मुलगा झाल्याची बातमी आली अन् आनंदाची लहर साऱ्यांनाच सुखावून गेली. प्रथम आई होण्याचा आनंद शारदा मनापासून जपत होती. तिला मनातून खूप समाधान वाटत होतं. सुरजचं बघायचं हे काम वाढल्याने सासरी आल्यापासून तिला कामासाठी दिवस पुरत नसे. घरातील जबाबदाऱ्या तर वाढतच होत्या. पाटलांचा वाडा जणू सूरजभोवती खेळत असे. सूरजची आत्या मात्र लांब राहात होती. तरी सुरजची आठवण आली की, वेळात वेळ काढून त्याला भेटून अन् माहेरपण अनुभवून जात होती. प्रत्येकजण त्याला बोलण्याचा, त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करे. तो झोपेल तेवढेच काय ते शांत. नाहीतर हसण्याच्या गोड आवाजाने वाडाही जणू सुखावून जात असे.

सूरज, सूरज आणि सूरज, याशिवाय प्रत्येकाला दुसरं काही सुचत नसे. सूरजचे बाबा तर शेतातलं एखादं काम पुढं मागं करत पण सूरजशी तासन् तास खेळत, गप्पा मारत. सारं काही छान चाललं होतं. शारदाने ही पण जबाबदारी आनंदाने मनापासून स्वीकारली. अशातच वृत्तपत्रातून शिक्षकांसाठीच्या परीक्षेची जाहिरात निघाली होती. शारदाच्या मनाची चलबिचल सुरू झाली. यावर सासूबाईंचं म्हणणं होतं, ‘सूरज थोडा मोठा होऊ दे. त्याच्या सोबतीला एखादी बहीण, भाऊ येऊ दे. मग पाहू नोकरीचं.’शारदा मनातून नाराज होत असे. सरकारी जागा पुन्हा निघतील का ? आपली परीक्षेची तयारी होईल का? एका मुलातच आपला एवढा वेळ जातो. मग आणखी एक कशाला? आणि असंच बरंच काही. शारदाने नवऱ्याला आपली इच्छा सांगितल्यावर त्यांनीही आईचं बरोबर असल्याचे सांगितले. तरीही तिने हळूहळू अभ्यासाला सुरुवात केली. सूरज दोन वर्षांचा झाला. अन् सूरजच्या बळी काकांचे लग्न ठरले. घरात पहिल्या लग्नापेक्षा जास्त धामधुम सुरू झाली. शारदालाही आता घरात एखादी मैत्रीण असावी, जी आपल्या सुखदुःखात, विचारात अन् कामातही सहभागी होईल असे वाटत होते. लग्नाची धावपळ सूरजला काही कळत नव्हती. पण त्याच्या बोबड्या बोलांना ऐकत ऐकत कामं पटापट चालली होती. थोरल्या सूनबाई म्हणून शारदाही काळजीपूर्वक सर्व पेलवत होतीच. नंदा वन्संना आहेरातलं हे शेवटचं मोठं कार्य म्हणून महिन्यासाठी आणलं होतं. भावाचं लग्न म्हणून ती पळत होतीच. नवरदेवाचं तर काय गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होता. नोकरीनिमित्त ते पुण्याला रहात होते. पण सध्या लग्नासाठी रजा घेऊन इकडेच आले होते. सर्व विधी व्यवस्थित पार पाडण्यासाठी खूप तयारी केली होती मुलगी सुशिक्षित आणि शहरातली होती. खेड्यात तिला जास्त राहावे लागणार नव्हते. सणासाठी पहिलं वर्ष माहेरी आणि नंतरचे सण सासरी. एवढंच काय तो खेड्याशी संबंध येणार होता. बाकी नवऱ्यासोबत तीही पुण्यातच राहाणार असंच ठरलं होतं. बळी काकाच्या लग्नासाठी पाटलांचा वाडा छान सजला. छोट्या सूनबाई येणार म्हणून सासू-सासरेही आतुरले होते. त्यांच्या संसाराची कर्तव्यपूर्ती होणार होती. एक मुलगी अन् दोन मुलं. मुलगी नंदा दिल्याघरी सुखानं नांदत होती. थोरल्या मुलाचा म्हणजे रोहितचा संसार सुखाचा चालला होता आणि बळीचंही छान होणार होतं, यात काहीच शंका नव्हतीच. झालं आता हरी हरी करत बसावं म्हणजे झालं. स्वाती घरात आली अन् घरामध्ये सूरजशी खेळायला एकजण वाढलं. स्वाती काकूलाही सूरजचा चांगलाच लळा लागला होता. शारदाला जिवाभावाची बहीण मिळाली.

घरामध्ये दोन लक्ष्म्या नांदू लागल्या. शारदाला दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. तिला हे एका दृष्टीनं बरं वाटत होतं. एकदा सगळं पूर्ण केलं म्हणजे तिला नोकरी करायची होती. पहिला अनुभव असल्यामुळे शारदाला जास्त काही अवघड वाटत नव्हतं. बघता बघता दिवस जात होते. तिला आता एक गोंडस मुलगी व्हावी, असे वाटत होते. तिला स्वतःला बहीण नव्हती. ती एकटीच अन् दोन भाऊ. कमीत कमी आपल्या भावाला आपण एक होतो पण सूरजला एक बहीण असलीच पाहिजे, असे तिला वाटत होते. पण शेवटी कोणतीही गोष्ट आपल्या हातात नसतेच. यावेळेस बाळंतपण सासरीच होणार होते. नाही म्हटलं तरी सासूबाईंच्या हाताखाली करायला आता एकजण होतंच. स्वाती कधी पुण्याला, कधी माहेरी अधूनमधून जात असे. पण आता सध्या ती सासरीच होती. शारदाला त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात एडमिट केलं अन् तासाभरात मुलगा झाल्याची बातमी मिळाली. शारदाला मुलगी हवी होती. त्यामुळे ती मनातून थोडी नाराज झाली. पण शेवटी आपल्या हातात काही नसतं हे तिलाही मान्य होतंच. घरात मात्र साऱ्यांनाच खूप आनंद झाला. बघता बघता दिवस जात होते. याही बाळाच्या कोडकौतुकात दिवस कसे गेले, कोणालाच कळले नाही. सोहम आता दीड वर्षांचा झाला. यादरम्यान छोट्या काकूचे म्हणजे स्वातीचेही बाळ सहा महिन्यांचे झाले. पाटलाच्या वाड्यात जणू गोकुळच नांदत होते. सुख नक्की काय असतं, हे त्या घराला पाहून कळत होतं.वृत्तपत्रात शिक्षक भरतीची जाहिरात आलेली पाहून शारदा भलतीच खूश झाली. आता तिला कोणतीच अडचण रोखू शकणार नव्हती. तिने सर्वांच्या परवानगीने अन् तयारीपूर्ण परीक्षा दिली. ती यशस्वी होणार होती. कारण श्रमाच्या वेलीला यशाची फुलं तर येतच असतात आणि तसेच झाले. बघता बघता ती शाळेत जाऊ लागली. सूरज, सोहम आईला शाळेत जाताना पाहिलं तर रडायची, पण आता त्यांना हळूहळू सवय झाली. शारदाचं लक्ष कमी झालं. पण घरात सासूबाई सासरे होतेच.

स्वाती पुण्याला होती. अधूनमधून सणावाराला ती येई. एकदा शिक्षणसेवक कालावधी संपला म्हणजे काय? आपण नोकरीत कायम होणार. ती प्रत्येक गोष्ट मन लावून करत असे. तिच्या अध्यापनाच्या पद्धतीमुळे खूप कमी कालावधीत ती लोकप्रिय झाली. तिचं सर्वांच्या बाबतीतलं आदरात्मक धोरण तिला प्रत्येकापुढे आपलंसं करत होतं. शिक्षण सेवक कालावधीमध्ये असूनही तिची नेटाने काम करण्याची पद्धत, कामाविषयी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता वरिष्ठांना म्हणजेच मुख्याध्यापक सहकारी शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी या सर्वांपर्यंत ती आपल्या कार्यप्रणालीमुळे माहिती झाली होती. तिला मानसिक समाधान मिळत होते. एकतर तिची शिक्षिका होण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तिचं हे आवडतं क्षेत्र होतं. बघता बघता तीन वर्ष पूर्ण झाली. तिचा आनंद गगनात मावेना. कारण आता तिला शिक्षण सेवक कालावधी संपून ती नियमित शिक्षिका होणार होती. तिच्याबरोबर लागणाऱ्या बऱ्याच जणांचे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू झाली होती. ती ज्या शाळेत होती त्या शाळेतीलच सहशिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी या सर्वांची एकच मागणी होती. याच शिक्षिका आमच्या शाळेवर राहू द्या. सर्व कसं छान चाललं होतं. सूरज अन् सोहम आता बऱ्यापैकी मोठे झाले होते. शारदाचे सासू-सासरे जरा थकले होते. पण सुनेचं कौतुक करण्यात कधी कमी पडत नव्हते. ती आता घरातलं, मुलांचं आणि शाळेचं चांगल्या पद्धतीने हाताळत होती. सुटीदिवशी एखादं दुसरा तास शेतावर जाऊन येत होती.

एके दिवशी ती घाईघाईने शाळेला जाण्यासाठी निघाली. आज तिच्या शाळेवर गटशिक्षणाधिकारी येणार होते. तिने तिच्या वर्गाची चांगली तयारी घेतली होती. ती एसटीत घाईघाईने चढू लागली तेव्हाच तिच्या अचानक छातीत दुखू लागलं आणि कसंतरी होऊ लागलं. पायऱ्या चढणंही कठीण वाटू लागलं. जणू अंगात त्राणच नाही. ती कशीतरी पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला शक्यच होईना. कंडक्टरही आश्चर्याने पाहू लागले. ‘ताई काय झाले?’ म्हणून विचारल्यावर ती काही बोलणार एवढ्यात तिला काय होत आहे हे कोणाच्या लक्षात येण्यापूर्वीच ती कोसळली. तिला अर्धांगवायूचा (पॅरेलिसिसचा) झटका आला होता. तिचे हात, पाय, जीभ, चेहऱ्याच्या वरून तो गेल्याने तिला बोलता येईना. तिला बघण्यासाठी आसपासची माणसं, बसमधली माणसं गोळा झाली. तिचा त्रास पाहून तिच्या घरी निरोप पाठवला. खेडेगावात एवढ्या सकाळी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने जिल्ह्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पटकन् गाडीची व्यवस्था करून तिला जिल्ह्याच्या ठिकाणी हलवले. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती आयसीयूमध्ये होती. तिने शेजारी असलेल्या डॉक्टरांना, ‘मी कुठं आहे? मला इथं कोणी आणलं?’ असे अनेक प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडलं खरं पण तोंड हलत होतं खरं, पण ध्वनी बाहेर पडेना. तिच्या ते लक्षात आलं. आणि तिच्या नयनांमधून अश्रूंचा महापूर वाहू लागला. डोळे पुसण्यासाठी आणि चेहरा झाकण्यासाठी हात वर उचलण्याचा प्रयत्न केला तर फक्त डावा हात वर आला. उजवा हात तिने प्रयत्न करूनही हलेना. तिने सहजच दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण फक्त डावा पायच हलला. तिला काय करावे ते समजेना. तिला शुद्धीवर आलेले पाहून नर्सने तिच्या नवऱ्याला बोलावले. तिने त्यांच्याकडे पाहिले आणि ती जोरात रडू लागली. फक्त तोंडाची वेडीवाकडी हालचाल होत होती. आणि डोळ्यातून अश्रू वाहात होते. पण ध्वनिनिर्मिती होत नव्हती. त्यांनी तिला धीर दिला. डोक्यावरून मायेने हात फिरवला. तिचे डोळे पुसले. ‘घाबरू नकोस मी आहे ना. डॉक्टर प्रयत्न करताहेत. त्यांना नक्की यश येईल. तू फक्त हिंमत ठेव.’ असे ते म्हणाले. पण ते स्वतःचे अश्रू लपवू शकले नाहीत. त्यांचे अश्रू तिच्या डाव्या हातावर पडले. अन् तिला जास्तच रडू आले. ते सर्व पाहून नर्सने त्यांना, ‘पेशंटला त्रास होतो. तुम्ही बाहेर थांबा.’ असे सांगितले. ती खरंतर नवऱ्याचा हात सोडायला तयार नव्हती. पण कसंबसं समजावून ते बाहेर पडले. ती आता उदास झाली. आपण कधी बरे होणार? शाळेत कधी जाणार? आपल्याला बोलता येईल का ? आणि अशा बऱ्याच प्रश्नांचं काहूर तिच्या मनात उठलं आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली. नर्स, डॉक्टरांची पळापळ सुरू झाली.तिला दवाखान्यातून घरी येऊन पंधरा दिवस झाले. जवळजवळ एक दीड महिना ती दवाखान्यातच होती. घरी तिचं सर्व करायचं सोपं नाही. म्हणून तिला दवाखान्यात थोडं जास्त दिवस ठेवण्यात आलं. तिला आता स्वतः खुर्चीतून उठणं, बसणंही जमत नव्हतं. अंथरुणात झोपण्यासाठी, उठण्यासाठी आधार लागत होता. तिला आपण पूर्णपणे परावलंबी झालो, याची जाणीव झाली होती. आता मन रमवणंही सोपं नव्हतं. आता ना शाळेला जायचं होतं, ना शेतात. घरातलं कामही करता येत नव्हतं. साधं नवऱ्याचं, मुलांचंही करता येत नव्हतं. तिच्या माध्यमातून घरभर सळसळणारं चैतन्य घरातून हरवलं होतं. सारं कसं उदास उदास वाटत होतं. ती. या साऱ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती. व्यायाम करणे, चांगल्या विचारांच्या ऑडिओ ऐकणे, वृत्तपत्र वाचणे असं बरंच काही. घरातले सर्वजण तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते. पण शेवटी तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ लागला.एके दिवशी वृत्तपत्र वाचताना त्यात शिक्षक भरतीसाठी आता शिक्षक योग्यता परीक्षा ही बातमी वाचताना तिला तिचा शिक्षणसेवक कालावधी संपून ती नियमित होणार होती, हे आठवले आणि ती एकदम उदास झाली. पलंगावर बसलेली ती स्वतः उठण्याच्या प्रयत्नात पलंगावरून खाली पडली. अन् डाव्या हाताला प्लास्टर झाले. घरातले नवरा सोडले तर बाकी सर्व चिडले. नाही जमत तर शांत बस. उगीच व्याप वाढवू नकोस. म्हणून ओरडू लागले. तिच्या मनात खूप काही होतं. पण तिला व्यक्त होता येत नव्हतं, पण मी कधीतरी बोलेनच असं तिला वाटतच होतं. मनात मोठा आशावाद होता. या साऱ्या प्रयत्नात नवरा मात्र खंबीरपणे साथ देत होता. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, ‘हेही दिवस जातील…’

सौ. आशा पाटील,सोलापूर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!