‘नलिनी, नलिनी.’
‘सरिता, तू केव्हा आलीस.’
सरिता अन् नलिनीच्या गप्पा छानच रंगल्या. नलू अन् सरू याच नावाने त्या दोघी एकमेकींना हाक मारत. सरिताची आज चाललेली धावपळ पाहून नलीनीने आश्चर्याने विचारले.
‘आज काय विशेष बाईसाहेब. खूप गडबडीत आहात तुम्ही.’
अगं आज आत्तू येणार आहेत.’
‘आत्तू अरे वा! मुंबई वरून यायला वेळ लागेल ना! यावर सरिताने केलेला खुलासा ऐकून नलिनी एकदम आश्चर्यचकित झाली. आत्तू म्हणजे वडिलांची बहिण नसून आत्तू म्हणजे नवऱ्याची आई येणार होती. यावर नलिनीला वाटलंच. एवढं काय ते घरभर आनंदानं नाचायचं? पण सरिताने तिला आत्तूच्या स्वभावाची वैशिष्ट्य आणि समजूतदारपणा सांगितला. नलिनी आणि सरिता यांचे माहेर शेजारीच होतं. अर्थात त्या शालेय मैत्रिणी होत्या. सरिताने वडिलांच्या बदलीमुळे गाव सोडलं. तेव्हापासुन दोघींची गाठभेट झालीच नव्हती. सध्या या स्मार्टफोनमुळे त्यातल्या फेसबुक अन् व्हाट्सअपमुळे एकमेकांना अचानक भेटल्या. त्या एकाच गावात राहत परंतु एकमेकींची घरं दूर होती. नलिनी आणि सरिता दोघीही नौकरी करत होत्या. सरिताच्या घरी मुलगा, नवरा असे तिघं होते. तर नलिनीच्या घरात दोन मुलं अन् सासू, नवरा अशी पाचजण. तसं पाहता सरिताच्या सासूबाईंनी काल फोन करून सरिताला घरी येत असल्याचं कळवलं. निमित्त होतं राॅनीच्या वाढदिवसाचं. नातवाच्या वाढदिवसाला त्या येणार नाहीत असं होणं अशक्यच.
सासूबाई कडक, खडूस असतील असं गृहीत धरून नलिनीच्या गप्पा सुरू होत्या. त्या येणार म्हणजे तुला आता खूप कामं पडतील. बाहेर जाणे- येणे यावर, उठण्या बसण्यावर, ड्रेस घालण्यावर बंधने येतील. असू दे बाई, तुला सासुरवासाची जरा तरी सवय असली पाहिजे ना! बराच वेळ नलिनीची चाललेली बडबड थांबविण्यासाठी सरिताने प्रयत्न केला पण सासू म्हणजे डोक्यात विचित्र नात्याचे आराखडे, प्रतिमा तिने तयार केली होती. नव्हे बऱ्याच अंशी पुर्वी तिने ऐकली होती. याच पुर्वग्रहामुळे ती तिच्या सासूबाईंबरोबर त्याच अंदाजाने वागत असे. तेच तिने बोलून दाखवले. खरंच तिला मगाचपासून सरिता हेच सांगण्याचा प्रयत्न करीत होती की माझी सासू म्हणजे ती पूर्वीच्या सासवांसारखी कडकलक्ष्मी नाही. तिच्या हे लक्षात आल्यावर लगेच म्हणाली म्हणजे की आईप्रमाणे आहे. शक्य आहे म्हणा. त्यांना तू आईच म्हणत जा. सरिताने जेव्हा प्रथम या घरात प्रवेश केला. त्याच वेळेस तिच्या सासूबाईंनी बऱ्याच गोष्टी तिला मैत्रिणी प्रमाणे समजून सांगितल्या होत्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे “आई” हा शब्द फक्त आपल्या जन्मदात्या आईसाठीच असतो. तिची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही. आई ही आईच असते. आणि सासूही सासूच असते. सासूने आई होण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती जागा, ते प्रेम, ते वात्सल्य ती देऊ शकत नाही. तू मला आत्या म्हण नाहीतर तुला जे आवडेल ते म्हण. यावर त्यांची वागण्याची पद्धत. बोलण्याची, समजून सांगण्याची पद्धत, गोड बोलून सांगण्याच्या पद्धतीमुळे मी आजपासून तुम्हाला आत्तू म्हणेन असं सांगितलं. तरी आत्तूने पहिलं एक वर्ष तिला घरातले सण-समारंभ, रीती-रिवाज, पाहुणे- रावळे या सार्यांची माहिती करून दिली. तिला न येणारे पदार्थ तिला प्रथम करून दाखवून पुन्हा करून घेतले. जिथे ती चुकली तिथे दिला रागावण्यापेक्षा गोड बोलून काम शिकविले. सरिताला माहेरी असताना शिकण्यासाठी बाहेर राहिल्यामुळे स्वयंपाक घरात स्त्रिया एवढा वेळ काय करतात खरं! असं कोडं पडत असे. पण आता तिला स्वयंपाक घरातील एका एका वस्तूचे, तिच्या स्थानाचे महत्त्व समजत गेले. घर म्हणजे सर्व प्रकारचे शिक्षण मिळण्याचे आदर्श विद्यापीठच असतं,.हे तिला समजलं. तिची आई सुगरण होती पण शिक्षणाच्या धावपळीत तिच्याकडून काही पदार्थ शिकून घ्यावे असं तिला कधी लक्षातही आलंही नाही. सासूबाईंनाही खूप छान छान पदार्थ करायला येत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचे नियोजन कसं करावं. कमी वेळात काम कसं आटपावं. सण समारंभासाठी कोणती पूर्वतयारी करावी. म्हणजे सण जाचत नाही. याच्या सर्व पद्धती त्यांनी आपल्या सुनेला व्यवस्थित समजावून सांगितल्या. सरितानेही,
‘तुम्ही मला सांगायची आवश्यकता नाही.’
अशी भावना कधीच ठेवली नाही. उलट शनिवार, रविवार या सुट्टीच्या दोन दिवसात त्या दोघी स्वयंपाक झाल्यावर दुपारी एकटीने एक पदार्थ करायचा ठरवून एक पदार्थ करत. यामुळे सरिताने आत्तूकडून बरेच पदार्थ शिकले. सरितानेच काय पण आत्तूनेही बरेच पदार्थ सरिताकडून शिकले. या नवीन पिढीचे मोमोज, मंचूरियन, दाल – बाटी आणि बरंच काही. या उलट सरिताने पुरणाची पोळी लुसलुशीत कशी होईल? देवाचा नैवेद्य कसा भरावा? अशा आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी लक्षात घेतल्या. उन्हाळी सामान करण्यात आत्तूचा हात आईही धरू शकणार नाही असे सरिताचे मत होते. आत्तू नोकरी करत नव्हत्या पण समाजसेवेत अग्रेसर होत्या. त्यांच्या राहणीमानावरून त्या ऑफिसमध्ये साहेब असाव्यात असे वाटत होते. सरिताला त्यांनी एक ते दीड वर्षात संसारात चांगलेच ट्रेंड केले. कधीही तुला काहीच येत नाही म्हणून अपमान केला नाही की आईने हेच शिकवले का म्हणून राग राग केला नाही. स्वतः त्या तिचं नेहमी कौतुक करत. दोघींची गट्टी पाहून सुशील तर म्हणे,
‘आई अग तू माझी आई आहेस आणि तिची सासू आहेस. याची आठवण मला करून द्यावी लागतेय. तू तिचंच सारखं कौतुक करतेस. या लेकराला दोघी मिळून वाळीत टाकता ना!’
या वाक्यावर तिघेही खळखळून हसत.
आत्तू एके दिवशी सामानाची आवराआवर करत होत्या. हे पाहून सरिताने तुम्ही कुठे कार्यक्रमाला निघालात का? म्हणून विचारले. यावर आत्तूने,
‘ नाही गं. आता आपण वानप्रस्थाश्रमात जावं असं ठरवलंय. ‘
‘ म्हणजे काय? ‘
ते न कळाल्यामुळे सरिताने विचारले.
‘काही नाही गं, आतापर्यंत म्हणजे सुशील चे बाबा गेल्यापासून संसार, घर यातच अडकले. आता या सार्या जबाबदार्या स्वीकारणारी, माझ्या सुशीलची काळजी घेणारी आली. आता मी मोकळी. यावर सरिताला वाईट वाटले. सुशील, सरिता, नातूही उदास झाला.
‘ आई आमचं काही चुकलं का?’
असं सुशील म्हणू लागला. तर आत्तु मी तुमची माफी मागते. काही चुकलं असेल तर माफ करा. आम्ही कोणीच तुमच्या शिवाय राहू शकणार नाही. म्हणुन सरिता अश्रु ढाळू लागली. रॉनीही आजीला जाऊन बिलगला. सुशील, सरिता मनात पुन्हा पुन्हा आठवून पाहत होते की, आपण कुठे चुकलो तर नाही ना? शेवटी अआत्तूने सांगितलं.
‘हा माझा स्वतःचा निर्णय आहे. आतापर्यंत मी गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदाऱ्या मन लावून पार पडल्या. आता मात्र मी स्वतःसाठी वेळ देणार आहे.’
यावर लगेच सुशील रसिका दोघांनी सांगितले.
‘तू घरात काहीच करू नकोस पण आम्हाला सोडून जाऊ नकोस.’
यावर आत्तूने समजून सांगितलं. बाळांनो या घरात तुम्हाला माझी गरज होती. माझ्या नातवाचं म्हणजे दुधाच्या साईचं मी बालपण जपलं. माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आताही माझी गरज तुम्हाला पडणार नाही असं नाही. आता तुम्ही सर्वजण स्वतःला आणि घरातील इतरांना आधार द्यायला सक्षम आहात. मी आतापर्यंत संसारात सुख दुःख दोन्हींचा अनुभव घेतला. सुखाचे सोहळे अनुभवले. तसेच दुःखाचे डोंगर हिमतीनेम पार केले. सुख दुःखाचे उत्सवच जणू साजरे केले. या सर्व धावपळीत स्वतः साठी जगायचे राहूनच गेले. म्हणूनच मी लोणावळ्याच्या वृध्दाश्रमात माझी नोंदणी केली आहे. मी तिथे राहून माझे समाजसेवेचे व्रत पुर्ण करेनच. स्वतःच्या छंदानाही वेळ देईन. मी तशी अधुन मधुन घरी येणारच आहे. सणवार, लग्नकार्य, वाढदिवस यावेळेस आवर्जून येणार. माझ्या मते माणसाने आपलं कार्य किती दिवस आणि कुठे करायचं याचा स्वतः योग्य वेळी निर्णय घ्यायलाच हवा. थोडक्यात मी संसार म्हणजे गृहस्थाश्रमातून रिटायर्ड होऊन वानप्रस्थाश्रमाकडे वळणार आहे. सुशील आणि सरिताला हा निर्णय प्रथम तर त्रासदायक वाटला. पण जेव्हा आईने स्वतःची भूमिका, कर्तव्य यांचे नियोजन सांगितले. तेव्हा थोडेफार पटले. हा निर्णय घरातील सर्वांनाच न पेलवणारा वाटत होता. आत्तू शिवाय आत्तूचं घर म्हणजे सरिताला सुगंधाविना फुल असंच वाटत होतं. पण व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं असतं, असं ती म्हणत होती. पाहता-पाहता निर्णय घेऊन जायची वेळ आली. आत्तूने आपल्या सुनेला सगळ्याच गोष्टी छान शिकवल्या होत्या. गुरूला आपला शिष्य जेव्हा यशस्वी होताना दिसतो, तेव्हा परमानंद मिळतो. तसाच काहीसा अनुभव आत्तुला आला होता.
आत्तू लोणावळ्याला जाऊनही दोन वर्ष होत आली. आतापर्यंत आपल्या प्रेमळ नियोजनबद्ध कार्याने त्या आश्रमात ही लोकप्रिय झाल्या होत्या. तिथं ही त्या बरोबरच्या सहकारी वृद्ध व्यक्तींची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत. बोलून आणि सुश्रुषा करून आधार देत. एक- दोन गरजू व्यक्तींची आश्रमातली फी न सांगता, न कळू देता भरत. वेगवेगळे कार्यक्रम ठरवून व्यवस्थित पार पाडत. सुन, मुलगा, नातवंड यांनाही अधून मधून फोन करत. सण-समारंभ आला की घरी जात. एकंदरीत त्यांनी संसाराच्या मोहातून स्वतःला हळूहळू दूर नेलं होतं आणि ते त्यांनी केलं. त्यांनी घेतलेला निर्णय स्वतःसाठी हितकारकच होता. तसा सुशील, सरिता आणि नातवंडांनाही सक्षम बनविणारा होता. त्या नेहमी आश्रमातल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगत. योग्य वेळी बाजूला सरकता आलं पाहिजे. मी, माझं यापलीकडेही एक जग आहे ते पाहता आलं पाहिजे. त्यांच्या सांगण्याचा त्यांच्या आश्रमातल्या बर्याचजणांवर सकारात्मक परिणाम झाला होता. त्यामुळेच नको असताना बळे बळे संसारातून बाहेर काढून आश्रमात पाठवण्याचे दुःख खूप जणांना वाटत होतं. ते आता कमी झालं होतंह आहे त्या परिस्थितीत आनंदी कसं राहता येईल. हा आत्तूचा मूलमंत्र सर्वांनीच अंगीकारला होता. त्या उलट आपल्या सहकाऱ्यांना सांगत, घरात अडचण होऊन राहण्यापेक्षा इथे आपल्याच वयाच्या लोकांमध्ये सुख- दुःख, रम्य आठवणी एकमेकांना वाटत आपण आनंदाने राहू शकतो. या वयात सुरू झालेल्या शारीरिक व्याधींना आपण सकारात्मकतेने कमी करू शकतो. संसाराचं म्हणाला तर सुन, मुलं, नातवंडं यांना अधून-मधून भेटलं की झालं.
एवढा वेळ शांत चित्ताने ऐकणाऱ्या नलूच्या डोळ्यातून अश्रू ओघळून टप, टप सांडू लागले. खरंच तुझ्या सासुबाई ग्रेटच आहेत. योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबणं ज्याला कळलं. त्यालाच आयुष्य कळलं. मला त्यांना भेटायचंच आहे. असं सरिताला तिने सांगितलं. तिला वाढदिवसाचं आमंत्रण दिलं होतंच. ती येणारच होती. सरिताच्या सकारात्मकतेचं रहस्य तिने जाणलं होतं. त्याचा तीही अंगीकार करणार होती. जी परिस्थिती आपल्या हातात नाही तिचा विचार करत बसण्यापेक्षा, जे आपण करू शकतो त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं. हे तीन जाणलं होतं. आत्तुला भेटण्यासाठी ती आतूर झाली होती. उद्या लवकरच येते वाढदिवसासाठी, असं सांगून प्रसन्न मनाने ती घरी परतली.