'वाचाल तर वाचाल'
असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपण ज्ञान संपादन करतो. आपली विचारशक्ती वाढते. आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट म्हणजे वाचन. जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल रोजी आपण साजरा करतो. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. २३ एप्रिल याच दिवशी जगातील प्रसिद्ध साहित्यिक सेक्सपिअर त्यांचा जन्म आणि मृत्यू दिन. म्हणूनच या दिवसाला पुस्तक दिन म्हटलं जातं.
मला खूप लहानपणापासून म्हणजे अक्षर ओळख होण्यापूर्वी चित्र वाचनाची आवड होती. गोष्टींच्या पुस्तकातील चित्रावरून मनाने हावभावयुक्त गोष्ट सांगण्याची आवड होती. त्यानंतर जशी अक्षर ओळख झाली. तसे वाचन करणे हा सगळ्यात आवडता छंद होता, वाचन म्हणजे जणू तो संवादच वाटे.
चांदोबा, चंपक अशा पुस्तकांच्या वाचनाने बाल मनाला आत्मानंद मिळत होता. लहान असताना छोटी छोटी पुस्तके वाचायला आवडत. कुर्डू सारख्या छोट्या गावातील वाचनालयातून आणि जिल्हा परिषद शाळेतील वाचनालयातून पुस्तकं वाचण्याची आवड मी जोपासली. माझी आई सौ. सुंदर औदुंबर भादुले ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तिला पुस्तक वाचनाची खूप आवड होती. तिची हीच आवड वारसाहक्काने जणू आम्हा पाच बहिणींना मिळाली. सरस्वतीच्या उपासनेने, विद्यादेवीच्या साथीने ज्ञानाची दारे सहजच उघडली गेली. माझ्या लहानपणी मनोरंजनासाठी वाचने, खेळणे, निसर्ग सान्निध्यात राहणे हेच आम्हाला माहीत होतं. आम्ही तेच करत गेलो आणि ज्ञानाने, विचाराने, संस्काराने समृद्ध झालो. त्यानंतर कुर्डूवाडी येथील नूतन शाळेतही भव्य ग्रंथालय माझ्या बौद्धिकतेला खतपाणी घालण्यासाठी उपयुक्त ठरले.
माझ्या जडणघडणीत माझे आई-वडील, बहिणी – भाऊ आणि माझे शिक्षक यांचा विशेष हात आहे.
अनेक वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याच्या उद्देशाने, विषयाची तयारी करण्यासाठी बऱ्याच पुस्तकांची हाताळणी होई. आतापर्यंत केलेले वाचन मला समृद्ध करून गेलेच पण माझ्यात लेखनाची आवड निर्माण करून गेले. पंढरपूर येथे द ह कवठेकर या शाळेमध्ये माझे शिक्षक भागवताचार्य वा. ना. महाराज यांच्या प्रतिभेची छाया मला दिपवून, प्रेरित करून गेली. शालेय जीवनात भाषण, निबंध, नाटिका लेखन करण्याची आवड होतीच. पुढे मी महाविद्यालयात अनेक निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गेले. माझ्या पहिल्या कवितेची निर्मिती निसर्ग सानिध्यात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर या महाविद्यालयात निसर्ग ही पहिली कविता मी लिहिली. ही कविता भित्तीपत्रकावर लागली. माझ्या लेखनाच्या प्रथम प्रयत्नाला प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर मी निसर्ग,नातेसंबंध, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयावर कविता लिहिल्या. कविता लेखनाची आवड मला माझी आई आणि मोठ्या बहिणींकडूनच मिळाली. माझ्या लेखनाला खऱ्या अर्थाने पैलू पाडण्याची प्रक्रिया घरातूनच सुरू झाली.
मी वृत्तपत्रातून वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून शिक्षण शास्त्र पदवीका घेत असताना पासून लिहीत होते.
आपल्या लेखनाला मिळणारी प्रसिद्धी मला आंतरिक समाधान आणि प्रोत्साहन देत होती. लग्नानंतर मी सोलापूरला स्थायीक झाले. माझे पती अरूण रामचंद्र पाटील आणि सासर लक्ष्मीदहिवडी यांचीही मोलाची साथ मिळाली. सोलापूर साहित्य क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा सहवास मला लाभला. त्यांच्या परिसस्पर्शाने माझ्या लेखनात प्रगल्भता येत गेली. निर्मला उत्तरेश्वर मठपती यांच्या प्रोत्साहनामुळे मी माझा आठवणींचा पाऊस हा कवितासंग्रह काढला. त्यासोबतच तिघी बहिणींचा एकत्रित काव्यसंग्रह बिल्वदल हा महाराष्ट्रातला पहिलाच यशस्वी प्रयत्न. तो आई-बाबांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केला. त्यानंतर अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सोलापूर यांच्या तर्फे स्वरचित कथेचे कथाकथन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मी माझी रखमा नावाची पहिली कथा लिहिली. ही कथा स्पर्धेत यशस्वी ठरली. किशोर या मासिकातही छापून आली. यानंतर कथालेखनाचा मला जणू छंदच लागला. या लेखनास मला निर्मलाताई, भगिनी उमा कोल्हे आणि नयन राजमाने, दत्ता हलसगीकर, अवधूत म्हमाणे, माधव पवार, राजेंद्र भोसले, मारुती कटकधोंड, वंदना कुलकर्णी, शांता क्षीरसागर, रेणुका बुधारम यांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला. सोलापूरचे समृद्ध साहित्य क्षेत्र माझी साहित्य प्रतिभा फुलवत गेले.
बालकुमार साहित्य मंचचे पद्माकर कुलकर्णी सर,आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे सर यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले.
२००८ साली ई टीव्ही म्हणजेच सध्याच्या कलर्स या चॅनल वर सुपव वुमन या कार्यक्रमात मी अभिनेता चिन्मय मांडलेकर, सोलापूरच्या संगीता जाधव यांच्या उपस्थितीत स्वओळख आणि दागिन्यांचे महत्त्व या दोन कवितांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. २००९ साली पहिली दोन पुस्तके काढल्यानंतर २०१२ मध्ये दोन बालकथा संग्रह काढले. शूर वीर आणि बंटीची फजिती. यानंतर माझ्या लेखनास मिळालेले सकारात्मक प्रोत्साहन मला लिहितं ठेवण्यास कारणीभूत ठरले. सोलापूर आकाशवाणी केंद्रावर बालदिनानिमित्त मुलांसाठी दिवसभरच्या प्रसारणात मी आठ स्वलिखित एकपात्री विद्यार्थ्यांकडून अभिवाचन करून घेतल्या.
२०१५ साली अमृतफळ आणि आत्मनाद या दोन पुस्तकांचे प्रकाशन केलं. अमृतफळ या कथासंग्रहातील परीसस्पर्श ही कथा वाचनाचे वेड या शिर्षकांतर्गत राज्य शासनाच्या इयत्ता सातवीच्या इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळेत सुलभभारती या सातवीच्या मराठीच्या पुस्तकात समावेशित झाली. अमृतफळ हे पुस्तक मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील ग्रंथालयात अवांतर वाचनासाठी लागले होते. एकंदरीत या लेखनाने मला माझ्या आंतरिक भावना कागदावर उतरविण्याची सुवर्णसंधी मिळाली. समाजात वावरत असताना टीपकागदासारखे मन घेऊन वावरणे हे लेखकाला कथाबीज मिळवून देणारे असते. मला अनेक कथाबीज माझ्या विद्यार्थ्यांमध्ये, समाजात भेटणाऱ्या व्यक्तींमध्ये सापडत गेली. माझे लेखन आंतरिक भावनांना कागदावर मोकळी वाट करून देत होतं.
२०१८ मध्ये पाखरं आणि शेवंताबाई अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली. पाखरं हा बालकुमार कथासंग्रह आहे. तर शेवंताबाई हा विनोदी कथासंग्रह आहे. मानवाच्या जीवनात सुख दुःख, ताण तणाव तर आहेतच. पण या सर्वातून मुक्त होण्यासाठी माणसाने आनंदी राहायला हवं. याच भावनेतून हलकेफुलके विनोद साकारत हा कथासंग्रह लिहिला. त्यानंतर २०१८ मध्ये ई साहित्य प्रतिष्ठान यांनी एकटीआणि नशीब असे दोन ई बुक कथासंग्रह काढले. प्रतिष्ठाननेच एकटी या कथासंग्रहाचे अॉडिओ बुकही प्रकाशित केले. २०१९ मध्ये अट्टाहास हा कथासंग्रह आणि रितेपण हा काव्यसंग्रह काढला. आतापर्यंत मी१२ पुस्तकांचे लेखन केले. अनेक वृत्तपत्र, दीपावली अंकातून लेख, कथा, कविता,नाटक, एकपात्री यांचे लेखन केलं.
मी माझं लेखन मी लेखिका डॉट कॉम या माझ्या साइटवर टाकते. माझे मी लेखिका या नावाने फेसबुक पेज आहे. मी लेखिका नावाचा यूट्यूब चैनलही आहे. माझ्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मी सतत प्रयत्नशील असते. आतापर्यंत मृत्युंजय, छावा, तरंगिणी, बटाट्याची चाळ, श्यामची आई अशी अनेक पुस्तके वाचलेली आहेत. नुकतेच मी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे पुस्तक वाचलेले आहे. हे पुस्तक वाचल्यावर जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आपल्यामध्ये येतो. मला आतापर्यंत साहित्यक्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले. त्या सर्व पुरस्कारांचे श्रेय मी माझ्या वाचनाला देते. कारण वाचनाने आलेल्या विचारांच्या समृद्धतेला लेखणीची साथ मिळाली. म्हणूनच मी सरस्वती मातेची सेवा केली आणि मला सन्मान मिळाला. हीच माझी भावना आहे. तर आजच्या पुस्तक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
वाचाल तर वाचाल