माझी आवराआवर चालली होती खरी. पण मला तेवढा उत्साह, आनंद आणि नवीन ठिकाणी रहायला जायची उत्सुकता वाटत नव्हती. आम्ही दोघं आमच्या नरेंद्रकडे मुंबईला रहायला जाणार होतो. गेली तीस-पस्तीस वर्ष आम्ही दोघं सोलापूरला राहत होतो. यांच्या नोकरीमुळे कुठे जास्त येणं जाणं होत नव्हतं. पण आता यांनी रिटायर झाल्यापासून आम्ही दोघं निवांत होतो.
खरं तर निवांत म्हणजे जणू काय पुन्हा एकदा नव्याने जीवनाचा आस्वाद घेत होतो. घाई- गडबड, कर्तव्य आणि न कळतेपणानं राहून गेलेले क्षण पुन्हा नव्याने जगत होतो. अनुभव घेऊन मनाच्या कप्यात साठवत होतो. आमच्या दोघांचा दिनक्रम खूप छान होता. सकाळी फिरायला जायचं. तिथे यांचे मित्र आणि माझ्या मैत्रिणी असत. एक तासभर फिरून जरा कोवळ्या उन्हात गप्पा होत. मात्र गप्पांमध्ये कधीही तुझी सून अशी, अन् माझा मुलगा तसा, अन् मग नातू कसा ? असले विषय कधीही नसत. आज भाजी काय करायची, ती नव्या पध्दतीने किंवा मैत्रीणीच्या पध्दतीने कशी करता येईल, आज कोणाकडे नवीन पदार्थ बनणारे. आज कुणाचा वाढदिवस. तो कोठे साजरा करायचा. या अशा गप्पांमुळे विचारांचा प्रवाह वाहता राहत होता. हा प्रवाह निर्मळ, स्वच्छ पाण्याप्रमाणे खळाळता असे. कारण बाकी वेळा जर घरातली उणी- धुणी काढत गप्पा झाल्या तर हेच पाणी अस्वच्छ, गढूळ वाटे. खरंतर या गढूळपणाने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. पण आम्ही असे विषय टाळत असू.. फिरुन आलो की थोडयावळाने सकाळचे सर्व कार्यक्रम आटोपत आठ-साडेआठला नाष्टा अन् चहा.
यामध्येही मला यांच्या हातचा चहा आवडे म्हणून मी नाष्टा केला की चहा यांनी करत. नंतर दोघे बसून निवांतपणे वृत्तपत्र वाचून त्यातील बऱ्याच गोष्टींवर चर्चा होई. यात कधी कधी मतमतांतरे होत, पण कधी कधी आपण काय म्हणून भांडतोय असे म्हणून हसून विषय संपे. पुन्हा यांनी भाजी आणायला जात. तोपर्यंत सरु आली की तिच्याकडून घरातील धूणं, भांडी, फरशी, अंगण झाडणे सडा रांगोळी, भाज्या निवडणे, दळणं इतर छोटी मोठी काम मी करून घेत असे. ती दीड-दोन तासात जाई. बरोबर साडे अकरा- बाराला स्वयंपाक सुरु केला की, दीड-दोनला जेवणं होतं. यांना काय आवडतं अन् पचतं याचा विचार तर मी करतेच पण कधी माझ्याही आवडीचं बनवते. त्यात पण यांनी मदत करतात बरं.
नोकरीमुळे कधीही स्वयंपाक घरात ढुंकूनही न पहाणारा माझा नवरा, आताशा स्वयंपाक घरात चहा-साखरेचे डबे कुठे आहेत, मोहरी कसली असते, हे ओळखू लागलाय. मी स्वयंपाक केला की मग मी माझं स्वतःच आवरून येते. तोपर्यंत यांनी ताटे वाढून घेतात. छान आवरते म्हणजे केस विंचरून छान पैकी अंबाडा घालते. यांनी बाजारातून आठवणीने आणलेला गजरा माळते. प्रसन्न मनाने जेवण जातं आणि पचतंही. जेवणानंतर आम्ही थोड्यावेळ टिव्ही पाहून नंतर थोडावेळ विश्रांती घेतो. नंतर चारचा चहा अन् पुन्हा सोसायटीच्या बागेत निवांत बसायला जातो. सोसायटीतील लहान मुली, तरुण मुलं-मुली, जोडपी, वयस्कर मंडळी बागेत येतात.
त्यांना पाहत गप्पा मारत वेळ छान जातो. पुन्हा दिवेलागणीला घरी येवून दिवा लावून स्तोत्र, पोथी वाचून पुन्हा जेवण अन् मग आमच्या शेजारच्या तीन-चार घरातील वयस्कर मंडळी आमच्या घरी जमतो. आम्ही सर्वजण नंबर लावून एखादी गोष्ट, माहितीपर अनुभव सांगतो. दिवसभराचे अनुभव ऐकण्यात एक वेगळीच मजा येते. सुमारे नऊ-साडेनऊ पर्यंत सर्वजण आपापल्या घरी निवांत. या सर्व दिनक्रमामुळे वेळही छान जातो आणि मनही उत्साही, आनंदी रहातं. हाच दिनक्रम गेली एक वर्षे सुरू आहे पण आता नरेंद्रकडे जायचे म्हणजे मनात थोडी चलबिचल होतेय, बेचैन वाटतंय,
‘कसं होईल, काय होईल, ही भावना लग्न झाल्यावर वाटत होती आणि जीवनात बऱ्याच वेळा बेचैनी वाटलीही. पण पुन्हा आता नव्याने वाढू लागलीय. खरंच एखादया ठिकाणी रुजवून रोपट्याला दुसऱ्या ठिकाणी काढून लावले तर त्याला जेवढं अवघड वाटतं तेवढेच अवघड वाटत होते तसं मुंबईला ती दोघं म्हणजे नरेंद्र अन् सानिका रहायला जावून चार-पाच वर्षे झाली. ती नेहमी इकडे येत. सुट्टीला रहात पण आम्ही एक दोन दिवसाच्यावर कधी राहिलो नाही. आता तर पालवी आमची नात पाच वर्षाची आहे. तिच्या तर जीव रमवायचा असे ठरवत बेचैनीने का होईना मी आवरायला घेतलंच.
शेवटी काय? शेवटचे काही दिवस स्वनिर्णयाने जगणंही हातात नव्हतंच म्हणा. मनं साशंक होती. वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनात मुक्तपणे धावपळ करुन वावटळ निर्माण करत होते. पण याही प्रसंगात मी हिमतीने पुढे येणार होते. नेहमीप्रमाणे यांची साथ तर होतीच. तसं मुलांचं घर हे आपलंच असं मानत होतो. आता मोह, भावना या साऱ्यां पासून आम्ही फारकत घेतली.