सख्यांनो मी दिव्या. अहो मी तुमच्यासारखीच एक सखी, सासू-सासरे, आई-वडिल, बहिण- भावंडे, मुलगा यात रमत असतानाचा स्वत्व सिद्ध करण्यासाठी स्वकमाई करणारी मी. दररोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करणारी मी विसाव्यासाठी. माहेरपणाच्या आई- वडिलांच्या दाट छायेत निवांत क्षण अनुभवण्यास आतुरलेली मी. दिवसानंतर रात्र अन् अंधारानंतर उजेड ही गणितं तोडपाठ असलेली मी.
कष्टानंतर विसावणं विसरूनच गेले. कर्तव्य करताना कुठे कसुर होऊ नये म्हणून धास्तावलेली मी निर्धास्तपणा मला हवा हे विसरले होते. शिक्षकी पेशा निवडल्याने मे महिना जणू विसावण्याचाच. वर्षभर चाललेली शैक्षणिक कामं आणि सांसारिक कामं यातून विरंगुळा काय तो मे महिन्यातच. माझा मुलगा ऋत्विक. त्याच्या राजश्री म्हणजेच राजू आत्याचा अत्यंत लाडका. कधी एकदा त्याला सुट्टी लागते. याची तोच काय पण त्याची आजी, आत्या सारेच उत्सुकतेने वाट पाहत असतात, ऋत्विक प्रथम काही दिवस आजीसोबत आत्याकडे सुट्टीला जातो. नंतर काही दिवसांच्या सुट्टीसाठी आत्याला घेवून येतो.
आजपर्यंत बऱ्याच सूट्टयात या प्रथेत आजतागायत बदल झालेला नाही. हा आत्याकडे सुट्टीला जातो. त्यावेळी त्याच्या बाबांचे व आजोबांचे करण्यासाठी मला घर सोडून कुठंही हालता येत नाही, यावर्षी मात्र मी माहेरी जायचंच म्हणून ठरवलंय. पण ऋत्विक काही करता तयार होणारच नव्हता. माहेरी चार दिवस गेलं तरी एक प्रकारचा उत्साह निर्माण होणार होता. वर्षभराचे काम करण्याची उर्जा मिळणार होती. ज्या घरात मी लहानाची मोठी झाले त्या व्यक्तिंच्या सानिध्यात माझं व्यक्तिमत्व बहरत गेलं. त्या घरात माझं सर्वस्व असणारे माझे आई बाबा रहातात. सुट्टीला बहिण भाऊ येतात.
त्या माहेरच्या पंखाखाली दोन दिवस विसावले तरी छान वाटते. पुन्हा एकदा कामाचे चक्र सुरु झालं की मग पुन्हा आरशात तोंड पाहायला अन् दहा मिनिटं शांत बसून विचार करायलाही वेळ मिळत नाही. यावेळी मी माझ्या मुलाला समजून सांगण्यापेक्षा ननंदबाईंनाच विनंतीवजा बोलले. ताई ऋत्विक तुमच्याकडून इकडे येताना तुम्ही इकडे आलात की मी चार पाच दिवसाने एक-दोन दिवसासाठी ऋत्विकला घेवून माहेरी जावून येते. बोलताना मी जरी धाडसाने बोलत होते. तरी मनात धाकधूक होतीच. पण काय करायचं. ननंदबाईनी लगेच परवानगी दिली.
‘अगं चालेल ना! मी आई -बाबांसोबत दादाचीही काळजी घेईन बरं. तू खुशाल चार दिवस जावून ये माहेरी.’ त्यांच्या या परवानगीने मी मनोमन सुखावले. शेवटी एक स्त्रीच स्त्रीचं मन समजून घेवू शकते हे खरंच. मी मात्र एवढे वर्ष मनातच कुढत बसले. त्यांना यापुर्वीच का विचारले नाही. याचेच वाईट वाटले. त्यांच्या आई वडिलांचा नकार होता म्हणजे यांचाही आहे असंच मानून मी एवढे वर्ष विचार करतच राहिले.पण शेवटी काय? “देर आये दुरुस्त आये।‘