स्वयंपाकघरातून बोलण्याचा नव्हे संतापलेल्या सूरांच्या तारा छेडल्या जात होत्या. मी मध्ये गेले तर दोघंही नाईलाजाने गप्प बसतील पण मनात साचलेली किल्मिषं तशीच राहतील. त्यापेक्षा रागीट भावनांनी दाटून आलेलं मळभ मोकळं झालं म्हणजे मग पुन्हा प्रसन्न वाटेल. पण एका मनाने वाटत होते. आभाळ मोकळं होताना कधी कधी ढगफुटी झाल्यासारखं बरसतं अन् मग नुकसानच नुकसान. तसं भावनांचं होता कामा नये.
शर्मिला या घरात आल्यापासून तिला प्रत्येक सणवार, नियम आणि परंपरा समजून सांगितल्या. त्यातल्या बऱ्याच परंपरांना विषयी तिने माझ्यापुढे प्रश्न उपस्थित केले. हे का करायचे, यामागच्या भावना उद्देश विचारून मनाला कमकुवत करणाऱ्या बऱ्याच गोष्टी तिने मला गोड बालून बंद करायला लावल्या. खरंतर माझ्या लग्नानंतर जेव्हा सासरी वीस-पंचवीस जणांच्या कुटुंबात रहायला आले तेव्हाही माझ्या नवीन संसाराविषयीच्या कल्पना आणि प्रत्यक्षातील संसार यामध्ये बरीच तफावत होती पण शेवटी कल्पनेपेक्षा वास्तवात जगणे केव्हाही सोपेच आणि फायदेशीरही. त्यातून घरात तीन-तीन सासवा, सासरे दिर, जावू, ननंद या सर्वांना वाईट वाटेल अस वागायचं म्हणजे संस्कारहीन माणसाचंच लक्षण दाखवणं. म्हणून सगळं समजत असूनही गप्प रहाणं भाग होतं. ज्याप्रमाणे मी वागले तसंच शर्मिलाने वागावं अशी माझी अपेक्षा. पण छे… या मुली बाकी कर्मकांड, पाहुणेरावळे, सणवार, रितीपरंपरा या असल्या जोखडात अडकणे शक्य नाही. म्हणजे ही पिढी कोरडी आहे. यांना माणुसकी नाही. यांना माणसं नको आहेत.
सण-समारंभ, रीती रिवाज नको असे नाही तर योग्य त्या गोष्टी करणंच त्यांना आवडतं. त्याच पद्धतीने तिने बऱ्याच गोष्टी कमी केल्या. खरंतर हे सारे असेच असायला हवं असे मलाही नवीन लग्न झाल्यावर वाटे पण ही उमेद, हा उत्साह संसाराच्या रहाटगाडग्यात कधी मावळला माझ्या मला कळलेच नाही. शर्मिला घरून आली तेव्हा आम्ही एकत्र कुटुंबातच होतो. किरण शहरात राहून नौकरी करायचा आणि शनिवार रविवार आणि अधून मधून सुट्टी मिळाली की यायचा.
शर्मिला शिकलेली होती तिला नौकरी करण्याची हौस म्हणून तिने हा विषय किरण नंतर मी, यांनी आणि शेवटी मोठ्या सासऱ्यांपुढे काढला. हिच्या नौकरी करण्याच्या हौसेमुळेच घरातून हे बाहेर पडणार किंवा घर विभागणार असे त्यांना वाटले, पण तिने मी येवून जावून नौकरी करेन असे सांगितले. किरण मात्र जिल्हयाच्या ठिकाणी नौकरीला असल्याने त्याला रहाण्याशिवाय पर्याय नव्हता. पहिलं पहिलं मला तर नवलच वाटले.
बाईमाणसाला नाही म्हणलं तरी घरात अनेक जबाबदाऱ्या असतात. त्या काय कमी म्हणून नौकरीची हौस. तिला समजावण्याचा प्रयत्नही केला. पण तिने उलट मला समजून सांगितले. स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचे पंख कर्तव्याच्या बंधनातून मुक्त करणं महत्त्वाचं. एकदा मोकळे पंख मिळाले म्हणजे स्वतंत्र आणि स्वच्छ वातावरणात उडणं सोप्पं आणि मनाला आनंद देणारं. यावर मी तिला एकत्र कुटुंबात रहाणं, तुझ्या मते चुकीचंच का? असं विचारल्यावर तिने स्पष्ट नकार दिला.
एकत्र कुटूंबासारखी आदर्श गोष्ट फक्त भारतातच पहायाता मिळते, त्याचे सर्व फायदे तिने मला सांगितले पण म्हणून आपण तिथेच गुंतून पडण्यापेक्षा आपल्याला योग्य ते करायला हवे. असे तिचे मत. बाकी मोठ्या सणावारांना एकत्रच यायचं सर्वानी. या साऱ्या विचारांनी मी देखील भारावून गेले. पहाता पहाता आम्ही जिल्हयाच्या ठिकाणी रहायला आलो. प्रथम मला करमत नव्हते पण नंतर आम्ही दोघांनी छान कामं योजली. अधूनमधून गावाकडंही जात होतो खरंच शर्मिलाच्या हौसेने आम्हालाही नवीन काही शिकायला मिळाले. सध्या मात्र तिच्यावर वाढत्या जबाबदाऱ्याच तिच्यासाठी त्रासदायक ठरत होत्या. म्हणूनच मी आजपर्यंत तिला मदत केली. पण माझं शरीर साथ देत नव्हतं.
आज मात्र मी तिला कामाला बाई लावण्याची परवानगी देण्याचं ठरवलं आहे. कारण घरात कोणत्या कामाला बाई ठेवणं मला आवडत नव्हतं. पण वेळ निभावणे महत्वाचं.
‘स्त्रीयांना काही जबाबदाऱ्या वाटता आल्या तर त्यात काय चुकीचं?’
या तिच्या प्रश्नापुढे मी निःशब्द आणि निःशंक. तरीही मी हो म्हटलं नव्हतं आणि तिनेही जसा आपला निर्णय म्हणून जसं जमेल तसं घरातलं आणि घराबाहेरचही काम सुरू ठेवलं. शेवटी मी परवानगी दिल्याने तिला खूप आनंद झाला. कामाच्या ओढीने होणारी थोडी धावपळ कमी होईल. शेवटी काय प्रत्येकाच्या मनाची हौस पूर्ण होणं महत्त्वाचं. आज तिच्यामुळे दोन-तीन बायकांना रोजगार मिळाला,
‘हेही नसे थोडके.’