अरे संसार संसार

संसार करत असताना लग्नात दिलेल्या थोड्याफार भांड्यावर सुरू केलेला संसार. आजचे सुखद चित्र उभा करण्यासाठी काडी काडीने संसार उभा करताना खाल्लेल्या खस्ता मी कशा विसरू. माझ्या सासरी तर घर भरून माणसं. नवरा आणि मी आणि माझे सासू-सासरे एवढीच चौकट हवी असं मानणाऱ्यातली मी नव्हते पण एकत्र कुटुंबात करावी लागणारी कर्तव्य अफाट आणि मान, हक्क कमी होती. माझे सासरे मधले होते. त्यांना एक थोरला आणि एक धाकटा भाऊ. खरंतर घरात लक्ष्मी पाणी भरत होती. पण सासऱ्यांचा स्वभाव नको तितका भोळा. त्यांचे भाऊ-वहिणी यांचे शब्द म्हणजे प्रमाण मानणारे ते. पाहता पाहता पाहता दिवस जात होते. घरामध्ये आम्ही सख्ख्या जावा दोघी अन् चुलत जावा पाच जणी होतो. भरल्या गोकुळात सारं कसं आनंदी आनंद गडे असंच. पाहताना वरून नात्यांची समृद्धता. आतून मात्र स्वार्थाची किड, ही गोष्ट लक्षात आली. तोपर्यंत सासू-सासरे स्वर्गवासी झालेले.

आमच्याच धाकट्या दिराला फुस लावून आमच्यापासून तोडलं. या साऱ्यांनी एकतर आई वडिल गेल्यावर काका काकू असल्याने थोडाफार मानसिक आधाराचं टेकण मिळालं होत पण आता मात्र, आभाळ फाटले नव्हतं तर संकटांची ढगफुटी झाली होती. संकटांनी जणू आयुष्यात फेरच धरला होता. पोटी तीन मुलं घेवून घराबाहेर पडलो. सख्ख्या दिर- जावू यांचाही आधार मिळाला नाही. मग आयुष्यात सुरू झाली, तारेवरची कसरत. आजपर्यंत आर्थिक व्यवहार घराण्याच्या रिती-रिवाज, परंपरा या सर्वांची गणितं कधी स्वतः सोडवलीच नव्हती. पण आता मात्र या सर्वांना सामोरं जावं लागणार होते. मला तर नवऱ्याच्या आणि माझ्या लेकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहावं लागणार होतं. एवढया मोठ्या घरातून बाजूला झाल्यावर गडबडल्यासारखे झालं. काय करावं? नोकरी कुठं आणि कोणाकडे करावी? वाटणीसाठी किती झगडावं लागेल? ही सारी गणितं मन हेलावून टाकणारी असली तरी सोक्षमोक्ष हा लागायलाच हवा होता. यांनी यांच्या मित्राच्या मदतीने व्यवसाय सुरू केला. म्हणावा तसा जम बसत नसला तरी आलेली वेळ निभावली जात होती.

शेवटी चांगुलपणाला न्याय मिळेलच हा विश्वास मनात होताच. यांचे हक्काच्या शेतीसाठी प्रयत्न सुरू होतेच. आजपर्यंत मानाने राहणाऱ्याला आज दुसऱ्याकडे काम करावं लागणं हेही कमी अपमानकारक नव्हते. सुरुवातीला माझ्यासहीत घरातील सर्वांनाच आलेले संकट त्रासदायक होते. पण म्हणतात ना! काळ पुढे सरकत असतो. प्रत्येक वेळ सारखी नसते.
काही वर्षांनी का होईना झगडून आम्हाला शेतीत अन् घरामध्येही वाटा मिळाला. आम्ही त्या घरात काही राहायला गेलो नाही पण शेती मात्र पुन्हा नव्या जोमानं कसली. मुलं ही अभ्यासात हुशार होती. आलेल्या संकटामुळे आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे थोडयाच दिवसात मुलं बरीच समंजसपणे वागत होती. मुलं चांगली शिकतात हे पाहून समाधान वाटत होते. शेतीमध्ये पिकपाणी चांगलं येत होते. काही जीवनचक्र चालूच होते. दुःख-सुखाचा. खेळ होता. सुख आले म्हणून गर्व न करता सर्वजण वागत होतो. पहाता पहाता थोरल्याचे म्हणजे नितीनचे लग्न झाले. तो पुण्याला नौकरीच्या निमिताने राहत होता. सतीशचे दोन-चार वर्षात लग्न झाले. तो परदेशी गेला. शौर्याचेही धूमधडाक्यात लग्न झाले. ती मुंबईला राहत होती. शेतीही आणखी एक ठिकाणी विकत घेतली. सख्ख्या काय अन् चुलत काय? दिरांचं काय चाललंय, कसे चाललंय याची चौकशी करावी अस वाटत नव्हतं. पण नवऱ्याला मात्र ओढ वाटतच होती. पुन्हा येणं जाणं विचारपुस करणं सुरू झालं होतं. यांचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं मन खूप मोठ्ठे होते. पण मला मात्र अनुभवलेला एक ना एक क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता. मनात आठवणींमुळे कडवटपणा येत असला तरीही गप्प राहणं भाग होते.

मला आता माझ सुख जपावे लागणार होते. माझ्या गोष्टी, माझी माणसं जपावी लागणार होती. यांची धोरणं कशी का असेना पण आपण माणसं जपायची सवय लागली. नितीशच्या घरी मी यांनी गेल्यावर एकटं वाटतं म्हणून रहायला आले. तिचं वागणं मला खटकत होतं. पहिल्यांदा गोड बोलून समजावलं नंतर नितीनला सांगितले पण कसले काय? मला भूतकाळ आठवायचा. यांनी, मी आणि लेकरांनी बिकट परिस्थितीत घालवलेले क्षण आठवत होते. त्यामुळे मी हक्काने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिचं सगळं वेगळंच. म्हणूनच आमच्या दोघींचं पटेना. सतीश परदेशी असल्याने मी तिकडं जावू शकत नव्हते आणि तो इकडे येवू शकत नव्हता. मी कष्टाने कमावलेलं सारं जपलं तर काय चुकलं? जगाच्या दृष्टीने मी माझं माझं करत होते. पण मग मीही एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. भविष्यात काय असेल ते पाहता येईल. शेवटी माझा देव माझी काळजी घेईल ना! आजपर्यंत कुणाला आम्ही दुखावलं नाही. कोणाच्या वाट्याचे ओरबाडून घेतलं नाही. देव माझा पाठीराखा होणारच. म्हणून तर यांच्या माघारी मी आल्या परिस्थितीवर हिमतीने मात करतेय.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!