नात्यांची समृध्दता

आज सकाळीच छान खमंग भाजणीच्या वासाने झोप चाळवली. तसं तर या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या दिवस रात्री या परदेशातील सुयोदय आणि सूर्यास्तावरच ठरलेल्या असतात. पहाटे उठणं अन् वेळेत सर्व करणं याच्या त्यांच्या व्याख्याचं वेगळ्या आहेत. यांच्या आयुष्यात काम, पैसा यांना महत्व आणि नाती, रिती-परंपरा, कर्तव्य, सामाजिकता कोण जपणार? अशा साऱ्या विचारांनी माझ्या मनात गोंधळ होत असे. एकीकडे राही जी माझ्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येवून चार वर्ष होत आले. तर दुसरीकडे सासूबाई. ज्यांच्या बरोबर गेली तीस वर्षे मी लग्न होवून आल्यापासून राहते. कधीकधीतर आमच्या घरात मजाच मजा असते. माझी सून एक बोलत असते अन् माझ्या सासूबाई दुसरंच काही ऐकतात. अन् त्यात जर स्वप्निल आणि रामरावांनी भाग घेतला तर छान नाटक सादरीकरण होते. तसे आमच्या घरात हसतं, खेळतं वातावरण असतं. म्हणूनच एकाच घरात तीन पिढया नांदतात अन् चौथ्या पिढीची वाट पहाणं सुरु आहे. राही या घरात आल्यापासून मला तर खूप मोठा आधार मिळाल्यासारखं वाटत होतं. तिच्या माझ्या विचारात तफावत असली तरी बऱ्याच वेळा ती समजून घेते आणि समजून सांगतेही. आजेसासूबाईंनाही
‘अहो आज्जी हे असंच करायचं ना। मला तुमच्या पद्धतीने स्वयंपाक शिकायचा.’
म्हणून मागे लागून तिने बरेच पदार्थ शिकून घेतले होते. तीचं आणि आज्जीचं सुत छान जुळायचं. खरं पाहता तीची घरातील सणसमारंभात बरीच मदत होई. सर्वांना काय हवं नको ते ती पाही. नवनवीन पदार्थही खाऊ घाले. पण आमच्या पिढीत एकदा सुन आली की सासू रिकामी देवदेव करायला. असं काही या पिढीच्या बाबतीत नव्हतं. एकदा ऑफिसची काही जबाबदारी तिच्यावर आली की मात्र ती एकदम व्यस्त होवून जाई. तिच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेच तिचे कंपनीत चांगलंच वजन होतं. तसं घरातही. ती घरी पाहुणे – राऊळे आणि ऑफिसमध्येही नावाजली गेली होती. घरातील सर्व तिच्यावर खूष होते. तरीही तिला मात्र, आणखीन प्रमोशन हवं होतं. माझ्या सासूबाई एकदा म्हणाल्या,
‘एकदा परत्वंडाचं तोंड पाहिलं म्हणजे मी आपली रिकामी साऱ्यांचा निरोप घ्यायला.’
यावर राहीही लगेच म्हणाली,
‘एवढ्या माझ्या छान आजींना, मी बरी जावू देईन. माझ्या लेकराला पंजीची माया, प्रेम कोण देणार?’
हे असं सारं चाले पण, निर्णय काही होईचना. काही बोलायला जावे तर स्वप्निल म्हणे,
‘आई, अगं अजून मला माझ्या बाळासाठी खूप काही तयारी करायची आहे.’
आता या नवीन पिढीला काय आणि कसं समजून सांगावं. आम्हीही संसार केला. आम्हालाही लेकर बाळं झाली. पण… शेवटी त्यांचा निर्णय. आपण काय बोलणार म्हणा. असा विचार करत चार वर्ष झाली. तसे पहाता माझ्या लेकीने म्हणजेच रुचानेही लग्नानंतर पाच वर्षानेच बाळाचा निर्णय घेतला होता. पण तिला झालेला त्रास आणि निर्माण झालेल्या समस्या वेगळ्याच होत्या. तसं तर या लेकरांना सांभाळणारे आम्ही आजी-आजोबा धड अवस्थेतले हवेत ना ! लग्न करताना उशिरा, पुढचा निर्णय उशिरा, प्रत्येक गोष्टीला केलेला उशिर हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी त्रासदायक ठरणारच ना ! मी आणि माझ्या सासूबाईंनी रुचाला यावेळेस एक जबाबदारी सोपवली आहे. तिला आत्या व्हायचंय की नाही. मग तिचं योगदान हवंच की. या दीपावली सणाला ती आली की भाऊबीजेला ओवाळणी काय घ्यायची हे तिचे तिने ठरवायचे. हा निर्णय व्यक्तिगत आहे. हे नवीन पिढीनेच ठरवले. पण कुटूंब संस्थेत रहाताना जे तुझं ते माझं आणि माझं ते तुझं. या भावनेनेच रहावे लागणार, तेव्हा तर सोबत रहाणाऱ्यांचं आयुष्य सहकार्य आणि सहचार्याचा आदर्श नमुना ठरेल, आम्हालाही आता कधी एकदा नात किंवा नातवंड होईल असं वाटतंय. तसं तर राहीला,
‘पुढच्या वेळेस लक्ष्युम्याला आपल्याला पिलवंड हवं हो खेळणी खेळायला आणि सारं आवरायला.’
या वाक्यावर नेहमीप्रमाणे काहीच न बोलता ती गालातल्या गालात हसली म्हणजे सकारात्मक निर्णयाकडे एक पाऊल पडतंय असंच समजायला हवं, हो ना!’ आयुष्यात यश, पैसा, प्रसिध्दी यासोबतच नात्यांची समृद्धता खुप महत्वाची असते. हे या पिढीला आता नाही पण कधी ना कधी समजेलच.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!