मानापमान
मी जरा रागानेच ऑफिसला निघाले होते. तेवढ्यात सासुबाईनी
‘अगं न जेवता अन् डबा न घेता जावू नकोस,’
असं सांगितल्यावरही मी तशीच घराबाहेर पडले. मागे एकदा माझ्याकडून भाजीला जरा मीठ जास्त झाले तर समीरने घर पार डोक्यावर घेतलं. नुसतं डोक्यावरच घेतलं नाही तर त्याने मला बरंच काही ऐकवलं. तो म्हणाला, ‘मी दिवसभर मरमर करून काम करतो, सगळा व्याप सांभाळतो पण घरी आल्यावर व्यवस्थित जेवणंही देणे होत नाही तुला.’ आता कालच माझा वाढदिवस होता. वाढदिवसादिवशी बाहेर जेवण करू म्हणत असताना तो मात्र, ‘घरात जेवणं किती महत्वाचं, घरचं अन्न शरीराला कसं चांगलं याचे गोडवे गात होता.’ खरंतर मी ही नौकरी करत होते. माझ्यावरही जबाबदाऱ्या आणि ताण, अपेक्षा होत्याच की मग….
मला समीरच्या वागण्याचा त्रास होतोच, पण सांगायचं कोणाला? घरात सासू-सासरे, मी आणि समीर. आमचे लग्न होवून तीन वर्षे झाली. मी आणि समीर वेगवेगळ्या कंपनीत नौकरीला. समीर गाडीने जातो तर मी बसने. खरंतर मीही गाडीनेच जात होते. पण एकदा कंपनीत झालेल्या कटकटींमुळे माझं लक्ष गाडी चालवण्यावर नसल्याने माझ्या गाडीमुळे एक रस्त्याकडेचा फळांचा गाडा पालथा झाला. नशीब फळवाल्याला काही झालं नाही पण तेव्हापासून माझी गाडी वापरणं बंद झालं. साहजिकच मी गाडीवरून जाता येता जी काम करत होते. ती समीरला करावी, लागत होती. तरीही घराच्या आसपास शक्य असणारी सर्व कामं, मीच करत होते. तसं पहाता एकदा झालेली चूक पुन्हा पुन्हा होतेच असं काही नाही. पण तू वेंधळ्यासारखं करतेस या सबबीखाली मला काही गाडी मिळाली नाही पण यामुळे माझी जास्तच ओढाताण होवू लागली. बसने जायचं म्हणजे वेळेपूर्वी निघायचं आणि गर्दीचा सामना करावा लागे तो वेगळाच. घामेजलेल्या अन् धक्काबुक्कीच्या स्पर्शांनी मी वैतागून जात होते. ऑफिसची अन् घरची जबाबदारी तर चुकलीच नव्हती. सकाळ, संध्याकाळचा स्वयंपाक, धुण्याचं मशीन लावायचं, नाश्ता अन् येणारे जाणारे पाहुणे. करायचं करायचं, आणि करायचं. जबाबदाऱ्या घ्यायला माझी ना नाही पण मग सन्मानाच्या वेळी का विसर पडतो माझा? मला समानता हवी. किती दिवस आपण, हे असंच होतं, असंच आहे आणि पुढेही असंच चालत रहाणार असं म्हणणार. पहिल्यापासून सासूबाईनी सर्वांचं आदरातिथ्य मनापासून केलेलं. तो त्यांचा मोठेपणा आहेही. त्या करु शकल्या कारण त्या नौकरी करत नव्हत्या. त्यामुळे घरातली अन् इतर कामे त्या करत. बाहेरील सर्व कामे सासरे पहात. ‘तुला बाहेरचं काही जमणार नाही.' या सबबीखाली त्यांना कधी घरातल्यांनी बाहेर पडूच दिलं नाही. स्यामुळे साहजिकच त्यांनी घराला आदय कर्तव्य मानले, म्हणजे त्यांचे चुकलं अस नाही पण आत्मविश्वास हरवला तो कायमचा. पण झाले असे की सासूबाईंनी पेलवलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी ही पेलवल्याच पाहिजेत ही अपेक्षा साऱ्यांचीच. खरंतर मला नौकरी सांभाळून सासूबाईंसारखे सारं करायचं म्हणजे तारेवरची कसरत होई, प्रचंड ताण येई, तरीपण मी सारं बाजूला ठेवून घरी-दारी अपेक्षांचं ओझं वाहतच होते. पण मी पण माझ्या नवऱ्यासारखीच नौकरी करत होते. अर्थातच करत होते तरी पण घरात सगळीच कामं करण्याची जबाबदारी माझीच.
परवा आम्ही दोघंही घरात आलो. विशेष म्हणजे मी येण्याआधी पंधरा मिनीटे तो आला. तरीही मी येवून नुकतीच जमिनीवर आरामात पाय पसरून बसून दोनच मिनिटे झाले; तर लगेच समीरने पाणी आणण्यास सांगितले. खरंतर दमले तर मीपण होते, मग असे का ? पण परंपरेने चालत आलेल्या परंपरा आणि चुकीचे समज-गैरसमज. मात्र गेल्या महिन्यात मी दमून आले होते. माझ्या पूर्वी समीर आला होता. त्याच्या शेजारीच तांब्या-भांडं होतं. त्याने पाणी पिले मग मला पण देना. असे म्हणाले तर समीरच काय पण सासूबाईही चिडल्या. ‘पुरुषाला पाणी दयायला सांगतेस. अपमान करतेस काय त्याचा? तू कमवतेस म्हणजे काय झालं?’ आणि बरेच काही. माझा अपमान होतो की सन्मान याचा विचार तर मी कधी करतच नाही. पण हा मानापमानाचा खेळ हा फक्त त्यांनी खेळायचा आपण नाही. वाढदिवसादिवशी बाहेर जेवायला जावू एवढी साधी अपेक्षा. इतर वेळेस दोघांची ऑफिसं दोन टोकाला म्हणून जास्त कधी बाहेर खाणं -पिणं होत नाही, पण एखादा दिवस आयतं खावे म्हणलं तर 7 या सर्वांना पटेल तर शपथ! मी चिडायचं नाही, राग व्यक्त करायचा नाही. पैसे कुठे खर्च होतात विचारायचं नाही. स्वतः मनाने कुठे पैसे खर्च करायचे नाही. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच करायचं. बाकी निर्णयक्षमता असली तरी गुंडाळून ठेवायची. कुणाला सल्ला दयायचा तर नाहीच पण स्वतःचे निर्णय सुद्धा स्वत: घ्यायचे नाही. पुरुष नौकरी करत असेल तर त्याला महत्त्व, स्रीचं काय? मलाही कधी एक कप चहा आयत्ता मिळाला तर? मलाही तू नौकरी करतेस म्हणून थोडा खर्च करण्यास मोकळीक दिली तर? कधी मी ही नौकरी करुन आले की मला आयतं मिळावं वाटतं पण मग माझे चुकते का? कधी स्त्रीयांनी हक्कांची जाणीव होवून थोड्याफार प्रमाणात मागणी केली तर त्यांच्या नावाने शंखनाद. तिला घरची अन् दारची जबाबदारी घ्यावी तर लागणारच. मग जरा तिलाही घरात समानतेची वागणूक मिळालीच पाहिजे. हा निर्णय आपणा सर्वांचाच असायलाच हवा. नसेल तर तसे करण्यासाठी आपण प्रयत्नशील असायलाच पाहिजे. मी आज बंडाचे पहिले पाऊल उचलले आहे आणि तुम्ही?