फ्रॉड
माझा मोबाईल खणखणत होता. माझ्या हातातले काम सोडून फोन घेईपर्यंत त्याची रिंग वाजतच होती. मी फोन घेतला तेव्हा पलीकडून अनोळखी व्यक्ती बोलत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी प्रथम मला,
“नमस्कार, सुनीता परांडकर का? मी मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलगुरू बोलतोय.’
एवढं वाक्य म्हटल्यावर मला येणारा फोन हा खूप महत्त्वाच्या व्यक्तीचा आहे, हे लक्षात आले. त्यांचे नाव होते प्रा. पवार एन. एम. त्यांनी एका दिवाळी अंकात माझी कविता वाचली होती. त्यांना ती आवडल्याचंही मला फोनवर सांगितलं. मी लिहिलेली कविता त्यांनी आवडल्याचं सांगितल्याबरोबर मला खूप आनंद झाला. कोणीतरी मला खास फोन करून तुमचं लेखन आवडल्याचं सांगणं ही गोष्ट मला खूप महत्त्वाची आणि आनंद देणारी होती. नाहीतरी आजकाल साहित्य वाचतं कोण? वाचलंय तर वाचलेलं साहित्य आवडलं असं आठवणीने सांगतं कोण? लेखक किंवा लेखिका यांच्या लेखनापेक्षा दिसण्यासाठी महत्त्व जास्त. मला साहित्य आवडल्याचे फोन आला हे माझ्यासाठी खुप महत्वाचे होते. त्यापुढे त्यांनी मला आणखी एक सुखद धक्का दिला. तो म्हणजे माझ्या कवितेची निवड पदवी अभ्यासक्रमासाठी करण्यात आली होती. आता मात्र मला मी स्वप्नात असल्यासारखं वाटू लागलं. मी काय ऐकतेय यावर माझा विश्वासच बसेना आणि मला आता काय बोललं पाहिजे, हेही माझ्या लक्षात येईना. पण तेवढ्यातही मी त्यांचे आभार मानले आणि तुमचा फोन नंबर द्या असं सांगितलं. पण पवार सरांनी मला तुमच्या फोनवर आलेला नंबर माझ्या नावावर फीड करा, असं सांगून पत्रव्यवहारासाठी माझा पत्ता विचारून घेतला. मी पटकन् माझा पत्ता दिला. त्याबरोबर तुमच्या कविता निवडीचे पत्र लवकरच पाठवू असे सांगून त्यांनी फोन ठेवला. माझा आनंद गगनात मावेसाना झाला होता. मी लगेचच ह्यांना ऑफिसमध्ये फोन करून माझी कविता मराठवाडा विद्यापीठातील अभ्यासक्रमात निवडल्याचं सांगितलं. ह्यांनी माझं अभिनंदन केलं आणि घरी आल्यावर बाकीचं बोलू, असं सांगून ते जरा कामात आहेत, असं सांगून फोन ठेवला.
मी लगेच माझी मैत्रीण सरिता, रिमा, हिना यांना फोन करून ही बातमी दिली. त्यांनी अभिनंदन करून लगेच पार्टीची मागणी केली. तू आता मोठी साहित्यिका होणार आणि बरंच काही माझ्या गौरवादाखल बोलून येत्या रविवारी पार्टी दे असं सांगून फोन ठेवले. सासूबाईंना सांगावे म्हणून मी उत्साहाने त्यांच्या खोलीकडे वळले. त्यांचं टीव्ही पाहाणं सुरू होतं. दुपारच्या मालिका पाहायला त्यांना आवडते. मी काय म्हणते हे त्यांना जास्त काही लक्षात आलं नाही. पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या
‘असं का बरं बरं’
म्हणून टीव्ही पाहाण्यात गुंतल्या. मी मात्र खूप आनंदात होते.
क्रमशः