सुजलची आई होवूनही आता चांगली सतरा अठरा वर्ष झाली. लग्नाला एकवीस वर्ष झाली. लग्नापूर्वीच मी नरेशला बोलून ठरवून टाकले की, मी लग्नानंतर नौकरी करणार तसं माझ्या माहेरीच मी नौकरी करणे अपेक्षित नव्हते, काय शिकायचे ते शिका मात्र तुम्हाला नौकरी करायचीच असेल तर तुमच्या घरी गेल्यावर म्हणजेच नवऱ्याच्या घरी गेल्यावर मग करा. असे आई-बाबा नेहमी म्हणायचे. मला दोन बहिणी आणि एक भाऊ होता.
आम्ही खेडेगावात रहात असल्याने थोडी फार बंधने होती. स्त्रियांनी नौकरी करणे आता एकविसाव्या शतकात जरी सर्वमान्य असले तरी आमच्या घरात मात्र आजपर्यंत कोणी नौकरी केली नव्हती. मी सगळ्यात थोरली होते. त्यामुळे परिवर्तनाची सुरुवात माझ्यापासून होत असली तरीही परिवर्तनासाठी दयावयाचा लढा किंवा काही मत-मतांतरे मलाच सहन करावी लागत होती. पहिलं तर गावात जेवढे शिक्षण आहे. तेवढेच घ्यायचे असे सांगण्यात आलं. पण शेवटी आई, आज्जीच्या सहकार्याने पुढील शिक्षणासाठी मी शहरात गेले. शिक्षण चांगले चालले होते पण आज्जीच्या वयोमानानुसार तिचे या जगातून जाणे अन् आईला झालेला संधीवात यामुळे तिचे आजारी पडणे.
यामुळे माझे शिक्षण मधेच थांबले. तसे माझे शिक्षण पूर्ण झाले असते तर मी आमच्या घराण्यातली पहिली महिला इंजीनिअर झाले असते पण नियतीला हे मान्य नव्हते. मला मात्र अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागल्याचे शल्य मनात असूनही प्राप्त पारिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र मी माझ्या दोन बहिणी व भावाच्या शिक्षणाची हेळसांड होवू दिली नाही. पहाता पहाता सात-आठ वर्षे गेली, लग्नाच्या घडामोडी घरात सुरु झाल्या. घरात स्थळावर स्थळ येत होती. शेवटी इंजिनिअर असलेल्या नरेशची निवड बाबांनी केली. मलाही मनस्वी आनंद झाला कारण स्वत: इंजिनिअर नाही
झाले तरी नवरा तरी इंजिनिअर मिळाला. आईचे आजारपण कमी जास्त होत होते. बाबांनी मात्र लग्न जमल्यानंतर अवघ्या चार महिन्यात लग्न लावून दिले. नरेश पुण्याला रहायला होते. घरी आई- वडिल आणि एक छोटा भाऊ. एवढ्या मोठ्या शहरात रहायचे म्हणजे नवीन असताना मला दडपण येई. हळूहळू मी या वातावरणात रुळले. नवीन वर्ष असतानाचे सुवर्ण क्षण आणि नाविन्यपूर्ण अनुभव मी मनाच्या कुपीत साठवत होते. माझ्या संसारवेलीवर पुष्प उमलले. मी आणि यांनी त्याचे आवडीनठेवले सुजल ठेवले, खरंतर लग्नानंतर तीन-साडेतीन वर्षानंतर झालेल्या सुजलचे घरात कोडकौतुक झालेच, पण तो म्हणजे आमच्या सर्वाचा जीव का प्राण होता. त्यामुळे तो थोडा मोठा झाल्यावर मी नौकरी किंवा वेगळ काही करण्याची इच्छा जाहीर केल्यावर माझ्या सासू सासरे व छोटया ननंदेने सुजलच्या संगोपनाचे कारण दाखवत नौकरी न करण्याचा सल्ला दिला.
मी फक्त सुजलसाठीच सर्व काही करत होते. त्याचे संगोपन अगदी क्षण अन् क्षण जपून जोपासले. तसेच माझे लेकरू माझ्या नौकरी न करण्याच्या कारणास कारणीभूत न ठरवता मी घरातून छोटासा साडीचा बिझनेस सुरू केला. खरंतर नरेशने पहिला या गोष्टीलाही विरोध केला पण मी घराकडे, सुजलच्या जबाबदारीत कुठेच कमी पडणार नाही हे वचन मी त्यांना दिल्याने पुन्हा वातावरण माझ्यासारखे झाले. मी सुजलच्या संगोपनासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होते. ती घेणे माझे कर्तव्यच आहे हे मला मान्य होते. पण नरेशचे मात्र काहीच कर्तव्य आहे असे त्याला आणि घरातील कुणालाच वाटत नव्हते. उलट तो नौकरी करणे म्हणजे त्याचा राजेशाही थाट होता.
सुजलने काय खावे, काय खावू नये, काय घालावे, काय अभ्यास करावा सारे मी ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनतही मीच घेत होते. मग जरी मला प्रथम सुजलच्या यशाच्याची बातमी कळली. तरी नरेशला वाईट वाटणं कितपत योग्य होतं. तसे तर शाळेने त्यालाच पहिला फोन केला होता ना! विचार केला तर सुजलबरोबर नरेशचंच नाव लावलं जात होते ना! मग मी तर पडदयामागची कलाकार ठरणार होते, तसंही मला नावाची अपेक्षा नव्हती आणि नाहीही. मी फक्त इमारतीमधील पायाची वीट होते. जी महत्त्वाची भूमिका पार पाडते पण कोणाला दिसत नाही. कोणी माझे नावही घेत नाही. सत्काराची मानकरी तरीही मी दुर्लक्षित असणंच महत्वाचं. .