मी स्वयंपाकघरातून बाहेर पाहिलं. प्रकाशवर त्याचे बाबा चिडले होते. त्याने स्वतःसाठी मोबाईल आणि फुड प्रोसेसर आणलं होतं. खरंतर तो कमावता आहे. त्याच्या मनाप्रमाणे पैसा खर्च करू शकतोच ना ! यांनी ज्या चिकाटीने संसार केला. तसाच त्याने करावा असे यांचं मत. पण आजची पिढी आपल्या मनाप्रमाणे थोडेच वागणार आहे. संसारात सगळी हौस मौज आणि गरजाही पुरचुंडीत बांधून मनाच्या खोल डोहात तळाशी ठेवल्या जातात. जसा प्रकाश मोठा होऊ लागला. तसे दोघात मतभेद होवू लागले. कोणतीही गोष्ट तो तुलाच कसं सांगतो? माझ्याशी का नाही बोलत. यावरुन चिडचिड करत तर दुसरीकडे ‘आई, तू बाबाचं चूकतं हे का नाही सांगत? अशा सॅंडविच अवस्थेत मला काय करावं ते सूचतंच नव्हतं,
प्रकाशचे बाबा तर त्याला कमवायची अक्कल आली पण व्यवहारज्ञान नाही. अशा उधळपट्टीने तो दोन खोलीतच रहाणार असे म्हणायचे. प्रकाश दोनच काय चार खोल्यांचं घर घेईल असा मला विश्वास होता. आजची पिढी उगाचच कोणत्याही गोष्टीचा ताण घेवून विचार करत नाही म्हणजे ते बेजबाबदार असतात का? शिक्षण घेण्यावरूनही घरात ताण निर्माण झाला होता. पण प्रकाश मात्र स्वतःच्या मतावर ठाम होता. तो चित्र खूप छान काढायचा त्यातच त्याने करियर केले. एका जाहिरातीच्या कंपनीत तो नोकरीला लागला.
प्रकाशने काही नवीन आणलं की यांची चिडचिड सुरुच. खरंतर लेकराने घरासाठी किंवा स्वतःसाठी काही वस्तू आणल्या तर त्यांच कौतुक करायचं सोडून कुरकुर कसली करतात देव जाणो. यावेळी मोबाईल घेतल्यावर चिडले म्हणून दोघांच्या बोलण्यामध्ये पडले तर माझ्यावरच बरसले. तूझ्यासारखी वायफळ खर्च करायची सवय आहे तुझ्या मुलाला. तो वायफळ, फालतू खर्च करतो. यांच्या भाषेत बोलायचं म्हणजे पै पै साठवून नव्हताच मुळी प्रकाश, पण आज चांगले दिवस आले असतानाही असंच का वागायचं? मला विश्वास होता. कधी कधी थोड्याफार चुका होतात त्याच्याकडून. पण म्हणून दरवेळेस चूकच. असे म्हणता येणार नाही. आमच्या वादावादीमध्ये तो मध्ये पडला नाही. वातावरण थोडेस शांत झाल्यावर मात्र आईस्क्रिम आणतो सगळ्यांसाठी असं तो म्हणाला. पण यावर त्यांची काहीच प्रतिक्रिया नाही. बाबाची चप्पल प्रकाशच्या पायात बसू लागली आणि दोघांमध्ये एक दरी निर्माण झाली.
एके दिवशी यांच्या नावाचं कुरियर आलं. मला तर खूप नवल वाटलं पण आश्चर्य भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. मला तर कळेचना पण प्रकाश बराच वेळ हे सर्व पाहूनही गप्प होता.
थोड्यावेळाने मात्र तुमच्या नावाने आलंय तर पहातरी उघडून असं म्हणून त्यांच्या जवळ गेला. पण हे तयारच होईनात. शेवटी प्रकाश व माझ्या आग्रहाखातर त्यांनी पार्सल उघडलं’, ‘रेबन गोगल’ होता. त्यांच्या चेहऱ्यावरील स्वर्गीय सुखाचा भाव टिपण्यासारखा होता त्यांची रेबनचा गॉगल घ्यायची हौस त्यांना कधी पूर्ण करताच आली नाही. पण आज नकळत न विचारताच लेकाने पूर्ण केली होती. गॉगल हा पप्पांसाठीच मी मागवला आहे. हे प्रकाशने सांगितल्यावर तो महागडा गॉगल परत कर म्हणाले. पण तो म्हणाला, “बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप केलंत. आई-बाबा तुम्ही स्वतःचं मन मारून माझी प्रत्येक हौस मौज पूर्ण केलीत. बाबा तुमच्याशी मतभेद होत असले तरी तुमची माझ्याविषयीशी तळमळ मला समजत होती.” माझ्या मनात आलं. खरंतर प्रत्येक घरात, बाप-लेकात अदृश्य भिंत असतेच. आईशी जेवढं मनमोकळे पणानं मुलं बोलतात तेवढं बाबांशी नाही. बोलतांना त्यांना दबाव वाटतो. एवढ्यात प्रकाशने बाबांना मिठी मारली. खरंतर यांच्या डोळ्यात तरळलेलं पाणी मी पाहिलं होतं पण ते प्रकाशने पाहू नये म्हणून यांनी डोळ्यावर गॉगल घातला अन् म्हणाले कसा दिसतोय गॉगल.
यावर प्रकाश ‘कडक SS’ म्हणाला. यांनी पटकन आतल्या खोलीत आरश्यात बघतो म्हणून पाय काढता घेतला. आत गेल्यावर दार लावून घेतले. पण थोड्या वेळाने त्यांचे डोळे, चेहरा पाहून मनात साठलेलं मळभ नेत्रांवाटे वाहून गेलं आणि अभिमानाने ऊर भरल्याचंही माझ्या लक्षात आलं. रेबन गॉगल त्या सुखाश्रुंमध्ये न्हावून निघाल्याच निश्चित झालं.