आज माझा वाढदिवस असला तरी तो आपणहून लक्षात आणून दयायचा नाही असं मी ठरवलं होतं. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनींचे स्टेटस व मेसेज दिवसभरात ओपनच करायचे नाही असे ठरवले. मी नेहमीप्रमाणे पहाटे पाचचा गजर लावला होताच पण त्यापूर्वीच जाग आली. आवाज न करता मी खोलीच्या बाहेर आले, बाहेर पडण्यापूर्वी मी यांना त्रास नको म्हणून गजर वाजू नये म्हणून आधीच तो बंद करून टाकला. दररोज प्रमाणेच दिवस उगवला की कामांची यादी तयार होतीच. मला आज ऑफिससाठी घरातून जरा लवकर म्हणजे नऊलाच निघावं लागणार होते.
काल रात्री मीच तुला ऑफिसला सोडतो असं सांगितल्यापासून मी निर्धास्त झाले होते. एक एक करत सगळी कामं मी हातावेगळी करत होते. यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे उठतीलच, हे मला माहित होतं. नाहीतर यांनी जरी लवकर उठले तरी मला त्याचा काही फायदा नव्हता. कारण आजपर्यंत त्यांनी माझ्या कामात मदत केली नाहीच पण स्वतः स्वतःचे आवरायचेही यांना होत नव्हते. शेवटी काय घरातील इतर सदस्यांप्रमाणेच मला यांची काळजी घ्यावीच लागणार होती. नेहमीपेक्षा पाच दहा मिनिटं उशिरच झाला होता. खरंतर आज सकाळपासून माझ्या मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले सहकारी यापैकी एकाचाही फोन झाला नाही.
एवढया घाईत फोन घ्यायचा ठेवायचा हे सारं करायचे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे होते. देवच पावला होता की कोणाचा फोन आला नाही. शेवटी मी नेहमीप्रमाणे व्यवस्थित आवरून निघाले. तसं यांचं माझ्याकडे कधी लक्ष जात नाही, आजही जाणारच नव्हते. कारण कितीही वेळा मी यांच्याकडे मागणी केली की, अहो मी घातलेला ड्रेस किंवा साडी कशी दिसते हे सांगत चला किंवा मी आवरल्यानंतर कशी दिसते सांगत चला. पण छे! यांना असे नेहमीच वाटतं, म्हणजे तसं त्यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे, की तू नेहमीच छान दिसतेस काहीही घाल. मग ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची मला गरज वाटत नाही. खरंतर त्यांनी मला तू छान दिसतेस असं म्हणल्यावर मला हर्षवायू होवून काही होईल की काय? असं त्यांना वाटत असावे.
तरीही माझा स्वभाव अपेक्षा करण्याचा आणि त्यांचा स्वभाव अपेक्षा लक्षात न घेण्याचा. म्हणूनच की काय देवाने आमच्या दोघांची जोडी बनविली होती. आजही वाढदिवस असल्याने मी छान अशी माझ्या आवडीची गुलाबी साडी घातली होती. यांना माझे कुरळे लांब केस खूप आवडतात. फक्त ते वेळोवेळी व्यक्त करणं त्यांना माहित नाही एवढंच. आजही तसंच असणार. मी निरपेक्ष भावनेने गाडीवरून उतरून ऑफिसकडे वळले. दिवसभर कामाच्या घाईत वेळ कसा गेला कळलेच नाही. ऑफिस नंतर आम्ही दोघांनी तास दिडतास खरेदी केली. आज आमच्याकडे माझा भाऊ वहिनी येणार होते. ते येणार आहेत, हे यांनाही माहित होते. त्यांनी विचारलेही नाही. नेहमीप्रमाणेच परस्पर तर्क लावून रिकामे. असेल काही कार्यक्रम गावात म्हणून येत असतील. त्यात काय विचारायचे? आम्ही घरी पोहोचलो. ते दोघंही आले होतेच. यावेळी वाढदिवसासाठी दादाने माझ्यासाठी खूप छान साडी आणली होती, ती तो वाढदिवसाच्या वेळी मला देणार होता. मी स्वयंपाक घरात काही तयारी राहिली का? हे पाहत असतानाच हे अचानक स्वयंपाक घरात आले. आणि हॉल कशासाठी सजवला आहे असे विचारले. नेमके याचवेळी आमचे बंधूराज स्वयंपाक घरात आले. त्याने प्रश्न ऐकला आणि तो आश्चर्यचकित झाला. ‘अहो आज सरलाचा वाढदिवस. विसरलात की काय भावोजी?’ असं म्हणू लागला. हे काही बोलणार एवढ्यात सासूबाईंनी सर्वानाच हॉलमध्ये बोलवलं. मी पटकन गेले. नेहमीप्रमाणे मीच यांना स्वतःच्या वाढदिवसाची आठवण करून देणे टाळले होते.
आज जर यांच्या लक्षात असेल तर सकाळपासून एकदाही त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा का दिल्या नाहीत? याचे मला आश्चर्य वाटत होते. आज यांनी सर्वांसमोर भेट दयायचे विसरले तर मला वाईट वाटणार नाही पण हे काय साधं वाढदिवस लक्षात नाही असं बाकीच्यांनी म्हणलेले मला चालणार नाही. एवढयात सर्वांनी केक कापण्यासाठी यांना हाक मारल्यावर आलोच दोन मिनिटात म्हणत यांनी आत जाऊन मला आवडणाऱ्या आणि मला गंधीत करणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा चांगला हातभर गजरा माझ्या केसात सर्वांसमोर माळवा. मी लाजेने चूर झाले. कुणाला कळणार कसं माझ्या कानात हे कुजबुजले, ‘ आजपासून तुझ्या प्रत्येक गुणांचं कौतुक मी करणार आहे. हीच वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्याकडून तुला अनोखी भेट.