दुर्गा

रितीका घाईघाईने आवरत होती. तिला आज नवरात्रोत्सवात स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी यादी काढायची होती. मोठमोठ्या पदावर असणाऱ्या स्त्रियांना सत्कारित करण्याची योजना होती. खरंतर अशा अनेक स्त्रियांना ती ओळखत होती. पण यावर्षी काहीतरी वेगळं कर असा माझा आग्रह होता. त्याच त्या व्यक्तिंना पुरस्कार देणं किंवा सन्मान करणं एवढं महत्वाचं नाही. त्यापेक्षा समाजातील अशा स्त्रियांचा शोध घे ज्या खरोखरच सन्मानपात्र आहेत. शेवटी काय? स्त्रियांमधील जिद्द, चिकाटी, धडपड, कार्यक्षमता, सोशिकता, सहनशीलता, शूरता, बुद्धीमत्ता, कणवाळूपणा, मातृत्व, हळूवारपणा आणि अशा अनेक गुणांनी युक्त असणाऱ्या माता भगिनी समाजात पदोपदी आढळतात. त्यांचा सन्मान हेच खरे ध्येय असले पाहिजे, असे विचार रितिकाला मी सांगितले. तिलाही ते पटलेच होते म्हणूनच तिने विचारपूर्वक यादी तयार केली.

या आजकालच्या पोरींचा स्वभाव पाहिला म्हणजे खूप नवल वाटते. खरंच ऑफिस, घरकाम एवढं केल्यावर स्वतःचे छंद जोपासणे, स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवण्याचा प्रयत्न करणे. शिवाय सामाजिक कार्यात सहभागी होणे. खरंच अष्टभूजा धारिणीच जणू प्रत्येक घरात कार्यरत आहेत असे वाटते. आम्ही लग्न होवून न कळत्या वयात आलो असलो तरी स्वतःच्याच मुला मुलीच्या बाबतीतही काही साधे सोपे निर्णयही आम्ही घेतलेच नाही. रितिका आणि नक्षचं लग्न त्यांच्या मर्जीने आणि योग्य वयात होवू दिले. आजकाल प्रत्येक पालकाला परवानगी दयावीच लागते.
तुमच्या मनाप्रमाणे करण्याची परवानगी देणार नाही असं म्हणण्याचा प्रश्नच येत नसतो ना! तरीही आजची पिढी वयाच्या मानाने जास्त समजदार, मनमिळावू अन् वैचारिक पार्श्वभूमीवर प्रगल्भ असते. रितिका आणि नक्षच्या लग्नाच्या वेळी बराच भाव-भावनांचा गुंता झाला वैचारिक मतभेद झालेही पण पुन्हा काही महिन्यांनी सारं पूर्ववत होणार असा विश्वास माझ्या मनात होताच. माझी सून रितिका तशी खूप समंजस, कामसू, जिद्दी होतीच पण दुसऱ्याला सन्मान देण्याची तिची भूमिका तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख देणारी होती. तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीविषयी ती सहृदयपूर्ण विचार करतेच, पण या नवरात्रात मात्र ज्या सन्माननीय स्त्रीयांचा सन्मान करायचा त्यामध्ये तिने आमच्या घरातल्या, सोसायटीतल्या कामवाल्यांचा सन्मान करावा असा प्रस्ताव मी ठेवला होता पण तिचं म्हणणं’,
‘त्या असं काय विशेष काम करतात. चार घरची कामं करून पोट भरण्याचेच तर काम करतात ना! हे काम त्यांना करावे लागते कारण त्यांनी योग्य शिक्षण म्हणण्यापेक्षा शिक्षणच घेतलेलं नसतं’

मग पण मी तिला एक दिवस त्या शिक्षण न घेण्यासाठी बरीच कारणं सांगितली. कारण मलाही सामाजिक कार्याची आवड असल्याने घरात बसून का होईना रितिकाच्या सासऱ्यांच्या कार्यात हातभार लावत होते. आमच्या घरी कामाला येणाऱ्या शांताबाईंच्या बद्दल तिला सांगितलं, शांताबाई सहा-सात घरची कामे करून आलेल्या पैशात स्वतःच्या घरचा खर्च भागवते. काही ठिकाणी भिशी लावलीय, तर विचार ही येणार नाही अशी गोष्ट म्हणजे ती जवळच्या वृद्धाश्रमात जावून तेथे काही सहकार्यही करते. यावर माझ्या सुनेला वाटलंच तिला धुणी-भांडी करून येणाऱ्या एवढ्या-तेवढ्या पैशात ती काय मदत करणार. शेवटी मग मी तिला सर्व व्यवस्थित सांगितलं ती दर शनिवार-रविवार दोन-तीन तास जे काम असेल ते ती तिथं जाऊन करते. त्या कामाचा मोबदला घेत नाही. भले ती पैसा दान करत नाही. भले ती अन्न-धान्य पुरवत नाही पण जे तिला शक्य आहे. ती ते करते. हे तरी काय कमी आहे का?

दुसरे आमची दुधवाली मावशी. सोसायटीत दूध घालून जर काही दूध शिल्लक राहिले तर सोसायटीच्या आसपास गरीब गरजू लोकांना ती ते देते. कधी दुध शिल्लक रहातेही तर कधी नाहीही.

तिसऱ्या आमच्या स्वयंपाकवाल्या मावशी, सोसायटीतल्या पवार आज्जीच्या घरी जावून अगदी कमी मोबदल्यात का असेना स्वयंपाक करून देतात, मुलं परदेशी असतात ना त्यांची. आज्जींना देश सोडून जायचं नाही. मुलांना कधी आई बाबांची आठवण येते तर कधी नाही. कधी पैसे येतात अन् कधी… सगळाच वांदा. म्हणूनच ते सध्या दोघंच राहत असुनही खर्चाचं अवघड होतं. आताशा काकूंना काम होत नाही, पण मावशीची ही अनमोल साथ असल्याने काकू काका आनंदाने सोसायटीत राहतात.

चौथी आमची सोसायटीची माळीण आजी. सोसायटीतल्या नकाते आज्जीला दररोज फुलपुडा देतात पण कधी मोबदला घेत नाहीत. नकाते आज्जीला ती सांगते, तुमच्या मुलाने मला फोनवरुनच पैसे पाठवले. मी हाच अनमोल विचार केला की आज कामवाली, स्वयंपाकवाली, दुधवाली, माळीण या सर्वांमुळे कोणा न् कोणाला नकळत महत्वपूर्ण मदत होते. आपल्या संसाराची काळजी वाहणारे सारेच असतात पण आपण जर दुसऱ्याचा विचार केला तर माणुसकी टिकेल, आजकाल माणुसकीच नाही, कोरडी नाती आहेत. अशा गोष्टी आढळणार नाही… यावेळेस नवरात्रोत्सवात या सर्वांचा सन्मान करणं किती उचित आहे. हे सर्वांनाच पटल्या वाचून रहाणार नाही, एवढे खरे.
रितिकालाही माझं म्हणणं पटलं. ‘आत्ती खरंच तुमच्या मतांचा मी आदर करते.’ तिच्या या वाक्याने ही जणू तिने माझ्या व तिच्याही नकळत माझा सन्मान केला होता. शेवटी सुनं कोणाची आहे म्हणा. नव विचारांची नवदुर्गाच जणू.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!