
आयुष्यात कर्तव्य करणं हे प्रत्येक स्त्रीच्या वाटयाला येतंच तसं ते माझ्याही आलं. मी ते प्रामाणिक आणि मनापासून केलं. माझं नाव जयमाला. मी पेशाने शिक्षिका. एक मुलगा- एक मुलगी आणि पती. चौकोनी कुटूंब होतं. खरंतर देशाचे नागरिक घडविण्याचे महत्वपूर्ण काम शिक्षक मन लावून करतात, मीही केलं. आयुष्यात हाती घेतलेलं काम पूर्ण तर करायचंच पण ते काम म्हणून न करता तो एक छंद म्हणून त्याकडे पहायचं हे माझं तत्वं. मी घडवलेले अनेक विदयार्थी आयुष्यात यशस्वी झालेच पण एक आदर्श व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. संसारातही मी आनंदी आणि समाधानी होते. मुलगा शिकून सध्या परदेशात स्थिरावला तर मुलगी देशातच दिल्या घरी समाधानाने संसार करत होती. आम्ही दोघंच असायचो. अलीकडे मात्र एकदा एका जीवघेण्या प्रसंगाने आमचे आयुष्य बदलून टाकले. मुलीचा संसार चांगला पंचवीस वर्षे झाला. ती समाधानाने संसारात रमली असतानाच अपघाताने तिचा संसार उद्ध्वस्त झाला. काळाने झडप घातली अन् दोन पिलांच्या आईला आमच्या पासून हिरावून दूर दूर नेलं. जिथून कुणी परतत नाही अशा ठिकाणी गेली ती. हा धक्का माझ्या नवऱ्याला पेलवलाच नाही अन् तोही अटॅक आल्याने अचानक गेला. लेकीसोबत माझाही संसार उद्धवस्त झाला. कारण मुलगा परदेशात त्याच्या बायको मुलासह रहात होता. मी मात्र भारतात एकटीच होते. तो वरच्यावर पैसे पाठवून काय हवं नको विचारपूस करत होता. पण भारतात परत येण्याच्या विचारात नव्हता. मला परदेशात जाणे, रहाणे जमणार नव्हतं. सगळ्या परिस्थितीचा मनस्थितीवर वाईट परिणाम झाला आणि शारीरिक दुखणे मागे लागले. मी आलेल्या परिस्थितीपुढे हात टेकले, आयुष्यभर इतरांना विचारांनी कणखर बनविणारी मी स्वतः हताश झाले होते. यातच माझ्या गुडघ्याच्या वाट्या काम देईनाशा झाल्या. परिणामत: मला व्हिलचेअर वापरायची वेळ आली. पहाता पहाता स्वत: सर्व करणारी मी साध्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर विसंबून राहू लागले.
मुलाने एकही महिना पैसा पाठवला नाही असं झाले नाही, पण माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती खूप वाईट झाली होती. मुलगा देशात परत येण्यास इच्छुक नव्हता आणि मला नेण्यासही तो इच्छूक नव्हता. मलाही तिकडे रमायसारखं काही आहे असं वाटत नव्हतंच. शेवटी आपला देश तो आपला देशच असतो. म्हणून तर मी इकडेच राहिले. पण कामाला मिळणारी माणसं, आपल्या कमजोरीचा फायदा घेतात. याची प्रचिती मला येवू लागली. नाइलाजाने मुलाने मला वृद्धाश्रमाचा पर्याय सुचवला. प्रथम तर इथे आश्रमात खूप माणसं असली तरी करमायचे नाही, एकटे वाटायचे. मन पुन्हा पुन्हा जीवनातील कर्तव्याचा हिशोब मांडून बेरीज- वजाबाकी करे.
आपण कुठे चुकलो हा प्रश्न सारखा पडे आणि यातच मला डायबेटीज झाला. उदास आणि एकटेपणामुळे शारीरिक मानसिक स्थिती ढासळू लागली. एवढयात माझ्या आयुष्यात बंड्या आला. कोण कुठला माहित नाही. पण त्याने आयुष्याकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला. तो सण-वार असला की टिमसह किंवा कधी कधी एकटाच वृद्धाश्रमातील लोकांना भेटायला येतो. तो आला म्हणजे साऱ्यांनाच काय हवं काय नको पाहतोच पण सोबत आस्थेने विचारपूस करतो. मला डायबेटीज झाल्यावर मी घाबरले. गोड खात नव्हते. मनावर ताण आला होता पण बंड्या म्हणजे एक आनंदाची लहर होता. तो वृद्धाश्रमात माझं मनोबल वाढवण्यासाठीच येत होता. मनाप्रमाणे वागत जा, गोड खात जा. खूप दिवस जगण्यापेक्षा मनाप्रमाणे थोडंच आयुष्य जगणे केव्हाही चांगलं हा महत्वाचा संदेश त्याने मला दिला.
माझ्या आयुष्यात जणू म्हातारपणी मला मित्र भेटला. त्याने एक चैतन्य निर्माण केले. कधी रडताना मी त्याला पाहिला नाही. मात्र त्याला आज एक वचन मागितले. आयुष्यात खूप माणसं भेटली. खूप विदयार्थी घडवले खूप कर्तव्य केली. पण जीवनाच्या संध्याकाळी आपल्यानंतर कोणी दोन अश्रू ढाळणार नाही याचे वाईट वाटते. मी गेल्यावर दोन अश्रु माझ्यासाठी देशील. माझ्या या मागण्याने तो गहिवरला. खरंतर तो जेव्हा भेटायला यायचा तेव्हा मला पेढा घेवून यायचा. म्हातारे घाबरून जगू नको. मनापासून जीवनाचा आनंद घे असं सांगायचा. आयुष्यात कुढत जगण्यापेक्षा आनंदाचे दोन क्षण जगण्याचा संदेश देत होता. मेल्यावर मी तुझे सारं करेन असं सांगत होता. पण माझ्या मागणीने मात्र हादरला. काहीही मागते तू तर, असं म्हणत उठला पण त्याच्या मनातली खळबळ चेहऱ्यावर दिसत होती. दोन अश्रु माझ्यासाठी कोणीतरी गाळणार याची मात्र खात्री पटली. तो मात्र हरलेल्या योद्ध्याप्रमाणे उठून निघून गेला.