तीच्या नजरेतून
आज मला एटीएम मशीनमधून पैसे काढून आणावेच लागणार होते. या महागाईच्या वाढत्या भस्मासूराच्या काळात महिन्याला पंधरा-वीस हजारात कसे तरी भागवावं लागतं. कॉलेजची फी, पुस्तक-वह्या जेवण-रहाणं सारं सारं. मी या साऱ्या विचारातच शांत अशा ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनकडे गेले. गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभा राहून वेळ तर जातोच. काहीतरी वेगळाच गोंधळ होवून बसतो. मी माझ कार्ड घालून नंबर दाबत असतानाच माझं लक्ष पैसे मशीनमधून बाहेर येतात. त्या ट्रेकडे लक्ष गेलं. अरे हे काय तिथे दोन हजारांच्या पाच नोटा होत्या. अरे बापरे कोण बरे विसरून गेले असेल. मी शोध घेण्यासाठी इकडे तिकडे पाहिले पण व्यर्थ, तिथे आसपास कोणी जाताना किंवा येताना दिसत नव्हते. काय करावे याचा बराच विचार केल्यावर एटीएम मशीन कोणत्या बँकेकडून बसविले याचा शोध घेवून मी त्या बँकेच्या नंबरवर फोन केला. मी सध्या होते तिथून जवळच त्या बँकेचे ऑफिस असल्याने त्यांनी मला तिकडे येण्याबाबत विनंती केली. पैसे देण्यासाठी म्हणून मी गेले. मॅनेजर साहेबांनी माझे स्वागत केले.
‘आजच्या काळातही माणूसकी टिकून आहे म्हणायचं आपल्या सारख्या माणसांमुळे.’
त्यांच्या या वाक्याने त्यांनी माझा शाब्दिक गौरव केला. मी त्यांना एटीएम मशीनमध्ये असलेल्या मशीनवरून टाईप केल्या गेलेल्या अकांउटवरून नंबर, नाव किंवा पत्ता मिळतो का? पाहून पैसे परत करा म्हणून रक्कम सुपूर्द करून मी घरी परतले. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पैसे कोणाचे असतील? आपले पैसे मशीनमधून घ्यायचेच विसरले हे लक्षात आल्यावर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल? त्याच्या कोणत्या कारणांसाठी हे पैसे काढले गेले असतील? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. मी माझ्या कामाच्या नादात थोडावेळात सर्व विसरून गेले होते. माझी दररोजची काम सुरू होती.
दुसऱ्यादिवशी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान बँकेतून मैनेजरसाहेबांचा फोन आला. कालचे पैसे कोणाचे आहेत ती व्यक्ती त्यांना सापडली होती. राधा जोशी या नावाची ८० वर्षांची वृध्दा होती ती. आठ हजार घरभाड्यासाठी आणि दोन हजार महिन्याचा खर्च भागवण्यासाठी असे एकूण दहा हजार तिने काढले होते. पैसे मॅनेजरसाहेबांनी परत केल्याचं सांगितले. आणि त्यांनी राधाकाकूंचा सांगितलेला हिशोब ऐकून माझ्या डोक्यात असंख्य विचार झिम्मा खेळू लागले. कसे भागत असेल त्यांचे? माझा स्वत:चा मी विदयार्थीनी असून बराच खर्च होतो. मी न राहवून बैंक मैनेजरला फोन केला. माझ्या अकाउंटवरून राधाकाकूंच्या अकाऊंटला१००० ट्रान्सफर करायला सांगितले. प्रथम त्यांना आश्चर्य वाटले पण माझी भूमिका त्यांना आवडली. जगामध्ये स्वतःचा किंवा स्वत:च्या माणसांचा विचार तर खूप माणसं करतात पण अनोळखी, परक्या व्यक्तिचा विचार कोण करणार?