सच्चा नागरिक
भरभर पायऱ्या चढून मी वर्गापाशी आले. वर्गात प्रवेश करणारच होते. एवढ्यात कानावर वाक्य पडले. ‘अभ्यास केला नाही तर बाई खूप रागवतात. मला तर खूप भिती वाटते त्यांची.’एवढयात कोणाचं तरी लक्ष माझ्याकडे गेलं आणि सारे चिडीचूप. मी नेहमी प्रमाणे वर्गात परिपाठ घेवून गृहपाठाच्या वह्या मागितल्या. बऱ्याच मुलांनी अभ्यास केला होता. पण नेहमीच्या उरलेल्या मुलांनी आजही अभ्यास केला नव्हताच. तसंही मी या पालकांची भेट घेवून त्यांना व्यवस्थित समजून सांगितलंही होतं पण त्या पालकांची खरी अडचण अशी होती की त्यांची इच्छा होती की आमच्या मुलांनी खूप शिकावं. आम्हाला न शिकल्यामुळे किंवा कमी शिकल्यामुळे जो त्रास सहन करावा लागतोय. तो आमच्या मुलांना व्हायला नको. म्हणून स्वतःला जास्त श्रम पडले तरी चालेल पण मुलांना शिकवायचं हा त्यांचा अट्टाहास. या शाळेत मी शिक्षिका म्हणून आल्यापासून पालकांची परिस्थिती आणि पालक आणि पाल्याची मानसिकता यांचा चांगला अभ्यास झाला होता. म्हणूनच लहान वयात त्यांना योग्य वळण लागावं म्हणून मी झटत होते. पण…
नोकरीला लागून दहावर्ष होवून गेली मला. खरंतर मी जेव्हा शिक्षिका होण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेव्हाच्या माझ्या शाळा, शाळेतील विद्यार्थी यांच्याविषयी वेगवेगळ्या संकल्पना या काल्पनिक होत्या. स्वतःच्या कर्तृत्वाची पताका फडकविण्याची हौस होती. पण जेव्हा शिक्षण संपवून मी नौकरीस लागले. तेव्हा वास्तव हे नेहमी वेगळंच असतं हे मला जाणवलं. खरंच आपण कल्पना केली ती चिखलाच्या आयत्या गोळ्यांना रेखीव आकार देवून आपल्याकडं येईल. आपण फक्त त्यास अनुरूप रंग दयायचा आणि आपणच घडवलं असा शिकका मोर्तब करायचा. पण इथे मात्र सारे वेगळंच होतं. माझ्या वर्गात असणाऱ्या एकूण मुलांपैकी ५०% विदयार्थी हे चांगल्या घरचे, चांगल्या वातावरणातून आलेले. एवढंच काय मी दिलेला गृहपाठ करून देण्यासाठीही त्यांनी घरी माणसं ठेवलेली. खरंतर पालकांची स्वत: मुलांचा घरी अभ्यास घ्यावा. एवढी साधी आणि छोटीसी अपेक्षा माझी. पण ती उच्च वर्ग, मध्य वर्ग आणि गरिब कुणाकडूनच पूर्ण होत नव्हती. मध्यमवर्गातल्या विदयार्थ्याचे पालकही शक्यतो कुठेतरी अभ्यासाला पाठवत. रहाता राहिला प्रश्न परिस्थिती नसणाऱ्याचा. त्यांना मात्र सगळंच अवघड वाटत होते. म्हणजे धड ते स्वतः अज्ञानामुळे आणि पैशाअभावी अभ्यासाला पाठवूही शकत नव्हते आणि घेवूही शकत नव्हते. फक्त तुम्ही लक्ष दया, जरा जास्त लक्ष दया, तुमच्या जवळ बसवा, पहिल्या नंबरला बसवा. एवढ्या अपेक्षा मात्र जबरदस्त, खरंतर बऱ्याच पालकांना आपला पाल्य कितवीला आहे, कोणत्या तुकडीत आहे हे सुद्धा माहित नसते. पण म्हणून मी चंगच बांधला. यांना मी वाचन लेखन आणि मुलभूत क्रिया शिकवणारच. पण गंमत अशी होई. जी मुले शिक्षणाबाबत जागरूक घरातून येत होती. ते पालक दररोज वेळेवर सांगितलेला अभ्यास करून घेत. पण ही मात्र आज आली की उदया येतील की नाही सांगता येत नव्हते. आणि यांना सांगितलेले पुढचे पाठ आणि मागचे सपाट होत होते. यावर एकमेव उपाय म्हणजे यांनी दररोज आलेच पाहिजे.
मी खूप विचार करून शेवटी ठरवलंच. यांना मी शिक्षण घेण्याचे आणि न घेण्याचे फायदे तोटे समजून सांगेन. हे नुसते नाही तर उदाहरण देवून. शेवटी मी यासाठी एकेदिवशी शाळेमध्ये एका कार्यक्रमासाठी कलागते साहेब जे पोलिस खात्यात अधिकारी होते. त्यांना आणि राजू भाजीवाला दोघांनाही निमंत्रित केले. मुलांना पोलिसांचा ड्रेस, बंदूक आणि एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची भयानक आवड. त्यामुळे मुले प्रोत्साहित झाली होती. दुसरीकडे भाजीवाला राजू. त्याला पुढे खुर्चीवर बसायलाही नको वाटु लागलं पण आग्रहाखातर तो कलागते साहेबांपासून चार खुर्च्या सोडून बसला. त्याने अगदी तळमळीने मुलांना अभ्यासाचे महत्व सांगितले.
मी अभ्यास न केल्याने माझी कशी फसवणूक होते. मोठ मोठ्या ऑफिसमध्ये कशी तारांबळ उडते. सारे त्याने व्यवस्थित सांगितले. खरंतर बऱ्याच मुलांना या कार्यक्रमातील पाहुण्यांमुळे प्रोत्साहन मिळाले पण जी मुलं आज या कार्यक्रमाला उपस्थित नव्हती ती मात्र पुन्हा या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिली. खरंतर मला प्रयत्न करतंच रहावं लागणार होते. पण कधीकधी माझी चिडचिड होत होती. पालकांची इच्छा असे तर विद्यार्थी अभ्यास करण्यापासून माघार घेत. तर काही वेळेस मुलांची इच्छा असे मात्र पालक स्वतःच्या गरजेपोटी त्यांना शाळेत पाठवत नसत. या साऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त पाट्या टाकण्याचं काम करणं माझ्या मनाला मान्य नव्हतं, पण माझ्या प्रयत्नामध्ये त्यांना धाक बसावा म्हणून मी त्यांना शिक्षा देणार, असं सांगितल्याने विदयार्थी मात्र हळूहळू अभ्यासाकडे वळू लागले.
खरंच विदयार्थी शिकले तरच मला समाधान होते. कोणी माझं कौतुक करावं, कोणी सत्कार करावा, पुरस्कार दयावा ह्या इच्छेने मी अध्यापन करत नाही. माझे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पायावर सक्षम उभे रहावे. त्या विद्यार्थ्यांनी जीवनात नाव कमवावे. भले ते डॉक्टर, इंजिनिअर झाल्यावर मला अभिमान वाटणार. यात काही शंका नाही पण त्यांनी कमवलेला मान हाच माझा सन्मान असणार बाकी माझ्या सारख्या अनेक शिक्षकांचं ध्येय एकच असते, विद्यार्थी या देशाचा चांगला नागरिक घडावा. देशाचा त्याने मान राखावा. मनामध्ये देशाचा सन्मान ठेवावा. चांगले विद्यार्थी घडले तर तो शिक्षकांसाठी मानाचा पुरस्कार घेण्यापेक्षाही खुप काही वेगळं सन्मानाचे असते.