मेसेज

                        मेसेज

                  माझा फोन खणखणला. पलीकडून माझी जिवाभावाची मैत्रीण हुंदके देत बोलत होती. ‘अनुष्का, हॅलो अनुष्का, काय झालं. अगं तुझं बोलणं काहीच कळेना.’ ती फक्त भरल्या आवाजात काहीतरी बोलली. मी तिला फोनवर फक्त शाब्दिक आधार देऊ शकत होते. ती अजूनही हुंदके देत होती. 

 ‘अनुष्का, अनुष्का शांत हो,  असं रडायला काय झालं, शांतपणे सर्व सांग.’

 माझ्या पाच मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर तिने एक वाक्य उच्चारले, 

‘ माझ्या मोबाईलवर……’

 एवढं बोलून पुन्हा तिचं रडगाणं सुरुच.

 ‘अगं मोबाइल हरवला का? कुठे, घरात का, बाहेर.’

 आणि असे बरेच प्रश्न विचारले. अनुष्काने रडू आवरले. ती आता स्पष्ट आवाजात बोलू लागली.

‘ निशा, अगं मोबाइल वगैरे काही हरवला नाही; पण काल रात्री साडे अकरा वाजता एक मेसेज आला.’ आतापर्यंत शांत बसलेला माझ्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला. 

‘अगं, या कंपनी वाल्यांना काही काम नसतं. केंव्हाही फोन करायचा नाही तर मेसेज पाठवायचा. काही काळ वेळ नसतो.’ आता मात्र तिने मला शांत केले. ती मला सांगू लागली.

‘अगं, तसं काही नाही.’

‘ मग काय झालं अनुष्का?’

‘  आठवत का, आपण जनमत वृत्तपत्रातल्या मेसेज स्पर्धेत भाग घेतला होता.’

‘ हो, आठवतं ना. जनमत या वृत्तपत्रात  आपलं सहभागी स्पर्धकात नावही आलं होतं; पण त्याचं आता काय?’

‘ त्या स्पर्धेत भाग घेताना एक फॉर्म आपण भरला होता. फॉर्मवर सर्व माहिती अचूक लिहिली. मोबाइल किंवा घरगुती फोन नंबर द्या. अशी सूचना असल्याने, आपण मोबाइल नंबर लिहिला.’

 आता मात्र माझी उत्कंठा शिगेला पोहोचली.

‘ अग, मग त्याचं आता काय?’

‘ काही स्पर्धकांचे मोबाइल नंबरही त्यांनी पेपरला दिले. आमच्या शेजारच्या काकू म्हणाल्याही. बरं झालं बाई त्या निमित्ताने पेपर ला नाव आलं; पण खरा घोटाळा वेगळाच झाला. ठराविक लोकांची म्हणजे जवळजवळ पन्नास स्पर्धकांपैकी, दहा जणांचे मोबाइल नंबर आले होते. माझ्याबरोबर तुझाही आला होताच की.’

 एवढं सर्व शांतपणे ऐकूनही, मला मूळ समस्येची उकल होईना. शेवटी मी तिला म्हणाले,

‘ नक्की काय झाले ते सांग.’

‘ अगं, मला जो मेसेज आला, त्याचा आणि या गोष्टीचा संबंध आहे. मेसेज आल्याचं माझ्या लक्षात आले नाही. आमच्या यांनी माझा मोबाइल, बँक अकाऊंट नंबर बघण्यासाठी घेतला. कारण यांचा  बँक अकाउंट नंबर पटकन सापडावा, म्हणून मी मोबाइलमध्ये तो सेव करून ठेवला आहे. त्यांनी मोबाइल घेतला. अन् मोबाइलवर नुकताच मेसेज आला. असे कितीतरी मेसेजेस दिवसभरात येतात. आपण कुठं पाहतो,मी तर बघत पण नाही; पण त्या दिवशी यांनी तो वाचला आणि सरळ मोबाइल माझ्यापुढे फेकला. मला तर काहीच  घोळ कळेना. मेसेज पाहा म्हणून आदित्य रागारागाने हॉलमध्ये निघून गेले. मी मात्र मेसेज पाहा म्हटल्यामुळे तो ओपन करून बघितला.’

 तिचं बोलणं होईपर्यंत, माझी उत्कंठा आता मला शांत बसू देईना. 

‘अगं, असा काय मेसेज होता तो. ज्यामुळे एवढं महाभारत घडलं.’

 तसं ती म्हणाली ‘अग त्यामध्ये चक्क लिहिलं  होतं, आपकी मुस्कान हमारी कमजोरी है। आप से ना कहना हमारी मजबुरी है। आणि शेवटी चक्क आय लव्ह यू असे लिहिलं होतं.  माझ्या तर हातातून फोन पडलाच. नशीब मी गादीवर बसून वाचत होते; पण तरीही  फोन उचलून मी पुन्हा, पुन्हा मेसेज वाचला.’

  अनुष्काचा फोन सुरू होता; पण शेवटी मी तिच्या घरी जाऊन समस्येचे निराकरण करायचं ठरवलं. तिला फोनवर मी पंधरा वीस मिनिटांत येते असं सांगितलं. मी गेले तरी माझ्यामागे मुलांची व्यवस्था आई बघतील. या विश्वासाने आवरून पटकन निघाले. माझ्या घरापासून तिचे घर तीन सव्वातीन किलोमीटर असेल. स्कुटीवरून मी पाच दहा मिनिटांत पोहोचले. तिच्या घरात प्रवेश केल्यावरच, मला एक वेगळेपण जाणवलं. डॉगी शांत बसला होता. नेहमी सारखा सलाम नाही जवळ घोटाळणं नाही. पुढे गेले तर चपलांचा अव्यवस्थितपणा दिसला. घरात प्रवेश करण्यासाठी बेल वाजविणार होते; पण चाहूल लागल्यामुळे स्विटी दारात आली. दार उघडल्याबरोबर स्विटी मला बिलगली. 

‘माऊ, बघ ना. आई आणि बाबा सारखे एकमेकांशी मोठ्याने बोलतात नाही तर एकदम गप्प बसतात’

 असं म्हणून ती रडू लागली. मी तिला हाताने पाठीवर थोपटत थोपटत शांत करत म्हणाले.

‘ स्विटी तू आता सहावीला गेलीस  मग तू रॉनीला समजून घ्यायचं. अगं आणि आता कुठे तो लहान गटात जातोय. तू रडायला लागल्यामुळे तो बघ किती घाबराघुबरा झालाय. तू त्याला सांभाळायला हवं. मोठ्यांच्या गोष्टीत लक्ष घालू नये, लहान मुलांनी’

 असं म्हणून मी  रॉनीकडे गेले. तो खूपच गप्प बसला होता.

‘ माऊ, आई माझ्याशी बोलेना, खेळेना. आज शनिवार शाळेला सुटी. तरी आईने काहीच वेगळे केले नाही, खाण्यासाठी घरात.’

 आता याला कसं समजावणार घरात काय चालले ते. माझ्या मनात विचार आला; पण काही तरी समजूत घालावी लागणार होती.

 ‘माऊ मला भूक लागली.’

 असं म्हणून तो रडू लागला. त्याला व स्वीटीला फ्रिजमधला केक व दूध दिले व मी बेडरूमकडे गेले. तर तिथंही नजारा तसाच होता. टापटीप असणारी माझी मैत्रीण आज राड्यात दिसेनाशी झाली होती, उदास चेहऱ्याने ती बसली होती.

‘ अनुष्का, अशोक वनातल्या सीते सारखी का बसलीस?’ माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली. मी तिला शांत केले व तिचा मोबाइल मागून घेतला. तिने रागानेच तो माझ्याकडे फेकला. 

‘हळू फुटेल ना! त्याच्यावर का राग  काढतेस?’ 

‘मेसेज यायच्या आधीच फुटला असता तर बरं झालं असतं.’

 असं म्हणून तिचे डोळे पाणावले. मी विचारलं ‘पोलिसांना कळवलं का?’

 तसं ती माझ्यावर बरसलीच.

‘ अगं आम्ही सगळी चौकशी करून बसलो. मी तर कम्प्लेंट करणार होते; पण यांनी फटकारलं. आता पोलिस स्टेशनच्या वाऱ्या करायची वेळ आणू नका. मग काय करायचं अगं त्यांनी हे मान्य केलं की, हा मेसेज ओळखीच्या कुणी पाठवला नाही. हेच विशेष म्हणायचं. किती ऐकलं मी या बारा तासात. मोबाइल वापरायला अक्कल लागते. कुणाला नंबर दिलास कि काय आणि बरंच काही.’

 ‘खूप विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की पेपरमध्ये नाव व नंबर आल्यावर दोघींच्याही फोनवर दोन तीन अनोळखी लोकांकडून अभिनंदनाचे फोन आले होते. मी त्यातले फोन नंबर लक्षपूर्वक पाहिले होते; कारण अनोळखी लोकांचे फोन का म्हणून आले म्हणूनही महाशय गरजले होते. त्या वेळेस मला आदित्यचा राग आला होता; पण आता वाटते त्याच बरोबर आहे. त्या फोन नंबर मधीलच हा मेसेज वाला नंबर आहे.’ 

मी सर्व शांतपणे ऐकत होते. मनातून मात्र त्या मेसेज वाल्याला शिव्यांची लाखोली वाहत होते. 

‘अगं अनू, मेसेज वाल्याला भावजीने फोन करून खडसावायला हवं. मग बघितलं असतं त्याला आपण.’

‘ अगं पण हे म्हणाले तसं पेपरमध्ये नाव सौ.   लिहिलं होतं. एवढं तरी त्या व्यक्तीच्या लक्षात आलंच असेल ना. मग त्याने भरलेल्या संसारात मिठाचा खडा का टाकावा? काल पर्यंत हे  सी आय डी पोलिसांसारखे उलट सुलट प्रश्न विचारात होते. हे चुकून इंजिनिअर झाले, पोलिस झाले असते तर आतापर्यंत राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला असता असं वाटलं. आज सकाळी तर अगदी तावातावात निघाले होते. जातो अन् त्याची गच्ची धरुन विचारतो. तुझ्या बायकोला असा मेसेज आला असता तर. त्यासरशी मी म्हणाले अहो, बायको पोरं असणारा, सुखी संसारात मग्न माणूस असं वेड्यासारखे मेसेज पाठवेल का? तो लाज लज्जा सोडलेलाच असणार. अगं निशा माझ्या बहरलेल्या संसारात त्याने बॉम्बस्फोट केला गं. आम्ही दोघ कालपासूनच एकमेकांशी बोललो नाही; तर वाटतंय जणू  किती दिवस होऊन गेले कोणास माहीत? असं वाटतं त्या परक्या व्यक्तीला गाठून जाब  विचारावा. दणके द्यावे.’

 अगं  अऩू हे सर्व करण्यासाठी त्याचा आधी आपल्याकडे पत्ता हवा. मला वाटतं आपण त्याला सरळ फोन करू त्याला विचारू, असं का केलंस? ‘त्यापेक्षा सरळ दोघी जाऊन पोलिसांत तक्रार करू या का?’

  ‘ अगं अनु, तुला आठवतं का? मागे माझं गंठण गेलं तेव्हा सापडेपर्यंत आणि नंतरही मी कित्येक वेळा चकरा मारल्या पोलिस स्टेशनच्या. चोर ओळखण्यासाठी, गंठण ओळखण्यासाठी, आपलंच आहे हे पटवून देण्यासाठी. अरे बापरे! भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ आली होती. अनु, आपणच फोन करूया आणि बघू काय होतं का?’

        शेवटी मी फोन केलाच तर बऱ्याच वेळेला रिंग जाऊनही मोबाइल उचलला गेला नाही. मी पुन्हा पुन्हा तीन- चार वेळा प्रयत्न केला. मग मी डोक्याला हात लावून बसले. एवढ्यात मोबाईल वाजू लागला. अनुष्काच्या ओळखीच्या कोणाचा तरी फोन असेल असं वाटून मी खिडकीतून बाहेर बघत बसले; पण तेवढ्यात अनुष्काने मला हाक मारली.

‘ निशा तोच  बावळट  वाटतो गं. बघ ना तोच नंबर आहे. मघा फोन उचलला नाही आणि आता फोन का केला? सर्व विस्कटून अजून काय राहिलंय?’

     मी तिच्या हातातून जवळजवळ मोबाइल ओढलाच.  

‘हॅलो, कोण बोलतंय?’

 तसा पलीकडून आवाज आला,

‘आपण कोण बोलताय?’

 तशी मी जाम वैतागले.

‘ तुम्हाला त्याच्याशी काय? तुम्ही फोन मला केलात तुम्हीच नाव सांगा.’

 म्हणून मी जवळ जवळ ओरडलेच. तशी ती व्यक्ती गंभीर आवाजात बोलू लागली.

‘ मॅडम तुम्ही मला फोन केला. तुमचे तीन मिस्कॉल बघूनच मी फोन केला. बरोबर ना.’

 मी आता खूप चिडले,’ महाशय आपण काल साडे अकरा वाजता फोनवर काय मेसेज पाठविला? म्हणून तर मला तुम्हाला आज फोन करायची वेळ आली.’

  एवढा वेळ गंभीरपणे बोलणारी ती व्यक्ती आता रागाने उसळली,’ अहो मी कशाला रात्री तुमच्या फोनवर मेसेज पाठवू.मी सज्जन माणूस आहे. मला घर -संसार मुलंबाळं आहेत. ‘

 मला त्याच्या साळसूदपणाचा वैताग आला. सज्जन माणूस तोंडाने मी सज्जन आहे असं सांगतो का? ‘महाशय, मी शेवटचं सांगते, हा फोन माझ्या मैत्रिणीचा आहे. तिला घर -संसार सार आहे. असा मेसेज किंवा फोन पुन्हा आला तर……..’

 असं म्हणून मी फोन ठेवायच्या  आतच त्यानेच फोन केला. मी आश्चर्यचकित झाले. अनुष्का मला ‘काय झालं?’ 

म्हणून सारखं विचारत होती. शेवटी तिला सर्व इतिवृत्तांत दिला व “चोर तो चोर वर शिरजोर” कसा झाला तेही सांगितलं. इतका वेळ रडणारी ती आता खंबीर झाल्यासारखी वाटली.

‘ पुन्हा मेसेज किंवा फोन आला तर बघू.’

 असं म्हणून ती तोंड देण्यास निघून गेली. पुन्हा तिचा फोन वाजला. आताही मीच उचलला.

‘ हॅलो, कोण? मॅडम. मी मगाशी फोन ठेवल्यावर पाहिलं तेव्हा खरा प्रकार माझ्या लक्षात आला. त्याचं ते हसत खेळत फोनवरचं बोलणं ऐकून त्याच्या निर्लज्जपणाचं कौतुक वाटू लागलं.

‘ मॅडम, काय मेसेज आला होता?’

 खरं तर त्याला खूप बोलावं वाटत होतं; पण शेवटी तोंड सांभाळणं महत्त्वाचं. म्हणून मेसेजचा काही भाग ऐकवला. त्यासरशी ती व्यक्ती पलीकडून जोरजोरात हसू लागली.

‘ स्वारी हा मॅडम, सॉरी. एक वेगळाच  घोळ झाला.  अहो करायला गेलो एक आणि झालं एक तुम्ही मला प्लीज समजून घ्या. फोन कट करू नका. पाच दिवसांपूर्वी माझं माझ्या पत्नीशी थोडं भांडण झालं होतं. तिला मनवण्याचे सगळे प्रयत्न केले.’

 मी मध्येच खेकसले, ‘मग  तिऱ्हाईत बाईला असा मेसेज पाठवायचा.’

‘ मॅडम, प्लीज समजून घ्या. मी तुम्हाला बहीण मानून सर्व सांगतो. ती माझ्याशी बोले ना. फोन केला तर उचलेना. शेवटी मी मेसेज पाठवायचा ठरवलं आणि झालं काय माझ्या बायकोचं नाव अनोलुष्का व तुमच्या मैत्रिणीचं नाव अनुष्का. मी मेसेज पाठवताना दोन्ही स्पेलिंग साम्य असल्यामुळे चुकून तुमच्या मैत्रिणीला मेसेज आला.’

‘ अहो पण माझ्या मैत्रिणीचा फोन तुम्ही फोनमध्ये फोन नंबर तुम्ही फोनमध्ये सेव का केला?’

‘ कारण माझी पत्नी त्यांची चाहती. तिच्या फोनमधले फोन नंबर मुलं गेम खेळताना डिलीट होतील. म्हणून तिचे बरेच नंबर माझ्या फोनमध्ये असतात. वृत्तपत्रात नाव आल्यावरही तीनच फोन करायला लावला होता. मी माझ्या परीने माझी बाजू सांगितली. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा.’

        एवढं बोलून ती व्यक्ती गप्प बसली.  मला तर काहीच सुचेना.  सहज  झालेल्या गोष्टीने केवढा गोंधळ केला.

‘ मॅडम, मी तुमच्या मैत्रिणीच्या घरी माझ्या फॅमिली सहित येतो. त्यांचा व त्यांच्या नवऱ्याचा मी गैरसमज दूर करेन.’

 मलाही कल्पना पटली. दोघांनी मिळून वार व वेळ निश्चित केली व फोन ठेवला. अनुष्काला सर्व वृतांत सांगितला. प्रथम ती विश्वास ठेवेना; पण शेवटी नाईलाज झाला. राखी पौर्णिमेदिवशी सण साजरा करून दुपारी मी अनुष्काच्या घरी गेले. मेसेज भैय्या यायचा होता. आम्ही तर दोघींनी त्याचं नाव संदेश भैय्या असं ठेवलं. संदेश भैय्या अनुष्का वहिनी व   सारा.  त्यांची मुलगी सारा गोड होती.  सर्वजन आले, गरम वातावरणाने चर्चेला सुरुवात होऊन शेवटी एकमेकांना  समजून घेण्यात मोठेपणा समजला गेला. एकमेकांची ओळख तर झालीच; पण नवीन नातीही निर्माण झाली. मी व अनुष्का दोघींनीही संदेश भैयाला राखी बांधली. भावजींचा गैरसमज कसा तरी दूर झाला. माझ्या मनात आलं. आज या ठिकाणी गढूळ झालेलं वातावरण शांत झालं; पण प्रत्येकाच्या जीवनात असेच होईल असंही नाही. खरंच थोडीशी चूक व त्यामुळे निर्माण होणारे गैरसमज. आम्ही सर्वजण गप्पा मारत हसत बसलो होतो. तेवढ्यात माझ्या फोनवर मेसेज आल्याचं संगीत ऐकू आलं.

‘ निशा, कोणाचा मेसेज?’

 असं अनुष्काने विचारताच, मी म्हणाले,

‘ असेल संदेश भैय्या सारखा कोणी.’

 माझ्या वाक्यासरशी सर्वजन हसू लागले.

                                      सौ आशा अरूण पाटील 

                                        सोलापूर .

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!