सदाशिवराव सेवानिवृत्त होणार म्हणून त्यांच्या बऱ्याच मित्रांनी पार्टी मागितली होती. सदाशिवरावांनी मला सांगून सारी तयारी करायला सांगितली होती. आयुष्यात सदाशिवरावांनी मोठमोठ्या पदांवर काम केलं. अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलवल्या. ते प्रत्येक जबाबदारी ९९% निभावत असले, तरी कौटुंबिक जबाबदारी मीच निभावत होते. आयुष्याच्या धावपळीत स्वअस्तित्वाचा ध्यास बाजूला ठेवून मी कर्तव्यतत्पर राहिले होते. आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमात काही शब्द बोलण्यासाठी सदाशिवराव उभारले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रगतीचा चढता आलेख शब्दांतून सर्वांसमोर मांडला. सारेजण मन लावून ऐकत होते. जवळ जवळ दहा-पंधरा मिनीटांचं मनोगत होत आलं. यात त्यांनी आई आणि मुलीचा आवर्जुन उल्लेख केला. समारोपाच्या दिशेने ते मनोगत पुढे नेत असतानाच अचानक सदाशिवरावांनी एकच वाक्य माझ्यासाठी उच्चारले. अन् ते जणू माझ्यासाठी लाखमोलाचं होतं. ते सांगत होते.
‘आजपर्यंत मी आर्थिक कमाई करून उदरनिर्वाह, बचत हे जरी केलं. तरी या सर्व गोष्टी कुसुममुळेच मी करू शकलो, माझ्या आयुष्यात ज्या महत्वपूर्ण स्त्रीया आहेत. त्यात तिचं नाव महत्वाचे आहे. मला जन्म देणारी आई, साथ देणारी कुसुम आणि माझी लेक या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.’
तिघींच्याही डोळ्यात आनंदाश्रु तरळले.
खरंच स्त्रीचं जीवन म्हणजे जणू प्राजक्ताचं असणं. प्राजक्त जसा दिसण्या आणि असण्यात नाजूक, कोमल, नेत्रसुख देणारा. तसंच काहीसं स्त्रीचं. प्राजक्ताच्या नाजूक फुलाचं सौंदर्य पहाता फूल उचलणाराही ते अलगद उचलतो. तसंच स्त्रीचं मन. भाव-भावनांचे असंख्य तरंग उठत असतानाही चेहऱ्यावरचा संयम पाहण्याजोगा. कुणाची तरी कन्या म्हणून जन्म घेणारी ती कधी कुणाची ताई असते तर कधी कुणाची छोटी बहिण असते. काही वर्षांनी ती कुणाची सखी होते. योग्य वयात कुणाची जीवनसंगिनी, म्हणजेच पत्नी बनते. त्यानंतर ती मग अनेक नात्यांचं कोंदण घेवून दिमाखात नाती उजळवते. कधी ती मावशी, काकू, मामी, आत्या होते. तर मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या मनातलं गुपित हळुवार उघडणारी मैत्रीण होते. काही वर्षांनी ती सासू होते. अन् मग दुधावरच्या सायीची म्हणजेच नातवांची आजी होते. आजीपणाची थोरवी वाढवत असतानाच पणजी पण होते. एक एक करत प्रत्येक नात्याला योग्य न्याय देते. स्त्रीला आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ वाटतात, म्हणूनच ती नेहमी दुसऱ्याचाच विचार करते. माहेर असो किंवा सासर किंवा असो बालपण, सगळ्या परिस्थितीमध्ये ती फक्त आणि फक्त दुसऱ्याचाच विचार करते. फुलंही स्वतःचं स्वत्व अर्पण करून कधी देवाच्या डोक्यावर तर कधी गळ्यात, तर कधी पायावर स्वतःला अर्पण करून घेण्यात धन्यता मानतात. हीच फुलं एखाद्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात वाहिली जातात. तर कधी शेवटच्या हातात गुंफली जातात. प्राजक्ताच्या झाडावरच्या फुलांचं फुलणं आणि अस्तित्वाची वेळ पाहिली तर मला तर वाटतं, माणसाने ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, किती जगला यापेक्षा कसं जगला आणि परोपकारी कसा वागला याला महत्व दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्राजक्ताच्या झाडावर आलेली फुलं झाड धरणीमातेला सह्दयतेने अर्पण करते. अन् आता मी रिता झालो, याचा विचार न करता सृजनाच्या प्रक्रियेत गुंतून जातं, तसंच स्त्रियांचं आयुष्य असतं, त्यांना इतरांसाठी करणं आणि करणंच फक्त माहित असतं. कन्या असताना आई-वडिलांच्या संस्कारांनी फुलून वातावरण सुगंधीत केलं, तर काही दिवसांनी कधी मोठी बहिण म्हणून लहान भावाची काळजी घेतली. कधी छोटी बहिण म्हणून दादाच्या आरोग्यपूर्ण आयुष्याची देवाकडे मागणी केली. काही वर्षांनी पत्नी होवून आयुष्य भर साथ दिली अन् मागितलीही. त्याचवेळी सून या नात्यातूनही सासू-सासऱ्यांची कन्या झाले. बनले मी ननंदेची मैत्रीण तर जावेची बहिण. दिराला आईरुपी माया तर कधी बनले त्याची बहिण. कधी झाले मी मैत्रीण. भाच्यांची मामी, पुतण्यांची काकू अन् भाच्यांची मावशीही झाले. मी स्त्री धरणी मातेप्रमाणे अंकुरीत झाले. माझ्या आयुष्या नवांकुराचे डोहाळे आणि आनंदाचे सोहाळे दाटले. व्हायचे असते मला माता. महत्व नसते जन्माला येईल मुलगी की मुलगा. मातृत्वाचं दान पदरी पडल्याने पुलकित झालेलं तन आणि मन प्रसव वेदनेसही सहज विसरते अन् नवांकुराचे स्वागत. संसाररूपी विद्यापीठातील आई या पदवीने होते मी विभुषीत. आपलंच छोटंसं रूपडे पहाण्याचा परमानंद अनुभवत वाढवण्यातला त्रास सहज विसरतो. बाळ आपलं कधी मोठ झालं. हे लक्षातही येत नाही. पहाता पहाता सारंच आनंदमयी वातावरण होतं. आईपणाच्या भूमिकेत एक एक कर्तव्य पार पाडत स्त्री सासू या भूमिकेत सहज प्रवेशते अन् आजी या भूमिकेत स्थिरावते. दुधावरच्या सायीसाठी क्षण अन् क्षण खर्च करते. स्वत:च्या लेकराच्या वेळी न झालेल्या सर्व गोष्टी, हौसमौज ती पूर्ण करते. रुपेरी बटा अन् थकलेले शरीर नातवांबरोबर रमतं अन् संस्काराची रुजवणूक करण्यात अग्रेसर होतं, स्वतःच्या लेकराच्या वेळी राहून गेलेल्या सर्व गोष्टी ते सहज करतं. स्वतःच्या आयुष्यात न झालेली हौस मौज नातवासाठी करून दाखवतं. आजी या भूमिकेतून पणजी या भूमिकेत ते कधी जाते काही कळतच नाही, आयुष्यातील भावनांची गणितं मांडली तर कर्तव्य अन् जबाबदाऱ्यांची गुणात्मक वाढ होतच असते. अन् सकारात्मक गोष्टी अन् सुख कणा कणाने वाढत असते.
आयुष्याचं सिंहावलोकन केल्यावर झालेल्या चुका लक्षात आल्या तरी त्या सुधारता येत नाहीत. पण उरलं आयुष्य परोपकारात अन् परमार्थात खर्च करावं हे चिंतन आणि कृती एक स्त्रीचं जबाबदारीपूर्ण समर्थपणे करते. यात काही दुमत नाही.