रकमा

           आज माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस होता. शाळेत वार्षिक तपासणी आणि घरी पाहुण्यांचे आगमन. आपल्याकडे  “अतिथी देवो भव”  ही संस्कृती आहे . पण आज मात्र माझी या सर्वांमध्ये तारेवरची कसरत चालली होती. कसरत कसली अहो, तारांबळ चालली होती.  खरंतर माझ्या महत्त्वाच्या दिवशी तिनं इतका वेळ लावायचा.  एवढ्यात मोबाईल वाजला. ‘दुष्काळात तेरावा महिना’ असं पुटपुटतच

 ‘आणि आता कोण?’ या भावनेनेच फोन उचलला.

 ‘अवं बाईसाहेब आज लय महत्त्वाचं काम हाय. मी याची नाय.’

‘ काम?’

‘अवं बाई कमला मामलेदार झालीया. फर्मान निघलंया. परवाच्याला पेढे आणती.’

 म्हणून तिने फोन ठेवलासुध्दा. माझ्या डोक्यात विचारांच काहूर माजलं. रकमा आमची कामवाली. पंचवीस वर्षापूर्वीच व्यसनामुळं तिचा नवरा गेला. तेव्हापासून तिनं कामाला सुरूवात केली. तिच्या अंगी जिद्द ,ध्येय,चिकाटी अन् आपल्या कामावरची श्रध्दा हे गुण वाखाणण्यासारखे होते. तिनं पोराला व्यसनापासून दूर ठेवलं होतं. स्वत:च्या पोरी व पोराला चांगलं वाढवायचं तिनं ठरवलं होतं. अन् तसल्या बिकट परिस्थितीतही तिनं पोरांना शिकवायचं ठरवलं. पोराला दहावीपर्यंत शिकवून कारखान्यात कामाला तर पोरगी थोडी फार शिकून अंगणवाडी बाईंच्या हाताखाली मदतनीस म्हणून होती.

     काही वर्षापूर्वीच तिनं थाटामाटानं मुलगा-मुलीचं लग्न लावून दिलं. सगळं आनंदात चाललं होतं. दिल्याघरी पोरगी खुश  तर आपल्या संसारात पोरगं रमलं होतं. त्यांच्या सुखात ती सुख मानत होती. पण म्हणतात ना, दुखाःनंतर सुख अन् सुखानंतर दुखः हे जीवनचक्र असते. त्यातून कुणीही सुटत नाही. लग्नाला वर्ष झालं होतं. त्याआधीच अपघाताच्या रूपानं काळानं रकमाच्या पोरावर झडप घातली. अन् गरोदर बायको आईच्या पदरात टाकून पोरानं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आभाळ फाटलं नव्हतं फुटलंच होतं तिच्यासाठी. तरीपण न डगमगता तिनं तिच्यातला आपल्या लेकाचा अंश जपायचा ठरवलं होतं. डोळ्यातलं पाणी अटायच्या आत रकमा पुन्हा कामाला हजर झाली. शेजारणी काही कमी नव्हत्या रकमाच्या. अगं, आता लय इषाची परीक्षा घेऊ नगसं. जा तपास, पोरगी असली तर… रकमा मात्र ठाम होती, तिच्या निर्णयावर.

‘माझ्याच्यानं  असलं पाप  व्हायचं नाही, कितीबी झालं तरी माझ्या लेकाचाच अंश हाय तो. आपणचं आपल्या पायावर धोंडा कसा मारायचा. आपलीबी लेक कुणाचीतरी सून हायचकी.’ रकमानं तिच्या हिमतीवर सुनेचं बाळांतपण केलं कन्यारत्न झालं तरी नाराज न होता आपल्या लेकाच्या अंशाचं आनंदाने स्वागत केले. आपल्या नातीला मोठ्ठं करण्याचं स्वप्न मनी धरून ती आता काम करत होती. दिवसामागून दिवस जात होते. आता तिनं सुनेलाही कामाला लावलं. बापापेक्षा जास्त शिकवायचं पोरीला असं ठरवलं होतं दोघींनी. त्यांच्या इच्छेला कमलापण प्रयत्नरूपी साथ देत होती. वर्गात पहिला नंबर यायचा तिचा.  तिच्या गुणांची पारख तिच्या गुरूंनी केली. अन् तिला योग्य मार्गदर्शन केलं. आज  ती प्रयत्नरूपी पायऱ्यावरून यशाच्या शिखरावर चढली होती. चिखलातून सुंदर कमळ उगवतं हे तिनं सिध्द केलं होतं. हिरा आपल्या तेजाने कुठेही चमकतो, हे तिनं  दाखवून दिलं होतं. आपल्या आईचं आणि आजीचं स्वप्न तिनं सत्यात उतरवलं होतं. आई-आज्जीच्या दु:खात हा सुखाचा किरण, जगण्याची आशा निर्माण करत होता. तिघींच्याही आनंदाला सीमा उरली नव्हती. रकमाच्या ध्येयासक्तीला सलाम. तिच्या नातीचं कौतुक करायला शब्द अपुरे पडत होते. खरंच मुलगा-मुलगी समान मानले पाहिजेत. माझं मन व डोळे भरून आले. माझ्यासमोर दिवसभराच्या कार्याचं नियोजन त्या आनंदाश्रूत तरळू लागलं.   रकमा, तिची सून, कमला या तिघींच्याही प्रेरणेने मी काम करण्यासाठी कमरेला पदर खोचला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!