ती

स्त्रीसन्मान

‘सरिता झाला की नाही स्वयंपाक’ या वाक्यासरशी सरिता वळली. तिच्या सासूबाईंनी आज स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला होता. कारण कालच सरिताच्या माहेरचे आले होते. माहेरचे येणार म्हणून तिने स्वयंपाकात जरा चार नवीन पदार्थ बनवले होते. पण तिच्या  माहेरच्यांना सासूबाईंचा एकंदरीत स्वभाव माहित असल्याने त्यांनी येतानाच हॉटेल मध्ये पोटपूजा करून घेतली होती. घरी आल्यावर कसंतरी चार घास बळबळं पोटात ढकलले होते. त्यामुळे कालचं तसं जरा जास्तच उरलं होतं. सरिता आज पुन्हा सकाळी घरातल्या सर्वांचा स्वयंपाक करायला उभी होती. पण तिच्या सासूबाईंच्या मते

” फक्त आण्णा आणि मोहितसाठी ताजं कर. आपण दोघी खाऊया कालचंच. ते काही खूप शिळं नाहीच ना !”

काल रात्री केले आहे. तरीपण शिळं खाणं चांगले नसतं, याची सरिताने आठवण करून दिली पण तिच्या सासूबाईच्या मते,

 ‘गरिबी आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तरी माजू नये.’ 

अन्नाचा अपमान केला तर वाईट असतं. तसं तर शहरात राहिलेले पदार्थ कचऱ्यात टाकावे लागतात. खरंच किती वाईट वाटतं पण नाईलाज. सरिताला सर्वच पटलं तरीही शेवटी आरोग्य आणि अन्नाची नासाडी न होणे. यांची सांगड तिलाच घालायची होती. ते ही खरंच. कारण ती अन्नपूर्णा होती.

अन्नपूर्णा घरात असेल तर लक्ष्मी नांदते आणि सरस्वतीही प्रसन्न होते. या गृहलक्ष्मीचा विचार मात्र सर्वांनी केलाच पाहिजे. या मताची स्त्री असले म्हणून काय ? सर्व जग तसा विचार करेलच असे नाही. आता हेच पहा ना! स्त्रीयांनी हे मनानेच ठरवून टाकलेलं असतं की  आपण शिळं खाल्लेलं चालतं. बाकी सर्व गोष्टींसाठी शास्त्र-पुराण, पंचांगाचा आधार घेणारे आपण या गोष्टीविषयी विचारच करत नाही. कोणत्या पंचागात असं लिहिलं आहे की स्त्रीयांच कार्यकर्तृत्व जबाबदाऱ्या कमी आहेत. म्हणून त्यांनी स्वतःसह सर्व स्त्रीजातीला कमी महत्त्व दिलं पाहिजे. आपण सर्वांनीच लहानपणापासून आतापर्यंतच्या घटना आठवल्या तर आपल्या लक्षात येईल. स्त्रियांना नेहमीच कमी महत्त्व असते. नव्हे स्त्रिया मनानेच हे ठरवून टाकतात.

मी मात्र या घरात आल्यापासून मला माझ्या सासूबाईंचा त्यांच्या तत्त्वाचा आदर वाटतो. मी ही मानते की नासाडी करू नये. म्हणून तर मी भुकेपेक्षा चार घास कमी खावे. या तत्वाने दररोजचा स्वयंपाक करते. पण कधीतरी कमी जास्त होतोच. पाहुणे कमी जास्त जेवणं, ते काही आपल्या हातात नाही पण नासाडी होवू नये म्हणून पोटाचे डस्ट बीन करण्याच्या मी पूर्ण विरोधात आहे. पूर्वीच्या काळी माझ्या सासूबाई काय किंवा माझी आई काय या सर्वांनी अन्न वाया न घालवण्याच्या तत्वापाई शिळ्या चपात्यांचा चिवडा, फोडणीचा भात, ताकभाकरी, शिळ्याभाजीची थालपीठं या साऱ्या पदार्थांच्या शोधाचा स्विकार केला, पण त्यावेळचं वातावरण, क्रियाशीलता, अन्नाचा पौष्टिकपणा, मानसिकता या सर्वामुळे हे सारे सहज पचन होत होतं. 

माझ्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंचे दाखले देतात. त्या १०३ वर्षे जगल्या. शेवटपर्यंत वर्तमानपत्र वाचत होत्या. दात व्यवस्थित होते. शरीराच्या खूप काही तक्रारी नव्हत्या. हे सगळे जरी खरं आहे. तरी त्यांच्या वेळचे सभोवतालचे वातावरण, अन्नधान्याचा कसदारपणा, मानसिक ताण-तणाव, बदलत गेलेले नाते संबंध, विविध सण समारंभ यामुळे घडत जाणारे व्यक्तिमत्व. याचाही आपण विचार केला तर आजच्या आम्ही प्रगतीच्या मार्गावर विज्ञानरूपी पंख लावून यशस्वी भराऱ्या मारतोय खरं…

 पण आज घड्याळ्याच्या काट्यामागे धावता धावता त्या काट्याच्याही पुढे जाण्याच्या नादात शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडून जातेय. माझ्या सासूबाई किंवा त्यांच्या सासूबाई घरातच असत म्हणजे त्यांना कमी महत्व होतं. असं मी चुकूनही म्हणणार नाही.  त्याही घरातील त्यांच्या वाटयाला येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या कुशलतेने पेलवत होत्या, पण म्हणून त्यांच्या आणि माझ्या कार्यात किंवा राहणीमानात तुलना करणं चुकीचंच.

 मी तर अलिकडे स्वतः जागृती घडवून आणलीच आहे सोबत सासूबाईंच्याही विचारात फरक पडावा म्हणून त्यांनाही सोसायटीतील महिला मंडळात भजन, किर्तन, सहली, एकत्रित खरेदी या सर्वामध्ये  सहभागी व्हायला लावते. म्हणजेच त्यांनाही स्वतःविषयी जाणीव जागृती व्हावी. 

थोडक्यात काय स्त्री म्हणून त्यांच्या विचारांची जागरूकता मला फायदयाची ठरणारच आहे ना! दुसरे म्हणजे अन्नाची नासाडी टाळण्यासाठी पहिला उपाय म्हणजे तो त्याच रात्री गरजू व्यक्तींना देवून टाकणे आणि दुसरं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण बनवणार आहेत, त्यांना विचारून करणे. या गोष्टीवर माझ्या सासूबाई चिडून म्हणतात,

‘आम्ही एवढा कट्टाकट्टी स्वयंपाक कधी केलाच नाही. एक दोन माणसं वाढली तरी सहज खपायची.’ 

पण त्यावेळेस घरात असणाऱ्या माणसाचं प्रमाण जास्त होतं. तसंच घरी येणा-जाणाऱ्यांचंही होतं. राहता राहिला प्रश्न तरीही काही उरलं तर गोठ्यात जनावरं असतंच. वेळकाळेनुसार होत जाणारे बदल, स्विकारणं खूप महत्वाचे आहे. हेच मी सासूबाईंना समजून सांगते. दोन पिढ्यांमध्ये असणारं अंतर कायम असणारच आहे पण ते जास्त होवू नये एवढी काळजी मात्र आपण नक्की घ्यायची. 

       स्त्रियांवरील मातृत्व, गृहिणी आणि अन्नपूर्णा या भुमिका ती खुप व्यवस्थितपणे पार पाडते. म्हणूनच तिला घरात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळणं खुप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे सकस जमिनीत सकस पिकांची निर्मिती होते तसंच मातृत्व भुमिकेविषयी. स्त्रीचं मन आणि शरीर आरोग्यपूर्ण असेल तर सगळं घर आनंदाचा सोहळा साजरा करतं. आयुष्यात आपण स्वतःला महत्व दिलं तर बाकीचेही आपोआपच देतात. कारण कोण आपल्याविषयी काय विचार करतो यापेक्षा आपण स्वतः विषयी काय विचार करतो हे खुप महत्वाचे असते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!