सल

              आज सकाळपासून टिटवी घरावरून घिरट्या घालीत होती. आकाशही ढगाळलं होतं. त्यामुळे वातावरणात उदासी पसरली होती. शेवंताबाईंचा सकाळपासून उजवा डोळा फडकत होता. आज काय होणार अन् काय नाही. एक तर वातावरण असलं, कामातही मन लागंना. शेवंताबाईंना सहा मुलीचं. मुलगा होईल या आशेवर सहा मुली झाल्या. मुली मात्र देवाने नक्षत्रासारख्या दिल्या होत्या. असं म्हणतात की,’गरिबांच्या घरात सौंदर्य देवाने भरभरून दिलेलं असतं’ आधी त्याला पोटा पाण्याचा घोर, अन् ते काय कमी म्हणून सौंदर्याची भर. सांभाळायचं जपायचं म्हणजे आणखी जास्तीची काळजी. शेवंता बाईंच्या सहा मुलींपैकी तिघींची लग्न झालेली होती. शेवंताबाईंकडे नाही म्हटलं तरी बागाईत शेती सहा एकर होती; पण गेल्या दोन महिन्यांपूर्वी अपघातात नवरा गेला, अन् शेवंता बाईंना आभाळ कोसळल्यासारखे वाटू लागलं. तरीही लग्न झालेल्या तिन्ही लेकी अन् तीनही जावई, सासूबाईंना आधार देण्यासाठी सरसावले. तसं तर असं म्हणतात की, मुलींना आई- वडिलांची जास्तच काळजी वाटत असते. या तत्त्वाने की काय मुली, जावई विचारपूस करत. जास्त काय हवं नको, ते सर्व वरचेवर विचारत होते. शेवंताबाईंचा खूप मोठा आधार गेला. जीवनसाथी शिवाय जीवन जगणं खूप अवघड होतं; पण दोघांनी पाहिलेलं  त्यांच्या संसाराचं चित्र पूर्ण तर करायला हवं. मांडलेला खेळ अर्ध्यावर सोडून घरधनी गेला तरी, तो खेळ आपण तरी पूर्ण करायलाच हवा. याची त्यांना चांगली जाणीव होती. बघता, बघता दिवस जात होते. शेवंताबाई जाधव तशा काही कमी खमक्या स्वभावाच्या नव्हत्या. गावात कुणी नजर उचलून पोरींकडे बघेल तर मग, त्याला भर चौकात बडवल्याशिवाय  शेवंताबाई गप्प बसत नव्हत्या. त्यामुळेच त्यांच्या सहा अप्सरे सारख्या पोरींकडे कुणी नजर उचलून काय; पण नजर वळूनही बघत नव्हतं. जाधव काका जाऊन सात महिने झाले अन् वर्षाच्या आत लग्न कार्य करायचं म्हणून जाधवांच्या घरात लेकी जावई अन् सासूबाईंची मीटिंग झाली. सर्वानुमते चार अन् पाच नंबरच्या मुलींच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा असे ठरले. त्यामुळे आपोआपच शेवंताबाईंची जबाबदारी कमी होईल. तसं तर लग्न म्हटलं की तयारी आलीच. ती काय साधी- सुधी नाही. लग्न दहा पंधरा मिनिटांत उरकेल; पण त्याची तयारीच खूप दिवसांपासून करावी लागते. लग्नानंतर एक वर्षभर सण- वार, माहेरपण, आहेर, मानपान अन् राहिलं साहिलं म्हणून बाळांतपण. एक वर्षभर तर हात खर्चातून बाहेर पडत नाही. रिमा, मीना, जया यांची लग्न होऊन प्रत्येकीला दैवकृपेने एक मुलगा, एक मुलगी होती. छाया, माया, प्रतीक्षा लग्नाच्या होत्या. त्यांच्या लग्नाच्या तयारीचे नियोजन अन् कार्यवाही रिमा, मीना अन् जया यांच्याकडे होती. रीमा पोस्टात, मीना सरकारी बँक बँकेत, तर जया खासगी बँकेत नोकरीला होती. छाया, माया, प्रतीक्षा तिघीही खूप हुशार; पण मुलींना शिकवून डॉक्टर, इंजिनिअर करणं, शेवंता बाईंच्या तत्त्वातही नव्हतं अन् आर्थिक नियोजनातही बसत नव्हतं. त्यामुळे शेवंताबाईंनी पोरींना बारावीपर्यंत शिकवून शिक्षण थांबवलं होतं. एक तर नवऱ्याची सोबत नाही अन् वर खर्चाचा धोंडा गळ्यात बांधलेला होताच. दगड दोराने गळ्यात बांधून नदीत बुडणं सोपं; पण सुंदर पोरी घेऊन जगणं खूप अवघड. पोरी मात्र खूप सालस अन् व्यावहारिक. त्यामुळेच मुलींना स्थळांची काही कमी नव्हती. आजपर्यंत शेवंतबाईंनी जावयांना  मुलगी आणि नारळ या बोलीवरच पोरी दिल्या होत्या. मागाहून सणवार, मानपान, सोनं-नाणं, अधिक वाण असलं मात्र हौसेनं भरभरून करत होत्या. खरं तर या महागाईच्या जगात एवढ्या जणांचं घर चालवणं सोपं नव्हतं;  पण शेवंता बाईंनी मात्र हिम्मतराव त्यांना अपघातात सोडून गेल्यापासून, येणाऱ्या प्रत्येक संकटाला हिमतीने तोंड दिले होते. बघता बघता छाया, मायाच्या लग्नाचा दिवस येऊन ठेपला. सर्व बाजूने तयारी झाली होती. एखाद्या कार्याला सगळ्यांचेच हात लागले, की ते कार्य झटपट होते. या कार्यामध्ये तर खूप हात मदतीसाठी सरसावले होते. शेवंताबाई अन् हिम्मतरावांची पुण्याई. पोरींना चांगली घरं मिळाली होती. थोरला जावई पोलिस, दुसरा वकील, तिसरा इंजिनिअर होता. आता चौथा जावई व्यापारी तर पाचवा डॉक्टर. पोरीचं रूप अन् गुण यांची कदर करणारी स्थळ होती सगळी. पहिल्या तिघी आपल्या संसारात सुखी होत्या. आज शुभकार्य असल्याने आपला मान मोठेपणा सगळं बाजूला ठेवून सारेजण एकत्र आले होते. लग्नघटिका जवळ येऊ लागली, तशी शेवंताबाईंना एक प्रकारचा ताण मनावर जाणवू लागला. आज हिम्मतराव असते तर, या विचारांनी त्यांचे मन आणि नयन भरून आले. मुलींना आईच्या डोळ्यात पाणी  पाहून वाईट वाटू लागले, परंतु शुभ प्रसंगी साऱ्यांनीच मनाला आवर घातला. बघता, बघता लग्नघटिका आली. अन् सनईच्या मधुर वादनात सप्त सुरांसह, देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने वधू वरांनी एकमेकांना वरले. खरंतर या वेळेस सर्वजण खूप आनंदीत होते. सर्व विधी पार पडले आणि थोड्या वेळाने नवरा नवरीला जेवणासाठी ताटं आणली होती. ताटा मधले सुग्रास जेवण मनास तृप्त करणारे होते. पुरी-श्रीखंड, बटाट्याची भाजी, पुलाव, चटणी, कोशिंबीर छोल्याची पातळ भाजी. साऱ्यांनाच आता भूक लागली होती. मायाच्या नवऱ्याने तर खूप प्रेमाने आपल्या अर्धांगिनीला प्रेमाने घास भरवला. अन् हौसेने खाल्लाही; पण छायाचा नवरा काही केल्या पुरीचा घास तोडायला तयार होईना. सर्वजन त्यांना घास भरवण्याची विनंती करत होते; पण ते काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी बोलून चालून यशस्वी व्यापारीच तो. छायाला मग सर्वांनी तूच घास भरव म्हणून आग्रह केला. छाया खूप लाजत होती. तशी ती सगळ्या बहिणीत लाजाळू अन् कमी बोलणारी. त्यामुळे तिला साऱ्या बहिणींनी तयार केलं. अन् घास भरवायला लावला; पण छे! जावई घास घ्यायलाही तयार होईनात. शेवटी छायाच्या नणंदेला भावाला समजावण्याची विनंती केली. थोड्या वेळाने छायाची ननंद सांगायला आली. 

‘दादाला, अर्धा तोळ्याची अंगठी हवी. नाही तर दादा जेवणार नाही.’ या निरोपाने साऱ्यांच्या चेहऱयावरचे रंग उडाले. अंगठी घालणे अवघड नव्हते; पण एक अंगठी नाही तर पाच अंगठ्या घालाव्या लागणार होत्या. कारण आजपर्यंत  कोणत्याच जावयाला अंगठी घातली नव्हती. मग का म्हणून अंगठी घालायची?  साऱ्यांनाच काय करावे सुचेना. शेवटी जयाकडून नणंदेला, पहिल्यांदा घरी जावई आले की अंगठी घालू म्हणून निरोप दिला. नाही, होय म्हणता कसे तरी जावईबापू तयार झाले. तेव्हा कुठं जावई बापूंनी घास घेतला. शेवंता बाईंना त्याचवेळेस जावयाची खोड लक्षात आली; पण दगडाखाली हात असल्यावर माघार घ्यावीच लागते.

                  दिवसामागून दिवस जात होते. मायाला मुलगा होऊन एक वर्ष झालं. छाया मात्र निवांत होती. या विषयी काही बोलले कि ती चिडतच असे. तसे लग्नापासून जावयाने सासरी बरेच रंग दाखवले होते. आल्या संकटाला सामोरे जाणं कर्तव्यच आहे, असं समजून शेवंताबाई चालल्या होत्या; पण एवढा मोठा व्यापारी जावई. त्याला सासरच्या गोष्टींचीच का अपेक्ष होती? ते मात्र कळत नव्हते. आज- काल तर आपल्या बरोबरीने लग्न झालेल्या मेहुणीला अपत्य आहे; पण आपल्याला नाही ही सल त्यांच्या मनात बोचत होती. त्याच्या सख्ख्या भावाचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मुलगी साधारणच होती; पण घरची परिस्थिती जोरदार होती. तिच्या घरच्यांनी भरभक्कम हुंडा अन् हौस मौज करून लग्न करून दिले. तेव्हापासून मनात सलणार दुःख आणखीनच वाढलं होतं. नाना तऱ्हेने तो छायाला त्रास देत होता; पण छाया बिचारी, आपल्या आईला त्रास नको. म्हणून गप्प बसून सहन करी. काही दिवसांपूर्वीच बहिणींकडे चार दिवस जाऊन यावे. म्हणून जयाकडे अन् मीनाकडे चार चार दिवस राहायला ती गेली होती. तिचे लग्न होऊन एक वर्ष होऊन गेले; पण अजूनही मुलबाळ नाही. म्हणून तिचा नवरा तिला खूप त्रास देई. बहिणीकडे चार चार दिवस राहिल्यावर तिच्या मनाला आणि शरीराला थोडा आराम वाटला; पण शेवटी काही जरी झालं तरी शेवटी तिला आपल्या कर्म भूमीकडे परतावाच लागणार होतं. चार तिथे चाराचे आठ दिवस झाले तर काही खैर नाही म्हणून सांगितलेल्या दिवशी ती परतली. नवऱ्याचा मूड काही वेगळा वाटला: पण खूप दिवसांच्या विरहामुळे प्रेमाची लाट येणारच, असं मानून छाया घरातल्या कामाला लागली; पण काही दिवसांनी जेव्हा आपला कार्यभाग साधून झाला. तेव्हा मात्र तो मूळ पदावर आला. मला व्यापारासाठी म्हणून ट्रक घ्यायचा आहे. माहेरून तेवढे पैसे ये.

         त्यांच्या या वाक्यावर छायाला खूप चीड आली; पण बोलून भांडून काहीच उपयोग नव्हता. तिने त्यांना खूप गोड गोड बोलून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्याला ते मान्य नव्हते. स्वतः तो तिला माहेरला सोडायला गेला. सासूबाई पुढे काहीच बोलला नाही.

   ‘ आत्ती चार दिवसांनी न्यायाला येतो. तेवढीच चार दिवस तिला विश्रांती मिळेल.’

           या त्यांच्या वाक्यावर सासूबाईं नाही थोडा संशय आलाच; पण नक्की काय झाले. हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांनी होकारार्थी मान हलवली. एवढ्यात छायाला मळमळायला लागलं. म्हणून ती पळतच नहानीत पळाली. तसं तर तिला सकाळपासून त्रास होऊ लागला होता; पण नवऱ्याला सांगितलं. तर तो नुसती चिडचिड करणार. त्यापेक्षा आईकडे गेल्यावर आईलाच सांगावं. म्हणून ती गप्प होती; परंतु तिला आता उलटी आल्यासारखे वाटू लागले आणि चक्करही येऊ लागली. 

‘अगं काय झालं चल जरा विश्रांती घे?’ 

आईच्या या वाक्यावर छाया झोपायला जाणार, तेवढ्यात आपल्या नवऱ्याचा विचार तिच्या डोक्यात आला.

‘ त्यांना जेवायला वाढते अन् मग विश्रांती घेते.’

 हे वाक्य ऐकल्यावर  शेवंताबाईंना खूप वाईट वाटले. खरंच आपली मुलगी जावयाला किती घाबरते. तरीपण त्या स्वतःला सावरत तिला म्हणाल्या,

      ‘ तू जा विश्रांती घ्यायला, मी वाढते जेवायला.’

   शेवंता बाईंनी अनुभवावरून ओळखलं होतं. छायाला नक्की काय झालं. जेवताना त्यांनी जावयाला छायाला दवाखान्यात नेण्याविषयी सुचविले, तर जावयाने लगेच जबाबदारी झटकली. 

‘तुम्हीच घेऊन जा. मला जरा घाई आहे. मी लगेच निघणार आहे.’

 झालं जावई बापू आले अन् गेले. शेवटी काय, शेवंताबाई छायाला घेऊन दवाखान्यात गेल्या. डॉक्टरांनी छायाला तपासले. अन् लगेच शेवंताबाईंचे अभिनंदन केले.

‘अभिनंदन’ तुम्ही आजी होणार.’

  या वाक्यासरशी शेवंताबाई छाया दोघेही खूश झाल्या. गोळ्या औषध आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी छायाने लक्षात घेतल्या. छायाने घरी आल्या आल्या नवऱ्याला फोन केला. तिला वाटलं त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. तसा त्यांनी आनंद व्यक्त केला; पण लगेच स्वतःला सावरत पैशांची मागणी लक्षात आणून दिली. तिला कुणीतरी दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखं वाटलं. तिने फोन ठेवला अन् मग बहिणींना फोन करून सांगावं असं तिला वाटेचना.  प्रतीक्षाने मग साऱ्यांना फोन करून कळवले. शेवंताबाईना मुलीचे लक्ष विचलित झाल्याचं जाणवलं. किती आनंद व्हायला पाहिजे. मग, मग या विचाराने त्या सुन्न झाल्या. त्यांनी मग तिला विश्वासात घेऊन विचारले; पण छायाने आईला अंत लागू दिला नाही.

  ‘काही नाही, माझा हा आई होण्याचा पहिलाच अनुभव असल्यामुळे असेल, तू नको काळजी करू.’

 छाया असं म्हणाली खरं; पण ती मनातल्या मनात विचारांच्या खोल गर्तेत पडली होती. दोन चार दिवसांनी ती आपल्या घरी परतली; पण तिला आता आपल्या नवऱ्या पुढे काय सांगायचे हा प्रश्न सतावत होता. बघता बघता रात्र झाली. तिला आता उत्तर द्यावेच लागणार होते. आली वेळ मारून नेण्यासाठी, आईला पैशाच्या मागणीबद्दल सांगितल्याचं, नवऱ्याला तिने सांगितलं. आई थोड्या दिवसांनी बघू म्हणाली असंही सांगितलं. जावई बापूंना दोन्ही बाजूंनी लॉटरी लागल्यासारखे वाटले.

      दिवसामागून दिवस जात होते. पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी केली अन्  डॉक्टरांनी बाळं सुखरूप असल्याचं सांगितलं. बाळं म्हणल्यामुळे दोघही चक्रावली. डॉक्टरांनी दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, अन् लगेच विश्लेषण केले. 

‘जुळ्यांचा जन्म होणार आहे.’

 हे ऐकून छायाला एकीकडे आनंद झाला; पण दुसरीकडे मनावर ताण जाणवू लागला. तिच्या नवऱ्याला मात्र खूप आनंद झाला. त्याने घरी आल्यावर घरात खूप आनंदाने ही बातमी सांगितली. पहिलं बाळंतपण माहेरी म्हणून छायाने नवऱ्याला विचारून, माहेरी दवाखान्यात नाव नोंदवण्याविषयी विचारले. यावर ‘तुझं बाळंतपण इथेच शहरात होईल. वाटल्यास दवाखान्याचा खर्च द्या म्हणावं. अन् इथे येऊन रहा म्हणून सांग.’

 या निर्णयावर छाया गप्प बसली. तिने दुपारी निवांत आईला दवाखान्याचा रिपोर्ट आणि नवऱ्याचा निर्णय सांगण्यासाठी फोन केला. आईला छायाला जुळे होणार म्हणून आनंद वाटला; पण जावयाच्या घरापेक्षा आपल्या घरीच लेक आली असती, तर झालं असतं चांगलं, असं वाटलं. पण हायकोर्टाच्या निर्णयावर त्या काहीच बोलू शकणार नव्हत्या. बघता बघता चोळ चोरी झाली. सातव्या महिन्यातील चोळीही झाली. चोळी झाल्यावर, लेकीसाठी म्हणून शेवंताबाई छायाच्या घरी जाऊ शकत नव्हत्या. घरात प्रतीक्षा होतीच. तरुण पोरीला एकटे सोडणे योग्य नव्हते. घेऊन जाणेही योग्य नव्हते, कारण तिचं कॉलेज संपल्यावर मी येईन असं त्यांनी सांगितलं. छाया स्वतःची काळजी घेत होती अधूनमधून जावई बापू ट्रकच्या पैशांची आठवण करून देत. तसं पहाता तर त्यांना स्वतःला काही कमी नव्हतं; पण आपल्याला मेहुणा नाही. बागायती शेतीचे भरपूर उत्पन्न. मग आपल्याला थोडा तरी फायदा नको का?  हा विचार फक्त याच जावयाच्या मनात येत होता. 

           छाया मात्र एका डोळ्यात उद्याची स्वप्नं, तर एका डोळ्यात  भयानक भविष्य घेऊन जगत होती. ती प्रत्येक दिवस काळजीत ढकलत होती. खरं तर या दिवसांत खूप आनंदी राहायला हवं. हे छायाला ही माहीत होतं; पण शेवटी स्वप्न आणि वास्तव यात खूप फरक असतो. डॉक्टरांनी दिलेली तारीख जवळ आली अन् सासूबाई आल्या. छायाच्या नवऱ्याला सासूबाईंनी थोडी तरी रक्कम आणली असेल, असं वाटलं; पण त्यांची निराशा झाली. तरीही ते छाया जवळ गप्प न बसता कुरकुरलेच; पण तिने बाळंतपणाचा खर्च आहे. पुन्हा बघू म्हणून समजूत काढली. एक एक दिवस जवळ येत होता. तसा छायाला ताण जाणवू लागला. शेवटी गुरुवारचा दिवस उजाडला. आज सकाळपासूनच छायाला त्रास होऊ लागला. म्हणून शेवंताबाई तिला घेऊन दवाखान्यात गेल्या. अवघ्या दोन- अडीच तासात तिचे सिझर करावे लागले. दोन गोंडस बाळांना तिने  जन्म दिला. एक मुलगा एक मुलगी. शेवंता बाईंनी छायाच्या डोक्यावरून कपाळावरून हात फिरवून, तिच्या तब्येतीची चौकशी केली. जावईबापूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने छायाला एका शब्दानेही विचारले नाही; पण आपल्या बाळांशी गप्पा मारण्यात ते गर्क झाले होते. तिला आपल्याशी बोलले नाही, या दुःखापेक्षा बाळांना आनंदाने घेतलं. याचं खूप समाधान होते. शेवटी या मोठ्या आनंदाने तरी माणसाचा  स्वभाव बदलेल, असं तिला वाटत होतं. जावयांनी आनंदाने साऱ्या भावकीत, नातेवाईकात पेढे अन् जिलेबी दोन्हीही वाटले. त्यांना आता स्वर्ग दोन बोट उरल्याचा भास होत होता.

           बघता बघता अमृता अन् अमोल यांचा वाढदिवस तोंडावर आला. जावईबापूंनी तो खूप धामधुमीत करायचं ठरवलं. त्यांनी पैशांची केलेली मागणी सासरच्यांनी पूर्ण केली नव्हती. म्हणून त्यांनी जो पर्यंत सासरहून पैसे येत नाही. तोपर्यंत बायकोला माहेरी पाठवायचे नाही असे ठरवले होते. बाळांतपणानंतर फक्त एक महिना तिला माहेरी पाठवले; पण पुन्हा मात्र कधी पाठवलेच नाही. तीही आपले मन मारून नाईलाजाने राहात होती. आता मात्र वाढदिवसाला सगळ्यांना बोलावलं; पण सासरी आमंत्रण दिलं नव्हतं. छायाला खूप वाईट वाटू लागलं. सासूबाईंना तर ट्रकच्या पैशांची मागणी माहिती नव्हती. त्यामुळे ‘आम्हाला वाढदिवसाचे निमंत्रण का नाही?’

 म्हणून त्यांनी छायाला फोनवरून विचारणा केली. छायाने आज आपल्या मनातले दुःख, आईला सांगून मन मोकळे केले. मनावरचा एक दगड बाजूला सारला. तरी तिला हा दगड आईच्या मनावर ठेवला. याचे वाईट वाटत होते. आईने सर्व परिस्थिती लक्षात घेतली अन् बाकी सर्व आले की त्यांच्या बरोबर सल्ला मसलत करून एकटे का होईना, वाढदिवसाला जायचे ठरवले. वाढदिवसादिवशी दारात मंडप अन् बाकीचा सर्व थाट जावई बापूंनी केला होता. जेवणासाठी पंचपक्वानांचा बेत होता. बघता बघता सर्व पाहुणे मंडळी, भावकी गोळा झाली. सासूबाईही आल्याच होत्या. याच संधीचा फायदा घेऊन जावयाने सासूबाईंनी आणलेल्या भेट वस्तूंवरून त्यांचा अपमान केला. छायाला तर रडून आवरेना. खरं तर आमंत्रण नसतानाही आई वाढदिवसाला आली आणि तरी सर्व माणसांसमोर जावयाने असा अपमान केला. हे तिला सहन झाले नाही. तरीही शेवंताबाईंनी आपल्या लेकीला शांत राहण्यास सांगितले. एवढ्या खमक्या शेवंताबाई जावया पुढे मात्र गप्प बसल्या. सर्वांना आश्चर्य वाटले. कार्यक्रमात रंगाचा बेरंग नको, म्हणून छाया आईच्या आज्ञेवरून गप्प बसली. कार्यक्रमाला भरपूर माणसे आली होती. कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा झाला फक्त आईच्या अपमानाची सल मात्र छायाच्या मनात बोचत होती.  भेटवस्तूंनी एक खोली भरली होती. स्वतः मुलांसाठी म्हणून छायाने हौसेने बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या. मुलगा- मुलगी झाल्यापासून जावई बापूंच्या व्यापाराची भरभराट झाली होती. दोन दुकानांची, चार झाली होती. दारात दोन चारचाकी गाड्या होत्याच. जावाईबापुंना देवाने भरभरून दिले होते. छायाच्या रूपाने तर लक्ष्मी घरात नांदत होती; पण जावईबापूंचा डोळा सासरच्या बागायत शेतीवर होता. म्हणून तर काही ना काही  कारण काढून ते पैसे मागत. वाढदिवसा दिवशी  शेवंताबाईंचा अपमान केल्यावर, त्यांना मानसिक समाधान मिळाले. छायाला मात्र त्या दिवसापासून डोकं फिरल्यासारखं वाटू लागलं. तिने आजपर्यंत सहन केले; पण आता तिला सहन होईल असं वाटत नव्हतं. ती त्या दिवसापासून सारखी काहीतरी विचार करत होती.      आईच्या अपमानामुळे तिला खूप वाईट वाटत होते. तिने काहीतरी ठाम निश्चय केला. आईला फोन लावला. तिच्याशी व्यवस्थित बोलून तिची खुशाली विचारली. सगळ्या बहिणींना फोन लावून बोलली. तिला आज साऱ्यांचीच खूप आठवण येत होती, असंही तिने सांगितले. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर नवऱ्याशी बोलताना, तिची थोडी कुरबूर झाली. त्या रागात ती तशीच झोपली. सकाळी सगळे इकडे तिकडे आपापल्या कामात गुंतलेले असताना, ती दोन्ही बाळांना घेऊन शेजारांच्या शेतात गेली. अन् कुणाला काही कळायच्या आत तिने आपल्यासह तिघांच्या जीवनाचा विहिरीमध्ये उडी मारून अंत केला. थोड्या वेळाने घरामध्ये तिघंही नाही, हे लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली. अन् शेजारच्या रामाला विहिरीकडे चपला दिसल्या. त्या बघून तो घाबरून गावाकडे परतला. त्याने साऱ्यांना सांगितल्यावर विहिरीत शोधाशोध केली. तर काय ती माऊली आपल्या दोन बाळांना घेऊन देवाघरी गेली होती. 

          वाऱ्यासारखी ही बातमी पंचक्रोशीत पसरली. लाजणारी, अल्प बोलणारी छाया मनातल्या मनात कुढत राहिली. अन् शेवटी सर्व जगाला काही न सांगता, काही न बोलता सर्वांपासून दूर दूर निघून गेली. गावांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. वरकरणी छायाचा स्वभाव शांत होता. तरीही  मनातली सल तिने अशी बाहेर काढली होती. नवऱ्याच्या वागण्याची जबरदस्त शिक्षा, तिने त्याला दिली होती. ज्या बाळांच्या जन्माचे सार्थक झाले असे त्याला वाटले. त्याच बाळांना घेऊन ती गुपचूप न सांगता गेली. 

           भांडण आरोप, प्रत्यारोप, पोलिस कम्प्लेंट सारं सारं झालं; पण गेलेला माणूस काही आला नाही. छायाने आपली खंत या रूपाने बाहेर काढली. छाया गेल्याने शेवंताबाई खचल्या, आजारी पडल्या. बहिणींनाही क्षणाक्षणाला ती आठवत होती. मुख्य म्हणजे छायाचा नवरा खूप शांत झाला. त्या दिवसापासून तर तो जास्त कोणाशी बोलत नसे. जणू जाता जाता छायाने त्याचा आनंद, बोलणं चोरून नेलं होतं. छायाने खरं तर खूपच टोकाची भूमिका घेतली होती. तिने नवऱ्यापासून फारकत घेऊन, आपला संसार पूर्ण करायचा होता; पण, पण हे काय. आपल्या बरोबर त्या निष्पाप जीवांच्या अंताला ती कारणीभूत ठरली. शेवटी संसार अर्ध्यावर सोडून गेल्यामुळे नवऱ्याच्या मनात एक सल टोचू लागली. आजपर्यंत आपल्या असल्या वागण्याने आपण काय मिळवलं; पण मिळवण्यापेक्षा गमावल्याची यादी मोठी होती. 

               तो नजर लावून आकाशाकडे पाहात बसला होता. मोकळं, मोकळं आकाश. मन मात्र गच्चं भरलेलं साऱ्यांचच. आटोकाट प्रयत्नांनीही फुंकर न बसणारं मन, काटोकाट भरलं होतं दुःखाने.

        सौ आशा अरुण पाटील सोलापूर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!