माझ्यावर प्रभाव टाकणारी पुस्तके
वाचता वाचता वाचता गेले
वाचन कौशल्य फुलत गेले
भूतकाळाच्या जाणून गोष्टी
वर्तमानकाळी भविष्य पाहिले
समृद्ध वाचनाने ज्ञान वृद्धिंगत होते. अनुभव समृद्ध होतात. जीवन पथदर्शी होते. बाल वयात गोष्टीं पासून मोठ्या वयात आत्मचरित्र किंवा वैचारिक वाचनाने वेगळीच अनुभूती येते. चांदोमामाच्या संकल्पनेपासून झालेली सुरुवात मोठ्या वयात वैचारिक वाचनाने मिळालेल्या ज्ञानाचे, बौद्धिक पातळीवर चिकित्सक रीतीने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाताळणी करून ते ज्ञान मान्य केले जाते. बालपणी बोधकथा, दंतकथा, चंपक, चांदोबा, अकबर- बिरबल, किशोर ही मासिकं आणि जोडीला दैनंदिन वृत्तपत्र वाचत बालपण रम्य झाले. लहानपणी पाठ्यपुस्तकातील मराठीचे धडे, कविता, इतिहासाचे पाठ आजही आठवणीत आहेत. बालकवींची कविता आजही स्मरणात आहे. कवितेने मनावर गारुड केलं आहे. थोरांची ओळख अन् शिवरायांचा इतिहास कधीच विसरणार नाही. त्यांची स्वराज्याविषयी, जनतेविषयी, प्रजेविषयी अन् दुश्मनांविषयी धोरणं पाहिली, वाचली तर आजही आदराने आपले मस्तक झुकते. राजा राणीच्या गोष्टी, विक्रम वेताळ, विक्रमादित्य, सिंहासन बत्तीसी खूप आवडे. इसापनीती मधील प्राण्यांचे संवाद खूप आवडतात. त्या गोष्टी मधून निघालेले तात्पर्य मनाला रुचे.
रामायण महाभारत वाचताना त्यातील अनेक व्यक्तींच्या स्वभावाचे दर्शन घडते. अनेक महत्त्वपूर्ण घटना माहिती होतात. खरंच रामायण नक्की का घडले? राम हे स्वतः देव होते. मग ते नको असलेल्या घटना थांबवू शकत होते. पण ते मनुष्यरूपात मनुष्य योनीच्या बंधनात, मर्यादेत. त्यांचे कर्तव्य, क्षमता यांचे उत्कट दर्शन आपण रामायणात पाहतो. तर महाभारतात कौरव आणि पांडव पाहिल्यावर प्रथमदर्शनी आपण कौरवांना वाईट संबोधतो. खरंही असेल पण परवाच मी काका विधाते या लेखकाने लिहिलेली दुर्योधन ही कादंबरी वाचली. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. पूर्वापार चालत आलेल्या मानसिकतेमुळे, दुर्योधनाच्या वागण्यामुळे, आपण त्याला वाईट म्हणतो. परंतु त्याच वेळी त्याच्या चांगल्या गुणांकडे थोडं सुद्धा लक्ष देत नाही. पांडवांच्या वाईट गुणांचाही डोक्यात विचार येत नाही. म्हणजेच काय रामायण असो किंवा महाभारत दृष्टिकोन पूर्वापार चालत आला आहे तो कायमचाच. रामायणातील अनेक घटना आदर्श पुत्र, बंधू, सखा, पती, पिता, राजा यांचे दर्शन घडवतात. रामायणातील कैकयी आणि रावण हे वाईट खल करणारी पात्र आवडत नाहीत. आजही ती आवडतच नाहीत पण कधी तरी मनात विचार येतो. रावणाची शंकर भक्ती आणि पुण्य कर्मांमुळेच त्याचे मरण देवताच्या हातून ठरले होते. यासाठी सीताहरण हे दुष्कृत्य त्याच्या हातून व्हावे लागले.
मृत्युंजय शिवाजी सावंत लिखित कादंबरी या मध्ये कुंती, कर्ण, द्रोणाचार्य, दुर्योधन, अर्जुन अशी बऱ्याच धुरंधरांची चरित्र वाचली की प्रत्येक व्यक्तीतील आदर्श डोळ्यासमोर येतो आणि पूर्वापार मानत आलेल्या प्रतिभा थोड्याफार प्रमाणात का होईना बदलल्या जातात. कुंतीला वरदानामुळे प्राप्त झालेला सूर्यपुत्र म्हणजेच कर्ण. मग यामध्ये त्याचं जन्मणं नावारस का ठरवलं जाव? नक्की चुक कोणाची? कुमारी माता म्हणून घेणे कोणती ला रस्ता वाटतही नसेल. म्हणून कर्णासाठी ती सजा ठरावी? आयुष्यभर सूतपुत्र म्हणून घेण्याची वेळ का यावी असा प्रश्न सतावतो.
व पु काळे यांचे वपुर्झा पुस्तक तर मला खूपच आवडले. कोणत्याही पानापासून सुरुवात केली तरी प्रत्येक पान अर्थपूर्ण. कोणतेही पान उघडा अन् वाचा. प्रत्येक पानातून साहित्याच्या समृद्धपुर्ण अवस्थेचे दर्शन घडते. सावरकरांचे काळे पाणी वाचताना प्रत्येक घटनेतून देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी झेललेल्या अन्याय, अत्याचाराचे दर्शन होते. स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वचन ते मायभूमीला देतात. ही कादंबरी वाचताना अंगावर रोमांच दाटून येतात.
शिवाजी सावंत यांची छावा वाचतानाही शौर्यरसाचे ओथंबून आले दर्शन होते. काका विधातेंची ‘रक्ताचा’ या कादंबरीत पेशव्यांसाठी इंग्रजांविरुद्ध लढलेल्या व लढ्यात आत्मसमर्पण केलेल्या कानपूर येथील नर्तकी अझीजान. यांच्यावर लिहिलेली १९९१ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचली तर मन सुन्न होते. मानवतेच्या स्वभावाचे, नात्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन होते. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या ‘पारध’ राजा रामचंद्र देव आणि बिहार ओरिसाचे सुभेदार मुर्शीद कुलीखानची कन्या रझिया. त्या दोघांच्या प्रेमकथेचा, त्यामधून उद्भवलेल्या सामाजिक आणि राजकीय समन्वयाचा, संघर्षाचा वेध घेणारी कादंबरी मनाचा ठाव घेते. त्याचप्रमाणे काका विधातेंच्या दर्यादिल, भार्गव, संताजी याही वाचनीय आहेत.
ज्ञानेश्वरी लहानपणी वाचली पण त्या ओळींचा मतितार्थ, गर्भितार्थ आता लक्षात येतो. सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांची बौद्धिक पातळी, त्यांचा अति उच्च दर्जा आपल्यासाठी आदर्श ठरतो. त्यांनी लिहिलेले आपल्यासाठी ज्ञानदर्शन, जीवनदर्शन ठरते. ते लिखाण पूर्वीपासूनच मार्गदर्शक वाटते आणि आजही वाटते. यात तिळमात्र शंका नाही.
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो. त्या गदीमांच्या गीत-रामायणासारखी रचना वाचल्यावर धन्य वाटते. मेघदूत ही कालिदासांची अमर कलाकृती. आतापर्यंत याचा सारांश वाचला पण ती कलाकृती पूर्ण वाचण्याचा मानस आहे. त्यांची शाकुंतल ही थोडक्यात अनुवादित वाचले. आनंद यादवांच्या झोंबी मनाचा ठाव घेणारी आहे . नरेंद्र दाभोळकरांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ पुस्तक वाचले. खरंच श्वासाच्या शेवटपर्यंत ही व्यक्ती अंधश्रद्धेच्या खोल गर्तेतून देशाला बाहेर काढण्यासाठी झटली. ‘अग्निपंख’ हे अब्दुल कलामांची कादंबरी आवडली. नावाड्याच्या मुलाने घेतलेली ध्येयासक्ती त्याला थोर वैज्ञानिक बनविते आणि पुढे जाऊन ते देशाचे राष्ट्रपती होतात. ही प्रेरक कथा आपल्यालाही क्रियाशील बनवते. ‘तोत्तोचान’ हे अनुवादित पुस्तक वाचलं आणि खोडकर किंवा अभ्यासाच्या त्यात त्या साच्यातून अध्ययन करण्यास नकार देणारी ती. प्रयोगशील शाळेतून शिकून जीवनात यशस्वी होते. हे वाचून खूप छान वाटले. आज आपण बऱ्याच शाळांमधून अशी अभ्यासपद्धती राबवताना पहातोय. हेरंब कुलकर्णी यांचा
‘ काळा फळा पांढरा खडू’ हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातील अंतर्गत घडामोडी पारदर्शकपणे वाचकांसमोर सादर करते आणि वाचकांना विचार करण्यास कारणीभूत ठरते. वि. स. खांडेकर यांचे ‘ययाती’ रविंद्रनाथ टागोरांची ‘गीतांजली’, रणजीत देसाईंची ‘स्वामी’, पु ल देशपांडे यांचे ‘बटाट्याची चाळ’,’ अमलदार’ शंकर खरातांचे ‘तराळ- अंतराळ’, दया पवारांची ‘बलुतं’, व पु काळेंचे ‘पार्टनर’, या साऱ्यांचे वर्णन करणे शब्द मर्यादेमुळे शक्य नाही.
प्रख्यात नाटककार व ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक श्री अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ ही महाकादंबरी लिहिली आहे. श्री महर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली ही बहुतेक मराठीतील पहिली कादंबरी असावी. भारतातील आर्ष काळातील श्री परशुराम, श्री हनुमान, बळीराजा, बिभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात. अश्वत्थामा सोडून बाकी सहा जणांसाठी हे वरदान असले तरी अश्वत्थाम्यासाठी हा दुर्धर शाप आहे. अश्वत्थामाने केलेल्या राजकारणाचे फलित म्हणून श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या कपाळावर उर्ध्वभागी असलेला जन्मजात नीलमणी उपटल्यावर तेल मागणाऱ्या अश्वत्थाम्याच्या भावना किंवा संवेदनांचे लौकिक वर्णन न करता तर्कनिष्ठ पद्धतीने पडलेल्या प्रश्नांची उकल केली आहे. या कादंबरीत अश्वत्थाम्याच्या सर्वांगीण गुणांचा वेध घेत असताना फक्त ऐकिव कथा किंवा घटनांवर विश्वास न ठेवता. स्वतः अनेक संदर्भ ग्रंथ अभ्यासून तर्कशुद्धतेने मतं मांडली आहेत. कादंबरी वाचताना आपल्या जीवनात अश्वत्थाम्यासारखी आपली स्थिती झाली असेल तर सहज स्मरते. सातपुड्याच्या पर्वतनगांमध्ये अस्तंबा या पर्वतावर एकाकी राहणारा द्रोणपुत्र, स्वतःच्या भळभळणाऱ्या जखमेसाठी तेल मागणाऱ्या अश्वत्थाम्याचा आलेख मांडत असताना कारूण्य किंवा विषादाच्या भावना अतिभावूक किंवा अतिसंवेदनेने गडद न करता तर्कनिष्ठ पद्धतीने पडलेल्या विराट प्रश्नांची सहज उकल केली आहे. प्रतिस्मृती योग विद्या ही फक्त श्रीकृष्ण, महर्षी व्यास, बृहस्पती, धर्मराज, गुरु द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि अश्वत्थामा यांना प्राप्त होती. या विद्येचा चपखलपणे वापर करत अशोक समेळ यांनी कादंबरीला कमालीचे उंचीवर नेऊन ठेवले आहे.
‘ज्या गर्भाने डोळे उघडले नाहीत. त्याची गर्भावस्थेत निर्घुणपणे हत्या करणाऱ्याला डोळे मिटण्याची मुभा अजिबात नाही.’
म्हणुन अश्वत्थाम्याला मरण्याचे पुण्य देता येत नाही. मरणप्राय यातना तो भोगणारच हे त्याचे संचित आहे. अर्थगर्भ आशय देणारी नि सत्य शिव सुंदर या भारतीय संस्कृतीच्या मुल्यांची पुनर्स्थापना करणारी ही कादंबरी वाचलीच पाहिजे अशी आहे.
आतापर्यंत मी कोणत्याही एका लेखकाच्या लेखनाचे वाचन करण्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठांसोबत नवनवीन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करते. यामुळे एकाच धाटणीचे साहित्य वाचण्यापेक्षा नवनवीन विषय वाचन्याने विचार समृद्ध, सर्वसमावेशक आणि विस्तृत होतात. ‘द मंक हू सोल्ड हिज फेरारी’ ‘दि ग्रेटनेस गाईड’ ही मराठीत भाषांतरित पुस्तके वाचली. जीवनात मार्गदर्शक अशी पुस्तकं फक्त मराठीतच नाहीतर हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आढळली. ‘निर्मला’ ‘गोदान’ लिहिणारे प्रेमचंद. हरिवंशराय बच्चन, सुमित्रानंदन पंत, चंद्रधर शर्मा गुलेरी, सुमित्रानंदन पंत या सर्व लेखकांच्या कलाकृती बरंच काही सांगून जातात. शेक्सपीयरला आपण विसरू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रेड खाऊन पोटाची भूक भागविली. कारण त्यांना वाचनाची, ज्ञानाची भूक भागवायची होती. तशीच चिकाटी, जिद्द, ध्येय उरी बाळगून मी माझा साहित्यप्रवास आक्रमित आहे. मला शक्य होईल तेवढा वेळ मी वाचनासाठी देते. जेव्हा उत्स्फूर्त भावना प्रकटीकरण होतात तेव्हा ते लेखन सर्वांच्या मनाला भावते. मला माझ्या गुरुंचे सांगणेच आहे, दररोज थोडे तरी वाचत जा. तरच लेखनात विविधता येते. वेगवेगळे विषय सुचतात. जीवनात सगळेच अनुभव घ्यायचे नसतात तर काली वाचनातूनही मिळवायचे असतात. याच ध्येयातून मी वाचन आत्मानंदाकरिता करते आणि करतच राहीन.
‘वाचाल तर वाचाल.’