दिपज्योती

                           जगाचा कारभार कितीही सर्वव्यापी असला तरी तो सावरतो माणूसच. या माणसाला कारभार सुरळीत, सोपा करण्यासाठी, शांत मन अन् थंड डोक्याची आवश्यकता भासत असते आणि ही आवश्यकता पूर्ण करणारी मी म्हणजेच प्रत्येक पुरुषाच्या मागे खंबीरपणे मानसिक स्थैर्य आणि संसाराचे एक चाक समर्थपणे पेलणारी स्त्री. दोन महिन्यांपूर्वीच महिला दिन साजरा झाला. महिलांसाठी सगळ्याच घरात योग्य वातावरण असेल किंवा नसेल. पण महिला स्वतःसाठी आहे त्या स्थितीत वास्तव स्विकारून प्रत्येकजण आपापल्या घराचा संसाराचा स्वर्ग करतात. हे मात्र अगदी खरे.

            अहो परवाच काय झालं. जरा यांचं आणि माझं जरासं प्रेमाचं भांडण झाले. तसं पहाता संसाराला रुसव्या फुगव्याशिवाय गंमतच नाही. 

नवीन नवीन संसारात दोघं आम्ही राजा-राणी 

आणि नसताना तिसरा कुणी

 का बरे अशी दूरी

मग मी गेले तडक सासरी. 

सासरी गेले असे सांगण्याचा खास उद्देश असा की आम्ही दोघं नौकरीच्या निमित्ताने असतो शहराच्या ठिकाणी. सासू-सासरे आणि छोटे दीर गावाकडे. शेती असल्याने त्यांना शहरात राहणे जमत नाही आणि शहरात नौकरी त्यामुळे आम्ही जास्त गावाकडे जावू शकत नाही. मग काय झालीच आहे थोडी कुरकर तर मग एवढ्या वेळी सासरी फेरफटका मारून त्यांचीही थोडी सेवा करावी असा विचार केला. विचार सत्यात उत्तरवणार ही माझ्या मनाची जिद्द होती. पण ही काय जाते मला सोडून कुठे? गेली तरी माझे काय अडणारे? असा समज त्यांच्या नजरेतून मी टिपला आणि गाव गाठला. गावी सगळे छान चालले होते. अचानक न कळवता आल्याने आश्चर्यच वाटले त्यांना. पण काहीही न सांगता सहजच आले असे सांगितले. रागाने रुसून आल्याने पोहोचले किंवा मी इकडे आले असे काहीच सांगितले नाही.

                           आश्चर्यम सासूबाईनी मी न सांगता बरेच काही माझ्या बोलण्याच्या लकबीवरून ओळखले आणि माझ्या समोरच यांना फोन करून ख्याली खुशाली विचारून रकमा आली असं सांगितलं. पण जुजबी उत्तरं देत नवऱ्याने पटकन फोन ठेवला पण तिला दे मी बोलतो असे नाही म्हणाले, तुझी तलवार तर माझीही तलवार असा तणाव होताच. सासू-सासऱ्यांबरोबर इकडे तिकडे चार दिवस कसेतरी गेले. सारखं मनात घराचे, यांचे विचार येत होते. काय खात असतील. व्यवस्थित असतील ना? मी नसल्याने कसे राहत असतील? बाहेरचं खावून पोट बिघडले असेल का ? सारखं उठता बसता यांचाच विचार येई. माझ्या वागण्यावरून सासू-सासऱ्यांनी ताडलं. दोघांनी रात्री जेवणानंतर गप्पात विषय काढला. जवळीकत्ता झालीच पाहिजे यासाठी समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या. एकमेकांशिवाय संसार होत नसतो हे समजून सांगितले. त्याचे कधी तर तुझेही कधी तरी चुकणारच ना! तसे मी तडकाफडकी असं कधी घरातून बाहेर गेले नव्हते. मला चुकल्यासारखे वाटत होतं. शेवटी बऱ्याच विचाराअंती मी माझ्या घरट्याकडे परतण्याचे ठरवले. नाहीतर माझे तन इथे अन् मन तिथे होते. मी सासू-सासऱ्यांना परत जाण्याविषयी बोलले. पण मी परत येते हे न सांगण्याची विनंती ही केली..  

                          एके दिवशी मी माझ्या घरी आले तेव्हा मी का म्हणून गेले असा पश्चाताप मला झाला. जिकडे पहावा तिकडे पसारा होता. यांनी ऑफिसला गेले होते. घरातील अशी पडलेल्या कोणतीही जागा शिल्लक नव्हती जिथे उगाचच वस्तू नव्हत्या. कहर म्हणजे मी गेल्यापासून देवपूजाही प्रत्येक झाली नव्हती. मी प्रथम घर आवण्यासाठी पदर खोचला. दीड-दोन तासात घर स्वच्छ आवरून झाडून पुसून झाले. आता कुठं त्याला बरा असा आकार आला होता. धुळ, घाम आणि प्रवासानंतर अंघोळ केल्यावर प्रसन्न वाटलेच पण देवपूजा केल्यावर मन प्रसन्न आणि शांत वाटलं. झाडंही पाणी घातल्याने टवटवीत दिसू लागली. कालचा डबा घासण्यासाठी बेसीनजवळ दिसला. त्यात मॅगी दिसत होती.

 मी गेले की झालं मन मानेल ते केलेले दिसत होते. पण आता हे घर, या घरातील वस्तू माझी वाट पहात होती. . मी नसल्याने धूळ साठलेल्या वस्तू मी आल्यावर चमकून समाधानानं जणू मला पहात होत्या. गेल्या काही दिवसात घराची अवस्था जणू वर्णन करत होत्या. मी येण्याची सगळेच वाट पहात होते. मी यांच्या आवडीचे मस्त भजी अन् चहा केला होता. कितीही झाले तरी त्यांच्या शिवाय माझे जग असूच शकत नाही असं वाटत असतानाच त्यांची चाहूल लागली.

नाहीतरी संसारी ते दिवा मी ज्योती. मिळून संसारी प्रज्वलित साऱ्या दिशा जगती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!