उध्वस्त

                   सकाळी सकाळीच शकुंतलाचा राहिला फोन आला. शकुंतलाची मावस बहीण रसिका, आयसीयूमध्ये ॲडमिट होती.शकुंतलाला फोनवर बोलताही येईना. शकुंतलाने राहिला काही दिवसांपूर्वी रसिकाच्या आजारपणाची कल्पना दिली होती रसिका नावाप्रमाणेच रसिक वृत्तीची. आरोग्य पर्यावरण कला अशा अनेक क्षेत्रात हातखंडा असलेली. ती योगा स्वतः करतच होती; पण इतरांनाही प्रोत्साहन देत होती. म्हणून तिने सखी ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमधल्या सखी मिळून दररोज सकाळी एक तास योगा करत. तिच्या बरोबर ती सर्वांनाच आरोग्यपूर्ण राहण्यासाठी योगा क्लासच्या वेळी आहाराचीही माहिती देत होती. अशा या रसिकाला ब्रेन ट्यूमर व्हावा, ही धक्कादायक आणि आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट होती. पूर्वी रसिका स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करत होती. आज पर्यंत तिचे कितीतरी विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले. मोठमोठ्या पदावर यशस्वीपणे कार्यरत होते. तिच्या शिकवण्याच्या आदर्श पद्धतीमुळेच तिचा क्लासचा टीचिंग ग्रुप प्रत्येक गोष्टीत तिचा सल्ला घेत असे. रसिका आपल्या क्लासच्या ठिकाणीच काय; पण घराशेजारील लोकांनाही चांगले सहकार्य करीत असे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांमधील ठराविक विद्यार्थ्यांची ती स्वतः ही भरत होती. तिच्या पगाराची तशी घरात गरज नव्हती; कारण रसिकाचे मिस्टर बँकेत कॅशिअर होते. रसिकाला एक मुलगा व एक मुलगी दोघेही अतिशय हुशार संस्कारशील आणि सुस्वभावी. मुलगा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला तर मुलीने नुकतीच पत्रकारिता कोर्सला अॅडमिशन घेतलेले. दोघांचेही विचार आईशी मिळते जुळते. रसिकाने मुलीचे नाव यशस्विनी तर मुलाचे नाव अजिंक्य ठेवले होते रसिकाने अंगणात अबोलीचे झाड लावले होते फुलझाडांचे तिला खूप वेड होते अबोलीला दररोज पाणी घालून पाच दहा मिनिट तरी तिथे थांबे. झाड छान बहरले होते. रसिकाला आपल्या घरातील व्यक्तींना काय हवं काय नको, हे सर्व पाहायला आवडत होतेच; पण आता ती जिव्हाळा नावाचा वृद्धाश्रम काढणार होती. तिला सासू सासरे नव्हते. तिचा नवरा अनाथाश्रमात वाढला होता. तिच्या लग्नानंतर लगेच चार वर्षांत तिची आई अपघातात  मृत्यू पावली होती. सासरचं जवळचं असं कोणी नव्हतं, तरी माहेरच्या लोकांचा खूप आधार दिला होता. तिच्या आर्थिक मदतीची घराला गरज नव्हती पण मुले मोठी झाल्यामुळे घरात वेळ जात नाही म्हणून तिने वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला गुंतवून घेतले होते. आतापर्यंत तिने अफाट पुस्तकांचे वाचन केले होते. तिने पुस्तक  भिशी हा प्रकार सुरू केला आणि तो सर्वांसाठी आदर्श ठरला. या निमित्ताने तिच्याबरोबर बऱ्याच जणांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली. तिच्या मैत्रिणी तिला ब्लॅक ब्युटी तर कोणी एव्हर ग्रीन म्हणत. दिसायला गहू वर्णी असणाऱ्या रसिकाच्या वेणीचा शेपटा कमरेच्या खाली पर्यंत होता. तिच्या पाणीदार डोळ्यात नेहमीच आनंदाची चमक दिसे. तिच्या हास्याने जणू मोती चमकल्यांचा भास होई.गालावरील खळ्या पाहून कोणीही मोहित होईल असे हास्य  होते. तिच्या दिसण्या बरोबरच तिचा स्वभाव सर्वांना आपलेसे करून घेई. रसिका नेहमीच स्वतःबरोबर घरातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेई. अलीकडे मात्र तिला स्वतःमध्ये ही काहीसा बदल जाणवू लागला. तिला थोडे फार काम केले तरी दमल्या सारखे वाटे कोणाशीही बोलायला नको वाटे छोट्या छोट्या गोष्टींवरून  चिडचिड होई. तिच्या मधला बदल यशस्विनी, अजिंक्य यांच्याबरोबर आशुतोष लाही मान्य होता. सहमतीने त्यांनी रसिकाला फॅमिली डॉक्टरांकडे दाखविण्याचे ठरविले. रसिकाला मात्र स्वतःला काही झाले आहे, हे मान्य नव्हते  तिने चाल ढकल  करून  एक दोन महिने घालविले. मात्र एके दिवशी क्लासवरून परतताना, तिचा तोल जाऊ लागला. अन् अचानक चक्कर आल्याने ती रस्त्यातच पडली. ओळखीच्या काकूने तिला घरी सोडले. आशुतोषने तिच्यापुढे आता हात जोडले आणि दवाखान्यात चलण्याचा आग्रह केला. त्याने त्यासाठी बँकेतून दीर्घ  रजा काढली होती. दवाखान्यातील काही प्राथमिक टेस्ट वरून काही लक्षात येईना, म्हणून डॉक्टरांनी तिला बाकीच्या टेस्ट करायला लावल्या. आपल्याला काहीतरी वेगळे झाले तर मग आपल्या कुटुंबाचे कसे होणार, असे तिला वाटत होते. तरीही आपण आपल्या योगामुळे मन आणि शरीराने कधीच हार मानायची नाही, हे तिने मनाशी पक्के ठरवले होते. बघता बघता तिचे वजन आठ ते दहा किलोने कमी झाले. म्हणतात ना चिता शरीराला जाते अन् चिंता मनाला जाळते. तिला आता दवाखान्याच्या ट्रीटमेंटसाठी वेळ द्यावा लागणार होता. तिने क्लासला जायचे बंद केले अन् त्यामुळे बऱ्याच जणांना तिच्या आजाराविषयी माहिती झाले. घरात असताना बघता बघता एके दिवशी ती बेशुद्ध पडली अन् तिला आयसीयूमध्ये दाखल केले. शकुंतला  राहिला पाहायला गेली पण तिची स्थिती त्याच्याने पहावेना. डोक्याचे ऑपरेशन म्हणून केस काढले होते. अन् डोक्याला सर्व पांढऱ्या पट्ट्यांनी गुंडाळले होते. अटॅकमुळे चेहरा बघवेना झाला होता. एकंदरीत तिची स्थिती पाहता शकुंतलाला अश्रू अनावर झाले. खरं तर सर्व स्थिती एकदम बदलली. अजिंक्य अन् यशस्विनी एकदम गंभीर झाले होते. भान हरपलेल्या सारखी त्यांची स्थिती झाली होती. कोवळ्या वेलीने वृक्षाचा आधार घेऊन मातीमध्ये आपली मुळं खोल वर रुजवून पक्कं  उभ राहायच्या वयातच वेलीला सोसाट्याच्या वाऱ्याने उद्ध्वस्त करावं अन् वेलीचं  अस्तित्व होत्याचं नव्हतं व्हाव, तसं काहीसं रसिकांचं अन् तिच्या कुटुंबाच   झालं होतं अाशुतोषला  मुलांना सावरणे क्रमप्राप्त होते; पण त्याला स्वतःलाच आधार  नसल्याचा  भास होऊ लागला होता.  आता कोणी कोणास आधार द्यायचा अन् खोटी आशा मनात धरायची ते कळेना. शकुंतलाला पाहाताच यशस्विनी अन् अजिंक्यने तिच्याजवळ आपलं मन मोकळं करून घेतलं . बघता बघता आशुतोषलाही  स्वतःला सावरणे कठीण झाले.  तो मनोमन ही सर्व स्थिती सुधारेल अशी प्रार्थना करत होता परंतु डॉक्टरांनी त्याला फक्त दोन तीन दिवसांत ऑपरेशनसाठी आर्थिक तरतुदीसाठी मुदत दिली.   शेवटचा   आशेचा किरण त्याला मृगजळासारखा  दिसला होता.

 ऑपरेशननंतर मात्र दोन महिन्यांनी तिला घरी नेण्याची परवानगी दिली. मुलांना खूप आनंद झाला; परंतु हा आनंद क्षणिक ठरेल, याची भिती आशुतोषला होती आणि ती खरी ठरणार हे डॉक्टरांच्या निर्णयावरून पक्की झाली. शेवटचे काही दिवस आनंदात मनाप्रमाणे जावे म्हणून रसिकाला घरी नेले. तिच्या शारीरिक स्थितीत हळूहळू सुधारणाही झाली; पण विजण्याच्या आधी दिवा प्रज्वलित  होतो.  त्याचप्रमाणे  झाली रसिका आशुतोष यशस्विनी अजिंक्य यांनी जास्तीत जास्त वेळ एकत्र घालविला. रसिका सोडली तर बाकी सर्वांना आपापल्या कामानिमित्त बाहेर पडावे लागेल, तरीही रसिका बरोबर कोणी एकजण राहील, याची पुरेपूर काळजी ते घेत. तिच्या बरोबर जो कोणी राही तो तिचे मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करी. विविध चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, वेगवेगळी  नवनवीन झाडे लावणे हे छंद तिने जोपासले अबोलीचे रोप लावलेली कुंडी तर तिने अंगणातून उचलून बेडरुमच्या खिडकीत ठेवली.  अबोली बरोबर तिचे काहीतरी हितगुज झाले तिच्या प्रकृतीत कधी कधी अचानक बदल होई. आशुतोषला  येणारा प्रत्येक क्षण काय पुढे मांडून ठेवेल याची धास्ती वाटे,  अन् झालेही तसेच. काही दिवसांतच तिच्या जीवनाचा सूर्य अस्ताला  गेला.

 अन् मुलांच्याही जीवनात आईच्या ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण झाली. आई या शब्दाने नयनी अश्रू दाटू लागले. घराचे घरपण हरविले.खिडकीत रसिकाने ठेवलेली अबोली  मुकी होऊन शांतपणे उभी होती. तिच्यावर रोज मायेचा वर्षाव करणारे व पाणी घालणारे हात तिच्यापासून दूर गेले होते. तीही आता हळू हळू सुकू लागली. बहरलेली अबोली अबोल बनली होती.  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp
error: Content is protected !!