मालकीण
तालुक्याच्या गावाला मीटिंग होती. म्हणून रमा पटापट आटपत होती. तिला या गावात सरपंच होऊनही चार वर्षे झाली होती. खरंतर तिला हे पद घेतानाही मनात खूप धाकधूक होत होती. आपण पडलो बाईमाणूस. कधी घरातही आपल्याशिवाय काही अडत नाही. घरात स्वयंपाक सोडून कुठलंच कार्यक्षेत्र नव्हतं. मग असं मोठं पद आपल्याला पेलवेल का? परंतु शिवाजी रावांपुढं तीच काही चाललं नाही. महिला राखीव जागा, मग त्यांना स्वतःला पद मिळवण्यासाठी त्यांनी रमाला स्त्री स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. तू राजकारणात कशी योग्य. तुझ्यासारख्या महिलांमुळे देशाची प्रगती कशी होऊ शकते. या आणि इतर अनेक गोष्टी सांगून तिला बळेच बोहल्यावर चढवले होते.
गेल्या काही वर्षांपूर्वी शिवाजी रावांनी सरपंच हे पद भूषवले होतेच. फरक एवढाच रमा सरपंच झाल्यामुळे स्त्रियांची वर्दळ वाढली. मालकीण बाईंकडे काम असले तरी निर्णय मालकच घेत . बघता बघता चार वर्षे सरली. सभा, मोठ्या ऑफिसमधल्या साहेबांच्या मीटिंग, गावासाठी विकास योजना यांची तिला चांगलीच माहिती झाली होती. काही नाही तर मालकिणीकडे शेवटी का होईना सहीला कागद येई. दोन वर्षांपूर्वी सासुबाई गेल्या अन् रमावर सनवार, पाहुणे- रावळे यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तिला खऱ्या अर्थाने मालकीन व्हावे लागले. शिवाजी रावांच्या घरी वाडवडिलांपासून बागायती शेतीची परंपरा . लक्ष्मी घरी नांदत होती आणि घरंदाज घराण्याच्या प्रतिष्ठेमुळे रमाला नवीन असताना दबल्या सारखे होई पण पुन्हा ती या सर्व वातावरणात रूळली. एक दीड गुंठय़ाच्या वाड्याची व्यवस्था तिच्या एकटीच्याने होत नसे म्हणूनच तिने हाताशी सखूला घेतलं होतं.
तालुक्याला मघाशी झालेल्या मिटिंगची आठवण तिला झाली. मीटिंगला जाण्यापूर्वीच मिटींगमध्ये तू काही बोलू नकोस म्हणून शिवाजीरावांनी सांगितले होते. यावर रमा नाराज झाली होती. मिटींगमध्ये बऱ्याच महिला सरपंच बोलतात ; पण आपल्यालाच मुभा नाही. रमाला आपणही आपला एखादा विचार मांडावा असे वाटे. परंतु दुसऱ्यांना त्रास द्यायला तिला आवडत नसे. कुणाच्या गाडीवर ती केव्हाच बसली नव्हती. ते तिच्या तत्वात बसत नव्हतेच. गावामध्ये वातावरण बरोबर नाही, नको त्या विषयांची चर्चा.
‘आपण खेडेगावात रहातो, अमेरिकेत नाही. जमत नसेल तर जायचंच नाही मिटिंगला.’
मागे झालेले सर्व प्रकरण तिला डोक्याला तापदायक ठरले. तेव्हापासून शिवाजीराव किंवा सखू यांना बरोबर घेतल्यावरच ती परगावी मिटिंगला जाई. नाही म्हटलं तरी खेडेगावात थोडी लोकसंख्या, लोकवस्ती कमी, त्यामुळे कोण कुठं, कशासाठी कोणाबरोबर जातं. याची बातमी पारावर बसून बरेचजण घेत असतात.
आजच्या मिटिंगमध्ये बऱ्याचजणांना आजकाल होऊ लागलेल्या त्रासाची चर्चा झाली होती. रमालाही हे पटत नव्हते, माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर होत नव्हता. कुणीही उठसूठ माहिती मागत होता. दररोजच्या कामात या एका कामाची भर पडे. काही वेळेस या अधिकाराचा योग्य प्रकारे योग्य माहितीसाठी वापर होत असला. तरी बऱ्याचवेळा विरोधी गटातील लोकांकडून एखाद्या ‘ क्ष’ व्यक्तिला तयार करून त्याच्याकरवी माहिती मागवली जात होती. माहिती देण्याविषयी कोणाची ना नसे; परंतु अशा एक ना दोन. वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या पध्दतीची, प्रकारांची माहिती मागणाऱ्या चार-पाच व्यक्ती असत. त्यांना माहिती पुरवण्यासाठी ती गोळा करण्यातच बराच वेळ जाई. गेल्या महिन्यात विरोधी गटाने शिवाजी रावांना असाच वैताग दिला होता. हाच मुद्दा त्यांनी मिटिंगमध्ये रमा करवी मांडला; पण त्यात अधिकाऱ्यांनी उलट त्यांनाच सांगितले. कारण रस्त्यावरचा भिकारीदेखील तुम्हाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवू शकतो आणि तुम्हाला ती पुरवावीच लागते. या सर्व चर्चेवरून विरोधी गट आपल्या कामात नेहमीच लुडबूड करणार याच विषयावर रमाबरोबर चर्चा करत होते. चर्चा करताना ते बरेच त्वेषात होते. रस्त्याने अंधारही दाटला होता. त्यातून रस्ता बरोबर नव्हता. शिवाजीरावांच्या गाडीचा वेग बराच होता. सखू तर सीटचा आधार घेऊन जाम बसण्याचा प्रयत्न करत होती. बघता बघता अचानक मोठ्या दगडावरून गाडी उडून रस्त्याच्या कडेच्या खड्डयात घसरली. रमा, सखूला थोडे खरचटले ; पण गाडी शिवाजीरावांच्या बाजूने रस्त्याच्या खाली गेल्याने त्यांचे पाय गाडीखाली अडकले. जवळच असणाऱ्या वस्तीवरच्या लोकांनी आवाजामुळे, लाईटच्या प्रकाशामुळे घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मदत करून दवाखान्यात वेळेवर पोहोचवले. परंतु शिवाजीरावांचे पाय अधू झाले. मदत मिळाली; पण पुढील सारं पाहून रमाच्या अंगावर काटे उभे राहिले. तिला आपणच अधू झालो आहोत असे वाटू लागले.
राजकारणात मात्र रमाच्या कामामुळे ती थोड्याच दिवसात लोकप्रिय झाली. वाड्यावरची वर्दळ वाढली. मालकिणबाईंचा बराच वेळ लोकांसाठी खर्ची पडू लागला. गावातल्या बायकांना विविध योजनांमुळे लाभ मिळू लागला. रमाला आता सारे व्यवहार कळू लागले. तिला ‘ आदर्श सरपंच’ पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमासाठी सासरच्या सर्वांबरोबरच माहेरच्या सर्वांना तिने आमंत्रण दिले. याच कार्यक्रमात पुढेही याच सरपंचांना संधी देण्याविषयी एकमत झाले. तिच्या निर्णयक्षमतेमुळे तिच्याच काय पण गावाच्या, गावातल्या स्त्रियांच्या जीवनात प्रगतीची पहाट झाली. मालकिण खऱ्या अर्थाने मालकीण झाली.